অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नायक-नायिका भेद

नायक-नायिका भेद

नाट्य-काव्य-शिल्पादी कलाविष्कारांमध्ये विशेषतः शृंगाररसाचा परिपोष साधण्यासाठी स्त्री-पुरुषांतील भावसंबंधातून निर्माण होणाऱ्या विविध अवस्थांची रसिकतेने चर्चा झालेली असून तीमधूनच नायक-नायिकांच्या कल्पना रुजल्या व विकसित झाल्या. या विषयावरील मूळच्या विस्तृत विवेचनास सुरुवात होते, ती भारताच्या नाट्यशास्त्रापासून. नाट्यगुणवैशिष्ट्ये सांगत असताना अभिनयदृष्ट्या भावदर्शनाची सीमा गाठता यावी, या हेतूने स्त्रीपुरुष-स्वभावांतील बारीकसारीक जागांचे सूक्ष्म परिशीलन नाट्यशास्त्रात केलेले आहे. नाट्यातील महत्त्वाची पात्रे म्हणून नायक-नायिकांच्या योजनांवर भाष्य करीत असताना मुख्य अष्टनायिकांचे स्वरूपवर्णन भरताने दिले आहे. त्यानंतर या मूळ कल्पनांवर आधारित व अनुसरून नायिकांच्या शृंगारपरिणत अवस्थांची व भेदोपभेदांची रसपूर्ण वर्णने करण्यात आली. अग्‍निपुराण, रुद्रभट्टाचा शृंगारतिलक, विश्वनाथाचा साहित्यदर्पण, धनंजयाचा दशरूपक, शारदातनयाचा भावप्रकाश, हालाची गाहा सत्तसई, भानुदत्ताची रसमंजरी अशा अनेक ग्रंथांतून अशी वर्णने आढळतात. नाट्याचा उगम सांगताना विचारात घेतलेली अर्धनारीनटेश्वराची प्रतिमा कलेची अधिष्ठात्री देवता म्हणून पूजिली जाते. त्या प्रतिमेतूनच कलेतील आदिनायक-नायिकांच्या पुरुषप्रकृतितत्त्वाची प्रतीकात्मक कल्पना येते. अर्धनारीनटेश्वरापासूनच नायक-नायिकांच्या भौतिक गुणांनी व वैचित्र्यांनी नटलेल्या भेदांची चर्चा सुरू होते.

धर्म व अर्थ याप्रमाणेच काम हा जीवनाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. म्हणूनच वात्स्यायनाने कामसूत्रातील स्त्रीपुरुषविषयक विचार भोगादी सुखावस्थांपुरते मर्यादित ठेवले नाहीत; उलट तत्कालीन समाजव्यवस्था व लैंगिक व्यवहार यांचा सुसूत्र समन्वय साधण्याच्या उद्देशातून ते मांडले. भार्या, कन्या, वेश्या इत्यादींची आवश्यक लक्षणयुक्त योग्यता, कामपूर्तीसाठी स्त्रीचे योग्यायोग्यत्व, भार्येचे पुत्रफलदायित्वादी गुण, स्त्रीपुरुषांची शंखिणी, हस्तिणी, चित्रिणी व शश, वृषभ, अश्व इ. वर्गीकरणे - अशा अनेक अंगांचे नियमनयुक्त विश्लेषण वात्स्यायन करतो. तथापि त्यात स्त्रीपुरुषांच्या नर्मभावांसंबंधी विशेष मीमांसा नाही.

प्रेमबंधात गुंतलेल्या स्त्रीपुरुषांच्या विकलतादी अवस्था व शृंगारचेष्टित प्रमाद हे विषय साहित्यात विपुल आढळतात. दांपत्य जीवनाचा विकास रती या शाश्वत स्थायीभावावर आधारित असतो; परंतु वैवाहिक बंधनापुरताच तो भाव मर्यादित नसल्याने स्वीया किंवा स्वकीया, परकीया, सामान्या अशा स्त्रीसंबंधविषयक साधारण वर्गीकरणातून नायिकांच्या अनेक भेदोपभेदांना वाव असतो. त्यात उत्तमा, मध्यमा, अधमा असे सत्त्वरजतमादी गुणांवर आधारित नायिकाभेद आढळतात. वयोमानानुसार मुग्धा, मध्या, प्रौढा असेही भेद केले जातात. उदा., पतीची परस्त्रीवर आसक्ती हे जिच्या दुःखाचे कारण आहे, अशी ‘खंडिता’ ही नायिका होय. तिचे मुग्धखंडिता व प्रौढखंडिता असे पोटभेद, पतीच्या परस्त्रीगमनाचे गौप्य तिला आकलन होणे वा न होणे यावर आधारित आहेत. प्रियकराच्या शरीरावरील नखक्षतादी चिन्हे कसली हा प्रश्न मुग्धेला पडतो, तर प्रौढा पतीमुळे आरसा धरून आपण गौप्य जाणल्याचे सूचित करते. अशा मार्मिक व प्रासंगिक वर्णनांमधून हा भेद रंगविण्यात येतो. प्रेमाच्या मार्गातील मीलनोत्सुकता, उपेक्षा, विभ्रम, विस्मय आदी मनोवस्थांमधून जात असताना ग्‍लानी, मोह, शंका, गर्व, मद, यांसारखे अनेक अनुभव नायिकेस येतात व फलस्वरूप वासकसज्‍जा, विप्रलब्धा, प्रोषितभर्तृका उल्का किंवा ऊत्कंठिता, किंवा प्रोषितपतिका, खंडिता, अभिसारिका असे नायिकाभेद निर्माण होतात. स्वीया, परकीया या नायिकांप्रमाणे नायकांचेदेखील पती, उपपती असे भेद केलेले आढळतात. शठ, धृष्ट हे स्वभाव; उदात्तता, व्यासंग, सात्विकता हे गुण, यांसारख्या उत्तममध्यमादी प्रवृत्तिलक्षणांना, अनुसरून नायकांची वर्गीकरणे केलेली आढळतात. या प्रेमिकांची साहाय्यक पात्रे म्हणजे दूती, नर्मसचिव इत्यादींचीही स्वभावगुणांनुसार निपुणिका, बिट, पीठमर्द, विदूषक अशी वर्गवारी केलेली दिसते. कोपलेल्या नायिकेस प्रसन्न करणारा पीठमर्द व विनोदचेष्टादिंद्वारा गंभीर प्रसंगी हास्य निर्माण करणारा विदूषक, हे काव्यनाटकांमध्ये वेगळाच रंग भरतात.

कालिदासाच्या मेघदूतातील विरहिणी-यक्षिणी व जयदेवाच्या गीतगोविंदातील विप्रलब्धा, कलहान्तरिता या प्रसिद्ध आहेत. कृष्णाशी आत्मलीन होणारी राधा ही एक विकसित नायिका होय. तिच्या द्वारे प्रेम व भक्तीच्या रसधारा स्त्रवतात. भारतीय चित्रांमध्ये, विशेषतः पहाडी शैलीत गीतगोविंद, रसमंजरी, रसिकप्रिया इ. काव्यांवर आधारित शेकडो चित्रे आढळतात. अंधाऱ्या रात्री सर्पकाट्यांची वाट तुडवीत, पावसातून भिजत संकेतस्थानाकडे मार्गक्रमण करणाऱ्या अभिसारिकेची प्रतिमा भारतीय चित्रकारांनी अमर केली आहे. उपवनामध्ये राधेची केशभूषा करणारा कृष्ण अशासारख्या चित्रांतून स्वाधीन पतिकेचे कौतुक भारतीय चित्रकारांनी रंगविले आहे. भारतीय संगीतातील विविध रागांवर आधारित पद्यरचनांमधून ठुमरी-टप्पादींच्या ढंगांनी हृदयाची व्याकुळ व्यथा सांगणारे सूर वातावरणात लय धरतात. मंडपमंदिरांवरील शिल्पांमध्ये चिरंतन उभ्या असलेल्या नायक-नायिकांच्या विविध शृंगारप्रतिमा मूक शब्दांनी आपल्याला कथा, प्रेमकहाण्या सूचित करतात.

आधुनिक साहित्य-कलांतून दिसणारी स्त्रीपुरुषपात्रे नायक-नायिका संज्ञेनुसार असली, तरी त्यांच्या भोवतालच्या कथाकल्पनांचे स्वरूप कालानुरूप बदलले आहे. मात्र प्रीतीच्या नैसर्गिक प्रेरणांतून निर्माण होणाऱ्या प्रेमिकांच्या विविध मनोवस्था व भावावस्था कालबाह्य होणार नाहीत. विरह असेल, मानवतींचे मान असतील, मीलनातील न संपणारे औत्सुक्य असेल, अज्ञात यौवनाच्या मुग्धत्वावर भाळलेली अनेक हृदये असतील, एखादा शाठ्य कलहान्तरितेचा राग घालविण्यासाठी युक्तियुक्त प्रयासात मग्‍न असेल, पुरुषप्रकृतीच्या गुणांनी नटलेल्या व्यवहारातील या नायक-नायिका विविध भावनांनी पुलकित होत जातील. त्यामुळे पारंपारिक नायक-नायिका भेदांना कालानुरूप नवे रूप येत जाईल.

लेखक : मृगांक जोशी

महिती स्रोत :मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate