अलीकडे तंत्रज्ञानाच्या स्फोटाबरोबर मानवी राहणीमानाचा दर्जाही सुधारला आहे. दळणवळणाची असंख्य साधने निर्माण झाल्याने या प्रदेशातून त्या प्रदेशात भ्रमंती करणे आता सहज शक्य आणि सोपे झाले आहे. अर्थात गेल्या काही वर्षात देशाला पर्यटनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पनात वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायालाही सुगीचे दिवस आले आहेत. पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय याचा अनन्यसाधारण संबंध आहे. तसे पाहता आपल्याकडे खवय्यांची संख्या जास्त आहे. हमखास सुट्टीच्या दिवशी हॉटेलात जाणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. दरडोई उत्पन्न वाढल्याने त्याच्या आवडीनिवडी तो जोपासू लागला आहे. अगदी कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, मालवणी, अस्सल आगरी, वऱ्हाडी, पंजाबी असे जेवणाचे प्रकार प्रसिद्ध आहेत. उत्तम पद्धतीने विविध पदार्थ बनवुन देणाऱ्या अनेकास खूप मागणी असल्याचे आपण पाहतो. फाईव्ह स्टार ते सेव्हन स्टार अशी ही हॉटेल इंडस्ट्री विस्तारत आहे. रोजगाराच्या अमाप संधी इथे उपलब्ध असल्याने जागतिक मंदीचाही परिणाम या क्षेत्रावर झालेला नाही. भविष्यात या क्षेत्रात अफलातून करिअरच्या अफलातून संधी असल्याने त्या अनुषंगाने या क्षेत्रातील इतर बाबींचा घेतलेला आढावा खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी..
पात्रता
बारावीनंतर या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. तसेच बारावीत इंग्रजी विषय अनिवार्य आहे. प्रवेशासाठी जेईई आणि महाराष्ट्र शासनाची एमएचसीईटी(हॉटेल मॅनेजमेंट) या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.
उपलब्ध कोर्सेस
• मास्टर / बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी
• मास्टर / बॅचलर ऑफ सायन्स इन हॉस्पीटॅलीटी अँड हॉटेल अॅडमीनीस्ट्रेशन
• डिप्लोमा इन हॉटेल अँड केटरिंग टेक्नॉलॉजी
• हाउसकिपिंग, वेटर, बेकरी, कुकरी (कमी कालावधीचे कोर्सेस)
कामाच्या संधी
या क्षेत्राची सद्यस्थिती उत्तम असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. नोकरीसाठी प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट पद्धतीने कॉलेज किंवा प्रशिक्षण संस्थाही प्रयत्न करतात. फाईव्ह स्टार हॉटेल्स, रेस्टॉरंट, एअरलाईन्स फुड सर्विस देणाऱ्या संस्था, हॉस्पिटल, कॉर्पोरेट कँटीन, मॉल्स, रेल्वे, शिपिंग तसेच फास्टफुड क्षेत्रातही नोकरी मिळू शकते. तसेच पुरेशा अनुभवानंतर स्वत:चा व्यवसाय सुरु करता येईल.
या विभागात तुमची गरज भासेल..?
फ्रंट ऑफिस, हाऊस किपिंग, फूड अँड बेव्हरेजेस विभाग, अकौंटिंग विभाग, सेक्युरिटी विभाग, बँक्वेट विभाग, बिझिनेस सेंटर, मार्केटिंग विभाग, इंजिनिअरिंग किंवा मेंटेनन्स विभाग. कल आणि आवडी निवडीनुसार कामाची निवड करता येते.
वेतन
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर १८ ते २२ हजारापर्यंत सुरुवातीस वेतन मिळू शकते. अनुभवानंतर चांगले आकर्षक पॅकेज मिळते. तसेच परदेशी गेल्यास उत्तम पगाराच्या संधी मिळतात. स्वतः व्यवसायात उतरल्यास अमर्यादित आर्थिक उत्पन्न मिळू शकते.
प्रशिक्षण संस्था
• इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लायड न्युट्रीशन, नवी दिल्ली
• इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लायड न्युट्रीशन, दादर, मुंबई
• पी. ओ. अल्टो पार्वोरिम बार्देज, गोवा.
• इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट औरंगाबाद
• रिझवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई
• कोहिनूर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी
• डी. वाय. विद्यापीठ मुंबई
• जी. डी. आंबेडकर, परेल मुंबई
• सिंहगड इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सिंहगड, पुणे
• क्वार्टर्स अॅकेडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनजवळ, भोपाळ.
लेखक: सचिन के. पाटील, संपर्क: ९५२७७७७७३२
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/7/2020