शालेय जीवनापासून व्हॉलिबॉलची साथ, कधी छंद म्हणून कुंचल्याची याद, शेतकीचे शिक्षण घेऊनही आता ती सज्ज आहे सामान्यांच्या रक्षणासाठी... ही आहे किसरूळ (ता. पन्हाळा) येथील प्रिया नानासाहेब पाटील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिची नुकतीच पोलीस उपअधीक्षक (डीवाय.एस.पी.) पदी निवड झाली आहे.
प्रियाचे किसरूळ गाव अगदी दुर्गम भागात. कोल्हापूरपासून खूप दूर. आजही तिच्या गावात दिवसाला दोन ते तीन बस जातात. पण, अशा अडचणी कायम फिक्या ठरल्या कारण तिच्या आजोबांनी लहानपणीच मनावर बिंबवलेले प्रशासकीय अधिकाऱ्याचे वलय, चमक तिला सतत प्रोत्साहन देत होते. तिने जिल्हाधिकारी व्हावे, हे तिच्या अवघे चौथीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या आजोबांचे स्वप्न. त्याला खरी दिशा मिळाली ती कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना. तिचे बरेचसे सीनिअर्स हे शिक्षण घेऊन प्रशासकीय अधिकारी झाले होते. प्रिया विद्यार्थी परिषदेची प्रतिनिधी असल्याने या प्रशासकीय अधिकारी झालेल्या सीनिअर्सच्या सत्कारप्रसंगी त्यांच्याशी बातचीत व्हायची. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही एक दिवस असेच अधिकारी व्हायचे, ही जिद्द घेऊनच ती स्पर्धा परीक्षेच्या मैदानात उतरली.
आई, बाबा, लहान भाऊ आणि ती असे चौकोनी कुटुंब. प्रियाचे वडील कागलच्या डॉ.डी.आर. माने महाविद्यालयात पॅरामेडिकल कोर्सेसचे प्राध्यापक. आई गृहिणी. छोटा भाऊ इंजिनिअर. प्रियाचे प्राथमिक शिक्षण नेहरू हायस्कूल, राजारामपुरी येथे तर माध्यमिक शिक्षण शाहू हायस्कूल, कागल येथे झाले. विवेकानंद महाविद्यालयात अकरावी-बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर तिला कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. ॲग्रीकल्चरचे शिक्षण घेण्यात रस वाटला. त्यानंतर एम.एस्सी. ॲग्रीकल्चरचे शिक्षण हैदराबाद येथे झाले. एम.एस्सी. ॲग्रीसाठी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट ऑफ शुगरकेन ग्रोअर्स इन वारणा वायर्ड व्हिलेज या विषयावरील तिच्या प्रबंधाला सुवर्णपदक मिळाले. शाहू हायस्कूलच्या राज्यस्तरावर विजेत्या ठरलेल्या व्हॉलिबॉल टीमची ती सदस्य होती. बी. एस्सी. ॲग्री करताना राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवलेल्या टीमची ती कर्णधार होती. टीम लीड करण्याचा हाच गुण तिला आता शासकीय सेवेत उपयोगी पडणार आहे.
मेहनत, सातत्य, आत्मविश्वास आणि संयम ही आपल्या यशाची चतु:सूत्री असून, महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य, केंद्र शासनाच्या योजना, कुरूक्षेत्र यासारखी मासिके आपणास स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरली असल्याचे प्रिया पाटील सांगतात. लहानपासूनच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी मीरा बोरवणकर आणि प्रताप दिघावकर हेच आपले आदर्श आहेत. प्रिया लहान असताना बोरवणकर मॅडम कोल्हापूरला होत्या. तर प्रताप दिघावकर सरांच्या हातून आपल्याला बक्षीसही मिळाले आहे, असे प्रिया पाटील अभिमानाने सांगतात.
शेतीचे शिक्षण घेत असताना महाविद्यालयाच्या सीनिअर्सचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आपल्यासाठी उपयुक्त ठरल्याचे प्रिया आवर्जून सांगतात. मित्रपरिवारासोबत होणारा अभ्यास, हेल्दी कॉम्पिटिशन आणि ग्रुप डिस्कशनही महत्त्वाचे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सुरवातीला अगदी 12 ते 14 तास अभ्यास करावा लागत असे. यामध्ये पेपर वाचन महत्त्वाचे. सुरूवातीला द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस यासारखे पेपर वाचनासाठी 4 ते 5 तास लागायचे. पेपर वाचून नोटस् काढायचे. नंतर सवयीने हा वेळ कमी झाला. पेपरबरोबरच लोकराज्य, योजनासारख्या शासकीय प्रकाशनाचाही आपल्या यशात वाटा आहे, असे त्या सांगतात.
स्पर्धा परीक्षांसाठी क्लास फक्त दिशा दाखवू शकतात. सर्वसाधारणपणे स्पर्धा परीक्षेचे स्वरूप आणि त्याचा आराखडा यांची ओळख आपल्याला होते. पण, स्वतः केलेला अभ्यासच फायदेशीर ठरतो. दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. परीक्षेचे स्वरूप बदलत आहे. अवांतर वाचन, जनरल अवेअरनेस आणि कॉमन सेन्स यावर आधारीत प्रश्न परीक्षेत विचारले जातात. म्हणून कुठल्याची प्रश्नाचे विश्लेषण करायची सवय मनाला लावून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अनेक सोर्सेस शोधायला हवेत, असे प्रिया पाटील सांगतात.
स्पर्धा परीक्षेतील या यशामुळे आपल्याला लोकसेवेची चांगली संधी मिळाली आहे, याबद्दल समाधान व्यक्त करून प्रिया पाटील म्हणाल्या, या सेवेमध्ये माझ्या क्षमतांचा पूरेपुर वापर करणार आहे. महिला संरक्षण आणि ग्रामीण भागातील मुलींना स्पर्धा परीक्षेत येण्यासाठी प्रोत्साहीत करेन.
या सगळ्या प्रवासात आजोबांबरोबरच आई-वडील आणि पाठचा असूनही मोठ्या भावाची भूमिका बजावणारा आपला भाऊ या सगळ्यांनी खंबीरपणे साथ दिली, हे सांगताना प्रिया पाटील यांच्या मनाचा हळवा कोपरा अलगदपणे समोर येतो. आज एकीकडे मुलींची संख्या कमी होत असताना प्रिया पाटील यांच्यासारख्या कन्या समाजासाठी रत्न ठरतात. त्यांचे हे यश इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
-संप्रदा द. बीडकर
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर.
माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, १६ एप्रिल, २०१५
अंतिम सुधारित : 10/7/2020