অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिनान

सिनान

(१५ एप्रिल १४८९–१७ जुलै १५८८). तुर्की वास्तुशिल्पज्ञ. पूर्ण नाव इब्न अब्द अल्-मन्नान सिनान. त्याचा जन्म ग्रीक-ख्रिस्ती मातापित्यांपोटी अगिर्नाझ, तुर्कस्तान येथे झाला. जोसेफ हे सिनानचे ख्रिस्ती नाव होते. ‘कोसा मीमार’ सिनान (महान वास्तुकार सिनान) या नावाने तो प्रसिद्घ आहे. सिनान याच नावाच्या अन्य दोन वास्तुकारांहून त्याचे वेगळेपण दर्शविण्यासाठी त्याला हे नामाभिधान बहाल करण्यात आले. आपल्या बांधकाम व्यावसायिक आजोबांबरोबर त्याने बरीच भ्रमंती केली आणि वडिलांच्या व्यवसायात गवंडी व सुतार म्हणून उमेदवारी केली. १५१२ मध्ये ‘जानिसरी’ या तुर्की पायदळ विभागात त्याने कॉन्स्टँटिनोपल (सध्याचे इस्तंबूल) येथे लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले.

पुढे तो लष्करी मोहिमांमध्ये तोफखान्याचा प्रमुख बनला. ह्या काळात त्याने तटबंद्यांचे बांधकाम केले, लेक व्हॅनमधून नौकावाहतुकीसाठी सेतू बांधले आणि डॅन्यूब नदीवर पूलही बांधला. १५३० च्या दशकातील ह्या लष्करी तटबंद्या व सेतूंच्या बांधकामांमुळे आणि वास्तुकल्पांमुळे सिनानची वास्तुशिल्पज्ञ म्हणून ख्याती झाली. १५३९ मध्ये त्याने प्रथमच विनालष्करी म्हणजे नागरी वास्तुरचना पूर्ण केली आणि पुढील सु. चाळीस वर्षे त्याने ऑटोमन साम्राज्याचा प्रमुख दरबारी वास्तुकार म्हणून अनेक दर्जेदार वास्तू उभारुन महनीय कामगिरी बजावली.

हा ऑटोमन साम्राज्याचा सुवर्णकाळ होता आणि राजकीय सत्तेच्या व सांस्कृतिक वैभवाच्या ह्या उत्कर्षकाळात सिनानने वास्तुक्षेत्रात बजावलेली कामगिरी थक्क करणारी आहे. ऑटोमन राजघराण्यातील पहिला सुलेमान ‘द मॅग्निफिसेंट’(कार. १५२०—६६) व दुसरा सलीम (१५२४— ७४) ह्यांच्या कारकिर्दींत सिनान हा तुर्की-ऑटोमन साम्राज्याचा दरबारी वास्तुकार होता. ह्या काळात त्याने ७९ मशिदी, ३४ राजमहाल, ३३ सार्वजनिक स्नानगृहे, १९ कबरी, ५५ विद्यालये, १९ गरिबांसाठी घरे, ७ मद्रसे (धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळा) व १२ सराया (धर्मशाळा) यांच्या वास्तुरचना केल्याची आकडेवारी उपलब्ध आहे.

यांखेरीज त्याने धान्याची कोठारे, कारंजी, जलसेतू , इस्पितळे यांसारख्या विविध प्रकारच्या वास्तूही उभारल्या. त्याच्या तीन प्रमुख व सुप्रसिद्घ वास्तू म्हणजे शहजादे मशीद (१५४८ मध्ये पूर्ण) व पहिला सुलेामान मॅग्निफिसेंटची सुलेमानी मशीद (१५५०— ५७) ह्या दोन्ही इस्तंबूलमध्ये आहेत आणि तिसरी एदिर्ने (एड्रिॲनोपल) येथील सलीम मशीद (१५६८— ७४). मशीद बांधकामाची मध्यवर्ती केंद्रस्थानी घुमट असलेली ‘ऑटोन-तुर्की’ वास्तुशैली त्याने विकसित केली.

बायझंटिन हाज सोफिया (५३२—३७) या सर्वश्रेष्ठ मशिदीच्या घुमटयुक्त वास्तुशैलीचा प्रभाव सिनानवर होता व ही शैली त्याने आत्मसात करुन स्वतःची वास्तुशैली घडवली. मशीद-वास्तुरचनेचा अविभाज्य घटक म्हणून त्याला मध्यवर्ती विस्तीर्ण गोलाकार घुमटाची रचना अपरिहार्य व गरजेची वाटली. मशीद-वास्तूची पारंपरिक स्तंभावली दालनाची रचना त्याने अबाधित ठेवली; मात्र पूर्वापार प्रचलित असलेल्या सपाट छताच्या बहुस्तंभी प्रार्थनादालनाची रचना बदलून त्या जागी आधारस्तंभांवर पेललेल्या मध्यवर्ती भव्य गोलाकार घुमटाची योजना केली. सामुदायिक उपासनेसाठी विस्तीर्ण खुला अवकाश मशिदीच्या अंतर्भागात त्यायोगे उपलब्ध झाला.

सिनानने आपल्या वास्तुरचनेत छोटेघुमट, अर्धघुमट, पडभिंती, त्रिकोणिका ह्या वास्तुघटकांचा अशा खुबीने वापर केला, की शिरोभागी असलेल्या भव्य घुमटावरच पाहणाऱ्याची नजर खिळावी, तसेच वास्तूच्या कोपऱ्यांवर उंच सडसडीत मनोरे उभारुन एकूणच वास्तुकल्पाला देखणे आकर्षक रुप दिले. उदा., सलीमच्या मशिदीचा दर्शनी भाग. इस्तंबूलमधील सुलेमानी मशीद ही त्याची सर्वश्रेष्ठ वास्तुरचना. ऑटोमन साम्राज्यात बांधलेली ही सर्वांत भव्य मशीद होय.

ही मशीद म्हणजे एक सामुदायिक उपासनास्थळ आहेच, शिवाय तीत एक विस्तीर्ण सार्वजनिक संकुल असून त्यात चार मद्रसे, एक भव्य इस्पितळ व वैद्यकशाळा, भोजनगृह, स्नानगृहे, दुकाने, तबेले आदींचा अंतर्भाव आहे. सुसंवादी वास्तुशिल्पीय रचनांबद्दल सिनानची विशेषत्वे ख्याती आहे. इस्तंबूल येथे त्याचे निधन झाले. (चित्रपत्र).

सलीम मशीद, ऑटोमन-शैली (१५६८-७४) एदिर्ने-सिनान.सलीम मशीद, ऑटोमन-शैली (१५६८-७४) एदिर्ने-सिनान.शहजादे मशीद : अंपर्दृश्यभाग (१५४८), इस्तंबूल-सिनानशहजादे मशीद : अंपर्दृश्यभाग (१५४८), इस्तंबूल-सिनानसुलतान सुलेमान मशीद (१९५०-५७) इस्तंबूल-सिनानसुलतान सुलेमान मशीद (१९५०-५७) इस्तंबूल-सिनान

लेखक : श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate