অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संघ लोकसेवा आयोगाच्या मुलकी सेवा परीक्षा

संघ लोकसेवा आयोगाच्या मुलकी सेवा परीक्षा

संघ लोकसेवा आयोगाच्या मुलकी सेवा परीक्षेकरिता दरवर्षी अंदाजे सहा लाख उमेदवार बसतात, हे जरी खरे असले तरी या परीक्षेला बसणारे सर्वच विद्यार्थी फार गंभीर असतातच असे नाही. बऱ्याचदा असे दिसून येते की, 70 टक्क्यांपेक्षा अधिक उमेदवार परीक्षेची फारशी तयारी न करताच परीक्षेला बसलेले असतात. त्यामुळे केवळ संख्येचा विचार करून या परीक्षेबद्दल भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. कुठलाही न्यूनगंड न बाळगता या परीक्षेची तयारी करावी.

संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेकरिता दरवर्षी अंदाजे सहा लाख उमेदवार बसतात आणि या सर्व उमेदवारांमधून अंदाजे 1200 उमेदवारांची अंतिमत: निवड केली जाते. या संख्येचा विचार करूनच बहुतेक उमेदवार या स्पर्धा परीक्षेला बसण्याचे टाळतात. या स्पर्धा परीक्षेसंबंधात बहुतेक उमेदवारांमध्ये विशेषत: महाराष्ट्रीय उमेदवारांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झालेला आहे. इतकी मोठी संख्या विचारात घेता आपली निवड कशी होणार, अशा प्रकारची नकारात्मक मानसिकता बऱ्याचशा महाराष्ट्रीय मुलांमध्ये दिसून येते. मात्र आपण हे लक्षात घ्यावे की, या परीक्षेला बसणारे सर्वच विद्यार्थी फार गंभीर असतात असे नाही. बऱ्याचदा असे दिसून येते की, 70 टक्क्यांपेक्षा अधिक उमेदवार परीक्षेची फारशी तयारी न करताच परीक्षेला बसलेले असतात. त्यामुळे केवळ संख्येचा विचार करून या परीक्षेबद्दल भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही.

संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेकरिता इंग्रजी विषयाचे खूप ज्ञान असणे आवश्यक नाही. मराठी भाषेतूनसुद्धा ही स्पर्धा परीक्षा देता येऊ शकते. या स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याकरिता खालील पाच गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे.

यशाची पंचसूत्री :

प्रवृत्ती

या स्पर्धा परीक्षेस बसणाऱ्या सर्व उमेदवारांची प्रवृत्ती सकारात्मक असली पाहिजे. सकारात्मक प्रवृत्ती याचा अर्थ जिंकण्याची प्रवृत्ती. दृढनिर्धार आणि सकारात्मक प्रवृत्ती या दोन्ही बाबी प्रत्येक उमेदवाराच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेची ही लढाई ‘मी जिंकणारच’ या मनोवृत्तीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणे आवश्यक ठरते. प्रयत्न करू, यशस्वी झालो तर ठीकच अन्यथा दुसरीकडे बघू, अशा प्रकारची प्रवृत्ती बाळगून चालणार नाही. कोणतीही लढाई ही फक्त जिंकण्याकरिताच लढली पाहिजे, हरण्याकरिता नव्हे, ही जाणीव प्रत्येक उमेदवाराने आपल्या मनात ठेवणे आवश्यक आहे.

कठोर परिश्रम

या परीक्षेची तयारी करण्याकरिता कठोर परिश्रमाची गरज आहे. केवळ superficial (वरवरती) अभ्यास करून चालत नाही. दररोज कमीत कमी 12 तास या पद्धतीने कमीत कमी 1 वर्ष अभ्यास केला तरच या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळू शकते. उमेदवार सर्वसाधारण दर्जाचा असेल तर त्यास दीड ते दोन वर्षेसुद्धा अभ्यास करावा लागतो. विद्यार्थी तर 3 वर्षेपावेतो अभ्यास करतात. अर्थात, हा कालावधी त्या उमेदवारांच्या क्षमतेवर अवलंबून असतो. एखादा उमेदवार फार हुशार असेल तर तो एका वर्षातसुद्धा तयारी करू शकतो.

अभ्यास आणि परीक्षेचे तंत्र

या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेकरिता योग्य अभ्यास तंत्र आणि योग्य परीक्षा तंत्र अवगत करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा असे दिसून येते की, योग्य तंत्र अवगत न झाल्यामुळे अभ्यासाची दिशा चुकते आणि पर्यायाने अभ्यास करूनसुद्धा उमेदवार यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे या परीक्षेच्या विषयांचे अभ्यास करण्याचे योग्य तंत्र उमेदवारांना माहीत असणे आवश्यक आहे. त्यासोबतच परीक्षेत उत्तरे लिहिण्याचे तंत्रसुद्धा अवगत असणे गरजेचे आहे. अभ्यासाच्या योग्य तंत्रामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे योग्य पुस्तकाची निवड आणि त्यासोबतच प्रत्येक पुस्तकातील कुठल्या बाबींना किती महत्त्व द्यावे याबाबतची माहिती.

बाजारात सर्वच विषयांची अनेक पुस्तके उपलब्ध आहेत, परंतु या अनेक पुस्तकांपैकी फारच कमी पुस्तके दर्जेदार आहेत. त्यामुळे या दर्जेदार पुस्तकांची नावे स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवाराला माहिती असणे आवश्यक आहे. बरीचशी दर्जेदार पुस्तके, मुंबई, पुणे व दिल्ली यासारख्या मोठ्या शहरात उपलब्ध आहेत. त्यामुळे लहान शहरातील आणि ग्रामीण भागातील उमेदवारांना ही पुस्तके मिळविण्यात अनेक अडचणी येतात. दर्जेदार पुस्तकांसोबत काही दर्जेदार मासिकांचे आणि दैनिकांचे वाचन करणे क्रमप्राप्त ठरते. केंद्र शासन तसेच राज्य शासनातर्फे दरवर्षी अनेक प्रकारचे अहवाल प्रसिद्ध केले जातात. या सर्व अहवालांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची आणि बिनचूक माहिती उपलब्ध असते. त्यामुळे अभ्यासाचे योग्य तंत्र विकसित करण्यामध्ये दर्जेदार पुस्तके, दर्जेदार मासिके, दैनिके आणि शासनाचे अहवाल या सर्वांचा योग्य प्रकारे उपयोग करणे आवश्यक ठरते.

एखादे पुस्तक कितीही दर्जेदार असले तरीसुद्धा त्यात सर्वच बाबींचा समावेश असेल असे नाही. त्यामुळे प्रत्येक विषयांसंबंधित 3 ते 4 दर्जेदार पुस्तकांचे वाचन केल्यास कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अधिक सर्वंकष आणि मुद्देसूद पद्धतीने लिहिणे शक्य असते. केवळ एकाच पुस्तकाचे वाचन केल्यास बरेचसे महत्त्वाचे मुद्दे सुटून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्पर्धा परीक्षा ही बाद पद्धतीवर आधारित असते. या स्पर्धा परीक्षेत पास किंवा नापास होण्याचा प्रश्नच नाही. जेवढ्या जागा उपलब्ध आहेत, त्या जागांमध्ये माझा क्रमांक कसा लागेल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे इतर उमेदवारांनी लिहिलेल्या उत्तरांपेक्षा मी लिहिलेले उत्तर अधिक चांगले असेल या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराने प्रयत्न करणे गरजेचे असते. पुस्तके आणि मासिकासोबतच इंटरनेटचाही नियमितपणे वापर करावा.

दृढ निर्धार

महाविद्यालयीन शिक्षणाचे पहिल्या वर्षापासूनच आपले करिअरबाबत निश्चित दिशा ठरवणे गरजेचे आहे. आपणास प्रशासनाबाबत विशेष आकर्षण असेल तर मुलकी सेवा परीक्षेच्या तयारीची सुरुवात पहिल्या वर्षापासूनच करा आणि त्याबाबत दृढ निर्धार करा आणि या दृढ निर्धारात गांभिर्य असणे गरजेचे आहे. केवळ औपचारिकता म्हणून दृढ निर्धार करू नये.

सखोल अभ्यास

या परीक्षेत विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या व्यक्ती या देशपातळीवरील मान्यताप्राप्त तज्ज्ञ असतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतील प्रश्नांचा दर्जा हा फार उच्च श्रेणीचा असतो. या स्पर्धा परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न विश्लेषणात्मक स्वरूपाचे आणि गोंधळात टाकणारे असतात. त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरे लिहिण्याकरिता विषयाचा सखोल अभ्यास असणे गरजेचे आहे.

मुलाखत

मौखिक परीक्षा ही एक व्यक्तिमत्त्व चाचणी आहे. आपले व्यक्तिमत्त्व सकारात्मक असले पाहिजे. शिवाय आपल्या विचारात स्पष्टता, मुद्देसुदपणा, पुरेसी कारणमीमांसा आणि तर्कसंगतता असली पाहिजे. आपल्या वर्तनात संयम, नम्रता आणि योग्य संतुलन असले पाहिजे.

परीक्षेची तयारी

संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा लेखी परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाते. 1. पूर्व परीक्षा 2. मुख्य परीक्षा.

परीक्षेची तयारी करताना या दोन्ही परीक्षांची वेगवेगळी तयारी करण्याची गरज नाही, सुरुवातीपासूनच मुख्य परीक्षेची तयारी केली जावी आणि शेवटचे 3 किंवा 4 महिने पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने तयारी करावी. पूर्व आणि मुख्य परीक्षा यामध्ये फक्त 3 महिन्यांचा कालावधी असतो. या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये मुख्य परीक्षेची तयारी होऊ शकत नाही. ही बाब विचारात घेता सुरुवातीपासून केवळ पूर्वपरीक्षेची तयारी न करता त्यासोबत मुख्य परीक्षेची तयारीसुद्धा केली जावी. या स्पर्धा परीक्षेचा दर्जा संबंधित विषयाच्या पदवी परीक्षेशी समकक्ष असेल असे जरी आयोगातर्फे सांगण्यात येत असले तरीसुद्धा प्रत्यक्षात या परीक्षेचा दर्जा हा पदव्युत्तर शिक्षणाच्या दर्जापेक्षा थोडा अधिक असतो, हे गृहीत धरूनच मुख्य परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे.

या स्पर्धा परीक्षेची तयारी खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्याशिवाय स्पर्धा परीक्षेला बसू नये. केवळ परीक्षा कशी असते याचा अनुभव घेण्याकरिता परीक्षेला बसणे नुकसानीचे ठरते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे आणि ती म्हणजे ही स्पर्धा परीक्षा ठरावीक संधीमध्येच उत्तीर्ण करावयाची असते. खुल्या संवर्गातील उमेदवाराकरिता एकूण 7 संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणतीही संधी विनाकारण व्यर्थ खर्ची पडणार नाही, याची दक्षता घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या काळात उमेदवारांमध्ये बराच उत्साह असतो; परंतु पुढे पुढे हा उत्साह कमी होत जातो. पहिल्या दोनतीन संधीमध्ये यश मिळाले नाही तर बरेचसे उमेदवार नाउमेद होतात आणि त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होते. अशाप्रकारे नैराश्य निर्माण झाल्यानंतर तो उमेदवार पुढच्या संधी उपलब्ध असूनसुद्धा परीक्षेची तयारी करू शकत नाही. पर्यायाने तो स्पर्धा परीक्षेची लढाई हरतो. त्यामुळे पूर्ण तयारी झाल्यानंतरच परीक्षेला बसावे आणि आपण पहिल्याच संधीमध्ये कसे यशस्वी होऊ, यादृष्टीने आपल्या अभ्यायाची रूपरेषा ठरवावी.

- कृष्णा भोगे,

माजी सनदी अधिकारी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate