অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुसान लँगर

सुसान लँगर

(जन्म २० डिसेंबर १८९५-मृत्यू १७ जुलै १९८५). अमेरिकन तत्त्वज्ञ लेखिका. भाषिक विश्लेषण व सौंदर्यशास्त्र या विषयांत मौलिक विचारांची भर घातली. (न्यूयॉर्क शहरात जन्म. रॅडक्लिफ कॉलेजमध्ये शिक्षण-बी.ए. (१९२०) आणि हार्व्हर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञानामध्ये पीएच्.डी. (१९२६). रॅडक्लिफ कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान विषयाच्या पाठनिर्देशिका (१९२७-४२), कोलंबिया विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या अधिव्याख्यात्या (१९४५-५०), तसेय कनेक्टिकट कॉलेजात तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापिका (१९५४-६१ आणि १९६१ नंतर गुणश्री प्राध्यापिका), १९६२ मध्ये सेवानिवृत्ती. विल्यम एल्. लँगर या इतिहासकाराशी १९२१ मध्ये विवाह आणि १९४२ मध्ये घटस्फोट. ओल्ड लाइम, कनेक्टिकट येथे निधन.

ब्रिटिश तत्त्वज्ञ ल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड व जर्मन तत्त्वज्ञ एर्न्स्ट कासीरर यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. फिलॉसफी इन अ न्यू की (१९४२), फीलिंग अँड फॉर्म (१९५३), प्रॉब्लेम्स ऑफ आर्ट (१९५०) ही त्यांची महत्त्वाची पुस्तके, माइंड : न एसे ऑन ह्यूमन फीलिंग, तीन खंड (१९६७, १९७२ व १९८२) या ग्रंथात मानवी मनाचा उगम व विकास यासंबंधीचे विवेचन आहे.

लँगर यांचे तत्त्वज्ञानात्मक लिखाण मुख्यतः प्रतीकांविषयी (सिंबल्स) आहे. आपण आपले विचार मांडण्यासाठी किंवा भावना व्यक्त करण्यासाठी जी नेहमीची भाषा वापरतो, ती प्रतीकांची बनलेली असते. प्रतीक (सिंबल) आणि खूण (साइन) ह्यांत लँगर भेद करतात. जेथे धूर असतो तेथे विस्तव असतो असे मला वारंवार आढळून आले, तर माझ्यासाठी धूर ही विस्तवाची खूण बनते. येथे धूर आहे तेव्हा येथे विस्तव असला पाहिजे, असा तर्क मी करतो. पण ‘धूर’ हा शब्द आणि धूर ही वस्तू यांच्यामधील संबंध असा कार्यकारणात्मक किंवा भौतिक साहचर्याचा नाही. ‘धूर’ हा शब्द धूर ह्या वस्तूचा वाचक आहे. ह्या दोहोंतील संबंध अर्थात्मक आहे, भौतिक किंवा नैसर्गिक नाही. ‘धूर’ हा शब्द धूर ह्या वस्तूचे प्रतीक आहे; धूराविषयी बोलण्याचे, विचार करण्याचे माध्यम आहे. धूर प्रत्यक्षात उपस्थित नसतानाही धूराचा विचार ‘धूर’ शब्द वापरून करता येतो.

आता, लँगर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे, प्रतीके दोन प्रकारची असतात. एक प्रकार म्हणजे विवेचक (डिस्कर्सिव्ह) प्रतीके.वस्तू, घटना ह्यांचे वर्णन करण्यासाठी आपण जी नेहमीची गद्य भाषा वापरतो ती विवेचक प्रतीकांची बनलेली असते आणि तिची परिणती वैज्ञानिक भाषा आणि गणिताची भाषा ह्यांच्यात झालेली असते. वस्तुस्थितीचे तिचे घटक आणि त्यांच्यामधील परस्परसंबंध ह्यांच्यात आपण विश्लेषण करतो. प्रत्येक घटक किंवा संबंध ह्यांचे वाचक असलेले असे एक प्रतीक-शब्द-भाषेत असते आणि ह्या प्रतीकांची किंवा शब्दांची व्याकरणाच्या नियमानुसार रचना केल्याने जे वाक्य बनते, ते सबंध वस्तुस्थितीचे वर्णन करते. ह्यामुळे त्याच प्रतीकांची वेगवेगळ्या प्रकारे रचना करून भिन्न वस्तुस्थितींचे वर्णने करता येतात. वैज्ञानिक आणि गणिती भाषेचा वापर ह्याच पद्धतीला अनुसरून होत असतो.

दुसऱ्या प्रकारची प्रतीके ही उपस्थापक (प्रेझेंटशनल) असतात. कलाकृती ही उपस्थापक प्रतीके असतात. उदा., एखादा पुतळा, चित्र, आळवलेला एखादा राग इ. जे प्रतीक असते त्याला अर्थ असतो, ते कशाचे तरी प्रतीक असते, त्या प्रतीकाद्वारा आपल्या जाणिवेपुढे काहीतरी ठेवण्यात आलेले असते. शिवाय प्रतीकाद्वारे आपल्यापुढे जे ठेवलेले असते त्याला त्याचा स्वतःचा आकार (फॉर्म) असतो. आता वस्तुस्थितीचा आकार तिच्या घटकांचे परस्परांशी जे संबंध असतात त्यांचा बनलेला असतो. तेव्हा ह्या घटकांसाठी प्रतीके योजिली आणि ह्या संबंधांशी अनुरूप अशा रीतीने ह्या प्रतीकांची रचना केली की वस्तुस्थिती व्यक्त होते; तिचे वर्णन होते. आता लँगर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे कलाकृती हे जे उपस्थापक प्रतीक असते ते एक विशिष्ट भावना व्यक्त करते. एक विशिष्ट भावना हा ह्या प्रतीकाचा अर्थ असतो. आपली कोणतीही भावना घेतली तर तिचा एक आकार असतो. पण हा आकार तिच्या घटकांच्या परस्परसंबंधांचा बनलेला नसतो. भावनेचा आकार तिच्या स्वतःत अनुस्यूत असतो, तो तिचा आंतरिक विशिष्ट आकार असतो. एखादी कलाकृती घेतली तर तिचे घटक असतात- उदा., चित्राचे रंग, रेषा इ. घटक असतात- व ह्या घटकांत परस्परसंबंधही असतात. पण चित्राचा प्रत्येक घटक हे त्या चित्राकडून व्यक्त होणाऱ्या भावनेच्या कोणत्यातरी घटकाचे प्रतीक असते, चित्राच्या घटकांतील परस्परसंबंध ही त्या भावनेच्या परस्परसंबंधांची प्रतीके असतात असे नसते. तर चित्राचे घटक व त्यांच्यामधील परस्परसंबंध ह्यातून आकारित झालेली सबंध कलाकृती हे त्या विशिष्ट भावनेचे प्रतीक असते. अशा कलाकृतीद्वारा त्या भावनेचा विशिष्ट आकार प्रकट, गोचर होतो. पण ह्या आकाराचे अन्य मार्गाने वर्णन करता येत नाही. कारण विवेचक भाषा ज्याचे वर्णन करू शकेल असा तो आकार नसतो. केवळ त्या कलाकृतीद्वारेच तो आकार स्पष्ट होऊ शकतो. लँगर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मिथ्यकथा, विधी (रिच्युअल) इ. ही सुद्धा उपस्थापक प्रतीके असतात.

लेखक : मे. पुं. रेगे

माहिती स्रोत :मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate