অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फूड टेक्नॉलॉजिस्ट

फूड टेक्नॉलॉजिस्ट

तंत्रज्ञानाच्या अफाट विस्तारामुळे जागतिकीकरण वेगाने झालेले आपण पाहतो. बंदिस्त सीमा ओलांडून जग, विविध संस्कृती एकमेकांच्या जवळ आले आहेत. नवनवीन सवयी, आहार, संस्कृती यांचे अनुकरण करण्याचे प्रमाणही वाढले असून शहरीकरणाच्या या वेगवान चक्रात माणूसही गतिमान झाला आहे. व्यस्त दिनमानाच्या या युगात मानवानेही आपले राहणीमान आणि आहाराच्या सवयीही काळानुसार बदलल्या आहेत. आजचे जग हे फास्टफूडचे जग ओळखले जाईल इतक्या खाण्यापिण्याच्या सवयी संक्रमित झाल्या असून तयार डबाबंद, प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या खाण्याकडे तरुणाईचा कल असल्याचे दिसते. शीतपेयांच्या जाहिराती सर्वत्र झळकलेल्या आपण पाहतो अर्थात असे खाणे ही सवय आणि फॅशन बनली असून हे पदार्थ खात असताना त्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीतही लोक जागरूक आहेत. या सर्व बाबींचा विचार करता अनेक मल्टीनॅशनल कंपन्याही खाद्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. या क्षेत्राचा आवाका आणि विस्तार पाहता भविष्यात या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून नेमक्या कोणत्या संधी आहेत ? हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेवूया खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी..

पात्रता

या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा गणित या विषयासहित ५० टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण हवे. एमएस्ससी करण्यासाठी या विषयात पदवी असणे गरजेचे आहे. या विषयात खाद्यपदार्थ देखभाल, तपासणी, दर्जा, पॅकेजिंग, फ्रीजिंग आदी गोष्टींचा समावेश यात असतो. अभ्यासक्रमात पोषक तत्वांचा अभ्यास, फळे, मांस, वनस्पती आदी विषयी माहितीचा समावेश त्यात असतो.

व्यक्तिगत गुण

फूड टेक्नॉलॉजिस्ट बनण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. तसेच डेव्हलपमेंट, हेल्थ, न्युट्रीशन या विषयात रुची हवी. जबाबदारी पेलण्याची क्षमता, समूहात काम करण्याची तयारी, उत्तम संवाद कौशल्य असल्यास नोकरीत काम करणे सोपे जाते.

कार्य

विशेषतः पदार्थावरील प्रक्रिया म्हणजेच फुड प्रोसेसिंग या गोष्टीला फार महत्व राहते. उदा. लोणी, शीतपेये, फळांचा रस, बिस्किट्स, आईस्क्रीम आदीच्या गुणवत्ता, स्वाद, रंग-रुप, साठवणूक, टीकवणूक, स्वच्छता, आदी बाबतीत देखरेख करण्याचे काम फूड टेक्नॉलॉजिस्ट करतो. अगदी कच्चा मालापासून पदार्थ तयार होईपर्यंत त्याची भूमिका महत्वाची असते. जागतिक स्तरावर पदार्थांच्या गुणवत्तेला अतिशय महत्व दिले जाते. एका अर्थाने फूड टेक्नॉलॉजिस्ट हा कंपनीतील महत्वाचा घटक असतो.

संधी

हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर फुड इंडस्ट्री. पंचतारांकित हॉटेल्स, हॉस्पिटल, पॅकेजिंग इंडस्ट्री, शीतपेये फॅक्टरी, राईस मिल आदी ठिकाणी नोकरी मिळेल. प्रोडक्ट डेवलपमेंट, रिसर्चर, क्वालिटी एश्योर मॅनेजर, लॅबोरेटरी सुपरवायझर, फुड पॅकिंग मॅनेजर, फुड प्रोसेसिंग टेक्निशियन या पदांवर काम करता येईल. तसेच प्रशिक्षण संस्थात प्रशिक्षक म्हणून काम करता येईल.

वेतन

सुरुवातीस १५ ते २० हजारापर्यंत वेतन मिळू शकेल. अनुभवानंतर ३० ते ३५ हजार वेतन मिळते. व्यवसाय स्वरूपात काम केल्यास अधिक कमाई होऊ शकते.

उपलब्ध कोर्स

• बीएसस्सी इन फुड टेक्नॉलॉजी

• बीएसस्सी इन फुड न्युट्रिशन अँड प्रीजर्वेशन

• बीटेक इन फुड इंजिनिअरिंग

• एमएस्ससी इन फुड टेक्नॉलॉजी

प्रशिक्षण संस्था

• शिवाजी विद्यापीठ विद्यानगर, कोल्हापूर

• आदित्य फुड टेक्नॉलॉजी कॉलेज, बीड

• अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई

• एमआयटीसीएफटी लोणी काळभोर, पुणे

• महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ फुड टेक्नॉलॉजी, औरंगाबाद

• एमआयटी, पुणे

• राजीव गांधी फुड टेक्नॉलॉजी कॉलेज, परभणी

• राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

सचिन के. पाटील, संपर्क- ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 3/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate