অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बिंदुवाद

बिंदुवाद

(पॉइंटिलिझम). एक आधुनिक पाश्चिमात्य चित्रप्रणाली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रामुख्याने फ्रेंचचित्रकलेच्या क्षेत्रात उदयास आलेला बिंदुवाद हा पंथ म्हणजे उत्तर-दृक्‌प्रत्ययवादाचीच एक शाखा होय. या शाखेला नव-दृक्‌प्रत्ययवाद (नीओ-इंप्रेशनिझम) असेही म्हटले जाते. बिंदुवादामागील मूळ कल्पना अशी : प्रकाश हेच रंगसंवेदनांचे मूळ कारण असले, तरी वस्तूवर दिसणारा रंग हा पूर्णपणे सपाट नसून त्या रंगाचा आपल्या दृक्‌पटलावर होणारा परिणाम हा, अनेक प्रकारच्या रंगच्छटांच्या एकमेकांत गुंतलेल्या अगणित रंगबिंदूंचा एक संमिश्र अनुभव असतो. ही भूमिका स्वीकारून प्रथम पीसारोने (१८३०-१९०३) आपल्या चित्रांमध्ये वेगवेगळ्या रंगांचे फटकारे सपाटपणे न ठेवता त्याच्या रंगांची क्षेत्रे निर्माण करण्याचा, वेगवेगळ्या (शीत-उष्ण) रंगांचे ठिपके एकमेकांशेजारी ठेवून दृक्‌पटलावर त्या त्या रंगाचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पीसारोच्या प्रयत्नाला खरी शास्त्रीय दृष्टी दिली, ती सरा (१८५९-९१) या चित्रकाराने. त्याने प्रकाश, वस्तूचा रंग व रंगाच्या दृक्‌संवेदना यांविषयी शास्त्रशुद्ध अभ्यास करून रंगलेपनाचे एक नवीनच तंत्र प्रस्थापित केले.

त्याचे तंत्र रंगाच्या विभाजनावर आधारलेले असल्याने त्याने त्यास विभाजनवाद (डिव्हिजनिझम) असे नाव दिले. सूर्यकिरणांचे पृथःकरण केल्यास, ज्याप्रमाणे सात वेगवेगळे रंग दृष्टोत्पत्तीस येतात, त्याचप्रमाणे प्रकाशाच्या योगाने दृश्यमान होणारा कोणताही रंग संपूर्णपणे एक नसून तो अनेक रंगबिंदूंच्या एकरूपतेतून बनलेला असतो. या भूमिकेमधून सराने रंगलेपन करताना प्रत्येक रंगाचे त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या रंगच्छटांमध्ये विभाजन करून, लहान लहान ठिपक्यांच्या योगाने त्या रंगच्छटा मूळ स्वरूपात एकमेकांशेजारी ठेवण्याचे तंत्र निर्माण केले. परिणामी पाहणाऱ्याच्या दृक्‌पटलावर त्याचा उचित परिणाम होऊन त्याला सृष्टीमध्ये दिसणाऱ्या रंगांचा पुनःप्रत्यय यावा, असे त्याला अभिप्रेत होते. त्याचे संडे आफ्टरनून ऑन द आयलंड ऑफ ला ग्रांदे जात्ते(१८८५; पहा : मराठी विश्वकोश : ७; चित्रपत्र ४६) हे चित्र बिंदुवादी तंत्राचे अप्रतिम उदाहरण मानले जाते.

या चित्रप्रणालीचा पुरस्कार करणाऱ्या चित्रकारांमध्ये क्रॉस (१८५६-१९१०), द्यूब्वा-पिय्ये (१८४६-९०), रायसेलबर्ग (१८६२-१९२६), आँग्राँ (१८५४-१९२६), ल्यूस (१८५८-१९४१), पॉल सीन्याक (१८६३-१९३५) आदींचा अंतर्भाव होतो. फेलीक्स फेनाँ हा या पंथाचा कलासमीक्षक होता. ही चित्रपद्धती फारच अल्पजीवी ठरली. कारण या प्रणालीचा निर्माता सरा याचा अकाली मृत्यू झाला. तसेच या प्रणालीस सुरुवातीला प्रेरणा देणारा एक प्रमुख पंथसदस्य पीसारो याने या पद्धतीचा अव्हेर केला. ही पद्धती म्हणजे केवळ रंगलेपनाची करामत असून त्यात कलावंताच्या भावनात्मक आविष्काराला व स्वातंत्र्याला पुरेसा वाव नाही, अशी त्याची खात्री झाली. मात्र पुढे काही काळ सीन्याकने या पंथाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्याचे ‘फ्रॉम दलाक्र्‌वा टू नीओ-इंप्रेशनिझम’ (१८९९) या इंग्रजी शीर्षकार्थाचे पुस्तक बिंदुवादाच्या तत्त्वप्रणालीवर प्रमाणभूत मानले जाते.

 

 

 

 

 

 

संदर्भ : Graves, M. E. Color Fundamentals, New York, 1952.

लेखक :बाबुराव सडवेलकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate