অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पहाडी चित्रशैली

प्रस्तावना

हिमाचल प्रदेश आणि त्याच्या परिसरातील भाग हा पहाडी प्रदेश म्हणून ओळखला जातो. काही शतकांपूर्वी येथे छोटी परगणा राज्ये अस्तित्वात होती. प्रदेश डोंगराळ व दुर्गम असल्यामुळे बाहेरील जगाच्या संपर्कापासून काहीसा अलिप्त होता. इतरत्र वारंवार होणारी युद्धे व अस्थिरता यांपासून स्थैर्य मिळविण्यासाठी स्थलांतरितांचे प्रवाह येथे सतत येत असत. सतराव्या-अठराव्या शतकांत येथे राजाश्रयाखाली बरेच चित्रकार होते. त्यांची निर्मिती पहाडी कला या नावाने ओळखली जाते.

राजकीय संबंध

हिमालयाच्या शिवालिक, धौलाधार रांगांच्या मध्ये हा निसर्गसुंदर पहाडी प्रदेश आहे. अकबराच्या काळात मोगलांचा राजकीय संबंध येथील राजांशी आला. पहाडी राजांनी मोगलांच्या स्वामित्वाखाली निष्ठेने रहावे, म्हणून पहाडी प्रदेशीय राजपुत्र मोगल दरबारात ओलीस ठेवल्यासारखे रहात असत; तथापि त्यांना सन्मानपूर्वक वागवले जात असे. उच्चपदी नियुक्ती होणे, खास मर्जीतले म्हणून बादशहाकडून भेटी मिळणे, अशा प्रकारे शाही राहणीमानाचा प्रभाव पहाडी राजांवर साहजिकपणेच पडत गेला. त्यांचे मोगल कलाक्षेत्रातील चित्रकारांशी प्रत्यक्ष संबंध आले. स्वतःची व्यक्तिचित्रे त्यांनी रंगवून घेतली. पदरी चित्रकार असणे, ही त्या काळी भूषणाची बाब होती; तथापि उत्तम चित्रकार हे मोगल दरबाराचे मानकरी असत. पुढे औरंगजेबाच्या कलावंतांबाबतच्या अनुदार धोरणामुळे त्यांना इतरत्र आश्रयास जाणे भाग होते. हे स्थलांतर पहाडी प्रदेशाकडेही झाले. कलावंतांना पहाडी राजांचा आश्रय मिळाला. मोगलांच्या राजकीय वर्चस्वाला उतरत्या काळात पहाडी राजांना स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी कलांविषयी रसिकतेचे व उत्तेजनाचे धोरण स्वीकारले. भारतीय कलेच्या इतिहासातील एक समृद्ध दालन या काळात सजविले गेले.

प्रमुख शैली

पहाडी कलेच्या दोन प्रमुख शैली म्हणजे बसोली चित्रशैली व कांग्रा चित्रशैली या होत. ही दोन्ही नावे प्रदेशवाचक आहेत. जम्मू, मंडी, चंबा, गुलेर, कुलू, बिलासपूर, गढवाल येथील निर्मितीही प्रदेशनामांनुसार चंबा कलम, गुलेर कलम अशा प्रकारे ओळखली जाते.

पहाडी चित्रांचा जुना इतिहास

बसोलीचा राजा कृपालपाल याच्या कारकीर्दीतील (१६७८-९४) चित्रे व नुरपूर येथील राजवाड्यातील राजा मांधाताच्या काळातील (१६६१-१७००) भित्तिचित्रे येथपासून पहाडी चित्रांचा जुना इतिहास गवसतो. तत्पूर्वीची निर्मिती नष्ट झाली असावी. बसोली चित्रे भानुदत्ताच्या रसमंजरीवरील (तेरावे व चौदावे शतक) आहेत.चित्रांच्या पाठीमागे- ‘राजा कृपालपाल याच्या कृपेने विवस्थळी (बसोली येथे) विक्रमसंवत् १७५२ मध्ये निष्णात चित्रकार देवीदास याने ही चित्ररचना केली’ – अशा अर्थाचा संस्कृत श्लोक आहे. कृपालपालच्या व्यक्तिचित्रांवर टाकरी लिपीत राजाचे नाव लिहिले आहे. पक्ष्यांच्या मदतीने शिकार खेळणे, हा पहाडी राजांचा आवडीचा छंद होता. त्यामुळे चित्रात राजाच्या हातात बहिरी ससाणाही रंगविला आहे. अमृतपालच्या काळात (१७५७-७६) बसोलीची खूप भरभराट झाली. मेदिनीपालने (कार. १७२५-३६) बांधलेल्या राजवाड्याकडे पहाडी प्रदेशातील एक आश्चर्य म्हणून पाहिले जाई. याच राजवाड्याच्या पुढे झालेल्या नूतनीकरणातील भित्तिचित्रांमध्ये कांग्रा शैलीशी जुळणारी रूपसादृश्यता आहे. मूळची बसोली शैली अभिव्यक्तीत रांगडेपणा असलेली व लोककलेशी जवळीक साधणारी समृद्ध चित्रकला आहे. गडद रंगांचे उपयोग, रचनेच्या दृष्टीने चलअचल अशा सर्व आकृतींचे सुंदर एकत्रीकरण अशी बसोलीची काही वैशिष्ट्ये आहेत. याउलट कांग्रा शैलीचे स्वरूप उच्चभ्रू व मोहक आहे. महमदशाहकालीन (१७१९-४८) मोगल शैलीच्या स्वरूपाशी साधर्म्य ठेवून ती पुढे विकसित झाली. कांग्रा राजे घमंडचंद (कार. १७५१-७४) व संसारचंद (कार. १७७५-१८२३) यांच्या कारकीर्दी कलादृष्ट्या महत्त्वाच्या ठरल्या. दोघेही राजे रसिक होते. सुंदर बांधकाम व बगीचे यांच्या योजकतापूर्वक निर्मितीतून त्यांनी प्रदेशाचे सौंदर्य वाढविले. १७८३ मध्ये संसारचंदास कांग्रा किल्ला मिळाला व एक स्वतंत्र राजा म्हणून त्याची कारकीर्द सुरू झाली. येथून साधारण वीस वर्षांचा काळ कांग्रा शैलीचे सुवर्णयुग मानला जातो. शेकडो दर्जेदार चित्रांची निर्मिती या काळात झाली. त्याच्या दरबारातील परंपरागत संग्रहात मोगलांकडून भेट म्हणून मिळालेले अलेक्झांडरचे व्यक्तिचित्र होते. कुशन लाल नावाचा एक निष्णात चित्रकार संसारचंदाचा खास आवडता होता. सजनू, पुरखू अशी इतरही चित्रकारांची नामावळी मिळते. दरबारातील जन्माष्टमीचा सोहळा, होळी खेळतानाची, नृत्य बघतानाची दृश्ये इ. विषयांवरील चित्रांमधून संसारचंदाचे चित्रण आढळते. सर्व प्रकारच्या रंगछटांचा वापर; थंडीतील धूसरता, वर्षाकालीन मेघछाया, रात्रीचा अंधकार इ. वातावरणनिर्मिती; वृक्षवेलींच्या व वस्त्रभूषणांच्या लयबद्ध रेखाटनातून सोसाट्याच्या वाऱ्याचा आभास अशा अनेक प्रकारे मूळ काव्यकल्पना चित्रांतून यथार्थ रीतीने व्यक्त केल्या आहेत. या दृष्टीने रंगरेखाटनातील साम्ये तद्वतच काही स्वतंत्र वैशिष्ट्ये इत्यादींनी युक्त अशा निर्मितीतून सर्व पहाडी चित्रांचा इतिहास उभा रहातो. कांग्रापूर्वशैलीची बैठक या दृष्टीने गुलेर येथीलही जुन्या चित्रांकडे पाहिले जाते. ‘गुलेर राजा गोवर्धनसिंगाची संगीतसभा’  या चित्रापासून ते ‘पोलो खेळताना राजा दिलीपसिंग’ अशा चित्रांपर्यंत कालप्रवाहाचे एक चित्रदेखील दिसते. गुलेर येथील रामायण चित्रमालिका प्रसिद्ध असून, तीमधील प्रत्येक चित्र साधारणपणे ०.९१ मी. X ०.६० मी. एवढ्या मोठ्या आकाराचे आहे. ती बरीच अलीकडची असावी. चंबा येथील राजसंग्रहातून व भित्तिचित्रांमधूनही सुरुवातीस बसोली प्रभाव असलेली कांग्रापूर्व शैलीची चित्रे आढळतात. चंबा राजपुत्र व बसोली राजकन्या यांच्या विवाहप्रसंगी मलीक गुलाम महंमद हा चित्रकार चंबा दरबारी आंदणात भेट म्हणून देण्यात आला होता. असाच स्थलांतरित चित्रकार पंडित सेऊ हा जसरोटा येथे वास्तव्यास होता. त्याचा मुलगा नैनसुख याने जम्मू राजा बलवंतसिंगाच्या दरबारी चित्रनिर्मिती केली. ‘बलवंतसिंग अश्वपरीक्षा करीत आहे’, ‘बलवंतसिंग कौतुकाने चित्र बघत असून मागे अदबीने नैनसुख उभा आहे’ इ. विषयांवरील चित्रांमधून तत्कालीन व्यावहारिक बाबी आविष्कृत होतात. नैनसुखचा मुलगा रामलाल हा चंबा राजाच्या पदरी होता. एकाच पठडीच्या, एकाच घराण्याच्या चित्रकारांनी विविध काळांत निरनिराळ्या दरबारी चित्रनिर्मिती केली. त्यामुळे सकृतदर्शनी विविध शैलींच्या नावांनी ओळखला जाणारा हा कलाप्रवाह मुळाशी कसा समधर्मी आहे, ते या सर्व इतिहासातून दिसते.

कुलूमध्ये होणाऱ्या यात्रा, वार्षिक मेळे इ. प्रसंगी लोकरंजनासाठी चित्रकथी येत. त्यांची चित्रे ही लोककलेची सुंदर अभिव्यक्ती म्हणून गणली जातात. मंडी येथील राजा ईश्वरसेनास चित्रकार सजनूने भेट दिलेली हमीर हठ चित्रमालिका ही कांग्रा शैलीची शेवटची सुंदर चित्रे असावीत. गढवाल येथे बिहारी सतसैया व गीत गोविंद या चित्रमालिका कांग्रा राजकन्यांच्या विवाहात नजराणा म्हणून देण्यात आल्या होत्या. या दोन्ही मालिका कांग्रा चित्रांची श्रेष्ठ सौंदर्यस्थळे आहेत.

नंतरच्या काळातील गढवाल येथील चित्रे ही पहाडी शैलीच्या उतरत्या काळातील निर्मिती म्हणून मानली जातात. गढवाल दरबारी असलेल्या चित्रकार मोलारामसंबंधी (१७५०-१८३३) आधुनिक काळात बरेच कुतूहल आढळते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे कवी, तत्त्वज्ञ, मुत्सद्दी इ. अनेक पैलू होते. दारा शुकोह, राजपुत्र प्रीतमसिंग, नृसिंह, नायिका इ. विविध विषयांवर मोलारामने चित्रे काढली. तत्कालीन इतर चित्रकारांच्या तुलनेत मोलारामची निर्मिती फारशी उच्च दर्जाची नसल्याचे मत व्यक्त केले जाते. गढवालच्या चैतूशहा याची चित्रे फार दर्जेदार आहेत. तसेच कित्येक सुंदर चित्रांची निर्मिती करणाऱ्या कलावंतांची नावेही अद्याप उपलब्ध झालेली नाहीत.

शिखांचे राजकीय वर्चस्व

यानंतरच्या काळात पहाडी प्रदेशावर शिखांचे राजकीय वर्चस्व होते. शिकारचित्रे, दरबारचित्रे, व्यक्तिचित्रे अशा विषयांना जास्त प्राधान्य येऊन, निर्मितीचा दर्जा मात्र घसरला गेला. पुढे कंपनी अधिकाऱ्यांची व्यक्तिचित्रेही आढळू लागली व अखेरीस पहाडी चित्रकलेचे सुंदर पर्व संपुष्टात आले. लाहोरच्या किल्ल्यातील भित्तिचित्रे व शाही बुरुजाचे नक्षीकाम शिखांच्या काळात झाले होते. राजा रणजितसिंगाचा मुलगा दिलीपसिंग चित्रकलेचा भोक्ता होता.

निर्मितितंत्राच्या दृष्टीने असे दिसते, की चित्रांसाठी केलेल्या रेखाटनांवर रंगांच्या नोंदी केल्या जात. त्यांच्या आधारे वृद्ध कलांवंताच्या मृत्यूमुळे अपूर्ण राहिलेली चित्रे नंतर पूर्ण करण्यात आल्याचीही काही उदाहरणे आहेत. पशुपक्षी, निसर्ग, मनुष्याकृती अशा अनेक बाबींनी युक्त तक्त्यांच्या आधारे विद्यार्थी-चित्रकाराचा रेखाटनाचा अभ्यास होत असे. निरनिराळ्या खनिजांपासून रंग तयार केला जाई.

आनंद कुमारस्वामी, कार्ल खंडालवाला, आर्चर, रंधावा इ. अनेक लेखकांनी पहाडी कलेवर खूपसे संशोधनात्मक लिखाण केले आहे. भारतातील व परदेशांतील कलासंग्रहालये तसेच व्यक्तिगत चित्रसंग्रह यांतून ही असंख्य चित्रे विखुरली आहेत. पहाडी प्रदेशातील ही चित्रे हा भारतीय चित्रकलेचा फार मोठा वारसा आहे.

लेखक : मृगांक जोशी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate