অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कलाशाखा घटक : इतिहासची तयारी

कलाशाखा घटक : इतिहासची तयारी

महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम विविध सहा घटकांमध्ये विभागला आहे. अभ्यासासाठी आवश्यक श्रम व काठिण्यपातळीचा विचार करता कलाशाखा घटक हा इतर घटकांच्या तुलनेने सोपा ठरतो. पूर्वपरीक्षेत साधारणपणे या घटकावर विचारल्या जाणा-या प्रश्नांची संख्या ही 30-35 दरम्यान असते. स्वाभाविकच तुलनेने कमी श्रमात जास्त गुण देणारा घटक म्हणून कलाशाखा घटकाचा विचार करता येतो. अर्थात यात सर्वच प्रश्नांची उत्तरे अचूक कशी देता येतील यावरच लक्ष्य असावे.

कलाशाखा घटकाअंतर्गत "भारताचा विशेषत:
महाराष्ट्राचा इतिहास (1857-1990), महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य, भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यपद्घती,ग्रामप्रशासन हे पाच उपघटक येतात. प्रस्तुत लेखात पूर्व परीक्षेसाठी "इतिहास व समाजसुधारक घटकांची तयारी कशी करावयाची' याचा विचार करणार आहोत. पूर्व परीक्षेचा विचार करता या घटकावर विचारल्या जाणा-या प्रश्नांची संख्या ही 10-12 आहे हे लक्षात येते.

आधुनिक भारताचा इतिहास


अभ्यासकमामध्ये इतिहास या घटकाचा उल्लेख "भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास - 1857 ते 1990' असा आढळतो. या उल्लेखातून दोन महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होतात. एक म्हणजे विषयाची एकंदर व्याप्ती व दुसरी म्हणजे इतिहासातील अभ्यासासाठीचा निर्धारित कालखंड.' या घटकाचा अभ्यास करताना भारताचा इतिहास अभ्यासावा लागणार आहेच, पण त्यासोबत महाराष्ट्रातील घडामोडींही विशेषत्वाने अभ्यासाव्या लागतील. तसेच अभ्यासकमात जरी 1857 ते 1990 असा कालखंड नमूद असला तरी काही वेळा 1857 पूर्वीच्या घडामोडींवर देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे काही प्रमाणात त्या कालखंडातील काही घटकांची तयारी करावी लागते.

इतिहास या विषयावर प्रश्न विचारतांना भारतातील युरोपीय सत्तांचे आगमन, बिटिश सत्तेची स्थापना, बिटिश प्रशासन; 1857 चा उठाव व अन्य शेतकरी, आदिवासी उठाव; सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळी, राष्ट्रवादाचा उदय, बंगालची फाळणी, असहकार, सविनय, भारतछोडो आंदोलन; आझाद हिंद सेना, स्वातंत्र्यलढयाच्या काळातील वृत्तपत्रे, कांतीकारक चळवळी या घटकावर साधारणपणे प्रश्न विचारले जातात. आधुनिक इतिहासातील महत्त्वाच्या घटनानूसार वेगवेगळे टप्पे पाडावेत.  त्यातील सुधारक व्यक्ती, संस्था, त्यांचे कार्य यांचा अभ्यास करावा. बिटीश गव्हर्नर व व्हाईसरॉयची कारकिर्द, त्यांनी केलेली कामे, कायदे व त्यांच्या काळातील महत्त्वाच्या सामाजिक-राजकीय चळवळी इ. बाबींचा कोष्टक तयार करुन बारकाईने अभ्यास करावा. त्या शिवाय स्वातंत्र्योत्तर काळातील संस्थानांचे विलिनीकरण, भाषावार प्रांतरचना, शिक्षण सुधारणा यावरही प्रश्न विचारले जातात. प्रश्नांची संख्या व रोख पाहिल्यास एक बाब लक्षात येते की, अभ्यासकमाचा आवाका जरी व्यापक असला तरी प्रामुख्याने 1857 ते 1947 याच काळातील घडामोडींवर जास्त भर दिलेला असतो.

प्रश्नाचे स्वरुप

इतिहास या घटकावर विचारल्या जाणा-या प्रश्नाचे स्वरुप कसे असते? साधे. यात बहुतांशी सर्वसाधारण स्वरुपाचे थेट प्रश्न विचारले जातात.  उदा. "1857 चे स्वातंत्र्यसमर' गंथाचे लेखक कोण ? फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केली? सातार मधील प्रतिसरकार कोणत्या चळवळीच्या काळात स्थापन झाले होते? आर्य समाजाचे संस्थापक कोण? आर्य समाजाची स्थापना कधी झाली? प्रश्नांचे एकंदर स्वरुप पाहिल्यानंतर असे दिसते की इतिहास या घटकावर फारच कमी प्रश्न संकल्पनात्मक अथवा विश्लेषणात्मक स्वरुपाचे असतात. प्रश्नांचे स्वरुप "वस्तूनिष्ठ'च असते. तथापि आधुनिक इतिहासातील पायाभूत संकल्पना व त्यांचे विश्लेषण याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी. 

प्रश्नांच्या स्वरुपावरुन आणखी एक बाब स्पष्ट होते की दर परीक्षेमध्ये एखादाच प्रश्न तारीख, वर्ष अथवा सनावळ्या बाबत विचारला जातो. अनेक विद्यार्थ्याच्या मनात इतिहास म्हटले की  सनसनावळ्यांची भिती असते. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ही भिती दूर करण्यास सहाय्यक ठरते. तारखासंबंधी प्रश्न विचारतानाही 1857 चा उठाव, वंगभंग चळवळ, असहकार चळवळ, भारत छोडो आंदोलन, कांतीकारी संघटना, भारताची फाळणी इ. निवडक बाबींवर भर दिलेला दिसतो. सततच्या वाचनानंतर या तारखा व वर्षे आपोआप स्मरणात राहतात. त्यामुळे सनावळ्यांची अनाठायी भिती बाळगण्याची गरज नसते व नाही.

इतिहास विषयाचा अभ्यास करताना प्रथम या विषयातील प्रकिया समजून घेण्यावर भर द्यावा. त्यानंतर व्यक्ती, स्थल व काल या वस्तूनिष्ठ बाबींची तयारी करावी. विषयाची समज एकदा पक्की झाली की मग उरतात फक्त घटीते. त्यांचे सतत वाचन  केले की या विषयाची तयारी चांगली होते. जरी परीक्षेत प्राय: वस्तूनिष्ठ स्वरुपाची माहिती विचारली जात असली तरी अभ्यास करतांना व्यापक स्वरुपात करण्यावर भर द्यावा. त्या माहितीस विश्लेषणाची जोड दिल्यास अभ्यास आनंददायी व यशदायी ठरतो. इतिहासाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी ही दक्षता घ्यावी.

स्त्रोत : महान्यूज

 

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate