অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुखात्मे, पांडुरंग वासुदेव

सुखात्मे, पांडुरंग वासुदेव

(२७ जुलै १९११–२८ जानेवारी १९९७). एक प्रसिद्घ भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ. ते प्रतिदर्शन सिद्घांत व कृषी सांख्यिकीतील प्रायोगिक अभिकल्पाचे प्रवर्तक व अधिकारी व्यक्ती मानले जातात.

सुखात्मे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बुध येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वासुदेव हरी सुखात्मे व आईचे नाव सत्यभामाबाई होते. सुखात्मे कुटुंब १९१९ मध्ये पुण्यात आले. मॅट्रिकच्या परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९३२ मध्ये त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची गणितामधील बी.एस्‌सी. ही पदवी संपादन केली. शिष्यवृत्त्यांच्या साहाय्याने व अनेकांनी केलेल्या मदतीमुळे ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. संख्याशास्त्रात (सांख्यिकीत) मौलिक संशोधन करून त्यांनी लंडन विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळविली (१९३६). १९३९ मध्ये त्यांना डी. एस्‌सी. पदवी मिळाली. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘द्विविभाजित फलन’ (बायपार्टिशनल फंक्शन्स) हा होता.

बनारस हिंदू विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू पंडित मदनमोहन मालवीय यांच्याकडे रँग्लर विष्णुपंत नारळीकर यांनी सुखात्मे यांची शिफारस केल्यामुळे या विद्यापीठात सांख्यिकी विभाग सुरू झाला. सुखात्मे यांना मालवीयांकडून प्रेरणा मिळाल्यामुळे ते आपल्या ज्ञानाचा व पदाचा देशाच्या प्रगतीसाठी उपयोग व्हावा म्हणून सतत प्रयत्नशील राहिले. भारतीय कृषिसंशोधन व हरितक्रांती यांमध्ये त्यांनी संशोधन केलेले सांख्यिकीय तंत्रज्ञान फारच उपयुक्त ठरले आहे. पशुवैद्यक, पशुपालन, सुधारित व संकरित बियाणे निर्मिती इत्यादींशी संबंधित सांख्यिकीमध्येही त्यांचे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले आहे. जगाची अन्नधान्याची समस्या व आहार यासंबंधीही त्यांनी पुष्कळ संशोधन केले. आहारासंबंधीचे त्यांचे ‘सुखात्मे-मार्गन गृहीतक’ प्रसिद्घ आहे. मानवाला किती अन्न लागते ? जागतिक उपासमार कशी मोजायची ? या प्रश्नांवर सुखात्मे यांनी १९६१ मध्ये इंग्लंडमध्ये रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी पुढे सादर केलेल्या प्रबंधामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. अन्नातील ऊष्मांक व प्रथिनांचे प्रमाण आणि पोषण यांसंबंधीचे पाश्चात्त्य निकष अयोग्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले. भारतातील पारंपरिक शाकाहारी आहारही संतुलित आहे; तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास कुपोषणावर मात करता येते आणि त्यासाठी खर्चिक अशा पाश्चात्त्य आहारपद्घतीचे अंधानुकरण करण्याची जरूरी नाही, हे त्यांचे निष्कर्ष महत्त्वाचे मानले गेले आहेत. कुपोषणाचा प्रश्न आरोग्याशी निगडित आहे, हे त्यांनी विशेष करून दाखविले. अन्नपचन व्यवस्थित होत नसेल, तर आहारात वाढ करणे व्यर्थच आहे. पारंपरिक आहाराला सार्वजनिक आरोग्याची जोड लाभली, तर कुपोषणाची समस्या सुटेल असे त्यांचे ठाम मत होते. पुण्याच्या परिसरातील खेढ्यात प्रयोग करून त्यांनी ही मते निश्चित केली, त्यांचे हे भारतातील कामाचे वैशिष्टय होय. त्यांनी सुचविलेला ‘सुखडी’ हा आहार पौष्टिक व हवामानाचा विचार करून पचनासाठी योग्य व स्वस्त असल्याचे जगातील अनेक तज्ञांनी मान्य केले.

सुखात्मे यांनी विविध पदांवर काम केले. कोलकाता येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यू ट ऑफ हायजिन येथे प्राध्यापक, महाराष्ट्र ॲसोसिएशन फॉर दि कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (विज्ञानवर्धिनी, महाराष्ट्र) येथे जीवसांख्यिकी विभागाचे प्रमुख, पुणे विद्यापीठाच्या ग्रामीण नियोजन विभागाचे प्रमुख, तसेच भारतीय कृषिसंशोधन परिषदेत सांख्यिकी सल्लागार (१९४०–६०) म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शास्त्रीय संस्थांचे सदस्य, अधिछात्र व सल्लागार म्हणून काम केले. त्यांतील उल्लेखनीय संस्था पुढीलप्रमाणे : इंटरनॅशनल स्टॅटि-स्टिकल इन्स्टिट्यूट, अमेरिकन स्टॅटिस्टिकल ॲसोसिएशन, संख्याशास्त्रीय अध्ययन संस्था, इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (इंडिया), इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च आणि मराठी विज्ञान परिषद. ते इंडियन सोसायटी ऑफ अग्रीचुल्तुराल  स्टॅटिस्टिक्स या संस्थेचे संस्थापक होते.

रोम येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व शेती महामंडळाच्या सांख्यिकी विभागाचे प्रमुख (१९५२– ७०) आणि आयोवा स्टेट विद्यापीठ, एम्‌स (आयोवा, अमेरिका) व कॅलिफोर्निया विद्यापीठ (बर्कली) येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले. नंतर ते पुणे येथे स्थायिक झाले.

सुखात्मे यांच्या कार्याचा व सेवेचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिकांनी व सन्मानांनी गौरव करण्यात आला आहे. ‘ द वर्ल्ड्‌स हंगर अँड फ्यूचर नीड्स इन फुड सप्लाय ‘ या निबंधाबद्दल त्यांना १९६३ मध्ये रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी (लंडन) या संस्थेचे गाय सिल्व्हर पदक मिळाले. हे पारितोषिक मिळविणारे सुखात्मे पहिले भारतीय होत. विज्ञान विकास आणि मानवतेचे कल्याण यांतील असामान्य योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले (१९७३).

सुखात्मे यांचे सँपलिंग थिअरी ऑफ सर्व्हेज विथ अप्प्लिकतिओन ; स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर ग्रीचुल्तुराल रिसर्च वक्‌र्स रिसर्च वक्‌र्स (सहलेखक, १९५४); थर्ड वर्ल्ड सर्व्हे; फीडिंग इंडियाज ग्रोईंग मिलियन्स (१९६५); दि फूड अँड न्यूट्रिशन सिच्युएशन इन इंडिया (१९६२); न्यूअर कन्सेप्ट्स इन न्यूट्रिशन अँड देअर इंप्लिकेशन फॉर पॉलिसी (१९८२) हे ग्रंथ आणि भारतातील व परदेशांतील प्रसिद्घ नियतकालिकांत प्रकाशित झालेले त्यांचे पन्नासाहून अधिक मूलभूत शोधनिबंध तज्ञांनी प्रशंसिले आहेत.

सुखात्मे यांचे पुणे (महाराष्ट्र) येथे निधन झाले.

लेखक : सतीश वि. कुलकर्णी

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate