অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऱ्होड्स, सेसिल जॉन

ऱ्होड्स, सेसिल जॉन

ऱ्होड्स, सेसिल जॉन

(५ जुलै १८५३-२६ मार्च १९०२). दक्षिण आफ्रिकेमधील ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार व एक कार्यक्षम इंग्लिश प्रशासक. त्याचा जन्म धार्मिक परंपरा असणाऱ्या घराण्यात हार्टफर्डशरमधील स्टॉर्टफर्ड या गावी झाला. प्रकृतीच्या कारणास्तव हवापालट करण्यासाठी त्याला द आफ्रिकेत ब्रिटिश वसाहतीतील नाताळ येथील कापसाची शेती करीत असलेल्या हर्बर्ट या त्याच्या वडील बंधूकडे पाठविण्यात आले (१८७०). शेतीतील अपयशामुळे लौकरच हे दोघे बंधू हिऱ्यांच्या मागे धावणाऱ्या असंख्य नागरिकांत सामील झाले. बऱ्याच प्रयत्नानंतर किबर्ली भागात ग्रीकलँड वेस्ट येथील हिऱ्याच्या खाणीवर त्या दोघांनी आपला मालकी हक्क प्रस्थापित केला. पुढे हा भाग केप कॉलनीत समाविष्ट झाला. काही वर्षे वास्तव्य करून सेसिल परत इंग्लंडला आला (१८७३) व ऑक्सफर्ड विद्यापीठात दाखल झाला. त्याने बी. ए. ही पदवी घेतली (१८८१) व तो पुन्हा आफ्रिकेत गेला आणि केप वसाहतीच्या (कॉलनी) संसदेवर त्याच वर्षी निवडून आला.

त्याच्याकडे १८८७ च्या सुमारास अमाप संपत्ती जमली आणि त्यावेळी त्याचे जागतिक हिऱ्यांच्या व्यापारावर जवळजवळ नियंत्रण प्रस्थापित झाले होते. त्याने भागीदारीत ‘द बिअर्स मायनिंग कंपनी’ काढली व बार्नी बार्नाटोच्या सहकार्याने किबर्लीमधील सर्व हिऱ्यांच्या खाणीवर १८९१ मध्ये वर्चस्व मिळविले. संपत्तीपेक्षा सत्ताग्रहणात त्याला विशेष रस होता. ब्रिटिशांनी त्याच्या मदतीने दक्षिण बेचुआनालँड ही वसाहत रक्षित राज्य म्हणून ठरविली. लोबेंगूग्यूला या सत्ताधाऱ्याकडून हिऱ्यांच्या खाणींना काही सवलती मिळविणे, हे त्याचे पहिले उद्दिष्ट होते.

केप वसाहतीच्या संसदेत त्याने ब्रिटिश सत्तेच्या उत्तरेकडील विस्तारावर अधिक भर दिला. केप विधानसभेची निर्मिती झाल्यानंतर त्याने सीमा आयोगाच्या नियुक्तीसाठी मागणी केली. तो १८८४ मध्ये बेचुआनालँडचा प्रतिनिधी म्हणून निवडून आला. १८८८ पर्यंत किंबर्ली येथील हिऱ्यांच्या खाण उत्पादनात ऱ्होड्सची मक्तेदारी निर्माण झाली होती. त्याच्या कंपनीचे भांडवल जगात सर्वाधिक होते. त्याने व्यापारवृद्धी व वसाहत विस्तारासाठी ब्रिटिश साउथ आफ्रिका कंपनीची स्थापना १८८९ मध्ये केली. १८९० मध्ये केप वसाहतीचा तो पंतप्रधान झाला. त्याने पंतप्रधानकीच्या कारकीर्दीत (१८९०-९६) दक्षिण आफ्रिकेचे संघीय राज्य स्थापण्याचा उद्देश धरला आणि अनेक सुधारणा घडवून आणल्या. ब्रिटिश आणि डच यांत सामंजस्य निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न केला.

केपटाउन ते कैरो रेल्वेमार्गाच्या प्रकल्पास त्याने गती दिली. ट्रान्सव्हालमध्ये सशस्त्र उठाव झाला असता तो शमवण्यासाठी ऱ्होड्सने जेमसन राइड या अपरिपक्व सेनाधिकाऱ्यास डचांच्या मदतीसाठी धाडले; तथापि जेम्सन राइड हा उठाव मोडण्यात अयशस्वी झाला. त्याचा दोष ऱ्होड्सवर ठेवण्यात आला. ऱ्होड्सने हा विद्रोह मिटविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अखेर त्याला पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला (१८९६).

डच व ब्रिटिश वसाहतवाद्यांत बेबनाव निर्माण झाला. त्यानंतर त्याने ऱ्होडेशियाच्या सर्वांगीण विकासाला वाहून घेतले आणि रेल्वेचा उत्तरेकडे विस्तार केला. तार व टेलिग्राफ यांच्या सुविधा वाढविल्या. व्यक्तिगत वजन खर्चून त्याने मॅटबीलीलँडबरोबर निरंतर शातंता प्रस्थापित केली व पुन्हा केपच्या संसदेत तो निवडून आला (१८९८); पण सत्ताग्रहण केले नाही. बोअर युद्धाच्या वेळी किबर्लीत त्याने तळ ठोकला. त्याच्याच नावावरून दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश वसाहतीला ‘ऱ्होडेशिया’ हे नाव देण्यात आले. दक्षिण आफ्रिकेत केपटाउनजवळ मॉइझबेर्ख येथे त्याचे हृदयविकाराने निधन झाले.

ऱ्होड्स हा गेल्या शतकातील ब्रिटिश साहसी वसाहतवाद्यांचा आदर्श होता. ब्रिटिशांचे साम्राज्य आफ्रिकेत दूरवर पसरवून आर्थिक दृष्ट्या मागास व अशिक्षित लोकांना सुधारण्याचे कार्य आपण करीत आहोत. अशी त्याची धारणा होती. गोऱ्या वसाहतवाद्यांचे द. आफ्रिकेत संघराज्य स्थापिण्याचा त्याचा उद्देश होता.

त्याने सामाजिक सेवेसाठी मृत्यूपत्राद्वारे सु. ६०,००० पौंड कायमचा निधी ठेवला आणि त्यातून विविध छात्रवृत्त्या व शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. ऑक्सफर्ड विद्यापीठ, ब्रिटिश वसाहती, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व जर्मनी यांतील विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ १७० शिष्यवृत्त्या व छात्रवृत्त्या ऱ्होड्सच्या स्मरणार्थ ठेवण्यात आल्या आहेत.

 

संदर्भ :1. Bates, Neil, Cecil Rhodes, London, 1976.

2. Marlowe, John, Cecil Rhodes : The Anatomy of Empire, London. 1972.

चौधरी, जयश्री

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate