অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जिल्हा परिषदांमध्ये भरतीसाठी आता ऑनलाईन परीक्षा…

जिल्हा परिषदांमध्ये भरतीसाठी आता ऑनलाईन परीक्षा…

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात इथल्या त्रिस्तरीय पंचायतराज संस्थांचे मोलाचे योगदान असून पंचायतराज व्यवस्थेमुळे ग्रामीण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था लोकाभिमुख झाल्या आहेत. या संस्थांना विकासाचे काम करताना विविध क्षेत्रातील मनुष्यबळाची नेहमीच आवश्यकता असते, त्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क-ड’ वर्गातील हजारो पदे राज्यभरातून भरली जातात. २००७ पूर्वी प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे आणि त्यानंतरच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती ही जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रिया राबवित होती, मात्र आता जिल्हा परिषदांमधील गट ‘क’ च्या पदांसाठी भरती प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेने करण्याचा निर्णय नुकताच ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या नव्या निर्णयावर टाकलेला हा दृष्टिक्षेप…

निर्णयप्रक्रिया ही गावपातळीवर व्हावी हा पंचायतराज व्यवस्थेचा हेतू आहे. केंद्रित सत्ता एका व्यक्तीऐवजी ती लोकांच्या हाती देण्याने सत्ता कधीच भ्रष्ट होत नाही म्हणून लोकांचा सहभाग असलेली सत्ता ही नेहमीच लोकाभिमुख असते. याच लोकाभिमुख प्रशासनाला अधिक गती देण्याचं काम करण्यासाठी पंचायतराज व्यवस्थेमध्ये कुशल, तांत्रिक-अतांत्रिक स्वरूपाचे मनुष्यबळ नियुक्त केले जाते.

जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदापासून ते ग्रामपंचायत स्तराच्या ग्रामसेवक पदापर्यंत हजारो संधी दरवर्षी राज्यात उपलब्ध होत असतात. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवेतून निवडला जातो तर त्यांना सहाय्य करणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी (उच्च-निम्नश्रेणी) हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेद्वारे निवडले जातात. या अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी आवश्यक विविध पदांवरील मनुष्यबळ हे आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेली निवड समिती हे स्पर्धा परीक्षेद्वारे करायचे मात्र आता वर्ग-३ च्या सर्व पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

जिल्हा परिषदेत भरतीसाठी आता ऑनलाईन परीक्षा..

• जिल्हा परिषदेत वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी यापुढे होणार ऑनलाईन परीक्षा

• खुल्या प्रवर्गासाठी ५०० तर मागासवर्गीयांसाठी २५० रुपये परीक्षा शुल्क

• एका उमेदवाराला एक किंवा अनेक संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्याची राहिल मुभा. परंतू प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक

• उमेदवारांना अर्ज करताना कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती हवी आहे, त्याबाबत त्यांना १ ते ३४ असे जिल्हा परिषदांसाठी द्यावे लागणार पसंतीक्रम

• प्रत्येक संवर्गाची गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) आणि त्या संवर्गासाठी न्यूनतम पात्रता गुण (कट ऑफ मार्क्स) प्रसिद्ध केले जाणार

• कट ऑफ मार्क्सनुसार निवडलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे मूळ जिल्ह्याच्या सीईओंमार्फत तपासली जाणार व त्याचा निकाल ऑनलाईन सॉफ्टवेअरद्वारे अपलोड केला जाणार. तपासणीअंती ज्या उमेदवारांची प्रमाणपत्रे सेवाप्रवेश नियमानुसार योग्य आहेत, त्यांना नियुक्तीसाठी पात्र ठरवणार

• नियुक्तीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची त्यांच्या पसंतीक्रम व गुणानुसार जिल्हानिहाय नियुक्तीची प्रथम यादी होणार घोषित

• प्रथम यादीप्रमाणे नियुक्ती झालेल्या जिल्ह्यात हजर होताना उमेदवारांना Freeze किंवा Float यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. Freeze पर्याय निवडल्यावर उमेदवाराला नंतर जिल्हा बदलायचा नाही त्याला ही नियुक्ती मान्य आहे असे ग्राह्य मानून अंतिम नियुक्तीपत्रे दिले जातील तर ज्यांनी Float हा पर्याय निवडला त्यांना द्वितीय यादीत प्राधान्यक्रमात असलेला जिल्हा मिळाल्यास प्रथम यादीत नियुक्ती मिळालेला जिल्हा सोडून त्या जिल्ह्यात जाणे मान्य असल्याचे ग्राह्य धरण्यात येईल.

• पहिल्या यादीत निवडलेले मात्र नियुक्तीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत त्यांच्या ऐवजी कट ऑफ मार्क्स प्राप्त व नियुक्तीसाठी पात्र तसेच पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांना त्यांच्या गुण व प्राधान्यानुसार ज्यांनी Float हा पर्याय दिला आहे त्यांची जिल्हा नियुक्तीची द्वितीय व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

• द्वितीय यादीतील यशस्वी उमेदवारांना नियुक्ती केलेल्या ठिकाणी हजर होऊन अंतिम नियुक्ती घेणे बंधनकारक राहणार आहे.

जिल्हा परिषदांमध्ये भरती केली जाणारी पदे –

• कृषि अधिकारी

• कनिष्ठ अभियंता

• विस्तार अधिकारी (कृषि)

• प्रयोगशाळा तंत्रज्ञ

• जोडारी

• कनिष्ठ यांत्रिकी

• तारतंत्री

• पर्यवेक्षिका (एकात्मिक बालविकास सेवा योजना)

• विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३

• औषध निर्माता

• वरिष्ठ सहायक (लेखा)

• आरोग्यसेवक (पुरुष)

• आरोग्यसेवक (महिला)

• कनिष्ठ आरेखक

• कंत्राटी ग्रामसेवक

• आरोग्य पर्यवेक्षक

• विस्तार अधिकारी (पंचायत)

• आरेखक

• स्थापत्य अभियांत्रिकी सहायक

• वरिष्ठ सहायक (लिपिक),

• कनिष्ठ सहायक (लिपिक) (लेखा)

• पशुधन पर्यवेक्षक

• विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

• लघुलेखक

• कनिष्ठ लेखा अधिकारी

या ऑनलाईन भरती प्रक्रियेमुळे जिल्हास्तरावर परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे आदी कामे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या यंत्रणेला करावी लागणार नाहीत, परिणामी वेळ व श्रम वाचण्यास मदत होणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे भरती पद्धती सुटसुटीत होण्यास निश्चितच मदत होईल.

लेखक: किशोर गांगुर्डे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate