অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मध्ययुग, यूरोपीय

मध्ययुग, यूरोपीय

इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षाच्या कालखंडाला यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा दिली जाते. इ.स.४७६ मध्ये पश्चिम रोमन साम्राज्याचा अंत झाला आणि इ.स.१४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपलचे पतन झाले व पूर्व रोमन साम्राज्याही संपुष्टात आले. या दोन्ही घटनांचे यूरोपवर महत्वाचे व दूरगामी परिणाम झाले. पहिलीने मध्ययुगाचा प्रारंभ व दुसरीने त्याचा अंत झाला, असे इतिहासकार मानतात.

मध्ययुग ही संज्ञा प्रबोधनकालीन लेखकांनी रूढ केली. रोमन साम्राज्यांनंतरचा सु. हजार वर्षाचा इतिहास प्रबोधनकाली विशेष ज्ञात नसल्याने मध्ययुगाला तमोयुग असेही म्हटले जाते.

इ.स.पाचव्या शतकाच्या अखेरीस भूमध्य समुद्राच्या परिसरातील ग्रीस, इटली इ. देशाचे महत्व कमी होऊन तीन नवीन संस्कृतिकेंद्रे विकसित झाली. पहिले कॉन्स्टँटिनोपलचे पूर्व रोमन साम्राज्य. यालाच ⇨वायझंटिन साम्राज्य म्हणतात. या भागात प्राचीन ग्रीक-रोमन संस्कृतीचा प्रभाव विशेष घटला नाही. दुसरे इस्लामच्या उदयाने अरबस्तानात निर्माण झाले व नंतर भारत, उत्तर आफ्रिका, स्पेन इ. भागांत त्याचा प्रभाव पडला. तिसरे केंद्र इटली व फ्रान्समध्ये रोमन साम्राज्याचा विध्वंस करणाऱ्या गॉल टोळ्यांच्या प्रयत्नाने उदयास आले व कालांतराने याचा प्रभाव सर्व यूरोपभर पडला. मध्ययुगीन यूरोपचा इतिहास प्रामुख्याने या तिसऱ्या केंद्राच्या प्रभावाने घडला. इ.स.५०० ते १००० या पाचशे वर्षात या नव्या संस्कृतीची वीजे यूरोपात रूजली व पुढील पाचशे वर्षात यांच्या शाखआ विस्तारल्या.

राजकीय स्थित्यंतरे

रोमन साम्राज्य व ख्रिस्ती धर्म या दोन संघटनांद्वारे प्राचीन काळी यूरोपीय ऐक्य साधण्याचे प्रयत्न झाले. परंतु दळणवळण व वाहतूक साधनांच्या अभावामुळे अतिविस्तारलेल्या साम्राज्याचे शासन चालविणे कठीण झाल्याने पूर्व व पश्चिम असे साम्राज्याचे दोन भाग पडले. काँन्स्टँटिनोपलचे ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च व रोमचे रोमन कॅथलिक अशी दोन पीठे निर्माण झाली. तरीही धार्मिक व राजकीय एकतेचे उद्दिष्ट दृष्टीआड झाले नाही.

रानटी टोळ्यांशी झगडता झगडता इ.स.४७६ मध्ये पश्चिम रोमन साम्राज्य नष्ट झाले. तथापि रोमन साम्राज्याच्या एकतेचे कार्य पुढे चालविण्याची जबाबदारी बायझंटिन साम्राज्याला पेलता न आल्याने पश्चिम साम्राज्याची प्रतिष्ठा त्याला केव्हाच लाभली नाही. साहजिकच यूरोपच्या राजकीय जीवनात निर्माण झालेली पोकळी काही शतके भरून निघाली नाही.

रोमन साम्राज्यांच्या पतनानंतर तीन शतके यूरोपभर अंगल्स, सॅक्सन, ज्यूट, ऑस्ट्रोगॉथ, व्हिसीगॉथ, फ्रँक, हूण इ. टोळ्या निरनिराळ्या भागांत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात गुंतल्या होत्या . या टोळ्यांत सतत संघर्ष चालू होते. या संघर्षामुळे सामान्य जनांच्या जीवितवित्तास सुरक्षितता राहिली नव्हती. त्यामुळे मध्ययुगाचे वर्णन करणाऱ्या लेखकांपुढे बेबंदशाहीचा कालखंड उभा राहतो. ह्या अराजकाचा फायदा अरब, तुर्क इ. इस्लामी जमातींना मिळून त्यांचे साम्राज्य उत्तर आफ्रिकेत व स्पेनमध्ये पसरले. मध्य यूरोपात स्लाव्ह टोळ्यांनी आपले बस्तान बसविले. पश्चिम यूरोपीय देशांत फ्रँक टोळीने आपले आसन स्थिर केले. उत्तर इटलीत लोंबार्ड टोळीचे बस्तान बसले. तर अँगल्स, सॅक्सन, ज्यूट इ.टोळ्यानी इंग्लंड काबीज केले. स्कॉटलंड, आयर्लंड ,वेल्स यांत मूळच्या केस्ट जमातीचे वर्चस्व राहिले. [⟶ अँग्लो-सॅक्सन].

वरील टोळ्यांपैकी फ्रँक टोळीचे वर्चस्व वाढले व त्यांचा नेता क्लोव्हिस (कार. ४८१-५११) याने गॉलमध्ये (फ्रान्स) एक प्रबल राज्य स्थापन केले. पंचवीस वर्षाच्या कारकीर्दीत क्लोव्हिसच्या राज्याची सरहद्द र्हाकईन नदीपलीकडे गेली. याच्याच कारकीर्दीत फ्रँक टोळीने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. क्लोव्हिसचे वारस दुर्बल निघाल्याने खरी सत्ता कर्तबगार मंत्र्यांच्या हाती गेली. या मंत्र्यापैकी शार्ल मार्तेल (कार.७१४-७४१) याने इ.स. ७३२ मध्ये तूरच्या लढाईत भूर लोकांचा पराभव करून यूरोपवरील इस्लामी आक्रमणास पायबंद घातला. पुढे शार्ल मार्तेलचा मुलगा पेपिन द शॉर्ट (कार.७१४-६८) याने क्लोव्हिसच्या वंशजांना (मेरोव्हिंजिअन वंश) बाजूस सारून गॉलचे राज्य बळकावले. ही क्रांती पोपच्या अनुमतीने झाली. पेपिननेही धर्मगूरू म्हणून पोपच्या अधिकारास मान्यता दिली व लोंबार्ड टोळ्यांविरूध्द पोपला लष्करी साहाय्य देऊन मध्य इटलीत पोपचे राज्य स्थापण्यात यश मिळविले. साहजिकच पेपिन व त्याचे वारस यांना धर्मपीठाचा पाठिंबा मिळाला व पेपिनच्या कॅरोलिंजिअन वंशाची प्रतिष्ठा वाढली.

पेपिनचा मुलगा चार्ल्सच्या वेळी गॉलच्या राज्याचे पवित्र रोमन साम्राज्यात रूपांतर झाले. हाच चार्ल्स किंवा चार्ल्स द ग्रेट पुढे ⇨शार्लमेन (कार. ७६८-८१४) म्हणून मध्ययुगात प्रसिध्दीस आला. २५ डिसेंबर ८०० रोजी पोप तिसरा लिओ याने सम्राटाचा मुकुट त्याच्या मस्तकी ठेवून पवित्र रोमन सम्राट म्हणून त्यास मान्यता दिली  या घटनेने यूरोपच्या एकतेचे स्वप्न साकार होऊन पश्चिम रोमन साम्राज्याची पुन्हा स्थापना झाल्याचा भास झाला. पण सरंजामशाहीतील फुटीर प्रवृत्ती ,धर्मसंस्था व राजसंस्था यांच्यातील संघर्ष यांच्यात वाढ होऊन त्यामधून विद्यमान यूरोपची जडणघडण झाली. शार्लमेनच्या निधनसमयी त्याचा मुलगा लूई व फेथफुल (कार.८१३-४०) हयात असल्याने कॅरोर्लिजिअन रिवाजानुसार साम्राज्याची विभागणी होण्याचा प्रसंग टळला. स्वतःलूईने साम्राज्य अविच्छिन्न रहावे. म्हणून कॅरोलिंजिअन वारसाचा कायदा बदलून वडील मुलाकडेच राज्याचा वारसा जावा, असा प्रयत्न केला. पंरतु त्याच्या मुलांनी याविरूध्द बंड केल्याने इ.स.८४३ च्या व्हर्डनच्या तहाने राज्याची विभागणी पुढीलप्रमाणे झाली.

(१) चार्ल्स द बाल्डला पश्चिम फ्रँक राज्य-र्हााईनच्या पश्चिमेकडील मुलूख (आधुनिक फ्रान्स)

(२) लूई द जर्मन याला पूर्व फ्रँक राज्य (आधुनिक जर्मनी व ऑस्ट्रीया) व

(३) पहिला लोथेअर याला सम्राटपद व मध्य फ्रँक राज्य (आधुनिक उत्तर इटली, अँल्सेस –लॉरेन, बर्गडी व हॉलंड). लोथेअरनंतर त्याच्या मध्य फ्रँक राज्याचे आणखी तीन भाग होऊन इटली आणि मध्य यूरोपात अनेक राज्ये निर्माण झाली. अशा रीतीने शार्लमेननंतर अर्ध शतकात या साम्राज्याची अनेक शकले झाली. इ.स.९११ मध्ये कॅरोर्लिजिअन वंशातील शेवटचा राजा लूई द चाइल्ड निधन पावला व त्याचे राज्य ९१९ पर्यंत फ्रँकोनिआचा ड्यूक कॉनरॅड याजकडे व नंतर ९३६ पर्यंत सॅक्सनीचा ड्यूक हेन्री याजकडे गेले. हेन्रीने मध्य यूरोपातील अस्थिरतेला आळा घालून एक नवी प्रबल सत्ता स्थापन केली. हेन्रीचा मुलगा पहिला ऑटो मोठा कर्तबगार निघाला. त्याच्या नेतृत्वाखाली शार्लमेनच्या पवित्र रोमन साम्राज्याचे पुनरूज्जीवन झाले. (९३९).

इ.स. नवव्या शतकात यूरोपवर मूर, मग्यार, हंगेरियन व व्हायकिंग किंवा नॉर्स या रानटी टोळ्यांची आक्रमणे सुरू झाली. रोमन साम्राज्यावर आक्रमण करणारे गॉथ-फ्रँक –हून वगैरे जसे पुढे सुसंस्कृत बनले, तसेच ते याही टोळ्यांच्या बाबतीत घडले. कालांतराने या नव्या टोळ्यापैकी मग्यार आणि व्हायकिंग टोळ्यांनी हंगेरी, इग्लंड ,फ्रान्स, इ. देशांत वसाहती स्थापन केल्या . त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला पण हे स्थित्यंतर होण्यास दोन –अडीच शतकांचा अवधी लागला आणि या काळात यूरोपात सतत धामधूम चालत राहिली.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate