অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परीक्षेचे अभ्यासधोरण भाग - 2

एमपीएससी परीक्षेचे अभ्यासधोरण भाग - 2

एमपीएससी परीक्षेच्या अभ्यास धोरणातील शेवटची बाब म्हणजे योग्य नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होय. उपरोक्त साधनांची जमवाजमव केल्यानंतर अभ्यास व वेळेचे नियोजन ही बाब कळीची ठरते. त्यात परीक्षेचा विशिष्ट टप्पा, त्यातील अभ्यासक्रम व अभ्यासघटक, त्यांचे परीक्षेतील महत्त्व, त्यासाठी वाचावयाची संदर्भ पुस्तके, त्या-त्या अभ्यासघटकातील आपली पार्श्वभूमी व गती या सर्व घटकांना लक्षात घेऊनच अभ्यासाचे नियोजन तयार करावे. नियोजनाची आखणी करतांना प्रत्येक घटकाला रास्त महत्त्व दिले जाईल याची खबरदारी घ्यावी. 

आपल्या आवडीच्या विषयात वा अभ्यासघटकांसाठी अनाठायी वेळ दिला जाणार नाही हे पहावे. यादृष्टीने विचार करता प्रत्येक संदर्भ पुस्तकाचे किमान तीन वेळा वाचन होईल याची दक्षता घ्यावी. त्यासाठी पहिले वाचन, दुसरे वाचन आणि तिसरे वाचन याचे वेळापत्रक तयार करावे. यातील पहिल्या वाचनासाठी बराच कालावधी गरजेचा असतो. दुसऱया व तिसऱया वाचनासाठी आवश्यक कालावधी उत्तरोत्तर कमी होत जातो. उदा. पूर्वपरीक्षेसाठी चार महिन्याचा कालावधी निर्धारित केल्यास पहिल्या वाचनासाठी किमान दोन महिन्याचा कालावधी राखीव ठेवावा लागतो. त्यानंतर 40-45 दिवसात दुसरे वाचन आणि 20-25 दिवसात तिसरे वाचन करणे शक्य होते. 

वाचनाचे हे तीन टप्पे आणि त्यासाठीचा कालावधी निर्धारित केल्यास त्यातील प्रत्येक टप्प्याची विषय व त्यातील अभ्यासक्रमानुसार अंतर्गत विभागणी करावी लागते. उदा. पहिल्या टप्प्यातील 60 दिवसात पूर्वपरीक्षेतील एकंदर सहा अभ्यासघटकांचे वाचन करायचे आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक घटक व त्यावरील संदर्भसाहित्यासाठी द्यावयाचा कालावधीही ठरवावा आणि निर्धारित वेळेतच तो संदर्भ अभ्यासून पूर्ण करावा लागेल. अर्थात एखाद्या पूर्णपणे नव्या आणि अवघड विषयासाठी इतर घटकापेक्षा अधिक कालावधी देणे अत्यावश्यक ठरते.

अभ्‍यासाचे नियोजन

अभ्यास व वेळेच्या नियोजनात वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांसाठी दैनंदिन वेळापत्रकातील किमान दोन ते तीन तास कालावधी निर्धारित करावा. चालू घडामोडीची तयारी ही सातत्यपूर्णरीत्या केल्यासच त्यावर प्रभुत्व मिळवता येते. आपल्या नियोजनातील आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे प्रश्नपत्रिकांचा सराव होय. त्यासाठी सुरुवातीपासूनच विशिष्ट वेळ राखीव ठेवावा. प्रत्येक अभ्यासघटकातील संदर्भाचे वाचन झाल्यानंतर त्यावरील सरावप्रश्नांची नियमितपणे उकल करावी. विशेषत: दुसऱया व तिसऱया वाचनाच्या वेळी सरावप्रश्नपत्रिकांसाठी अधिकाधिक वेळ द्यावा. म्हणजे 10 तासातील 5-6 तास वाचन व उजळणीसाठी असल्यास उर्वरित 3-4 तास प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी वापरावेत. प्रश्नपत्रिकांच्या सरावामुळे आपल्या अभ्यासाची तपासणी करता येईल आणि त्यात परीक्षाभिमूखतेची हमी देता येईल. आपल्या तयारीतील त्रुटी लक्षात घेऊन त्या दुरुस्त करण्यावर जोर देता येईल. त्यामुळे अभ्यास म्हणजे केवळ वाचन नव्हे तर केलेल्या वाचनाची, अभ्यासाची उलटतपासणी म्हणजेच सराव प्रश्नपत्रिकांची उकल होय.

सर्वसाधारण विचार करता एका वर्षाचा कालावधी, दर्रोज 10-11 तास प्रभावीपणे वापरल्यास राज्यसेवेची संपूर्ण तयारी यशस्वीरीत्या करणे शक्य आहे. त्यातील 8 महिन्याचा कालावधी मुख्य परीक्षेसाठी आणि 4 महिन्यांचा कालावधी पूर्वपरीक्षेसाठी राखून ठेवावा. अर्थात आपल्या तयारीची सुरूवात मुख्यपरीक्षेच्या अभ्यासानेच करावी. सुरुवातीला मुख्यपरीक्षेचा अभ्यास केल्यानंतरच पूर्वपरीक्षेच्या तयारीला आरंभ करावा. या दोन्ही टप्प्यांची तयारी केल्यामुळे मुलाखतीचीही तयारी होते हे लक्षात घ्यावे. आणि मुख्यपरीक्षा दिल्यानंतर मुलाखतीपर्यंत जो कालावधी उपलब्ध होतो त्यात विशेषत्वाने मुलाखतीच्या तयारीवर भर द्यावा. अशारीतीने वर्षभराचे परीक्षा निहाय वेळापत्रक तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. नियोजनाची योग्य अंमलबजावणी होत आहे अथवा नाही यासाठी अभ्यासाचे नियमितपणे पुनरावलोकन करून त्यात वेळोवेळी आवश्यक दुरुस्त्या करण्यावर भर द्यावा. अशारीतीने नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण, नेमक्या व परीक्षाभिमुख अभ्यासधोरणाचा स्वीकार केल्यास यश प्राप्त करणे शक्य आहे यात शंका नाही.

लेखक : तुकाराम जाधव संचालक, द युनिक ऍकॅडमी, पुणे. 9850 9699 47

स्त्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 3/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate