অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इस्लामी कला

इस्लामी कला

सातव्या शतकात इस्लामचा उदय झाल्यानंतर अरबांनी मुलुखगिरीस प्रारंभ केला व जिंकलेले सर्व प्रदेश एका सांस्कृतिक गटाखाली संघटित केले. अरबांना स्वत:ची अशी कलापरंपरा फारच थोडी होती; परंतु त्यांनी केलेल्या स्वाऱ्यांमुळे पर्शिया (इराण), सिरिया, ईजिप्त व मेसोपोटेमिया (इराक) या प्रदेशांतील अत्यंत समृद्ध कलापरंपरांशी त्यांचा निकटचा संबंध आला. ह्या सर्व प्रदेशांच्या संमिश्र प्रभावातून एक वैशिष्ट्यपूर्ण कला उदयास आली. तिला इस्लामी कला अशी संज्ञा आहे. स्पेनपासून भारतापर्यंतच्या विस्तीर्ण परिसरातील अनेक देशांत इस्लामी कलेचा विस्तार व विकास घडून आला. इस्लामी कला साधारणत: ८०० ते १६०० या कालखंडात विस्तार पावली. १७०० नंतर तिला उतरती कळा लागली.

पश्चिमी ख्रिस्ती कला ज्या अर्थाने धार्मिक म्हणता येईल, त्या अर्थाने इस्लामी कला कधीच धार्मिक नव्हती. ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी धर्मप्रसारासाठी बायबलमधील तसेच ख्रिस्तचरित्रातील प्रसंगचित्रे, अन्य संतांची प्रतिमाचित्रे (आयकॉन्स) व इतर धार्मिक प्रतीके यांच्या कलाविष्कारास प्रोत्साहन दिले.याउलट इस्लाम धर्माने क्वचित काही अपवाद वगळता कलेचा धर्मप्रसारासाठी प्रत्यक्ष उपयोग करून घेण्याचे नाकारले. एवढेच नव्हे, तर तसे करणे म्हणजे धर्माच्या मूळ रूपाला बाध आणणे होय, असा दंडक घालून दिला. केवळ एकदेवतावाद व ईश्वरा विषयी (अल्ला) ‘सृष्टीचा एकमेव निर्माता’ ही संकल्पना इस्लाम धर्माची मूलतत्त्वे होत. त्यांस अनुसरून इस्लामी ईश्वरशास्त्रवेत्त्यांनी सजीव प्राणिमात्रांच्या प्रतिमानिर्मितीस सक्त विरोध केला. कारण तसे करणे म्हणजे ईश्वरी अधिकारावर अतिक्रमण करणे, असे त्यांना वाटे. तथापि इस्लामी धर्मकल्पनांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष ठसा मात्र कलानिर्मितीवर उमटलेला दिसतो. उदा., एकीकडे ईश्वराच्या अनंतत्वाची धर्मकल्पना, तर दुसरीकडे क्षणभंगुर मानवी जीवनातील सान्ताचा अनुभव या द्वंद्वाचा एक प्रतीकात्मक आविष्कार ‘अरेबस्क’ नक्षीप्रकारात आढळतो. अरेबस्क आकृतिबंधात अखंडता व अनंतता असते. हा नक्षीप्रकार कधी संपत नाही वा पूर्ण होत नाही. केवळ अनंतामध्येच ज्याचे अस्तित्व सामावले आहे, अशा या नक्षीप्रकाराचे आंशिक चित्रीकरण एखाद्या वस्तुपृष्ठावर केलेले असते. हे आंशिक चित्रण सान्ताचे प्रतीक ठरते. इस्लाम धर्माच्या विशिष्ट स्वरूपामुळेही इस्लामी कलेला एक विशिष्ट वळण लागले. एक म्हणजे, इस्लामी सत्तेखालील प्रत्येक महत्त्वाच्या केंद्रस्थानी धार्मिक उपासनेसाठी प्रार्थनामंदिर असावे, म्हणून मोठ्या प्रमाणावर मशिदींची निर्मिती झाली. या मशिदी सामाजिक व राजकीय संघटनांचीही केंद्रे असत. त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींना एकत्र जमता यावे, म्हणून त्या प्रशस्त बांधल्या जात. तसेच प्रदेशवैशिष्ट्यांनुसार निरनिराळ्या ठिकाणच्या मशिदींत रचनाभिन्नत्व असले, तरी मिहराब (मशिदीतील कमानदार कोनाडा), मिंबर (मशिदीतील उंच चबुतरा), मनोरे यांसारखे काही घटक सर्वत्र समान असत. दुसरे असे, की इस्लाम धर्मातील प्रतिमाचित्रणाच्या निषेधामुळे इस्लामी कलानिर्मिती अन्य क्षेत्रांत विशेषत्वाने केंद्रित झाली. रंगरेषांचे विविधाकार, नक्षी-सजावटीच्या विविध व जास्तीत जास्त कल्पना, वेली-पर्णपुष्पांच्या आकारांतील तसेच भौमितिक आकारांतील सूक्ष्मता, विविधता, अप्रतिरूपता यांचा व त्याचबरोबर सुलेखन, वस्त्रकला, धातुकाम, काचकाम, मृत्पात्री, तक्षण-उत्कीर्णन यांसारख्या कलाप्रकारांचा इस्लामी कलावंतांनी विशेष विकास घडवून आणला. तिसरे म्हणजे कुराणाचे पावित्र्य व त्यातील संदेशाचे दैवी स्वरूप यांचा एक अप्रत्यक्ष परिणाम म्हणून मुस्लिम जगतात धर्मग्रंथाचे व इतरही ग्रंथांचे माहात्म्य वाढले. त्यामुळे सुलेखनकला, ग्रंथसजावट व ग्रंथबांधणी या प्रकारांचीही प्रगती घडून आली.

या धार्मिक प्रभावांबरोबरच मुस्लिमांच्या लौकिक जीवनासक्तीचा परिणाम इस्लामी कलेवर झाला आहे. इस्लामी खिलाफतीतील विलासी व कलात्मक जीवनाचे प्रतिबिंब धातूंचे जाळीदार दीप, कुशल विणकामाने विनटलेले भरजरी गालिचे, उंची वस्त्रप्रावरणे, मद्याच्या सुरया, अत्तरदाण्या, फुलदाण्या यांसारख्या वस्तुनिर्मितीत व त्यांवरील वैविध्यपूर्ण, सूक्ष्म व सौंदर्यपूर्ण सजावटीत दिसून येते. मूळच्या भटक्या अरब जमातींच्या कलेत सुरुवातीस गृहवास्तूंची अत्यंत प्राथमिक रचना आढळते. त्यांच्या वास्तूंमध्ये फर्निचर-प्रकारांचे प्रमाण अत्यल्प दिसते. मात्र विणकामाच्या कलेचा अत्युच्च विकास झाल्याचे आढळून येते.

इस्लामी कला ही मुख्यत: बाह्य सजावटींवरच अधिष्ठित असल्याने चित्रविषयापेक्षा चित्राकृतिबंधावरच तीत अधिक भर देण्यात आला. अलंकरण हा इस्लामी कलेचा गाभा. मशिदी व इतर वास्तू यांच्या भिंती, पेयपात्रे, पेट्या, भांडी, वस्त्रप्रावरणे व इतर उपयुक्त वस्तू यांवर अलंकरण केले जाई. इस्लामी कलावंतांनी वेलबुट्टीच्या आकृतिबंधांची नानाविध रूपे शोधली. खास इस्लामी अलंकरणप्रकार म्हणजे अरेबस्क होय. पाने, फुले, वेली यांच्या आकृत्या, प्रवाही रेषा इत्यादींतून समतोल नक्षी साधणारा हा रचनाप्रकार सु. नवव्या शतकाच्या अखेरीस रूढ झाला व सर्व मुस्लिम प्रदेशांतील कलाविष्कारात प्राधान्याने वापरला गेला. स्पेन येथील अल् हम्ब्रा प्रासादात अरेबस्क नक्षीप्रकाराचे उत्तमोत्तम नमुने आढळून येतात. इस्लामी अलंकरणाचा आणखी एक खास प्रकार म्हणजे भौमितिक आकृतिबंधांचा. ईजिप्त, स्पेन, तुर्कस्तान येथील कलावंतांनी तो विशेषत्वाने स्वीकारला. इस्लामी कारागिरांनी घुमटांवरील अलंकरणात हिमस्फटिकाकृती (स्टॅलेक्टाइट) अलंकरणाचा प्रभावी वापर केला.

सुलेखन कला

अल्लाने अरबी भाषेत मुहंमदांजवळ ईश्वरी संदेश प्रकट केला, अशी आख्यायिका आहे. कुराणाची भाषाही अरबी आहे. इस्लामधर्मीयांतकुराणाचे लेखन पवित्र कृत्य मानले जात असे. यामुळेच सुलेखन कलेचा उदय व विकास झाला. मशिदी वा अन्य धार्मिक इमारती, विविध वस्तू यांवर कुराणातीलसंदेश कोरले जात. हे लेखन विविध शैलींनी व सुंदर सजावटींनी आकर्षक करण्यात येई. सुलेखनात पुष्कळदा वेलबुट्ट्या व भौमितिक आकृत्या चितारल्या जात. धार्मिक निर्बंधामुळे मानव वा पशुपक्षी यांच्या आकृत्या टाळण्यात येत. एकांतरित उभ्या-आडव्या फटकाऱ्यानी लयबद्ध बनलेली अरबी लिपी जात्याच अलंकरणानुकूल होती. अलंकरणाच्या इतर प्रकारांतही इस्लामी कलावंतांनी तिचा कौशल्यपूर्वक वापर केला. अरबी सुलेखनाच्या ‘कूफिक ’व ‘नक्शी’ या दोन शैली प्रसिद्ध आहेत. कूफिक ही साधारणत: चौकोनी व अणकुचीदार वळणाची शैली असून कूफिक हे नाव कूफा (इराक) या गावाच्या नावावरून आले. त्या गावात उत्तमोत्तम सुलेखनकार रहात. इस्लामी सुलेखनकारांनी कूफिक शैलीचा वापर शिलालेखांसाठी व दहाव्या शतकापर्यंत कुराणाच्या लेखनासाठी केला. नक्शी ही गोलाकार, वक्र रेखाटनाची व अधिक प्रवाही शैली असून कालांतराने तिचाही कुराण  लेखनासाठी वापर होऊ लागला. कूफिक शैली प्रामुख्याने कुराणातील अध्यायांच्या (सूरांच्या) शीर्षकांसाठी वापरीत.

आलंकारिक कला

रग व गालिचे : सर्वांत प्राचीन रग रशियन मंगोलियात सापडतो. त्यावरील आकृतिबंध पर्शियन शैलीत असल्याचे उल्लेख आहेत (ख्रि. पू. चौथे शतक). ह्यावरून कारागिरीचा हा प्रकार इराणात फार पुरातन काळापासून चालत आला असावा. इस्लामी कारागिरांनी गालिचे विणण्याचा व्यवसाय विकसित करून त्यास कलात्मक स्वरूप दिले. हे कारागीर गालिचे विणताना उभ्या-आडव्या  धाग्यांत लोकर व रेशीम यांच्या आखूड धाग्यांच्या गाठी मारून गालिच्याचा पृष्ठभाग जाड व फरसारखा मऊ करीत, तसेच त्यावर अत्यंत समृद्ध अलंकरण करीत. काही उत्तमोत्तम रेशमी गालिच्यांच्या विणकामात एका चौरस इंचात (६·४५१६ चौ. सेंमी.) धाग्यांच्या पाच हजार गाठी असत. कधी कधी कारागीर त्यांवर सोन्याचांदीच्या तारांचे सुबक जरकाम करीत. पर्शियात कुशल विणकामाचे उत्तमोत्तम रग विपुल प्रमाणात निर्माण झाले. पर्शियन व भारतीय मुस्लिम विणकरांनी पर्णफुलांच्या नक्षी, वेलबुट्ट्या, वळसेदार रेषाकृती, अरेबस्क रचना, प्राचीन पदकाकृती व क्वचित प्राण्यांच्या सांकेतिक आकृत्या यांचा विणकामसजावटीत प्राधान्याने वापर केला. अनेक रगांचे आकृतिबंध बागांचे होते; तर काहींच्या सजावटीत वृक्ष, पुष्पवाटिका तसेच बदके व मासे यांचा अंतर्भाव असलेले तलाव इत्यादींनी विभूषित अशा पर्शियन उद्यानांच्या दर्शनी रचनाकल्पांचाच वापर करण्यात आला. तुर्की रगांच्या सजावटीत अप्रतिरूप व भौमितिक आकृतिबंधांचा वापर विशेषत्वाने आढळतो.

वस्त्रकला

मागावरील विणकामाची कला इस्लामी प्रदेशात अत्यंत विकसित झाली. आठव्या शतकापासून पुढे उत्तमोत्तम वस्त्रप्रावरणांचे नमुने आढळतात. पोशाख, पडदे, आच्छादने व तंबू यांतून इस्लामी वस्त्रकलेचा प्रत्यय येतो. अनेक वस्त्रांच्या विणकामात रेशमी धागे वापरले जात. इस्लामपूर्व इराणातील रेशीमकामात वापरल्या जाणाऱ्या आकृतिबंधांचा प्रभाव सुरुवातीस अधिक आढळतो. १२५० नंतर कारागिरांनी चिनी आकृतिबंधांचा वस्त्रकलेत वापर केला. १५०० व १६०० या काळात पर्शियन विणकरांनी तत्कालीन लघुचित्रांच्या प्रभावाने सजीवांच्या आकृतिरूपांचा वापर केला. यांखेरीज वस्त्रसजावटीत पर्णपुष्पांची नक्षी, भौमितिक रचना व कोरीव अरबी अक्षरण यांचा विशेष वापर होत होता.

धातुकाम

ब्राँझ व पितळ यांवरील उत्कीर्णन अथवा जडावकाम या प्रक्रियांतून इस्लामी कारागिरांनी निर्माण केलेले आकृतिबंध व कोरीव अक्षरण नमुनेदार आहे. या कारागिरांनी सोने, चांदी यांसारख्या मौल्यवान धातूंचा वापर क्वचितच केला. कारण इस्लाम धर्मात मौल्यवान वस्तूंचा संग्रह निषिद्ध मानला जाई. कारागिरांनी निर्मितीची मूलद्रव्ये म्हणून जे धातू वापरले;त्यांवर उत्कीर्णन, उठावकाम यांबरोबरच ‘निएल्लो-प्रक्रिये’चाही (काळ्या गंधकाच्या मिश्रधातूचे जडाव काम) वापर केला. मेणबत्तीची घरे, कुंड, पेट्या, उखळी, जलपात्रे इ. वस्तूंच्या वैशिष्ट्यपूर्ण निर्मितीवरून इस्लामी धातुकामाचा दर्जा कळतो. सु. ९०० ते १४०० या काळात धातुकामाची प्रगती झाली. इराकमधील मोसूल हे गाव जडावकाम केलेल्या ब्राँझ वस्तूंच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र होते. तसेच कैरो, दमास्कस, इराणचा पूर्व भाग ही धातुकामाची महत्वाची केंद्रे होती.

मृत्पात्री

इस्लामी मृत्पात्री कला ८०० ते १३०० या कालखंडात भरभराटीत होती. या क्षेत्रात इस्लामी कारागिरांनी निर्माण केलेली काही तंत्रे आजही वापरात आहेत. वस्तूला काच-द्रव्याचा मुलामा (ग्लेझ) देऊन दर्शनी चकाकी निर्माण करणे, हे लक्षणीय तंत्र इस्लामी कलावंतांनीच वापरले. या प्रकाराचा प्रारंभ बहुधा इराकमध्ये झाला असावा. वस्तूवर काच-द्रव्याचा मुलामा चढविण्यापूर्वी तिच्या पृष्ठभागावर इस्लामी कारागीर कोरीव नक्षीकाम करीत. या तंत्राचे अनुकरण पुढे बायझंटिन व इटालियन मृत्स्‍नाशिल्पकारांनी केले. तसेच इस्लामी कारागिरांनी पांढऱ्या काच-द्रव्याचा मुलामा दिलेल्या वस्तु-पृष्ठावर खनिज धातूंच्या रंगद्रव्यांनी चकचकीत चित्रे (लस्टर पेंटिंग) रंगविली. या तंत्राचा वापर मध्यपूर्व आशियात व स्पेनमध्ये ८०० ते १६०० च्या दरम्यान करण्यात आला. प्रबोधनकालीन इटालियन कारागिरांनीही हे तंत्र वापरले. भिंतीवर भौमितिक व अरेबस्क रचनांनी सुशोभित केलेल्या चकचकीत पातळ कौलांचा वापर केला जात असे. इस्फाहानमधील मशिदींच्या भिंती, घुमट व मनोरे यांत कौलांच्या सजावटीचा अप्रतिम वापर केला आहे. कौलांचे सजावटकाम ही प्राचीन पर्शियन कला आहे. तिचा वारसा इस्लामी कलेस लाभला.

गिलावा काम

स्पेनपासून तुर्कस्तानपर्यंत वास्तूंच्या सजावटीत अनेकविध आकृतिबंध आढळून येतात. इस्लामी कारागिरांनी इमारतींच्या भिंतींवर व कमानींवर साच्यांचा वापर करून ओल्या गिलाव्यात पर्ण-पुष्परचना, अरेबस्क आकृतिबंध, सुबक अक्षरण इत्यादींची सजावट केली आहे. स्पेन येथील अल् हम्ब्रा प्रासादातील भिंतींवर गुंतागुंतीच्या भौमितिक रचना, कोरीव अक्षरण व हिमस्फटिकाकृती आढळून येतात. भिंतीवरील हे सजावटकाम चुनेगच्चीत केले असून त्यावर सोनेरी रंगाचे सुशोभन आहे.

काचकाम

काचकामाचे नमुने मशिदींचे दिवे, पेयपात्रे, फुलदाण्या, खिडक्यांची तावदाने इत्यादींत आढळतात. प्राचीन काळापासून उपलब्ध असलेल्या काचनिर्मितीच्या तंत्राचा वापर इस्लामी कारागिरांनी केला. मीनाकारी तंत्र वापरून काचेवर अरेबस्क नक्षीकाम केले जाई. तसेच अशी नक्षी व कोरीव अक्षरण यांची गुंफण करून काचेवर उत्थित आकृतिबंधही तयार करीत. ७०० ते ११०० या कालखंडात इराक, इराण व ईजिप्त येथे काचकामाची भरभराट झाली. बाराव्या शतकात रंगीत मीनाकारीने सजविलेल्या काचपात्रांसाठी सिरिया प्रसिद्ध होता. इस्लामी वास्तुकारांनी अनेक इमारती व विशेषत: मशिदी, रंगीत काचेच्या तावदानांनी सजविल्या. तसेच लाकडी चौकटीत ओल्या गिलाव्यावर रंगीत काचतुकडे जडवून अलंकरण साधले. काचेवर चित्रित केल्या जाणाऱ्या आकृतिबंधांत वृक्ष व फुले यांचा समावेश असे.

तक्षण कला

इस्लामी कारागिरांनी काष्ठतक्षणाचा वापर दरवाजे, पेट्या, तक्तपोशी, काष्ठफलिका, मिंबर इत्यादींकरिता केला. त्यांत त्यांनी विपुल व अनेक तऱ्हेचे गुंतागुंतीचे आकृतिबंध उपयोजिले. त्यांनी भौमितिक आकारांतील मोकळ्या जागा दाट कोरीव अलंकरणाने भरल्या व पृष्ठभाग संपूर्ण नक्षीमय केले. या अलंकरणात त्यांनी हस्तिदंताचाही विपुल वापर केला. इतरही मौल्यवान वस्तूंमध्ये, विशेषत: स्पेन व ईजिप्त येथील पेट्यांत, त्यांनी हस्तिदंती तक्षणाचा वापर केला. यांखेरीज इस्लामी कलावंतांनी मशिदींचे कमानी दरवाजे व घुमट यांवर अरेबस्क व इतर नक्षीप्रकार खोदले. भारतीय इस्लामी कलेत संगमरवरी गवाक्षावरील तक्षणाचे उत्तमोत्तम नमुने आढळतात.

ग्रंथसजावट

इस्लामी कलेतील विख्यात लघुचित्रांचा उदय ग्रंथसजावटीतून झाला. प्रारंभीची उपलब्ध लघुचित्रे साधारणत: १२०० पासूनची आहेत. त्याकाळी फार्सी वाङ्‌मयाची परंपरा समृद्ध होती. अनेक काव्यग्रंथांचे सुनिदर्शन तत्कालीन कारागिरांनी केले. उदा., फिर्दौसीचे शाहनामा  हे महाकाव्य. इस्लामी सजावटकारांनी काव्यग्रंथांबरोबरच गद्यग्रंथांचीही सजावट केली. त्यांत बोस्ताँ  व गुलिस्ताँ  यांचा अंतर्भाव होतो. इतर लोकप्रिय सजावटपूर्ण ग्रंथांत कलीला  वादिमना (पंचतंत्राचे अरबी रूपांतर) उल्लेखनीय आहे. इस्लामी कलांवंतांनी मजकुराभोवती नानाविध वेलबुट्ट्या व इतर अलंकरण योजून कुराणाचीसजावट केली. वनस्पतीविज्ञान, प्राणिविज्ञान, वैद्यक इ. विषयांवरील अनुवादित ग्रंथांत सजावटीसाठी लघुचित्रांचा वापर करण्यात आला. बिहजाद व कमाल अद्-दिन यांसारख्या सुविख्यात चित्रकारांनी लघुचित्रण द्वारा हस्तलिखितांची सजावट केली.

ग्रंथबांधणी

इस्लामी ग्रंथ सुबक कातडी वेष्टनामध्ये बांधलेले असत. या वेष्टनाला घड्या असून पृष्ठांना आच्छादन म्हणून त्यांचा उपयोग होत असे. इराणी कारागीर ग्रंथबांधणीच्या प्रक्रियेत वरील मुखपृष्ठावर उत्थित आकृतिबंध व आतील आस-पास कागदावर (एंड पेपर) जाळीदार नक्षीकाम करीत. या प्रकारच्या ग्रंथबांधणींचे १४०० च्या सुमाराचे काही नमुने आढळतात. ग्रंथबांधणीचा हा प्रकार आजही उत्कृष्ट मानला जातो.

फर्निचर-प्रकार

मशिदी व घरे यांच्या भिंतींवरील समृद्ध अलंकरणामागे फर्निचर-प्रकारांचा अभाव हे कारण असावे. जमिनीवर बसण्याचा प्रघात व भटकेपणाची वृत्ती यांमुळे मुस्लिमांच्या वास्तूंत फर्निचर-प्रकार विशेषत्वाने आढळत नाहीत. घरातील भांडीकुंडी, काचसामान व इतर सामानसुमान ठेवण्यासाठी भिंतींमध्ये कोनाडे, फडताळी, वा लाकडी कपाटे असत. इस्लामी फर्निचरचा एक साधासुधा प्रकार म्हणजे छोट्या, बुटक्या, गोलाकार टेबलांचा. खाटांचा वापरही काही ठिकाणी होत असे. साधारणत: सतराव्या शतकानंतर खुर्च्यांचा अल्प प्रमाणात वापर सुरू झाला. कालांतराने इतरही फर्निचर-प्रकार येऊ लागले; पण पाश्चिमात्यांच्या मानाने ते प्रमाण अल्पच राहिले. मशिदीत कुराण  ठेवण्यासाठी कुर्सी (मेज) वापरण्यात येई.

चित्रकला

इस्लामी कलेत मानवाच्या वा पशुपक्ष्यांच्या ज्या आकृत्या व्यक्त झाल्या, त्या अत्यंत सांकेतिक शैलीकरणाने (‘स्टायलायझेशन’) काढलेल्या व अलंकरणघटक म्हणून योजिलेल्या असत. तसेच त्यांत त्रिमितीय प्रत्ययाचा अभाव असल्याने त्या निर्जीव भासत. इस्लामी चित्रकलेत वा रूपण कलेत काही प्रमाणात सजीव आकृति-रूपांची उदाहरणे आढळतात. इस्लामी गृहवास्तूंमधील खाजगी दालनात, विशेषत: स्‍नानगृहात वा जनानखान्यात, सजीवांच्या आकृत्या आढळतात. भित्तिलेपचित्रांत, प्रणयपर वा बोधपर ग्रंथात तसेच घरगुती भांडी, धातूची वा काचेची पेयपात्रे, बाटल्या इ. वस्तूंवरही ही प्राथमिक चित्रकला आढळते. उदा., ७१२–७१५ या दरम्यान उमय्या-अल्-वालिद याच्या प्रासादातील भित्तिलेपचित्रांतून जीवनाच्या तीन अवस्था, शिकारीचे प्रसंग, स्‍नान करणाऱ्या स्त्रिया, सिंहासनाधिष्ठित खलीफा इत्यादींचे चित्रण केले आहे.

उत्थित शिल्पकला

सेल्जुक कलावंतांनी रूपण कलापरंपरा पूर्व तुर्कस्तानातून आणली. ती मध्ये आशियातील बौद्ध कलेशी निगडीत आहे. कोन्या व बगदाद येथील शहरपन्ह्यावरील (सिटी वॉल) सिंह, गरूड, ड्रॅगन पक्षी, देवदूत इत्यादींची उत्थित शिल्पे आढळतात. साधारणत: अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत इमारतींची आढी व तुळ्या यांवर मानवी वा पशुपक्ष्यांच्या उत्थित शिल्पाकृती कोरलेल्या आढळतात. मोगल साम्राज्यकालीन फतेपुर सीक्री व दिल्ली येथील हत्तीच्या शिल्पाकृतींत भारतीय शैलीचा प्रभाव जाणवतो (सोळावे-सतरावे शतक). सिंह, हत्ती, पक्षी इत्यादींच्या सांकेतिक आकृत्या अल्प प्रमाणात दगड व ब्राँझ यांवर कोरलेल्या आढळतात. जलपात्रे, हुक्क्यासारखी धूम्रपान-उपकरणे यांना पशुपक्ष्यांचे आकार देण्याचीही प्रथा होती.

इस्लामी कलेतिहासातील महत्त्वाचे कालखंड

उमय्या कालखंड

(६६१–७५०). या काळातच प्रामुख्याने इस्लामी कलेची जडणघडण झाली. सिरिया व पॅलेस्टाइन येथे प्राचीन स्मारकांचे अवशेष सापडतात. महत्त्वाच्या धार्मिक वास्तूंच्या रचनांवर व कुट्टिमचित्रणावर ख्रिस्ती संस्कृतीचा ठसा आहे. या कालखंडातील वैभवशाली प्रासादांतील भित्तिलेपचित्रे व चुनेगच्ची-शिल्पे यांवर पूर्व इराणी व बायझंटिन कलांचे संमिश्र संस्कार जाणवतात.

अब्बासी कालखंड

(७५०–सु. १०५०). मोठमोठी नवनवीन इस्लामी महानगरे व सांस्कृतिक केंद्रे यांच्या उभारणीचा हा काळ. व्यक्तिगत शैलींचा व विशेष कर्तृत्वाचा प्रभाव या दृष्टीने कलेतिहासात हा काळ महत्त्वाचा आहे. समारा येथे सापडलेल्या सोने, चांदी, ब्राँझ यांच्या वस्तू, मृत्स्‍नाशिल्पे, लाकडी वस्तू, रेशमी वस्त्रप्रावरणे तसेच चुनेगच्चीचे शिल्पावशेष यांवरून तत्कालीन विलासी व वैभवसंपन्न काळाची कल्पना येते. अरेबस्क आकृतिबंधाचा विकास याच कालखंडात झाला. या काळातील दर्जेदार कलाकुसरीच्या वस्तूंमध्ये ईजिप्तमधील ब्राँझशिल्पे; ईजिप्त, स्पेन व सिसिली येथील हस्तिदंती वस्तू; ईजिप्त, इराक व पूर्व इराण येथील मृत्स्‍नाशिल्पे यांचा उल्लेख करता येईल. पूर्व इराणातील वस्तूंवर अधिक आकर्षक आकृतिबंध आढळून येतात.

सेल्जुक कालखंड

(सु. १०५०–सु. ११५०). या काळात धातुकाम व मृत्स्‍नाशिल्प या कलाप्रकारांत नवनवी तंत्रे उपलब्ध झाली. उदा., ब्राँझवरील चांदी-रुप्याचे जडावकाम, मृत्स्‍नाशिल्पावर रंगविण्याच्या नवनवीन पद्धती इत्यादी. धातुकामात दरबारी प्रसंगचित्रे व अरेबस्क आकृतिबंध यांची सजावट असे. सेल्जुक कालखंड पर्शियन कारागिरांच्या उत्कृष्ट मृत्स्‍नाशिल्पांचा काळ मानला जातो. भांड्यावरील गुंतागुंतीच्या रचना, तजेलदार रंग, दरबारी जीवनातील प्रसंगचित्रे, काव्यविषयांच्या आधारे केलेले प्रतिमाचित्रण तसेच चकचकीत कौलांची निर्मिती यांतून इराणी कलेचा विकास दिसून येतो. याच कालखंडात ग्रंथ-सुनिदर्शनाची कलाही भरभराटीत होती.

उत्तरकालीन इस्लामी कला

१२५८ मध्ये मंगोल स्वाऱ्यांमुळे इस्लामी जगताचे स्वरूप आमूलाग्र पालटले. त्याचे चार गटांत विघटन झाले व त्यांतील परस्परसंबंध काळाच्या ओघात दुरावत गेले. त्यांच्या कलांचीही वाढ स्वतंत्र रीतीने झाली.

अरबी कला

१२५८–१५१७ या कालखंडात वास्तुकलेचा विकास विशेषत्वाने झाला. कैरो येथील मामलूक स्मारकवास्तूंमध्ये संगमरवर, पाषाण, चुनेगच्ची यांच्या तसेच कुट्टिमचित्रांच्या सजावटीतील सौंदर्य अप्रतिम आहे. यांखेरीज या काळातील धातुकाम, काचकाम व लघुचित्रण या कलाप्रकारांची तांत्रिक गुणवत्ता उल्लेखनीय होती. अल् हम्ब्रा येथील वैभवशाली उद्याने व कारंजी तसेच विपुल अलंकरण इतके अप्रतिम होते, की त्याचे अनुकरण मध्ययुगीन ख्रिस्ती कलेत व कारागिरीत झाले.

इराणी कला

इराणी कलेचा अत्युच्च विकास साधारणत: १३०० ते १५०० या काळात झाला. इराणातील आलंकारिक कला व विशेषत: गालिच्यांचे विणकाम अप्रतिम होते. इराणी चित्रकलेच्या क्षेत्रात अनेकविध शैली विकसित झाल्या. लघुचित्रण  हा उत्तरकालीन मंगोल-इराणी कलेतील सर्वश्रेष्ठ व अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कलाप्रकार होय. या इराणी लघुचित्रणाची बीजे प्रारंभीच्या इस्लामी कलेत, तसेच चीन व मध्य आशिया येथील कलांत आढळतात. परंतु त्यांतील विषय, आकृतिबंधाच्या ठळक कल्पना व आदर्श हे फार्सी काव्यप्रकारांत आढळतात. इराणी चित्रकलेचा मागोवा त्यांतील वीरवृत्तीच्या व प्रेमवृत्तीच्या अनुषंगाने घेता येतो. तसेच वास्तववादी चित्रण आणि प्रतिमाचित्रण यांचेही ठळक प्रवाह इराणी चित्रकलेत आढळतात. सफाविद राजवंशाच्या काळात (१५०२–१७३६) या सर्व प्रवृत्तींचा उत्कृष्ट आविष्कार झाला आहे.

ऑटोमन कला

(चौदावे–पंधरावे शतक) ऑटोमन कलेचा उगम बायझंटिन, सेल्जुक व इराणी कलांच्या प्रेरणांतून झाला. या काळातील लघुचित्रांची शैली इराणी चित्रकलेच्या आदर्शांवर आधारित आहे. परंतु त्यांतील ऐतिहासिक विषय व वास्तव पार्श्वभूमी यांमुळे त्यांचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण ठरते. इराणी कलेतील आकारित परिपूर्णतेचा प्रत्यय ऑटोमन कलेत क्वचितच जाणवत असला, तरी तिच्यातून तेजस्वी इतिहासावरील धावते भाष्य व्यक्त होते. तुर्की समाजात मृत्स्‍नाशिल्प व काष्ठकाम यांचे अलंकरणही विशेषत्वाने आढळते.

मुस्लिम भारतीय कला

साधारण: पंधराव्या शतकानंतर भारतात इस्लामी कलेची निर्मिती होऊ लागली. इराणी व भारतीय कलापरंपरांचे सुरेख संमिश्रण हे या कलेचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. आग्रा येथील ताजमहाल हे या प्रकाराचे उत्तम उदाहरण. भारतीय लघुचित्रांवर इराणी चित्रशैलीचा विशेषत्वाने प्रभाव दिसून येतो. दरबारी प्रसंगचित्रे, ग्रंथांतील सुनिदर्शने व प्रतिमाचित्रे या इराणी चित्रप्रकारांचा विशेष ठसा भारतीय चित्रशैलीवर उमटला आहे.

इस्लामी कलेचे महत्त्व

स्पेनपासून भारतापर्यंत पसरलेल्या व जवळजवळ दहा शतकांची परंपरा असलेल्या इस्लामी कलेचे रसग्रहण करताना दोन महत्त्वाच्या घटना लक्षात घेणे आवश्यक आहे : (१) बहुतांश मुस्लिम कला ही मुख्यत्वेकरून राजदरबारातील अमीर-उमरावांच्या अभिरुचीवर पोसली गेली. त्यामुळे आदर्श व अद्‍भूतरम्यता यांचे मिश्रण इस्लामी कलेत आढळते. भव्य मशिदींच्या उभारणीमागे धर्मश्रद्धेबरोबरच, ज्या सम्राटांनी त्या उभारल्या त्यांच्या वैभवप्रदर्शनाचा उद्देश असे. इस्लामी कलावंतांनी वैभवशाली जीवन व त्या जीवनाची पार्श्वभूमी यांवर भर देऊन जी लौकिक कला निर्माण केली, ती श्रेष्ठ दर्जाची आहे. (२) इस्लामी कारागिरांनी तांत्रिक परिपूर्णता साधण्याचा प्रयत्‍न केला. कलेतील आकारिक संकल्पनांचा शोध घेण्यात ते उदासीन राहिले. सांकेतिक ज्ञापकांचा विविध प्रकारे वापर करण्यापुरत्याच त्यांनी परस्परांशी स्पर्धा केल्या. त्यामुळे बारीकसारीक तपशील व भिन्न भिन्न आशय-आकारांची जुळणी यांतच इस्लामी कलेचे वैशिष्ट्य प्रकट झाले. मुस्लिम विश्वाच्या बौद्धिक, सामाजिक व ऐतिहासिक परिस्थितीचा परिणाम कलानिर्मितीवर ढोबळ स्वरूपात झाला असला, तरी वर उल्लेखिलेल्या दोन घटकांनीच इस्लामी कलेची वैशिष्ट्ये व मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.

संदर्भ: 1. Dimand, M. S. A Handbook of Mohammedan Decorative Arts, New York, 1958.

2. Grube, J. E. The World of Islam, London, 1966.

3. Rice, D. T. Islamic Art, London, 1965.

4. Wilson, R. P. Islamic Art, London, 1957.

लेखक :श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate