অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुद्रानिर्मिती

मुद्रानिर्मिती

मुद्रानिर्मिती : (प्रिंट मेकिंग). मूळ चित्र किंवा आरेखन ही कलाकीराची एकमेव निर्मिती असते; दुसरी कृती पहिलीइतकी हुबेहूब निर्माण होत नाही. त्यासाठी कृत्रिम उपायांनी केलेली अधिक प्रतींची निर्मिती म्हणजे मुद्रानिर्मिती. खरे पाहता व्यावसायिक मुद्रणात जी साधने म्हणजे मुद्रा (टाइप) व ठसे (ब्लॉक) यांत्रिक पद्धतीने बनवितात, त्यांना मुद्रानिर्मिती आणि मुद्रणकलेच्या विद्यार्थ्यांना त्या बाबतीत जे तंत्र शिकवतात, त्याला मुद्रारेखन (टायपोग्राफी) म्हणणे योग्य ठरते. स्वतः कलावंताने तूलिका (ब्रश), छिणी (छिन्नी), सूचिका इ. साधनांचा उपयोग करून स्वतः करावयाच्या प्रयोगाशी मुद्रानिर्मितीचा संबंध असतो. १९६० च्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ प्लॅस्टिक आर्ट्‌सने मुद्रारेखनाची व्याख्या केली आहे. ती अशी : 'ज्या छपाईचा मूळ ठसा (मुद्रासाधन किंवा इमेज-कॅरिअर) स्वतः चित्रकारने पत्रा, लाकूड, दगड किंवा कोणत्याही अन्य पदार्थावर करून स्वतः त्याची छपाई केली असेल, त्यास मुद्रारेखन म्हणावे'. अशा मुद्रारेखनावर कलावंत स्वहस्ते आपले नाव लिहितो, क्वचित त्यावर क्रमांक व दिनांकही घालतो व नंतर ती साधने स्वतः नष्ट करून टाकतो.

तिहासिक आढावा : भारतात यूरोपातील गुहांप्रमाणे आदिमानवाची कला असेल असे पूर्वी वाटत नव्हते; परंतु आता मध्य भारतात  भीमबेटका व इतर गुहांत जगातील सर्वांत मोठ्या आणि क्रमवार अशा ४०,००० वर्षांपूर्वीपासून ऐतिहासिक काळापर्यंत निरनिराळ्या कालखंडांतील कलाकृती उपलब्ध झाल्या आहेत; गेरू किंवा नैसर्गिक काव पाण्यात घोटून, पोकळ हाडांमधून फुंकून माणसांच्या पंजांने अनेक छाप भारतीय शैलाश्रयात सापडले आहेत. त्या प्राचीनतम मुद्राच होत. पूर्वी सुमेरमध्ये चपट्या किंवा लाटण्यासारख्या गोल, ठिसूळ दगडावर कोरलेल्या मुद्रा जशा सापडल्या; तशा सिंधू व सरस्वती नद्यांच्या खोऱ्यांतही सापडल्या. त्यानंतर लाकडी ठशांनी छापलेल्या कापडावरील चित्रांचा पुरावा सिंधू खोऱ्यांतील दाढी राखलेल्या राजपुरुषाच्या मूर्तीवर सापडला आहे; तो भारतातील मुद्रानिर्मितिचा नमुना म्हणावा लागेल. ऐतिहासिक काळातील साहित्यांमध्ये मुद्रानिर्मितिविषयीचे उल्लेख असले, तरी त्याचे दृश्य पुरावे सापडावे लागतात. मुद्रणाचा असा एक पुरावा धार येथे भोजशाळेच्या अवशेषात सापडला आहे, तो म्हणजे सपाट स्लेट शिळेवर उलट अक्षरे कोरलेल्या ओळी कापडावर किंवा कागदावर छापण्यासाठी केल्या होत्या. हे मोठे बोलके असे दहाव्या शतकाअखेरचे उदाहरण होय. लाकडी ठशांनी छापलेले कापड पूर्वी छीट म्हणून भारतातून निर्यात होत असे. ही बाब मुद्रानिर्मितिशी निगडीत आहे.

पाश्चात्त्य देशांतील लोकांनी मुद्रानिर्मितिच्या प्रयत्नांचे नमुने संग्रहालयातून जपून ठेवले आहेत. अशा नमुन्यांतील एक म्हणजे ७६४ ते ७७० दरम्यानची जपानमधील मुद्रिते. तसेच वांग चिह याने छापलेले हीरकसूत्र पूर्व तुर्कस्थानात सापडले आहे. (८६८). यूरोपातील सर्वांत जुन्या मुद्रानिर्मितिचा पुरावा म्हणजे १४१४ मधील लाकडी ठशांनी छापलेले खेळण्याचे पत्ते होत. १४३६ मध्ये इंग्लंडच्या सहाव्या हेन्रीसाठी केलेली मुद्रा ही सर्वांत जुनी लाकडी मुद्रा होय.सोळाव्या शतकातील प्रबोधनकाळात ठशांनी छापण्याची कला खूपच प्रगत झाली होती. इटली मध्ये रॅफेएलची  चित्रे छापनारा चित्रकार रायमोंदी (१४८०–१५३४) हा एक महान कलाकार होऊन गेला. त्याची 'आदम' व 'इव्ह' ही मुद्रानिर्मिती असामान्य आहे. त्याच शतकात आल्ब्रेक्त ड्यूरर हा लाकडी व धातूंचे ठसे कोरणारा श्रेष्ठ कलाकार होऊन गेला. तसेच त्यांचा प्रतिस्पर्धी डच कलाकार ल्युकास व्हॉन लाइडेन हाही असामान्य कारागीर होता. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात या कलेचा अपकर्ष झाला. त्या नंतर धातूंच्या पट्ट-विलयन प्रक्रियेने (इचिंग) ठसे करणारे कलाकार नेदर्लंड्‌समधील कॉर्नीलिअस व्हॉन दालेन आणि रूबेनचा शिष्य अँथोनी व्हॅन डाइक ह्यांनी मोठीच मजल मारली.

तराव्या शतकातील झांक कालो याने अनेक वेळा विलयनतंत्र वापरून निर्मिलेले 'फाशीचे झाड' हे चित्र फार प्रसिद्ध आहे. अठराव्या शतकात फ्रान्समध्ये द्रवछटा मुद्रण (अॅक्वा-टिंट) पद्धती नावारूपास आली. अठराव्या शतकातच ठसेमुद्रणात (ब्लॉक प्रिंटिंग) जपान आघाडीवर आला, त्यातील सुकूमारता अपूर्व होती. या क्षेत्रात नट व नाट्य याची चित्रे निर्मिणारा तोरिई कियोनोबु, दुरंगी  तसेच सोनेरी व चांदीच्या वर्खाने छपाई करणारा ओकुमुरा मासानोबु आणि कोमलतेत कमाल करणारा सुझुकी हारूनोबु हे विख्यात चित्रकार झाले.

कोणीसाव्या शतकात पुढीलप्रमाणे अनेक नवेनवे प्रयोग करण्यात आले. आलोयूस झेनेफेल्डर याने जर्मनीत एकस्तर शिलामुद्रणाचा शोध लावून आपल्या हयातील तो जगभर पसरविला. ही कला इंग्रजांनी नकाशे व चित्रे छापण्यासाठी भारतात आणली. राजा रविवर्म्याने जर्मन कारागीर आणून भारतात मोठ्या प्रमाणावर पौराणिक चित्रे छापली. त्या क्षेत्रात पुरुषोत्तम बाळकृष्ण हुदलीकर हे असामान्य शिलाचित्रणमहर्षी होऊन गेले (१८८५–१९७२). काष्ठमुद्रा छापण्यात जगात जपाननेच आघाडी टिकविली. कात्सुशिका होकुसाई या एकट्याने ३५,००० चित्रे छापून प्रसृत केली. त्यांच्या शैलीचा युरोपवरही मोठा प्रभाव पडला होता. ह्या शतकात यूरोपमध्ये पॉल गोगँ व पाँल चेझाने हे मुद्रानिर्मिती करणारे कलावंत फार गाजले.

विसाव्या शतकात छायाचित्रणाच्या शोधामुळे मुद्रानिर्मितीत क्रांती घडून आली. मुद्रानिर्मितीच्या नव्या शैलीच्या बाबतीत फ्रान्सने आघाडी मारली. स्पेनमध्ये जन्मलेला  पाब्लो पिकासो पॅरिसमध्ये स्थायिक झाला आणि त्याने अनेक नवोदितांना प्रेरणा दिली. या क्षेत्रात आंरी मातीस आणि जोन मीरो हे मोठे नवनिर्माणकर्ते झाले. मुद्रानिर्मात्यांची अतेलिअर-१७ ही संस्था (१९३०) उल्लेखनीय आहे. हिचा प्रणेता स्टॅन्ली विल्यम हा मूळचा इंग्लिश, परंतू तो (पॅरिस) येथे स्थायिक झालेला कल्पक आणि कुशल संघटक होता. त्याचप्रमाणे याच काळात जर्मनीत बौहाउस ह्या संघटनेने अनेक नवकलाकार निर्माण केले आणि त्याचा प्रभाव युरोप-अमेरिकेवर पडला. १९२० च्या आसपास लाकडी ठशाच्या मुद्रणाचे जपानमध्ये पुनरुत्थान झाले; त्यामध्ये ओंची कोशीरो आणि हिरात्सुका उन-इचि यांनी अगदी वेगवेगळ्या शैली केल्या.

दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने पुन्हा आघाडी मारली. या काळातील मुनाकाता शिको व साइतो किओशी हे नामवंत कलाकार होऊन गेले. भारतातसुद्धा कलकत्ता व मुंबईच्या कला विद्यालयांतून अनेक नामवंत कलाकार बाहेर पडले.

मुद्रानिर्मितिच्या पद्धती :मुद्रानिर्मितीच्या चार प्रमुख पद्धती आहेत, या अशा (१) उन्नत (कॅमिओ) मुद्रण, (२) उत्कीलन (इंटाग्लिओ) मुद्रण, (३) समतल किंवा एकस्तर (लिथोग्राफ किंवा कोलो टाइप) मुद्रण, (४) जाळी (स्क्रिन) मुद्रण.या पद्धतींची माहिती खालीलप्रमाणे आहे.

(१) उन्नत मुद्रण : भारतामध्ये मोहें-जो-दडो काळापासून कापडावर छपाई करणारे कारागीर, छापावयाचा ठशावरील भाग वर (उन्नत) ठेवून अन्य भाग उकरून टाकतात, तोच हा प्रकार होय. यालाच इंग्रजीत रिलीफ-प्रिंटीग असे म्हणतात. या पद्धतीत ज्या भागाचा छाप नको असेल, तो उकरून टाकणे, खरचटून काढणे, सूचिकेने खड्डे करणे, ठोके मारणे या युक्त्यांचा उपयोग लाकूड किंवा धातुपटावर करतात. अशा साधनांचे अवशेष पौर्वात्य देशांत आठव्या शतकापासून, तर पाश्चिमात्य देशांत पंधराव्या शतकापासून सापडतात. ८६८ मध्ये छापलेला हीरकसूत्र हा मुद्रितलेख चीनच्या तुनह युआंग येथील सहस्त्रबुद्ध गुंफेत सापडला, तो याच पद्धतीने रेशमावर छापलेला आहे. त्याची लांबी १६ फ्रूट (सु.४·८७ मी) असुन त्यावर चिनी भाषेतील मजकूर व चित्राकृती तसेच कारागीराचे चि येह असे नाव छापले आहे. अशी बहुरंगी छपाई चीनमध्ये त्याकाळी होत असे. असे रंगीत चिनी छायाचित्र १६२५ मध्ये छापलेल्या शिहू चू चै शू ह्‌वा प्यू या पुस्तकात आहे. चीनमधूनच हे यंत्र जपानमध्ये गेले. अशी छपाई पूर्वी कापड व कधी कातडयावर (व्हेलम) केली जाई. पंधराव्या शतकानंतर यूरोपमध्ये कागदावरील छपाई वाढली.

चित्रांच्या रेषा कोरण्यासाठी लाकडापेक्षांही लिनोलियमचा उपयोग विशेष होऊ लागला. कलाशाळांत त्याचा उपयोग सोयीमुळे अधिक केला जातो. १९५० सालापासून भडक रंगांत चित्रे छापून पिकासो याने या प्रकाराला लोकप्रियता मिळवून दिली. जपानी लोक जलरंगाने सुंदर छपाई करतात. कलाकार स्वतःच अनेक रंगांचे ठसे कौशल्याने तयार करून ते छापणारास देतो.

त्कीर्णन पट्टमुद्रण : यात प्रथम उकळलेल्या जवसाच्या तेलात रंगचूर्ण घोटून तयार केलेली घट्ट शाई कोरलेल्या भागात कुंचल्याने दाबून भरतात. नंतर वरचा भाग स्वच्छ कागदावर घासूनपुसून तो शाईविरहित करतात; परंतु शाई कोरीव भागांत तशीच राहते. मात्र कळीचा दाब देऊन कागद दाबला म्हणजे शाई कागदावर उतरते. हा दाब पुष्कळच द्यावा लागतो. दाबामुळे छपाईत रंग चांगलाच उतरतो व ती छपाई उठावदार दिसते. उत्कीर्णन कलेचे पुढील प्रकार लोकप्रिय आहेत.

(अ) उत्कीलन : लेख धातुपट्टीवर कोरणीने (ग्रुव्हर किंवा बुरिन) कोरतात. त्या कोरण्या पोलादी खिळ्यांच्या चौकोनी किंवा गोलाकारही असतात. कमी दाबाने कोरल्यास बारीक रेषा आणि जास्त दाबाने कोरल्यास पांढऱ्या जाड रेषा मिळतात. त्यामुळे कोपरे फार टोकदार होतात. त्याने कागद फाटू शकतो, म्हणून ते कोपरे (बर) हलक्या हाताने काढून टाकतात. कोरणी एका हाताने जोरात पुढे ढकलतात व दुसऱ्या हाताने धातुपट्टी सारखी फिरती ठेवतात. यासाठी जस्त, शिसे, ल्युमिनियम, मॅग्नेशिया किंवा पोलाद वापरले, तरी तांबे हे अतिमऊ किंवा अतिकठीण नसल्याने अधिक सोईस्कर पडते.

(आ) रेषात्मक उत्कीर्णन : यामध्ये पोलाद किंवा हिऱ्याचे टोक असलेली कोरणी वापरतात व त्याने खरचटून रेषा काढल्या जातात. धातूत त्या खोल शिरत नाहीत, पण त्यांनी जो खडबडीतपणा तयार होतो त्यात शाई अडकते. बारीक रेषांसाठी कोरणी उभी व जाड भागांसाठी ६९ अंशांपर्यत वाकडी धरून कोरतात. मात्र यासाठी तांब्याचाच उपयोग करावा लागतो. छापताना किंवा हाताळताना वर उचकटलेले कोपरे दबून जाऊ नयेत याची काळजी घ्यावी लागते. जास्त प्रती छापायच्या असल्यास तांब्यावर पोलादाचे विद्युत्‌लेपन (इलेक्ट्रोप्लेटिंग) करता येते; परंतु शिसे किंवा ॲल्युमिनियमवर ते करता येत नाही.

(इ) अर्ध-उत्कीलन : हल्ली छायाचित्रांचे अर्ध-उत्कीलन शैलीत (हाफ टोन) रूपांतर करण्यासाठी अम्लोत्कीलन (फोटो-ए-ग्रेव्हिंग) पद्धत रूढ झाली आहे; परंतु आठराव्या व एकोणिसाव्या शतकात तैलचित्रे छापण्यासाठी ह्या पद्धतीचा उपयोग करीत असत. आता गंमत म्हणूनच कलावंत या पद्धतीचा उपयोग करतात. या पद्धतीत सुरुवातीला धातुपटावर सर्वत्र सारखा खडबडीतपणा आणतात. त्यासाठी वाकडी दंतुर सुरी उभी धरून सर्वत्र फिरवून घेतात. नंतर त्यावर चित्राची बाह्यकृती काढून जो भाग हलक्या रंगात छापला जावा असे वाटत असेल, तो घासून तेथील खडबडीतपणा काढून टाकतात आणि पांढरा हवा तो भाग अगदी चकचकीत करतात. नंतर जेथे जास्त गडद हवे, तिथे सूचिकाभेदन (ड्रायपॉइंट) करतात. छापताना अधिक काळजी घ्यावी लागते. शाई ही मऊ चिंधीने लावतात. ती पुसून टाकण्यासाठीही मऊ चिंधीच वापरतात; घासत नाहीत. दाबदेखील कमी देतात. खवणी उत्कीर्णन (स्टिपल) हा या पद्धतीचा वेगळा प्रकार आहे.

(ई) अम्ल-उत्कीर्णन : या पद्धतीत रासायनिक द्रावणांनी धातू विरघळवतात व त्यासाठी योग्य ते रासायनिक पदार्थ वापरतात. प्रथम धातुपटावर रोधक आवरण म्हणजे लाख किंवा तत्सम पदार्थाचा लेप देतात व नंतर आरेखन कोरून काढतात. धातू म्हणजे तांबे, शिसे, ल्युमिनियम किंवा मॅग्नेशियम पट्ट व विलयक पदार्थ म्हणजे फेरिक क्लोराइड, नायट्रिक सिड, हायड्रोक्लोरिक सिड होत.

विरोधक आवरण म्हणून पूर्वी मेण व त्यांत तेल किंवा व्हार्निश वापरीत. हल्ली २ भाग डांबर, २ भाग मेण (मधमाशांचे), १ भाग राळ हे वितळवून एकजीव करतात व त्यांचे लेपन करतात. लेपनापूर्वी धातूवर तेलकटपणा नसावा. शेवटी आवरण हे कडक झालेले हवे, चिकट असलेले नको. कोरीव काम नीट दिसावे म्हणून आवरणात थोडे काजळ घालून ते काळपट करतात.

सायनांमध्ये नवीन साधने अधिक परिणामकारक ठरतात. उदा., सामान्य धातू विलयनासाठी डच-विलयन वापरतात, त्यात ९ भाग पाणी व १ भाग पोटॅशियम क्लोराइड विशेषतः जस्तासाठी वापरतात. खडबडीत परिणामासाठी ९ भाग पाणी व १ भाग नत्राम्ल (नायट्रिक सिड) वापरतात. विरोधक द्राव हा पदार्थ विलयनाचा रोधक पदार्थ असतो, यासाठी राळ मद्यार्कात (अल्कोहॉल) विरघळवतात. विरघळण्याची क्रिया लवकर होण्यासाठी भांडे जलपात्रात ठेवावे लागते. नाहीतर सरळ विस्तवाच्या संसर्गाने मद्यार्काला आग लागण्याचा संभव असतो.

काही कारणाने जर अम्लरोधक नीट वाळले नसेल किंवा मऊ राहिले असेल, तर त्यावर पातळ कागद ठेऊन सूचिकेने चित्रण केले म्हणजे शोषण अनियमित होऊन मजेदार प्रभाव निर्माण झालेले आढळतात. हल्ली निरनिराळे पोत दिसावे म्हणून वेगवेगळ्या वीणींचे कापड दाबून तसे प्रभाव उत्पन्न करतात. पूर्वी प्रतिरूप (ऑफसट) छपाईच्या पत्र्यावर या पोताचा उपयोग करीत आणि जे भाग अशा क्रियेपासून वाचवायचे असतील, त्यांना अगोदरच रोधक द्राव लावून त्या भागाला सुरक्षित करीत व शेवटच्या टप्प्यात विरोधक द्राव विरघळवून पुसून टाकीत. हल्ली अशा द्रावांना 'निरोधी द्रावण' (स्टॉप-औट-सोल्युशन) असे म्हणतात.

(उ) द्रवछटा (क्वाटिंट) उत्कीर्णन : ही पद्धत अठराव्या शतकात यूरोपात वाढीस लागली. एक बंद डबा व त्यातून सरकून आत जाईल अशी चौकटीची जाळी आणि तीवर राळ घालून ती राळ पंख्याने किंवा भात्याने आतील धातुपटावर उडवितात. काही कलाकार निरनिराळ्या कमीअधिक जाळीच्या कापडात राळेची पुरचुंडी भरून ती हव्या त्या प्रमाणावर धातुपटावर उडवितात. नंतर धातुपट शेगडीवर तापवितात; त्यामुळे राळ जागोजागी चिकटते. त्यावर मग निरोधी द्रावणाने चित्र काढतात. धातुविलयन करून व पट्ट स्वच्छ करून आणि पुन्हा वेगळ्या तऱ्हेने राळ उडवून द्रावाने चित्रण करतात; त्यामुळे चित्रणात विलक्षण व नावीन्यपूर्ण प्रभाव निर्माण होतात. हलक्या धूसर भागासाठी थोडासाही विलयनकाळ पुरतो मात्र अधिक गडद भागासाठी अधिक वेळ व तीव्रतर विलयन हवे असते. कलावंताची सर्जनशीलता या तंत्राने प्रत्ययकारी होते.

विरोधक पदार्थ उडविण्यासाठी हल्ली फवारे (स्प्रे-गन) वापरतात. त्यासाठी पेटिका (स्प्रे-बूथ) किंवा अन्य संरक्षक साधने वापरावी लागतात.

(ऊ) शर्कराविलयन मुद्रण : यात काळी चित्रण मषी (इंडिया इंक) बोळ-द्राव (गॅबोज) किंवा साखरेच्या पाकाने धातुपटावर (रेघा दिसण्यासाठी थोडा रंग घालून) चित्र काढतात. नंतर ते कडक वाळल्यावर त्यांवर विरोधक-द्रावाचे लेपन करून व ते तापवून वाळवितात. हा धातुपट कोमट पाण्यात टाकला म्हणजे ते शर्करामषी विलयन विरघळून ओले होते व तेवढा भाग उघडा होतो. स्वैर [सुलेखनासाठी] (फ्री कॅलिग्राफी) ही पद्धत फार उपयुक्त ठरते.

(ए) अम्लस्नान मुद्रण (इंचिंग) : ह्या पद्धतीत फार काळजी घ्यावी लागते. जस्तासाठी नत्राम्ल वापरतात. या स्नानात बुडबुडे वर येताना दिसतात. त्या बुडबुड्यांखालील जागेमध्ये अम्लाची प्रक्रिया मंद होते, म्हणून सावधगिरी बाळगावी लागते व कुंचल्याने हे बुडबुडे फोडत रहावे लागते; अन्यथा विलयन अनियमित होते. याशिवाय नत्राम्ल हे खालचाच धातू विरघळविते असे नव्हे, तर बाजूचाही धातू खाते. म्हणून जेथे जाड रेखन असते, तेथे तर सारखे बाहेर काढून तपासत रहावे लागते. तांब्यासाठीही नत्राम्ल वापरतात, पण मोठ्या भागात विलयन करावयाचे असेल, तेवढ्यापुरतेच. नाजूक भाग त्यावेळी विरोधकाने झाकून ठेवून मोठ्या जाड कामाचे विलयन संपल्यावर तो भाग द्रावणाने स्वच्छ करतात आणि मग नाजूक भागाचे काम करतात यावेळी हायड्रोक्लोरिक सिड वापरतात, कारण ते नत्राम्लासारखे शक्तिमान व भयंकर नसते. 'डच द्राव' (आर्यन पर क्लोराइड-फेरिक क्लोराइड) हे नाजूक कामासाठी विशेषतः तांब्यासाठी फारच उत्तम असतो.

(ऐ) धातु-विचित्रण (मेटल ग्राफिक) : या प्रकारचा प्रयोग प्रथमतः १९५३ मध्ये रॉल्फ नेश या जर्मन-नार्वेजियन चित्रकाराने केला. याची साधने नेहमीसारखी कोरण्या किंवा द्राव नसून तार कापायच्या कात्र्या व धातुसाधक औजार (सोल्डरिंग आर्यन) ही असतात. असे अनेकविध धातुपदार्थांचे तुकडे कलात्मक रीतीने जुळवून ते औष्णिक तंत्राने (वेल्डिंग) धातुपट्‌ट्यावर चिकटावयाचे (हल्ली त्यासाठी अरल्डाइट चालू शकते), म्हणजे मुद्रापट तयार होतो. याची छपाईसुद्धा कौशल्याने व कल्पकतेने करावी लागते.

(ओ) उठाव (एम्बॉसिंग) मुद्रण : आधुनिक कलाप्रकारांत छायाप्रकाशाने एखादाच भाग उंच उठवितात. हा प्रयोग प्रथम जपानमध्ये करण्यात आला. त्याला अदृश्य-मुद्रण (ब्लाइंड प्रोसिंग) म्हटले जाते. यात शाई वापरत नाहीत, तर ठशांवर दाब देऊन हा प्रकार निर्माण करतात.

(२) उत्कीलन किंवा उत्कीर्णन मुद्रण : यात चित्र कोरण्याचे काम कोरणी, घासणी किंवा अम्लक्रियेने करतात. त्यासाठी छपाई साधन म्हणजे धातुमुद्रापट एका लोखंडी जाड पत्र्यावर उताणा ठेवतात. मग छापायचा कागद त्यावर पालथा ठेवून व त्यावर मऊ लोकरीचे कापड ठेवून हे सर्व दोन लाटण्यांतून दाबून बाहेर काढतात. कधीकधी मऊ कापडाची घडी पाण्यात भिजवून त्यातील पाणी दाबून किंवा पिळून काढून टाकतात. अशा तऱ्हेने किंचित ओल्या कापडाची घडी वापरणे अधिक उपयुक्त ठरते.

शाईच्या बाबतीत तिच्यात इतपत घट्टपणा हवा की छापल्यानंतर ती कागदावर उठावरूपातच दिसावी आणि चिकटपणा असा हवा की ओलसर (ओला चिंब नव्हे) कागदाला तिने धरावे आणि छपाई स्वच्छ व दाट दिसावी. शाई लावताना तसेच वरचा भाग पुसताना मुद्रापट थोडा कोमट असावा म्हणून तो तात्पुरत्या शेगडीवर ठेवतात; त्यामुळे शाई मोकळी राहते. घट्ट शाई नीट उतरत नाही.

पुसण्यासाठी इस्त्री केलेल्या कापडची घडी वापरतात. अगदी शेवटच्या क्षणी मात्र हाताच्या तळव्याने पुसतात. छापल्यानंतर कागद वाळविण्यासाठी चिमट्याने तो लटकवितात किंवा विशिष्ट घोड्यांवर ठेवतात. बहुरंगी छपाईसाठी पिवळा, लाल, निळा व शेवटी काळा रंग वापरतात. कागद वाळला म्हणजे तो आकसतो. त्यामुळे छपाईच्या सम्यकपणात (रजिस्ट्रेशन) चूक होण्याची शक्यता असते; म्हणून दर दुसऱ्या छपाईच्या आधी तो थोडा ओलसर करावा लागतो. बहुरंगी छपाई करण्यापूर्वीच कागदाच्या स्थितीत खूणदर्शक लहान चौकोनी ठोकळे (गाइड) चिकटपट्टीने डकवून ठेवतात. शिवाय कागदाच्या ह्या खूणदर्शकांशी संबंध येणाऱ्या बाजू नीट व काटकोनात कापून ठेवाव्या लागतात. याहून खात्रीची पद्धत म्हणजे कागदाच्या अगदी विरुद्ध कोनांतून टाचणीने पहिल्या छपाईच्या वेळी छापलेल्या फुल्यांवर भोके करून, तळावर त्याच जागी सुईने भोके करावयाची आणि कागदावरील फुलीतील भोकांत सुई घालून ती सुई दुसऱ्या छपाईच्यावेळी तळाच्या भोकांवर ठेवून मग कागद सोडावयाचा व त्यावर कागद हलू न देता छपाईचा दाब द्यावयाचा.

(३) समतल किंवा एकस्तर मुद्रण : (लिथोग्राफ किंवा कोलोटाइप): दगड किंवा धातुपटाचा विशिष्ट अंशच शाई धरतो व उरलेला भाग ओला केल्यामुळे तो शाई धरत नाही. अशा समतलाच्या मुद्रासाधनांत शिलामुद्रण किंवा सरसमुद्रण (कोलोटाइप) यांचा अंतर्भाव होतो.

पाणी आणि तैलजन्य शाई परस्परांत मिसळत नाहीत. तेव्हा घासून ताज्याने स्वच्छ केलेल्या चुनखडीच्या दगडावर जर तेलकट शाईने चित्र काढले किंवा मेदयुक्त खडूने चित्र काढले व ती शाई वाळल्यावर तेलकटपणा पसरू नये म्हणून अम्लद्रावयुक्त डिंकाने त्याच्यावर प्रक्रिया केली, तर तेलकटपणा खोलवर शिरतो. आजूबाजूची जागा पाणी शोषण्यासाठी सूक्ष्म छिद्रयुक्त होते आणि दगडावर ओल्या पाण्याचा बोळा फिरविल्यास शाईची जागा सोडून उरलेल्या जागी पाणी मुरते. अशा ओलसर स्थितीत दगडावरून शाई लागलेले लाटणे फिरविले, तर फक्त शाईच्या जागेवर तेवढा अधिक शाईचा थर बसतो. कलावंत दगडावर बारीक ठिपके व रेघांनी काळजीपूर्वक चित्रण करून मोकळा होतो आणि त्यानंतर कुशल कारागीर दगडावरील प्रक्रिया व छपाईचे काम हातळीत असतो. छपाईचे काम आटोपल्यानंतर दगडावरील चित्र हे वाळू व पाण्याच्या साह्याने घासून नष्ट करता येते आणि दगडाला चकाकी आणून पुन्हापुन्हा तो दगड चित्रणासाठी व छपाईसाठी वापरता येतो. दगडाच्या ऐवजी जस्त किंवा ल्युमिनियम धातूचे पत्रे सूक्ष्म छिद्रान्वित करून वापरतात. छपाईच्या यंत्रात हे पातळ पत्रे पिंपाभोवती बसवून त्यावरील शाई जेव्हा रबर मढवलेल्या पिंपावर घेऊन नंतर कागदावर किंवा पत्रे इत्यादींवर उतरवितात, तेव्हा त्या पद्धतीला प्रतिरूपमुद्रण (ऑफसेट प्रिंटिंग) म्हणतात.

(४) रेशमी जाळीमुद्रम : पूर्वी कात्री किंवा कोरणीने साचे करून त्यांतून रांगोळ्या काढीत वा भूमिअलंकरण करीत. अलीकडे बारीक तंतुवस्त्रयुक्त चौकटींनी साचे करून छापण्याची कला विकसित झाली आहे, तिला रेशमी जाळीमुद्रण (सिल्क स्क्रिन-प्रिंटिग) किंवा साधेमुद्रण असेही म्हणतात.

कागद किंवा तत्सम पातळ परंतु कडक स्तरावर चाकूने साचे कोरले आणि त्यांतून शाई कुंचल्याने किंवा ओढणीने दाबून ओढून काढली तर खाली उत्तम छाप उठतो. मात्र अशा साच्यातील बेटे (आयलंड) किंवा कडेपासून मोकळे सुटलेले भाग जागेवरून निसटतात; त्यामुळे छपाईत खंड पडतो. चिनी-जपानी कलावंतानी या बेटांना मानवी केसांनी धरून ठेवण्याची युक्ती काढली. त्याऐवजी १९०० च्या सुमारास त्यावर जाळीयुक्त कापडच चिकटवण्याचे तंत्र पाश्चात्त्यांनी शोधून काढले आणि १९५० पासून चित्रकारांनी हे तंत्र उचलून त्यांनी ह्या रेशमी जाळीमुद्रण शैलीला लोकप्रिय केले.

या प्रकारात लाकडी चौकटीवर रेशमाची किंवा नायलॉनची जाळी ताणून ठोकतात किंवा चिकटवतात. साचा कापून झाला की मोठ्या कौशल्याने तो या जाळीयुक्त चौकटीला चिकटवतात. बाजूचे कोपरे चिकट पट्टीने बंद करतात. म्हणजे फटीतून शाई झिरपून पुढे घाण होणे टळते. लांब कापडावर (चादरी, साड्या, सतरंज्या इ.) छापणे असेल, तर लांब बाकांच्या कडेला अटकाव बसवितात व एक चौकटी भाग छापला की ती चौकट पुढच्या अटकावापाशी अडवून दुसरा छाप, अशा क्रमाने छापत जातात. जर लहान वस्तूवर छापावयाचे असेल, तर चौकटीच्या एका बाजूला बिजागरे लावतात. मग खाली कागद सम्यक् (रजिस्टर) करून ठेवण्यासाठी तळावर स्थलदर्शक (गाइड मार्क) चिकटवतात, त्यांच्या अनुषंगाने पुढील कागद छपाईसाठी तेथे सम्यक्‌ करून ठेवता येतो.

हाताने कापलेल्या कागदांचे साचे तर करतातच; परंतु पारदर्शक मेणकागदावर अलगद लावलेल्या पट्ट्याही (फिल्म) मिळतात. त्यांवर हलक्या कोरणीचे साचे कापून अनावश्यक पट्ट्या काढून टाकतात. अशा साच्यावर रेशीमयुक्त चौकट ठेवतात व द्रावात भिजलेली चिंधी चौकटीच्या आतून फिरवितात. त्यामुळे पट्ट्या चिकट होतात. त्यांना चिंधीने दाबून ते साध्या रेशमी चौकटीला चिकटवितात.

प्रकाशसंस्करण साचा पद्धती : याखेरीज सांप्रत प्रकाशसंस्करण (फोटोग्रॅफिक) साचा पद्धतीने सुद्धा साचे करता येतात. त्याच्याही दोन पद्धती आहेत : पहिल्या प्रकारात जाळीवरच प्रकाशसंस्कारक्षम (फोटो सेंसिटिव) पदार्थांचा थर लावून ती जाळी अंधारात पंख्याखाली वाळवतात. असा एक प्रकाशसंस्कारक्षम पदार्थ म्हणजे ५ टक्के पोटॅशियम डॉयक्रोमेटयुक्त सरसाचा द्राव किंवा डॉयक्रोमेटयुक्त पॉलिव्हिनिल सिडचा द्राव होय. त्याच्यावर ओलेपणी प्रकाशाची प्रक्रिया होत नाही, परंतु ते वाळले असता उन्हाने किंवा अतिनील प्रकाशकिरणांनी (अल्ट्रा व्हॉयोलेट रेज) सरस वा पॉलिव्हिनिल सिड टणक होते. तथापि ज्या भागाला प्रकाश लागत नाही. तो भाग पाण्यात विरघळतो. या तत्त्वाचा वापर करून हे साचे तयार करतात. प्रकाशरोधन हे चित्रकाराने हाताने काढलेल्या पारदर्शक स्तरावरील काळ्याशार शाईच्या कलाकृतीने होते किंवा सुप्रकाशालेख (फोटो-पॉझिटिव) वापरल्याने होते. या पद्धतीला प्रत्यक्ष स्तरपद्धती (डायरेक्ट कोटिंग प्रोसेस) म्हणतात; तर दुसरी अप्रत्यक्ष पद्धती असून ती पुढीलप्रमाणे असते : जलरोधी रंग आणि सरस लावलेले व पाणी शोषणारे कागद तयार मिळतात. असा पारदर्शक कागद (ट्रेसिंग) किंवा सुप्रकाशालेखापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा कापून त्याला ५% डायक्रोमेट द्रावणात १ मिनिट बुडवितात व नंतर वर काढून आणि त्यातील पाणी झटकून एका पारदर्शक पटावर थराचा भाग पारदर्शकाकडे व कागदी आधार बाहेर, असा ठेवतात. त्यात हवेचा बुडाबुडा राहणार नाही अशा तऱ्हेने तो ठेऊन त्यावर हलक्या हाताने लाटतात. मग पारदर्शक व स्वच्छ काचेच्या चौकटीच्या आतील भागात प्रथम पारदर्शक कागद किंवा सुप्रकाशालेख ठेवतात, त्यावर वरील लाटलेल्या कागदाची पारदर्शक बाजू सुप्रकाशालेखाच्या संपर्कात ठेवून त्यावर कापड व कागद दाबन चौकटी बंद करतात. ही प्रक्रिया झाली की ती प्रक्रियायुक्त वस्तू कोमट पाण्याच्या टाकीत बुडवितात. सरस ढिला झाला की कागद हळूच उचलून फेकून देतात आणि प्रकाशित स्तराला पाण्यात झोके देतात. त्याने अप्रकाशित रंगयुक्त सरस धुऊन जातो. थंड पाण्याने धुवून, त्या स्तरावर रेशीमयुक्त चौकट ठेवून आणि जुन्या वर्तमानपत्रांनी दाब देऊन पाणी शोषून घेतात व साचा पंख्याच्या वाऱ्याने वाळवितात. या पद्धतीने सूक्ष्म अक्षरे, रेषा इत्यादींचे उत्कृष्ट साचे छपाईसाठी तयार होतात.

संदर्भ : 1. Baker, Elizabeth Faulkner, Printers and Technology, New York, 1957.

2. Peterdi, Gabor, Print-Making, 1971.

3. Rothenstein, Michael, Frontiers of Printmaking, New York, 1966.

4. Wechsler, Herman J. Great Prints and Printmakers, London, 1967.

लेखक : ल. श्री.वाकणकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate