অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घुमट

प्रस्तावना

अर्धगोलाकार किंवा लंबगोलाकार छप्पर. घुमट या अर्थी ‘डोम'’ हा इंग्रजी शब्द साधारणतः अठराव्या शतकापासून वापरात आहे. त्याची व्युत्पत्ती ‘डोमस’ (विशिष्ट घर; गर्भगृह) या लॅटिन संज्ञेमध्ये सापडते. अर्धकंदुकाकार किंवा पालथ्या कमळाच्या आकाराच्या वास्तुरचनेस ‘कुमुद’ म्हणतात. हिंदीमध्ये या रचनेस ‘गुंबद’ म्हणतात. कुमुद व गुंबद या दोन शब्दांचे मराठी रूपांतर ‘घुमट’ असे झाले. घुमटाच्या रचनेत आवाज सर्व बाजूंनी परिवर्तित होतो आणि एकाच ठिकाणी लहानमोठ्या प्रमाणावर एकामागे एक असे त्याचे प्रतिध्वनी येतात. आवाज घुमण्याच्या या प्रक्रियेस सार्थ अशीच ‘घुमट’ ही संज्ञा आहे. नाट्यगृहे, सभागृहे वगैरे ठिकाणी घुमटाची रचना सहसा करीत नाहीत; करावयाची झाल्यास फार दक्षता घ्यावी लागते. घुमटरचना जमिनीपासून पुष्कळ उंचीवर केल्यास आवाजाच्या घुमण्याचा उपद्रव टाळता येतो. ताजमहालाच्या घुमटात आवाजाचे प्रतिध्वनी किती वेळा होतात, ते आवर्जून दाखविले जाते. विजापूरच्या गोलघुमटात सूक्ष्म आवाज परावर्तित होऊन समोरच्या बाजूस स्पष्टपणे ऐकू येतो. घुमटाच्या कटिबिंदुरेषेजवळ तो येतो. खुद्द घुमटात जितका आवाज घुमतो; तितका खाली खोलवर घुमत नाही.

अगदी सुरुवातीस घुमटाची रचना जमिनीपासून गोलाकार भिंत घेऊन त्यावर करीत असत. तळात चौकोनी, षट्‌कोनी वगैरे आकारांची जमीन व त्यावर घुमट उभारण्याची कल्पना घोणाकार मेघडंबरीवरून सुचली. घोणाकार मेघडंबरीपैकी बाजूच्या कमानींच्या माथ्याचा वरचा भाग जमिनीच्या समपातळीत कापून टाकला, तर होणारा छेद वर्तुळाकार होतो. हा छेद व त्याखालील कमानी यांच्यामध्ये तिकोनी बाकदार भाग राहतो. त्यास त्रिकोणी पंखे वा त्रिकोणी बैठक (पेन्डेंटिव्ह) म्हणतात. वर्तुळाकार छेदावर उभारलेल्या घुमटाचे वजन चारी बाजूंच्या कमानींच्या माथ्यावर व पंख्यांवर येते. पंख्यांवरील वजन पंख्यांना आधारभूत असलेल्या कमानींवर येऊन अखेर चारी स्तभांवर पेलले जाते. पुण्याजवळ आळंदी येथील ज्ञानेश्वर-समाधीच्या बाहेरील खोलीवर ही पंख्यांची रचना केलेली आढळते. घुमटाची रचना जास्त उंचावर करण्याकरिता वर्तुळाकार छेदावर काही उंचीपर्यंत लंबरेषेत बांधकाम करून त्यावर घुमट बांधतात. त्यामुळे त्रिकोणी पंख्यांवर जास्त वजन येते; पण घुमट अधिक प्रेक्षणीय वाटतो. ताजमहालाच्या घुमटाची रचना अशी केली आहे. चौकोनी जागेवर मधील अष्टकोनाभोवतालच्या आठ कमानींवर आणि तितक्याच पंख्यांवर ताजमहालाच्या घुमटाचे वजन घेतले आहे. अष्टकोनी आकारामुळे पंख्यांचे क्षेत्र कमी होऊन कमानीचा आधार आठ ठिकाणी मध्यस्थाशिवाय मिळतो व म्हणून जास्त वजन सुरक्षितपणे पेलले जाते.

ऐतिहासिक आढावा

अगदी प्राचीन काळी म्हणजे साधारणतः इ. स. पू. ५५०० च्या दरम्यान झोपड्या, मातीची वा विटांची घरे यांवर छप्पर म्हणून घुमटाकाराचा वापर होत असे. चीनमध्ये शांग राजवटीमध्ये (इ. स. पू. सु. १७६६—११२२) थडग्यांसाठी घुमटाकाराचा वापर केला जात असे. तो हान राजवटीमध्येही (इ. स. पू. २०२—इ. स. सु. २२०) रूढ होता. भारतामध्ये इ. स. पू. सातव्या शतकापासून स्तूपासारख्या वास्तूंमध्ये घुमटाकाराचा वापर दिसून येतो. घुमटरचनेची कल्पना लाकडी बांधणीतून निर्माण झाली असावी; कारण सुरुवातीच्या घुमटांवर लाकडी बांधणीसारख्या फासळ्या काढलेल्या आढळतात.

जगातील सर्वांत जुना घुमट रोम येथील पँथीऑन (दुसरे शतक) या वास्तूवर बांधलेला आहे. त्याचा परिघ ४३·३ मी. असून त्याच्या अंतर्भागात छतावर खोलगट नक्षीदार तक्त्या आहेत. भारतातील विजापूर येथील गोलघुमटही जगातील अत्यंत मोठा घुमट मानला जातो. त्याचा परिघ ४३·८९ मी. आहे. या दोन्ही घुमटांची बांधणी चुना व विटा यांपासूनच केलेली आहे. रोमन वास्तुशिल्पज्ञांना चौकोनी, षट्‌कोनी किंवा अष्टकोनी बैठकींवर घुमट उभारण्याची कला अवगत नव्हती. मात्र नंतरच्या काळातील (सहावे शतक) बायझंटिन वास्तुकारांनी या प्रकारचे चौकोनी भिंतीवरील वर्तुळाकृती घुमट उभारले. बायझंटिन कालखंडात बांधलेल्या इस्तंबूल येथील ‘हागिया सोफिया’ (५३२—५३७) या वास्तूवरील घुमट रचनादृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. ट्रॅलेझचा अँथीमिअस व मायलीटसचा इझिडोरस या वास्तुशिल्पज्ञांनी या घुमटाची रचना केली. चार प्रचंड कमानींची भिंतींवर योजना करून हा घुमट उभारला आहे. त्याचा परिघ ३२·६१ मी. आहे. घुमटाच्या खाली एक मोठे दालन व बाजूला दोन दालने असून त्यांवर अर्धगोलाकार घुमटांची योजना केली आहे. त्यायोगे ७६·२ मी. लांब व ३२ मी. रुंद असा भव्य, लंबगोल दिवाणखाना निर्माण झाला आहे. चौरस दालनावरील आधारासाठी असलेल्या कमानी आणि वरील वर्तुळाकार घुमटाचा पाया यांमध्ये त्रिकोणी बैठकीचा वापर केलेला आहे.

प्रबोधनकाळामध्ये ब्रूनेल्लेस्की याने फ्लॉरेन्स येथील कॅथीड्रलवर भव्य घुमट उभारला (१४२०—३४). हा घुमट त्याच्या त्रिज्येपेक्षा जास्त उंचीचा व आठ फासळ्यांचा होता. या फासळ्यांना लाकडी पट्ट्यांचा आधार देऊन तिरकस रेटा घुमटाच्या पायाशीच थोपविला आहे. त्यामुळे वास्तूच्या भिंतीची जाडी कमी होते, हे या रचनेचे वैशिष्ट्य होय. मायकेलअँजेलोने रोम येथील सेंट पीटर्सच्या कॅथीड्रलवर उभारलेला घुमट (१५४६—६४) हे प्रबोधनकालीन घुमटरचनेचे दुसरे उत्तम उदाहरण. घुमटामध्ये आधारासाठी लोखंडी सळ्यांचा वापर अनेक ठिकाणी केला आहे. विटा आणि चुना यांची बांधणी, दुहेरी घुमटाचा वापर यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे या वास्तूला अंतर्बाह्य शोभा आली आहे.

घुमटाकार कलाकृतीं

फ्लॉरेन्सच्या कॅथीड्रलचा घुमट–ब्रूनेल्लेस्कीफ्लॉरेन्सच्या कॅथीड्रलचा घुमट–ब्रूनेल्लेस्कीवास्तूवर अनेक लहान घुमट व त्यांवर एक मोठा घुमट यांच्या योजनेने वास्तूची वास्तुशिल्पदृष्ट्या आकर्षक मांडणी, अनेक अक्षरेषांचे कलात्मक संयोजन, अक्षीय अवकाशाची भव्यता यांसारखी वैशिष्ट्ये साधली जातात. रोम येथील सेंट पीटर्स, आग्रा येथील ताजमहाल व जामी मशीद, लाहोर येथील बादशाही मशीद इ. या प्रकारच्या घुमटरचनेची उदाहरणे होत. घुमटाच्या योजनेने दालनातील अवकाशाला एक प्रकारचा भारदस्तपणा येतो. मायसीनी येथील एट्रीअसच्या थडग्यावरील (इ. स. पू. सु. १२००) घुमट अशाच प्रकारचा आहे. तसेच कित्येकदा सम्राटांनी वैभवप्रदर्शनार्थ, तसेच सत्तेचे प्रतीक म्हणून मोठे मोठे घुमट उभारले. सर्वसाधारणपणे छतावर खास शिल्पांकन वा कोरीव काम केल्याशिवाय तिकडे लक्ष वेधले जात नाही; पण घुमटाकार छताचे अस्तित्व दालनामध्ये प्रवेश करताक्षणीच ध्यानात येते. ह्याचा लाभ उठवून कलावंतांनी घुमटाच्या अंतर्भागात छतावर अनेक उत्तम चित्राकृती, कुट्टिमचित्रे, भित्तिलेपचित्रे रंगवली. बायझंटिन साम्राज्यातील ‘हागिया सोफिया’, रोम येथील सेंट  चर्च, व्हेनिस येथील सेंट मार्क चर्च, इंग्लंड येथील ऑक्सफर्डमधील शेल्डोनियन रंगमंदिर वगैरे वास्तूंची घुमटाकार छते अशा कलाकृतींनी सुशोभित केलेली आहेत.

मुसलमानांनी घुमटाचा वापर मशिदी, दर्गे, मदरसा, धर्मशाळा इ. वास्तूंसाठी केला. इस्लामी वास्तुकलेमध्ये घुमटरचनेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोमन व बायझंटिन संस्कृतींशी संबंध आल्यामुळे तुर्की व इराणी वास्तुकारांनी घुमटरचनेचा अंगीकार केला असावा. इस्फाहान, शीराझ इ. शहरांत घुमटाला शोभा आणण्यासाठी रंगीत लाद्यांचा वापर करण्यात आला. याउलट भारतात सर्व बांधकाम दगडामध्ये होत असल्याने प्रारंभीच्या काळात घुमटाच्या तळाशी व शिरोभागीच फक्त नक्षीकाम करीत व इतर भाग साधेच ठेवण्यात येत. ताजमहाल, फतेपुर सीक्री येथील सलीम चिश्तीचे थडगे, दिल्लीचा शीश घुमट यांवर कोणतीही नक्षी कोरलेली नाही. याउलट आग्रा व दिल्ली येथील जामी मशिदींच्या घुमटांवर नक्षीकाम आढळते.

भारतात अकराव्या शतकापर्यंत घुमटाचा फारसा वापर होत नव्हता; पण नंतरच्या काळात भारतीय राजे-महाराजे आपल्या वास्तूंमध्ये घुमटाचा वापर करू लागले. बांधणीच्या दृष्टीने घुमट व शिखर यांमध्ये बराच फरक आहे. घुमटाची बांधणी वर्तुळाच्या मध्यापासून पसरत जाणाऱ्या रेषांवर अवलंबून असते, तर शिखराचे स्थापत्य एकावर एक रचलेल्या दगडांपासून निर्माण होते. बौद्ध स्तूपांचा आकार जरी अर्धवर्तुळाकार असला, तरी ते भरीव आणि अस्थापतीय बांधकाम होते. घुमटरचनेत निर्माण होणारी जोराविजोरांची किंवा रेट्यांची समस्या महाबलीपूर येथील देवळांची शिखरे (सु. ६५०) किंवा तंजावर येथील देवालये (अठरावे शतक) यांच्या रचनांमध्ये उद्‌भवत नाही. चौदाव्या शतकात मुसलमानी संस्कृतीशी संबंध आलेल्या विजयानगर साम्राज्यामध्येसुद्धा घुमटाचा वापर आढळत नाही. भारतामध्ये दुहेरी घुमटाचा वापर प्रथम शिहाब उद्दीन ताज खानच्या कबरीवर करण्यात आला (१५०१). नंतर तो शिकंदर लोदीच्या कबरीवर केला गेला (१५१८). दुहेरी घुमटाच्या योजनेने अंतर्बाह्य आवश्यक अशी वास्तुतत्त्वे व परिमाणे सहज साधता येतात. ताजमहालासारख्या प्रसिद्ध वास्तूवर दुहेरी बांधणीच्या घुमटाचा वापर केला आहे.

आधुनिक घुमट

आधुनिक वास्तुविशारदांनी सिमेंट-काँक्रीट, लोखंड, पोलाद,  इ. माध्यमांचा वापर करून घुमट बांधावयास सुरुवात केली. पॅरिस येथील पँथीऑनचा घुमट (१७५७—९०) लोखंडी व पोलादी पट्ट्यांच्या चौकटी बनवून उभारला आहे. अमेरिकेतील ‘कॅपिटोल’ वास्तूवरील घुमटही (१८५१—६५) अशाच प्रकारचा आहे. आधुनिक काळात सिमेंट-काँक्रीटच्या घुमटरचनेसाठी हवा भरून फुगवलेल्या मोठ्या रबरी फुग्यांचा आधारादाखल उपयोग करण्यात येतो. अतिशय साध्या व अल्पकाळात उभारता येणाऱ्या घुमटरचनेचे उदाहरण म्हणजे बक्‌मिन्स्टर फुलर या वास्तुशिल्पज्ञाची अल्पांतरी (जीओडेसिक) घुमटरचना होय. माँट्रिऑल येथील जागतिक प्रदर्शनातील (१९६७) अमेरिकन दालनात या रचनेचे प्रात्यक्षिक दिसून आले. रोम येथील ऑलिंपिक सामन्यांसाठी (१९६०) प्येर नेर्वी या वास्तुविशारदाने १९५६-५७ मध्ये उभारलेला घुमटाकार क्रीडाप्रासाद जगप्रसिद्ध आहे.

संदर्भ : Smith, E. B. The Dome : A Study in the History of Ideas, Oxford, 1950.


फ्लॉरेन्सच्या कॅथीड्रलचा घुमट–ब्रूनेल्लेस्की

लेखक :गो. कृ. कान्हेरे,  भ. प्र.ओक

माहिती स्रोत :मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate