অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विमा क्षेत्रातील करिअरच्या नवसंधी

विमा क्षेत्रातील करिअरच्या नवसंधी

लोकांची वाढती जागरूकता पाहता विमा उतरवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आजकाल ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विमा एजंट आपल्याला पाहायला मिळतात. व्यक्तीला आपल्या संवाद कौशल्याने प्रभावित करत लाखो रुपयांची पॉलीसी उतरविल्याचे अनेक किस्से आपण ऐकतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करता विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक नामांकित कंपन्या विमा क्षेत्रात कार्यरत असून आकर्षक योजनांच्या माध्यमातून परदेशी समूहही गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. विविधांगी कौशल्य असणाऱ्या मनुष्यबळाची गरज या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात भासत आहे. तसे पाहता एक्चूरिअल आणि ट्रेजरी मॅनेजमेंट यातील कौशल्य असणाऱ्यांची संख्या कमी असून कंपन्यांनी शैक्षणिक संस्थांबरोबर करार करून यातील अभ्यासक्रमांना उत्तेजना देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. देशात ५० हून अधिक विमा कंपन्या, ३०० हून अधिक विमा ब्रोकर कंपन्या, ५०० हून अधिक विमा कॉर्पोरेट एजंट विमा विक्री आणि सेवा यांचे काम करीत आहेत. मोठ्या प्रमाणात बँकांनीही विमा विक्रीचे काम सुरु केल्याचे दिसते. त्याचबरोबर अलीकडे मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्सनीही मेडिक्लेम सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या सर्व बाबींचा विचार करता या क्षेत्रात कशा पद्धतीने यशस्वी करिअर करता येईल याचा घेतलेला आढावा खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी..

पात्रता

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात करता येते. तसेच बीए (इन्शुरन्स) हा अभ्यासक्रम काही संस्थात उपलब्ध आहे. जे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण आहेत त्यांना बीएससी (एक्चुरीअल सायन्स) करता येईल. भारतीय जीवन बिमा निगम प्राधिकरण यांच्या वतीने परीक्षाही घेतली जाते. पदवी नंतर इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट कोर्सही उपलब्ध आहे. अर्थशास्त्र, गणित, वाणिज्य या शाखेतील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात चांगले काम करता येते.

आवश्यक गुण

उत्तम संवाद कौशल्य, प्रभावी जनसंपर्क, ग्राहकाला विषय समजावून देण्याची हातोटी, सचोटी तसेच कालानुरूप बदल स्वीकारण्याची तयारी असायला हवी. तसेच भविष्याचा अंदाज बांधण्याचे कौशल्य आणि दोनपेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व असल्यास फायद्याचे ठरते. त्याचबरोबर ग्राहकांचं मानसशास्त्र जाणून घेण्याची कला अवगत असेल तर उत्तमच.

कामाच्या संधी

देशात अनेक नामवंत कंपन्या कार्यरत आहेत. एक्चूरिज आणि ट्रेजरी मॅनेजमेंट या विषयातील लोकांना विशेष संधी आहेत. त्याचबरोबर मार्केटिंग आणि सेल्स यातही काम मिळू शकते. एजंट आणि मॅनेजर यांची भरतीही वेळोवेळी कंपन्यांकडून केली जाते. प्लॅनिंग अॅडवायजर, असिस्टंट अॅडमिनीस्ट्रेटीव्ह ऑफिसर, इन्शुरन्स सर्वेयर, रिस्क मॅनेजर, अंडररायटर, एक्चूरिज, इन्शुरन्स कन्सलटंट म्हणून संधी उपलब्ध आहेत. सरकारी विमा कंपन्यांमध्येही विकास अधिकारी म्हणून प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून नियुक्ती होते.

वेतन

या क्षेत्रात एजंट म्हणून काम करणाऱ्याची कमाई त्याने विकलेल्या पॉलीसीवर राहते. सुरुवातीस १५ ते २० हजारापर्यंत कमाई करू शकता. सेल्स मॅनेजर म्हणून काम केल्यास अधिक वेतन मिळते. अंडररायटर आणि एक्चूरिज यांना चांगले पॅकेज मिळते. अनुभवानंतर उत्तम वेतनाच्या संधी असतात.

प्रशिक्षण संस्था

प्रशिक्षण क्षेत्रात सर्वात जास्त अग्रणी असलेली संस्था ‘इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मुंबई’ ही आहे.

संकेतस्थळ- www.insuranceinstituteofindia.com

सिम्बोयसिस सेंटर ऑफ डीस्टन्स लर्निंग पुणे

लेखक: सचिन के. पाटील, संपर्क- ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate