অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोलाराम

मोलाराम

(सु. १७५०–१८३३). भारतीय चित्रकार. तो पहाडी चित्रशैलीच्या गढवाल शाखेतील शेवटचा प्रसिद्ध चित्रकार व कवी होता. त्याने लिहिलेल्या आत्मचरित्रपर काव्यातून त्याचवेळच्या गढवाल संस्थानचा राजकीय इतिहास, तसेच त्याने आपल्या आश्रयदात्या राजांकरिता केलेले राजकीय कार्य यांची उद्‌बोधक माहिती मिळते. त्याने आपल्या बऱ्याच चित्रकृतींवरही चित्रविषय वर्णन करणारे काव्य लिहिले आहे. [ गढवाल कला].

ढवाल राजा प्रिथीपत शाहच्या (१६२५–६०) आश्रयास मोगल दरबारातून आलेल्या शामदास व हरदास ह्या पिता-पुत्र चित्रकारांच्या चौथ्या पिढीत मोलारामचा जन्म झाला. त्याचे वडील मंगतराम हे स्वतः चित्रकार होते व मोगल शैलीत चित्रे काढीत. त्यांच्या हाताखालीच मोलारामने वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले व मग कांग्रा ह्या त्या काळच्या प्रसिद्ध चित्रकलाकेंद्रास भेट दिली. त्यामुळे त्याच्या चित्रांत कांग्रा शैलीतील तंत्र व चित्रविषय ह्यांचा बराच प्रभाव दिसतो. कांग्रा शैलीतील प्रसिद्ध चित्रकार रायसिंग हा त्याचा गुरू असल्याचे मोलारामने एका चित्रावर नमूद केले आहे. त्याला स्वतःला चित्रकारापेक्षा कवी म्हणवून घेण्यात जास्त अभिमान वाटत असे. गढवालच्या राजाकडून त्याला ६० खेड्यांची जहागीर व रोज ५ रुपये भत्ता मिळत असे. श्रीनगर येथे त्याचे निधन झाले.

मोलारामने आपल्या चित्रांतून अष्टनायिका, मयूरमुखी, चकोर प्रिया, कृष्ण-रुक्मिणी, उषास्वप्न, पुनामासी, सुंदर फुले व झाडे असे अनेक विषय हाताळले आहेत. पण अष्टनायिका व त्या प्रत्येकीचे पृथगात्म शृंगारिक भावविश्व हे मोलारामचे खास वैशिष्ट म्हणता येईल. तो त्या चित्रांवर कविताही लिहीत असे. त्याने काढलेल्या अष्टनायिकांचा एक संच त्याचा नातू बालकराम ह्याने जोहरी राजा कीर्तिसिंग ह्यास १९१० मध्ये भेट दिला. पक्षी, विशेषतः मोर व चकोर हे त्याचे आवडते विषय होते.चकोर प्रिया मयूरमुखी ह्या त्याच्या उत्कृष्ट कलाकृतींपैकी होत. विशेषतःमयूरमुखी ह्या चित्रात मोलारामच्या कलेचा परमोत्कर्ष दिसून येतो. गढवाल चित्रशैलीत दिसून येणारे एक वैशिष्ट्य मोलारामच्या चित्रांतही आहे. ते म्हणजे तत्त्कालीन उच्चभ्रू समाजातील स्त्रियांच्या कपाळावरील आडवा, चंद्रकोरीसारखा चंदनी टिळा. मात्र कांग्रा चित्रशैलीतील लयबद्ध रेषा, कौशल्यपूर्ण सहजता व रंगांचा चमकदारपणा यांचा अभाव त्यांत दिसतो. तरीही त्याच्या चित्रांतील प्रभावी वातावरणनिर्मिती, फुलांच्या चित्रांतील अगम्य आकर्षण व लावण्य, तसेच रंगसगतीतील नाजुकता व टवटवीतपणा इतका अजोड आहे की, त्याचे अनुकरण करता येणे अशक्य आहे. मोलारामच्या चित्रांचे संग्रह बॉस्टन म्यूझियम येथे व जे.सी. फ्रेंच, मुकंदी लाल (श्रीनगर) यांच्याकडे आहेत.

लेखक : वा. व्यं.करंजकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate