অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फातिमी खिलाफत

फातिमी खिलाफत

फातिमी खिलाफत

उत्तर आफ्रिकेत मुहंमद पैगंबरांच्या फातिमा या मुलीच्या नावाने स्थापन झालेली शिया पंथीय एक खिलाफत. सुन्नी पंथीय अब्बासी खिलाफतीला शह देण्यासाठी इ. स. च्या ९ व्या शतकाच्या मध्यात इस्माइली चळवळ फैलावली. या चळवळीचे नेतृत्व फातिमाची मुले हसन व हुसेन या इमामांच्या वारसांकडे गेले.

इस्माइली पंथाची सुरुवातीची शाखा म्हणजे करामिता अथवा कर्मेथियन. तिचे धर्मप्रसार-प्रचार कार्य उत्तर आफ्रिकेत अबू-अब्दुल्लाह अल्-शायी याच्या मार्गदर्शनाखाली ८९३ पासून गुप्तपणे चालू होते. त्याने बर्बर टोळ्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापिले. त्याला हुसेनचा खापर पणतू सय्यद इब्न हुसेन मदत करीत असे. सुरुवातीस तो सेलेमिया (सिरीया) येथे प्रचारकार्यात गुंतला होता. त्याने ९०३ मध्ये अल्जीरिया जिंकून अबू-अब्दुल्लाहला मदत केली; पण अब्बासींच्या आक्रमणाच्या भीतीने तो येमेनमध्ये व पुढे ईजिप्तमध्ये गेला. तिथे त्याला अमीराने काही काळ नजरकैदेत ठेवला.

दरम्यान अबू-अब्दुल्लाहने अ‍ॅग्लाबाइटांची चळवळ नष्ट करून केर्वानच्या अरब राजपुत्राचा पराभव केला आणि आपल्या जागी सय्यद इब्न हुसेनला नेमले. सय्यद इब्न हुसेनने अल्-महदी हा किताब व उबैदुल्ला हे नाव धारण करून केर्वान येथे फातिमी खिलाफतीची ९०८ मध्ये स्थापना केली. फातिमी परंपरेतील उबैदुल्ला हा पहिला इमाम व खलीफा इफ्रिकियात (ट्युनिशिया) सत्ताधीश झाला आणि त्याने स्वतःला पैगंबरांचा अधिकृत वंशज-वारस म्हणून जाहीर केले.

ट्यूनिशिया, सिसिली, ईशान्य अल्जीरिया, वायव्य लिबिया वगैरे प्रदेश आपल्या ताब्यात आणले आणि अल्-महदिया (बगदाद) येथे राजधानी स्थापन केली. ही खिलाफत इ. स. ९०९ ते १०५१ पर्यंत ट्यूनिशियात व इ. स. ९६९ ते ११७१ पर्यत ईजिप्तमध्ये टिकून होती. या खिलाफतीतील चौदा खलीफा प्रसिद्धीस आले; तथापि त्यांच्या एकूण अधिकृत संख्येबाबत मतभेद आहेत.

बैदुल्ला (कार. ९०९-९३४), अल्-खइम (कार.९३४-४६), अल्-मन्सूर (कार. ९४६-५३) व अल्-मुइझ्झ (कार. ९५३-९७५) या पहिल्या चार खलीफांनी उत्तर आफ्रिकेत राज्य केले. उबैदुल्लाचे सुरुवातीस कर्मेथियन शाखेशी वितुष्ट आले. या पक्षांतर्गत वितुष्टात त्याने अबू-अब्दुल्लाहचा खून केला. या शिवाय त्यास अब्बासींबरोबर सतत झगडावे लागले. पहिल्या तीन खलीफांनी सत्ता-विस्ताराचा प्रयत्न केला; पण ईजिप्त त्यांना जिंकता आले नाही.

अल्-मुइझ्झ सोडता उरलेले खलिफा विशेष कर्तबगार नव्हते. अल्-मुइझ्झने आक्रमक पवित्रा घेऊन राज्यविस्तार केला आणि बायझंटिनवर वर्चस्व प्रस्थापिले; ईजिप्त पादाक्रांत करून कैरो येथे आपली राजधानी हलविली (९७३). या स्वारीत त्याचा सेनापती अल्-जवाहिर याचा सिंहाचा वाटा होता. त्याच्या कारकीर्दीत फातिमी सत्ता ईजिप्तपासून पूर्वेकडे मक्का व मदीना येथपर्यंत पसरली होती. पुढे पॅलेस्टाइन व सिरिया हे प्रदेशही त्याच्या अंमलाखाली आले.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate