অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ज्यू संस्कृति

ज्यू संस्कृति

पॅलेस्टाइनमध्ये उदयास आलेली हिब्रू किंवा ज्यू लोकांची संस्कृती. यहुदी या नावाने हे लोक ओळखले जातात. इ. स. पू. आठव्या शतकात बेंजामिन व ज्यूडा या दोन जमातींनी ज्यूडाचे राज्य स्थापन केले. त्यांतील नागरिकांना ज्यूडियन म्हणत. त्यावरूनच पुढे ज्यू ही संज्ञा निर्माण झाली असावी. इ. स. १३२ मध्ये रोमन सम्राट हेड्रिएनस याने ज्यू धर्मावर बंदी घातली. तेव्हापासून जवळजवळ अठराशे वर्षांपर्यंत म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरपर्यंत ज्यू समाजाला स्वतःची अशी मातृभूमी नव्हती. जगातील काही अत्यंत प्राचीन संस्कृतींचा वारसा ज्यू लोकांकडे आला. तसेच ख्रिस्ती व इस्लाम या दोन महत्त्वाच्या धर्मांची वैचारिक व तात्त्विक बैठक उभारण्यास ज्यू संस्कृती साहाय्यभूत ठरली. एकीकडे अत्यंत प्राचीन व दुसरीकडे अगदी अर्वाचीन अशा संस्कृतींशी दृढ संबंध असणाऱ्या या समाजाला जगाच्या राजकीय नकाशात प्रदीर्घ काळ स्थानच नसावे, हा इतिहासाचा एक चमत्कार म्हणावा लागेल; पण याहीपेक्षा मोठा चमत्कार असा की, पोटासाठी जगभर विखुरलेल्या या समाजाने मातृभूमी नसतानासुद्धा आपली एकात्मतेची जाणीव सतत कायम ठेवली, हा होय.

यूरोपीय इतिहासकारांच्या ग्रंथांत ज्यू इतिहासाला फार महत्त्व दिलेले आढळते. त्यांनी केवळ प्राचीन जगातील वैचारिक नेतृत्व ज्यूंना बहाल केले; एवढेच नव्हे, तर जगातील संस्कृतींचा उगम अथेन्स, रोम व जेरूसलेम येथूनच झाला, असे विधान केल्याचे आढळते. वस्तुतः ईजिप्त, अ‍ॅसिरिया, सुमेरिया, चीन, भारत इ. प्रदेशांतील समाजांनी निर्मिलेल्या संस्कृतींचे विश्वरूपदर्शन आता घडले असूनसुद्धा ज्यू समाजाच्या वतीने असा दावा करण्यात यावा, हे अतिशयोक्तीचे वाटते. ज्यू संस्कृतीची निश्चितपणे केव्हा सुरुवात झाली, हे ज्ञात नाही; पण इ. स. पू. २००० वर्षांपासून ज्यू लोकांचे वास्तव्य पॅलेस्टाइन व आसपासच्या प्रदेशांत होते.

भौगोलिक स्थान

ज्यू लोकांचा प्राचीन इतिहास जेथे घडला, ती पॅलेस्टाइनची भूमी आकाराने लहान आहे. या भूमीचे नैसर्गिक रीत्या चार भाग पडतात. पहिला पश्चिमेकडील सपाट किनारपट्टीचा, दुसरा साधारण दक्षिणोत्तर जाणारी लेबानन पर्वताची शाखा, तिसरा जॉर्डन नदीचे खोरे आणि चौथा जॉर्डनच्या पूर्वेचा वाळवंटाचा प्रदेश. यांतील मध्यावरचा जो डोंगराळ प्रदेश, त्याचे तीन भाग कल्पिता येतात. अगदी दक्षिणेकडे ज्यूडा, यात जेरूसलेम, हीब्रन, बीरशीबा इत्यादींचा समावेश होतो. ज्यूडाच्या लगत उत्तरेस इझ्राएल प्रांत व गॅलिलीचा प्रदेश येतो. या सर्व भूभागाची अन्नदात्री नदी म्हणजे जॉर्डन. शेती व पाणीपुरवठा यांसाठी पूर्णपणे अवलंबून राहता येईल,इतका पाऊस येथे होत नाही. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिणाऱ्या जोसीफसला (३७ ? – १००) ही भूमी नंदनवनासारखी भासली, तरी हे नंदनवन प्रदीर्घ मानवी श्रमातूनच उत्पन्न करणे किंवा टिकविणे शक्य होते, तेव्हा उन्हाळ्यात होणाऱ्या जोराच्या पावसाचे पाणी साठवून ठेवून लहानमोठ्या कालव्यांतूनच ते सर्वत्र पोहोचविण्यात येई. लढाया आणि इतर कलह यांतून या मानवी प्रयत्नांत खंड पडल्याबरोबर जमीन वैराण झाली व वाळवंटाचा विस्तार पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढू लागला. पॅलेस्टाइनचे भौगोलिक स्थानही शांतता व सुबत्ता यांना फारसे अनुकूल नव्हते. आशिया व आफ्रिका यांतील विशेषत: टायग्रिस–युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यातील समाज आणि नाईलकाठचा ईजिप्त यांना जोडणारे मार्ग पॅलेस्टाइनमधून जातात. तसेच पश्चिम आशियातून भूमध्य समुद्रामार्गे यूरोपकडे जाण्याचा सरळ मार्ग पॅलेस्टाइनमधूनच जातो. यामुळे तेथील व्यापारी मार्ग व शहरे यांवर ताबा मिळविण्यासाठी सतत संघर्ष चाललेला दिसतो. ईजिप्त, बॅबिलोनिया, अ‍ॅसिरिया, हिटाइट या प्राचीन सत्तांनी या भागावर आपले वर्चस्व राखण्याचे प्रयत्न केले. ही प्राचीन काळातील एक प्रमुख समरभूमी ठरली. आपल्या भौगोलिक स्थानामुळे ही 'वाग्दत्त भूमी' (प्रॉमिस्‌ड लँड) किंवा 'पवित्र भूमी' (होली लँड) सतत संघर्षात सापडत गेली.

ऐतिहासिक साधने

ज्यू लोकांची माहिती मुख्यत्वे ज्या साधनांतून उपलब्ध होते, त्यांत बायबलमधील 'जुना करार' सर्वांत महत्त्वाचा आहे. ह्या ग्रंथाच्या वेगवेगळ्या भागांत ज्यू लोकांची भ्रमती, त्यांचे राजे व राजकारण यांसंबंधी बरीच माहिती मिळते. याशिवाय काही प्राचीन शिलालेखांत आणि मृण्‌मुद्रांत ज्यूंसंबंधी माहिती मिळाली. हामुराबीच्या काळातील मृण्‌मुद्रांत अरबस्तानातून बॅबिलनकडे हिब्रू लोक येत असल्याचा उल्लेख आहे. अमार्ना मृण्‌मुद्रांत पॅलेस्टाइनवर झालेल्या एका मोठ्या 'हिब्रू'आक्रमणाची नोंद आहे. यापुढचा परकीय उल्लेख दुसऱ्या रॅमसीझ याच्या काळातील आहे. यात ईजिप्तमध्ये मोलमजुरी करणाऱ्या हिब्रू लोकांचा निर्देश आहे. ईजिप्तमध्ये ज्यू लोक गुलामगिरीत होते, या घटनेचा उल्लेख रॅमसीझच्या लेखात आहे, असे

समजतात. यानंतरच्या काळात अ‍ॅसिरियन-खाल्डियन (नव-बॅबिलोनियन) व ईजिप्शियन लेखांतून ज्यूडा व इझ्राएल यांच्याशी राजकीय संबंधाचे, त्यांना जिंकल्याचे वा नष्ट केल्याचे अथवा हद्दपार केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. हीरॉडोटस, बेरॉसस यांच्या इतिवृत्तांत इतर घटनांच्या अनुषंगाने या लोकांची माहिती येते, पण ती फार त्रोटक आणि असंबद्ध आहे. पहिल्या शतकात रचलेल्या आपल्या इतिवृत्तात जोसीफस या ज्यू इतिवृत्तकाराने ज्यू राष्ट्राचा अगदी आरंभापासूनचा इतिहास दिलेला आहे. याशिवाय उत्खननांत उपलब्ध झालेल्या अवशेषांतून पॅलेस्टाइनमध्ये ठिकठिकाणी ज्यू लोकांच्या वसाहती कशा होत गेल्या याची आणि त्यांचा उदय व अस्त यांचीही काहीशी माहिती मिळते.

ज्यूपूर्व पॅलेस्टाइन

प्राचीन परंपरेनुसार ज्यू किंवा हिब्रू लोक इ. स. पू. २००० किंवा त्यानंतरच्या काळात अरबस्तानच्या वाळवंटातून कानन म्हणजे नंतरच्या पॅलेस्टाइनमध्ये येऊन स्थायिक झाले असावेत; ते तेथे येण्याच्या आधी कित्येक शतके या प्रदेशात मानवी वस्ती झालेली असावी; कारण येथे निअँडरथल मानवाचे सांगाडे सापडले आहेत. नतुफ, जेरिको, जोर्मो इ. ठिकाणी तसेच खुद जेरूसलेममध्ये नवाश्मयुगीन माणसांचे अवशेष सापडले आहेत. इ. स. प. २५०० ते २००० च्या दरम्यान पूर्व व दक्षिणेकडील वाळवंटातून मुख्यतः अरबस्तानातून आलेले सेमिटिक लोक व दुसरे म्हणजे उत्तरेतून खाली सरकणारे अ‍ॅमोराइट लोक या प्रांतात स्थानिक झाल्याचे दिसते. इ. स. पू. २५०० ते २००० च्या दरम्यान या दोन समाजांचा मिलाफ होऊन त्यांना 'काननाइट' म्हणजे'सखल प्रदेशाचे रहिवासी' अशा नावाने संबोधण्यात येऊ लागले. या सर्व भागात एकत्र किंवा अगदी समान भाषा प्रचलित होती, तसेच देवदेवतांविषयक एकच किंवा समान कल्पना व आचार अस्तित्वात होते. ईजिप्त व सुमेरिया येथील प्रवाह येथे येऊन पोहोचले होते. तथापि काननाइट लोकांची स्वतंत्र अशी संस्कृती निर्माण होत गेली. पॅलेस्टाइनमध्ये येऊन स्थायिक झाल्यावर हिब्रू लोकांचा याच संस्कृतीशी निकटचा संबंध आला. त्यांना भौतिक क्षेत्रात प्राचीन पॅलेस्टाइनचा समृद्ध वारसा झाला.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate