অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रवर्तक

प्रवर्तक

प्रवर्तक : अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक. उत्पादनाच्या इतर घटक साधनांना म्हणजे जमीन, भांडवल, मानवी श्रम यांना योग्य परिमाणांत एकत्रित करून उद्योगधंद्यांतील धोका आणि अनिश्चिती पतकरून वस्तूंचे योग्य परिमाणात उत्पादन करण्याचे कार्य प्रवर्तक करीत असतो. प्रवर्तकीय कार्य म्हणजे एक प्रकारचे मानवी श्रम. परंतु अर्थव्यवस्थेच्या संचालनामध्ये प्रवर्तकाचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन प्रवर्तकाला स्वतंत्र उत्पादन घटक मानण्यात येते. प्रवर्तक म्हणजे केवळ संघटक किंवा व्यवस्थापक नाही. इतर उत्पादन साधनांची योग्य परिमाणांत योजना करून वस्तूचे योग्य परिमाणात उत्पादन करणे आणि उत्पादनसंस्थेचे कार्य चालविणे, ही कार्ये व्यवस्थापनात मोडतात. प्रचलित उत्पादनतंत्राचा वापर करून उत्पादनसाधनांच्या दिलेल्या किंमतींत वस्तूचा सरासरी उत्पादन परिव्यय कमीत कमी करणे, हा व्यवस्थापकाचा मुख्य उद्देश असतो. वास्तविक हे व्यवस्थापनाचे कार्य पगारी व्यवस्थापकाकडे सोपविता येते; परंतु हे कार्य प्रवर्तक आपल्याकडे घेऊ शकतो आणि त्याबद्दल त्याला व्यवस्थापकाप्रमाणे मोबदला मिळतो. तरीसुद्धा उत्पादनसंस्थेच्या कार्याचे सुसूत्रीकरण आणि समन्वय हे प्रवर्तकाचे प्रमुख काम नव्हे. प्रवर्तक आपल्या व्यवसायात स्वतःचे भांडवल गुंतवील व स्वतःची जमीनसुद्धा उपयोगात आणील. तरीसुद्धा तो भांडवलदार आणि जमीनदारही ठरत नाही. व्यवसायात गुंतविलेल्या स्वतःच्या भांडवलावर तो व्याज आकारील आणि जमिनीच्या वापराबद्दल खंड किंवा भाडे वसूल करील.

प्रवर्तकाचे खास कार्य म्हणजे उद्योग-व्यवसायांतील धोका आणि अनिश्चिती पतकरून साहस करणे, हे होय. कोणत्याही उद्योगधंद्यात उत्पादनसंस्था सुरू करून स्वतःचा फायदा करून घेणे, हा प्रवर्तकाचा आद्य हेतू असतो. विशेषतः भांडवलशाही अर्थव्यवस्था या लाभहेतूवर आधारलेली आहे, परंतु लाभाच्या अपेक्षेबरोबरच तोट्याचीसुद्धा शक्यता असते. कारण स्पर्धायुक्त अर्थव्यवस्थेमध्ये नेहमीच लाभ होईल, अशी निश्चिती नाही. उद्योगधंद्यांत तोटा होण्याचा संभव, त्यापासून निर्माण होणारा धोका आणि अनिश्चिती पतकरण्याची प्रवर्तकाची तयारी असावी लागते. उद्योगधंद्यांतील काही धोक्यांच्या बाबतीत विमा उतरविता येतो आणि विमा कंपन्या अशा प्रकारचे धोके पतकरतात. कारखान्यास आग लागते, गुदामातील माल चोरीला जातो, मालाची वाहतूक होत असता बोट बुडते, अशा धोक्यांच्या बाबतींत विम्याचे हप्ते वस्तू उत्पादन परिव्ययाचा भाग बनतात; परंतु उद्योग-व्यवसायांतील ज्या धोक्यांचा विमा उतरवता येत नाही, ते धोके आणि त्यांपासून निर्माण होणारी अनिश्चिती यांची जबाबदारी प्रवर्तकाला उचलावी लागते. अशा प्रकारचा धोका आणि अनिश्चिती पतकरण्याबद्दल जे उत्पन्न प्रवर्तकाच्या पदरी पडते, ते उत्पादन परिव्ययाचा भाग असू शकत नाही. ते अतिरिक्त उत्पन्न अनिश्चित असते. प्रवर्तकाच्या उद्योगधंद्यांतील अनुभवाच्या आणि कार्यक्षमतेच्या प्रमाणात त्याला प्रवर्तकीय कार्याबद्दल फायदा मिळतो किंवा कधीकधी तोटाही सहन करावा लागतो.

अर्थकारणातील काही घटनांवर प्रवर्तकाचे नियंत्रण नसते. ग्राहकाच्या आवडीनिवडी बदलतात, बाजारात वस्तूंचा पुरवठा एकाएकी प्रचंड प्रमाणात वाढतो, उत्पादनासाठी आयात करण्यात येणाऱ्‍या कच्च्या मालाच्या आयातीवर सरकार निर्बंध घालते, देशातल्या देशात उपलब्ध असलेला कच्चा माल सहजपणे मिळेनासा होतो, अनपेक्षित करवाढ होते. अशा प्रकारच्या अनेक अनिश्चित घटनांमुळे प्रवर्तकाला तोटा सहन करावा लागतो आणि प्राप्य सवलती, स्वस्त दरांत कच्च्या मालाचा पुरवठा आणि कमीत कमी किंमतीत इतर घटक साधनांचा भरपूर पुरवठा, वस्तूंच्या बाजारपेठेपासून अंतर आणि वाहतुकीचा खर्च या सर्व गोष्टींच्या संदर्भात उत्पादनसंस्था स्थापन करावी, हे तो ठरवितो. तसेच भविष्यकाळातील सर्वसाधारण किंमतींच्या पाळीतील व उत्पादनघटक साधनांच्या किंमतींतील बदल, प्रतिष्ठापनीय वस्तू आणि प्रचलित आणि भावी किंमती यांविषयी थोडाफार अचूक अंदाज बांधून प्रवर्तक आपल्या वस्तूचे स्वरूप, ठेवण, रंग, बाह्य आवरण आणि इतर गुणधर्म ठरवितो. भविष्यकाळातील वस्तूच्या किंमतींतील बदल, उपभोक्त्यांच्या बदलत्या आवडीनिवडी व फॅशन; वैज्ञानिक-तांत्रिक प्रगती; नवीन, अधिक उपयुक्त आणि उच्च प्रतीच्या प्रतिष्ठापनीय वस्तू बाजारात येण्याची शक्यता या गोष्टींबाबत यशाशक्य अंदाज बांधून प्रवर्तक आपल्या वस्तूचे स्वरूप व परिमाण ठरवितो. स्पर्धामय परिस्थितीत तो उत्पादित वस्तूंची मागणी कशी टिकून राहील किंवा वाढेल यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करीत असतो. म्हणजेच स्पर्धा कशी टाळता येईल किंवा तिला कसे तोंड देता येईल, हे तो पाहत असतो. म्हणून प्रवर्तकाला होणारा फायदा किंवा त्याचे अतिरिक्त उत्पन्न म्हणजे प्रवर्तकाच्या उद्योगधंद्यातील स्पर्धा टाळून आपल्या वस्तूची थोडीफार मक्तेदारी स्थापित करण्याच्या यशाबद्दल मोबदला आहे, असेही म्हटले जाते.

प्रवर्तकीय कार्य कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या चौकटीत जखडलेले नाही. या कार्याची आवश्यकता जशी स्पर्धामय अर्थव्यवस्थेत आहे, तशीच समाजवादी व साम्यवादी अर्थव्यवस्थांतसुद्धा आहे. भविष्यकालीन घटनांचा अंदाज बांधून उत्पादनाचे कार्य कोणीतरी, मग ती व्यक्ती खाजगी व्यवस्थापक मंडळ, भागीदारी, संयुक्त भांडवल मंडळ, सहकारी संस्था असो किंवा शासकीय व्यवस्थापक मंडळ असो, योग्य प्रकारे चालवून अतिरिक्त लाभ किंवा उत्पन्न तयार केले पाहिजे.

 

संदर्भ : 1. Schumpeter, y3wuoeph, History of Economic Analysis, Oxford, 1954.

2. Knight, F. H. Risk, Uncertainty and Profit, London, 1921.

लेखक - गो. चिं. सुर्वे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate