অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पर्यटन क्षेत्रातील करिअर

पर्यटन क्षेत्रातील करिअर

ज्यांना मुक्त भटकायची, मनमुराद फिरायची आवड आहे अशांना पर्यटन क्षेत्रात करिअर करणे सहज शक्य झाले आहे. आवडच करिअर झाल्यास मिळणारा आनंद मोठा असतो. दळवळणाच्या सुविधा वाढल्याने मुक्तसंचार करणे आता सोपे झाले आहे. देशाच्या कुठल्याही प्रदेशात किंवा परदेश गमन करण्याकडे अलीकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. वर्षभरात पर्यटन या क्षेत्रात २५ टक्क्याने वाढ होते. पर्यटन व्यवस्थापन आणि नियोजन या अभ्यास शाखाही आता महाविद्यालयीन शिक्षणात आल्या आहेत. अनेक परदेशी पर्यटन कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. देशातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो आहे. सार्वजनिक आणि खाजगी स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने करिअरच्या या क्षेत्राचा घेतलेला आढावा खास करिअरनामासाठी

पात्रता

ट्रॅव्हल आणि टुरिझम या विषयात पदवीसाठी बारावी पास आणि पदव्युत्तर पदवीसाठी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे.

आवश्यक गुण

या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फिरण्याची आवड असायला हवी तसेच संवाद कौशल्य उत्तम असणे आणि दोनपेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व असायला हवे. काही परदेशी भाषा आत्मसात असल्यास खूप फायद्याचे ठरते. भौगोलिक प्रदेशांची उत्तम जाण असायला हवी. सहकार्यवृत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य असेल तर लोकांमध्ये पटकन एकरूप होणे सोपे होते. सामाजिक नितीनियमांचा आणि परंपरांचा आदर करणेही गरजेचे असते. त्याचबरोबर त्या देशाचा इतिहास, कला आदीची प्राथमिक माहिती हवी.

कोणत्या विभागात काम करू शकता?

निवास ,वाहतूक , अन्न, समारंभ, साहसी पर्यटन आदी सेवा देणारे हे क्षेत्र आहे. तुमच्या आवडीनिवडीनुसार यातील अनेक विभागात काम करता येईल.

संधी

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पर्यटन विभागात नोकरीच्या संधी मिळतात. पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातूनही अनेक पदे भरली जातात. सरकारी नोकरीत येण्यासाठी मात्र या विषयातील पदवीप्राप्त असणे गरजेचे आहे. तसेच अनेक परदेशी कंपन्यात संधीही आहेत. अनेक विमानसेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. खाजगी समूहात व्यवस्थापन आणि आदी बाबींसाठी उत्तम वेतनही मिळते.

पर्यटन विभाग

आरक्षण, विपणन, विक्री, नियोजन, मार्गदर्शन यासाठी अनेक जागा भरल्या जातात

माहिती साहाय्यक

हा उपलब्ध पर्यटनसंबंधी जागा आणि तिथे मिळणाऱ्या सेवांची तपशीलवार माहिती देण्याचे काम करतो. त्याच्या सहकार्यामुळे प्रवाशांना योग्य नियोजन करण्यास मदत होते.

गाईड(मार्गदर्शक)

पर्यटन मंत्रालय गाईडला मान्यता देते. प्रादेशिक, राज्य आणि स्थानिक असे तीन प्रकार त्यात पडतात. हा परवान्याचे दर दोन वर्षांनी नुतनीकरण करता येते. स्थळांची सविस्तर आणि इत्यंभूत माहिती देणे आणि सांस्कृतिक परंपरा आदीची माहिती देण्याचे काम गाईड करत असतो. त्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य असायला हवे कारण तो प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन मार्गदर्शन करत असतो. एकंदरीत गाईड हा महत्वाचा दुवा असतो.

टूर ऑपरेटर्स

हे प्रवासाचे संपूर्ण नियोजन करतात. टूर गाईड म्हणून अनुभव आल्यानंतर या पदावर काम करता येते.

ट्रॅव्हल एजन्सी

यांचे अनेक लोक ग्राहकांना एजन्सीशी जोडतात. आता ऑनलाइनही ग्राहक जोडता येतात. ग्राहकांशी संवाद साधून अनेक प्लॅन ते देत असतात आणि ग्राहकांना कंपनीशी संपर्क करून देतात.

हॉटेल क्षेत्र

पर्यटन आणि हॉटेल क्षेत्र या दोन्हींचा संबंध अनन्यसाधारण आहे. प्रवासात मुक्कामाची सोय करण्याचे काम एकमेकांच्या सहाय्याने केले जाते. यावर आकर्षक सवलती देऊन ग्राहक मिळवण्याकडे कल असतो. जवळजवळ एक लाख कुशल मनुष्यबळाची गरज या व्यवसायाला सध्या आहे.

विमान कंपन्या

विमान कंपन्यासाठी काम करणे ही वेगळा आनंद देणारी संधी असते. इतर व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्याने संधी मिळते. त्याचबरोबर आकर्षक वेतनही दिले जाते.

वाहतूक सेवा

पर्यटन व्यवसायाला वाहतूक सेवा मोठा हातभार लावत असते. अनेक खाजगी सेवा देणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. आरक्षण आणि आकर्षक सवलती तसेच पॅकेज देण्याचे काम या क्षेत्रातील लोक करतात. प्रवासासाठी वाहनांची उपलब्धताही मागणीनुसार करून दिली जाते.

वेतन

या क्षेत्रात पगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत पण हे उमेदवाराच्या योग्यतेवर अवलंबून असते. सुरवातीस पंधरा ते वीस हजारापर्यंत वेतन मिळते. अनुभवानंतर आकर्षक वेतन आणि पॅकेज मिळू शकेल.

काही प्रमुख उपलब्ध अभ्यासक्रम

• बॅचलर ऑफ टुरिझम अॅडमिनीस्ट्रेशन

• बॅचलर ऑफ टुरिझम स्टडीज

• मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन इन टुरिझम अँड हॉस्पीटॅलीटी मॅनेजमेंट

• एम.ए. इन टुरिझम मॅनेजमेंट

काही पदविका अभ्यासक्रम

• एअरलाईन टीकेटिंग

• एअरलाईन ग्राउंड ऑपरेशन्स

• ग्राउंड सपोर्ट अँड एअरपोर्ट मॅनेजमेंट

• गाईडिंग अँड एस्कॉर्टींग

• कार्गो मॅनेजमेंट

• एअरपोर्ट लॉजिस्टिक मॅनेजमेंट

मित्रहो पर्यटन जगताचा आवाका वाढतोय तसेच जगभरात हा व्यवसाय विस्तारतो आहे. तुम्हाला नवनवीन प्रदेश फिरायला आवडत असेल, नव्या जगाचा अनुभव घायचा असेल तर हे क्षेत्र भन्नाट आहे. लाखो नोकऱ्या यात उपलब्ध होत असून भविष्यात हे व्यापक होत जाणारे क्षेत्र आहे. वेगळं काहीतरी करण्याची आवड आणि उत्तम संभाषण कौशल्य असल्यास या क्षेत्रात आपण सर्वोत्तम यश मिळवू शकता. युवा वर्गाला आकर्षित करणाऱ्या अनेक संधी आता उपलब्ध आहेत मात्र गरज आहे ती कुशल मनुष्यबळाची तर मित्रहो तयार व्हा जगाच्या सीमा ओलांडण्यासाठी..

सचिन के. पाटील, ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate