অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ब्राँझशिल्प

ब्राँझशिल्प

ब्राँझ (कास्य) या धातूच्या लहानमोठ्या मूर्ती, विविध प्रकारची भांडी, आयुधे, उपकरणे, फर्निचर-वस्तू इ. तयार करण्याची कला. फार प्राचीन काळापासून ती सर्व प्रगत समाजात दिसून येते. पुरातत्वविद्येच्या दृष्टीने ब्राँझयुगाच्या कालखंडातच (सु. इ. स. पू. ४००० ते १०००) ब्राँझशिल्पांच्या व वस्तूंच्या निर्मितीस प्रारंभ झाला. प्राचीन कला व संस्कृती यांच्या अभ्यासात ब्राँझशिल्पांचा व वस्तूंचा पुरावा महत्वाचा मानला जातो. ओतीव काम, घडाई तसेच सूक्ष्म शिल्पांकन या दृष्टीने ब्राँझ धातू अत्यंत उपयुक्त असल्याने मूर्तिकलेचे ते एक आदर्शवत माध्यम ठरले आहे. [मूर्तिकला].

ईजिप्शियन लोक ब्राँझचे विविध प्रकारचे पुतळे, भांडी व चिलखते यांसारख्या वस्तू बनवीत असत. ग्रीकांची ब्राँझची मूर्तिकला अत्यंत श्रेष्ठ मानली जाते. या दृष्टीने झ्यूस ऑफ आर्टेमिसिअम ही देवतामूर्ती आणि डेल्फाय येथील रथसारथी ही ग्रीक ब्राँझशिल्पे अप्रतिम आहेत [ग्रीक कला]. प्राचीन इट्रुस्कन समाजातही ही कला प्रगत झाल्याचे दिसते [इट्रुस्कन संस्कृति]. ग्रीकांच्या ज्यूपिटर देवतेच्या मंदिरातील लांडग्यांचे ब्राँझशिल्प उल्लेखनीय आहे. रोमन काळात अभिजात ग्रीक मूर्तिकलेचे अनुकरण करून ब्राँझमूर्ती तयार करण्यात येत; तथापि रोमनांनी ब्राँझचा उपयोग दरवाजे, विविध प्रकारच्या फर्निचर-वस्तू, भांडी, दीपपात्रे इत्यादींसाठी केला. मध्ययुगीन काळात यूरोपात भांडी, तसेच दैनंदिन वापरातील दागदागिन्यांसाठी व धार्मिक-प्रतीकात्मक अलंकारवस्तूंसाठी ब्राँझचा उपयोग करण्यात येई. यूरोपीय प्रबोधनकाळात ब्राँझमूर्तिकला अत्यंत विकसित झाली होती. दोनातेलो (चौदावे शतक) याची ब्राँझशिल्पे विशेष उल्लेखनीय आहेत. याशिवाय व्हेररॉक्क्यो, जोव्हान्नी बोलोन्या, पोल्लिवोलो व चेल्लीनी ह्या प्रबोधनकालीन श्रेष्ठ मूर्तिकारांची ब्राँझशिल्पे उत्कृष्ट समजली जातात. [प्रबोधनकालीन कला]. ब्रिटिश सम्राटांच्या काही उत्कृष्ट ब्राँझमूर्ती या ब्रिटिश ब्राँझकलेच्या निदर्शक ठरतात. अठराव्या शतकात फ्रान्समध्ये फर्निचर निर्मितीत चकचकीत ब्राँझचे जडावकाम करण्यात येई. आधुनिक काळातील रॉदँ, एप्स्टाइन, ब्रांकूश, लीपशीत्स हे श्रेष्ठ मूर्तिकार ब्राँझशिल्पनिर्मितीत अग्रेसर होते.

भारतीय कास्यशिल्पेःप्राचीन वाङ्‌‌मयापैकी यजुर्वेदात सोने, चांदी, शिसे व कथिल या धातूंचे उल्लेख सापडतात. या धातू कशा वापरावयाच्या याची माहिती तत्कालीन लोकांना होती. ऐतिहासिक पुराव्याच्या दृष्टीने सिंधुसंस्कृतीच्या उत्खननात सापडलेली नर्तिकेची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून ती पंचधातूची आहे. गेल्या काही वर्षांत औरंगाबादजवळ असलेल्या दायमाबाद येथील उत्खननात सापडलेल्या पंचधातूच्या मूर्ती फार महत्त्वाच्या आहेत (इ. स.पू. ३००० - १०००). या उत्खननात मिळालेल्या प्राण्यांच्या भरीव प्रतिमांना खेळण्यांसारखी चाके आहेत. तसेच एक दुचाकी बैलगाडीसुद्धा उपलब्ध झालेली आहे.भारतात धातूंच्या ओतीव मूर्ती तसेच इतर वस्तू इ. स. चौथ्या शतकापासून निर्माण होऊ लागल्याचे दिसते. या निर्मितीचे स्वरूप तीन प्रकारचे होते (प्रत्यक्ष देवदेवतांच्या मूर्ती,पूजाविधीची उपकरणे उदा., दीपलक्ष्मी, उभे-टांगते आणि हातात धरण्याचे दिवे, विशिष्ट प्रकारच्या फर्निचर-वस्तू इ. आणि (३ दैनंदिन उपयोगाच्या वस्तू उदा., हत्यारांच्या मुठी, विविध प्रकारची भांडी,  अंग घासण्याच्या वज्‌ऱ्या इत्यादी.

तंजावर जिल्ह्यातील नाचीरकोईल हे गाव ओतकामाबद्दल प्रसिद्ध आहे. कावेरी नदीच्या पात्रात सापडणारी पिवळी वाळू साचे बनविण्यास उपयुक्त असल्याने हे ठिकाण ओतकामाचे प्रमुख केंद्र बनले आहे. आसाममधील गौहाती व सार्तबरी ही ब्राँझच्या धातुकामाची महत्त्वाची केंद्रे आहेत. मणिपूर येथे विशिष्ट आकाराची भांडी तयार केली जातात. गुजरातमधील जामनगर, वढवाण, विसनगर, सिहोर ही गावे ब्राँझ व इतर धातूंच्या भांड्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. विसनगर हे ठिकाण घोडे, हंस व इतर पशुपक्षी यांच्या ओतीव व शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. गिरनारच्या जैन मंदिरातील २४० किग्रॅ. वजनाची घंटा हा उत्कृष्ट ओतकामाचा नमुना मानला जातो. काही ठिकाणी ब्राँझच्या घंटा पोर्तुगीजांकडूनदेखील आल्याची उदाहरणे आहेत. त्यांवर लेखही असतात. नांदेड जिल्ह्यातील माहूर या तीर्थस्थानी गडावर एक मोठी घंटा असून त्यावरही लेख आहे. उत्तर प्रदेशातील इटावा, वाराणसी, सीतापूर या शहरांत पाणी साठविण्याची भांडी  तयार केली जातात. कर्नाटकातील बंगलोर, नागमंगला, श्रवणबेळगोळ, बुंटवाल आणि कारकल ही ठिकाणे जैन मूर्तिशिल्पांबद्दल प्रसिद्ध आहे. उडिपी येथे तयार होणाऱ्या ब्राँझमूर्ती प्राचीन शिल्पशास्त्राच्या प्रमाणांनुसार तयार केल्या जातात.

तमिळनाडूत पल्लव, पांड्य, चोल व नायक (सु. सहावे ते अठरावे शतक) या राजवटींच्या काळातील मूर्तिकलेची परंपरा आजही टिकून आहे. येथील कारागिरांना ‘स्थपति’ म्हणतात. मदुराई, काराईकुडी, श्रीविल्लिपुत्तूर, चिदंबरम् इ. ठिकाणे पंचरसी धातूच्या ओतीव मूर्तिकामासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. स्वामीमलाई गाव जगप्रसिद्ध नटराजाच्या मूर्तीसाठी विख्यात आहे. पारंपारिक ब्राँझमूर्तीच्या दृष्टीने त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्माविष्णुमहेश, दुर्गा किंवा महिषासुरमर्दिनी, नृत्यावस्थेतील कानडी अम्मा किंवा तिलोत्तमा इ. मूर्ती उल्लेखनीय आहेत.

पंचरसी धातूच्या मूर्तिशिल्पातील ओघवती बाह्य रेखा व सूक्ष्म अलंकरण हे भारतीय ब्राँझशिल्पांचे वैशिष्ट्य होय. मात्र इ. स. बाराव्या-तेराव्या शतकात पूर्ण विकसित झालेली भारतीय मूर्तिकला नंतरच्या राजकीय स्थित्यंतरामुळे एक प्रकारच्या साचेबंदपणात अडकून पडली. देवदेवतांच्या जुन्या कास्यमूर्ती सांकेतिक पद्धतीनेच निर्माण होत राहिल्या. त्यातून एकप्रकारचा नकलीपणा जाणवू लागला. आश्रयदाते कमी झाल्यामुळे मूर्तिकारांचे लक्ष अन्य वस्तू निर्माण करण्याकडे वळले. पुढे ब्रिटिश कालखंडात वेगळी परिस्थिती निर्माण झाली. १८५७ च्या सुमारास मुंबईत ज. जि. कलाविद्यालय सुरू झाले व त्यात पाश्चात्य मूर्तिकला हा विषय शिकविण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम म्हणून एतद्देशीय संस्थानिकांनी व धनिकांनी आपल्या घराण्यातील व्यक्तींचे जे पुतळे तयार करून घेतले, ते सर्व पाश्चात्य शैलीतील होते. म्हात्रे यांची  ‘मंदिरपथगामिनी’ व करमरकरांनी निर्मिलेला अश्वारूढ शिवाजी-महाराजांचा पुण्यातील पुतळा ही त्या काळातील उत्कृष्ट शिल्पे होत. दुसऱ्या महायुद्धानंतर कलाक्षेत्रातील मूल्ये बदलली [आधुनिक कला;आधुनिक चित्रकला; आधुनिक मूर्तिकला; आधुनिक वास्तुकला]. धार्मिक, सांस्कृतिक,ऐतिहासिक इ. विषयांच्या सांकेतिक व वस्तुनिष्ठ प्रकटीकरणाऐवजी कलावंतांच्या आत्माविष्काराला महत्व प्राप्त झाले. म्हणूनच विद्यमान ब्राँझशिल्पकलेवर पारंपरिक व आधुनिक कल्पनांचा संमिश्र प्रभाव दिसून येतो.

संदर्भः Chattopadhyay, Kamaladevi, Handicrafts of India, New Delhi, 1975.

लेखक : ज. पां. आपटे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate