অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चला शिक्षक होऊ या!

प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचं स्थान महत्त्वाचं असतं. ‌या नोकरीत मान आहे पण पैसे कमावण्याच्या फारशा संधी नाहीत, असा समज होता. पण स्मार्टपणे विचार केल्यास या करिअरमध्ये मान आणि पैसा दोन्ही चांगल्या मार्गाने मि‍ळवण्याचे अनेक पर्याय तुमची वाट पाहत आहेत.

शिक्षक कोणी बनावं?

विद्यार्थ्यांवर प्रेम, शिकवण्याची मनापासून आवड, न कळलेले सोपे करून, अधिक सोपे करून उदाहरणातून ज्याला समजावून सांगण्याची हातोटी उमजली आहे, तो नक्कीच आदर्श शिक्षक बनू शकतो. मुख्य म्हणजे माझ्या विद्यार्थ्याला कळत नाही, ही माझी जबाबदारी आहे, ही छोटीशी जाणीव सतत जागती असावी लागते. तीच जाणीव ज्यांच्या मनातून पहिल्या दहा वर्षांत संपते, ते बनचुके सर बनतात, तर ही जाणीव वाढवत नेणारे, विद्यार्थ्यांच्या हृदयात अढळ स्थान पटकावतात.

शिक्षक कधी व कसे बनावे?

मला शिकवायला आवडते, ही एक अनुभूती असते. माझ्या मित्र-मैत्रिणींना अडलेले मी सहजपणे समजावू शकतो, ते मला अडचणी विचारतात, हे ज्याला आवडते, लक्षात येते, त्याने या क्षेत्राचा जरूर विचार करावा.
शिक्षक बनण्याचे जुने पारंपरिक राजरस्ते आहेतच. उदाहरणार्थ, बारावीनंतर डीटीएड, चित्रकलेसाठी एटीडी, बीएड पदवी, बीएड पदवीनंतर एमएड व पदव्युत्तर पदवीनंतर नेट वा सेट देऊन शिक्षक बनणे; पण या रस्त्यांनी जाणारे बहुसंख्य या क्षेत्राबद्दल कडवटपणेच बोलतील; कारण संस्थाचालक, नोकरी, अस्थैर्य यांच्याशी सामना करताना त्यांची मानसिक कोंडी झालेली आढळते. यालाच जोड मिळत जाते, ती आर्थिक तारांबळीची. मग साऱ्याच शिक्षकी पेशावर ही कडवट साय पसरलेली पसरलेली दिसू लागते. ज्यांनी ही पारंपरिक वाट न पकडता काही विशिष्ट कौशल्ये आत्मसात केली आहेत, त्यांची मागणी, त्यांचे यश प्रचंड प्रमाणात वाढते आहे, हे लक्षात घ्या. अशांच्या वाटचालीवरच आता आपण एकेक क्षेत्र पाहात माहिती घेऊयात.

नर्सरी व केजी टीचर

अगदी छोट्या गावापासून मेट्रोपर्यंत पसरलेले इंग्रजी माध्यमाचे वेड आता सार्वजनिक आहे; पण त्याच वेळी याच माध्यमातून परिपूर्ण शिकलेली असंख्य चुणचुणीत मुले-मुली सामान्य मार्कांनी पदवीधर होत आहेत. या मुलांचे इंग्रजी हा अत्यंत मोठा प्लस पॉइंट त्यांनी लक्षात घ्यायचा आहे. बीपीओ, कॉल सेंटरवर धडका मारून दार सगळ्यांना उघडत नाही. उघडले, तरी ते आयुष्यभर झेपत नाही, हेही आता अनेकांना कळले आहे. मग अशांना हा सुंदर रस्ता आहे. वर्षभराचा माँटेसरीचा वा प्रायमरी टीचरचा कोर्स अनेक ठिकाणी आहे. अगदी पदवीदरम्यानसुद्धा तो पूर्ण होऊ शकतो. अन्यथा, पदवीनंतर स्कूल सायकॉलॉजीची पदविका अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. मात्र, यातील प्रगतीचे टप्पे व कौशल्ये नीट लक्षात घ्या. अस्खलित इंग्रजी, सोपे इंग्रजी, गप्पांतून इंग्रजी, इंग्रजी बडबडगीते यावर हातखंडाच हवा. घरी आई मराठीतून बोलणार, बाबा ऑफिसचे इंग्रजी बोलणार, अशा घरातील मुलांचे इंग्रजी सफाईदार बनवून देणा‍ऱ्या अगदी २६ ते ३६ वर्षे वयोगटातील शिक्षकांना सध्या प्रचंड मागणी आहे. सुरुवात व कायम काम एखाद्या नर्सरी वा केजीत व जोडीला तीन ते चार तास ट्युशन्स यातून मनाजोगती कमाई व आनंद दोन्ही मिळवणारे आज असंख्य आहेत.

प्रायमरी व सेकंडरी टीचर

डीटीएड व बीएड केल्याशिवाय या क्षेत्रात प्रवेश नाही, अशी आपली ठाम समजूत. त्यातच त्यांच्या पगाराबद्दल साऱ्यांची नाराजी दूर केल्यावर काय लक्षात येते? आज अनेक बीसीए, बीसीएस, नोकरी नसणारे कम्प्युटर इंजिनीअर व डिप्लोमा होल्डर आहेत. यातील महिलांची संख्या प्रचंड आहे. अनेकांनी फक्त गृहिणीपद नाखुशीने स्वीकारले आहे. या साऱ्यांना अनेक शाळांत असलेल्या कम्प्युटर लॅबमध्ये सन्मानाने काम उपलब्ध आहे. याच्यानंतरचा टप्पा म्हणजे गणिताच्या व सायन्सच्या पर्सनल ट्यूशन्स. प्रथम शाळेत शिरकाव, मुलांच्या आदरातून, त्यांच्या अडचणींवर तोडगे काढणारा टीचर अगदी तिसरी व सातवीपर्यंत अडणारे, पालकांच्या डोळ्यांत पाणी आणणारे गणित शिकवून लाडका शिक्षक बनतो. अशाला जोड देता येते, ती छोट्या छोट्या गणिती व्हिडिओची. खान अॅकॅडमीचे व्हिडिओ माहिती असलेले पारंपरिक शिक्षक अक्षरशः शोधावे लागतात, असा माझा अनुभव आहे; पण ज्यांना या खानची खाण सापडली आहे, त्यांचेच नव्हे, तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य ते बदलत आहेत. इतर 'दबंग'गिरीत अडकले आहेत. महाराष्ट्राबाहेरील अनेक टीचर आज मिडल ईस्ट, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इथल्या मुलांना इंटरनेटवरून होम ट्युशन्स देत आहेत व अक्षरशः शेकडो डॉलर्स कमावत आहेत, हे आपल्याला माहितीही नाही; पण त्यासाठी तिथल्या पुस्तकातील कंटेट व त्यांच्या रिलर्निंग पद्धती माहीत करून घेण्याची प्राथमिक गरज आहे.

अकरावी ते पदवीचे 'सर'

असंख्य इंजिनीअर, आयआयटीयन्स व डॉक्टर्स आज अकरावी-बारावीच्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेत आहेत. या साऱ्यांकडे अचंब्याने पाहणारे हजारो ज्युनिअर व सीनिअर कॉलेजचे सर वा प्राध्यापक आहेत. अशीच स्थिती सीए, सीएस, सीडब्ल्यूएच्या प्रवेश परीक्षांची आहे; पण या प्रवेश परीक्षांचा पेपर आपण कधी सोडवला आहे काय, असा एकच प्रश्न मी इथे मुद्दाम विचारू इच्छितो. माझ्या माहितीचे एक अत्यंत यशस्वी सर दर वर्षी 'कॅट'ची परीक्षा स्वतः देत असत. सुमारे दहा वर्षे हा सिलसिला चालू होता. 'आयआयएम'ची ही अत्यंत कठीण प्रवेश परीक्षा स्वतःला सोडवता येते का, कोठे कमी पडतो, नवीन पॅटर्न काय आहे, याचा त्यांचा ध्यास असे. हाच ध्यास घेतला, तर बारावीनंतरच्या सर्व स्पर्धा परीक्षा व पदवीनंतरच्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे उत्कृष्ट सर आज समाजाला हवे आहेत.

परकीय भाषा

फ्रेंच व जर्मनचे दिवस संपून एक तप झाले. मँडेरिन, जपानी, कोरियन, अरेबिक, स्पॅनिशचा जमाना चालू आहे; पण ना आमची कॉलेज बदलतात, ना पालक-विद्यार्थी. कोणत्याही बारावीनंतर यातील क्रॅश कोर्सस यू ट्यूबवरून सुरू करता येतात. आवडले, तर पदवीनंतर त्यातील डिप्लोमा मिळवता येतो. ऑडिओ-व्हिडिओ माध्यमातून घरबसल्या याचे अभ्यास होऊ शकतात. गरज एकच आहे, पदवी समकक्ष इंग्रजी चांगले हवे. या विषयातील शिक्षकांना मागणी वाढते आहे. मुख्य म्हणजे कामाकरता या देशात जाणारे वाढत आहेत; पण त्यांना तीन महिन्यांत किमान गरजा शिकवणारे उपलब्धच नाहीत.

लेखक :डॉ. श्रीराम गीत

स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स

माहिती संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 8/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate