অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भूराज नीति

भूराज नीति

स्थूलमानाने भूमी व राजनीती यांचा राज्याच्या संदर्भात परस्परसंबंधाचा अभ्यास करणारी ही एक विचार प्रणाली आहे. या विचारप्रणालीतील भूमी याचा अर्थ राज्याची भूमी किंवा प्रदेश असा असून राज्य ही संकल्पना एक जीवशास्त्रीय संकल्पना म्हणून वर्धिष्णू किंवा विकसनशील मानलेली आहे. राज्याने व्यापलेल्या भौगोलिक अवकाशाच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या राजकीय प्रश्नांचा विचार भूराजनीतीमध्ये करण्यात येतो. भूराजनीती हा राजकीय भूगोलातून उदयास आलेली असली, तरी तिचे स्वरूप राजकीय भूगोलापेक्षा वेगळे आहे. राज्याच्या भौगोलिक अवकाशाचा किंवा अवस्थेचा अभ्यास राजकीय भूगोलात प्राधान्याने केला जातो; उलट पक्षी भूराजनीतील राज्याच्या भौगोलिक गरजांचा प्राधान्याने विचार करण्यात येतो.

भूराजनीती या संकल्पनेची बीजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रुजली गेली आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, विशेषतः पहिल्या महायुद्धानंतर तिचा हिरिरीने पुरस्कार करण्यात आला. राज्याच्या सत्तचे घटक कोणते, या विषयीच्या संशोधनात भूराजनीतीविषयीच्या विचारांचा आधार घेतला जातो.भूराजनीती ही संकल्पना वा विचारप्रणाली जरी विसाव्या शतकात उदयास आली असली, तरी भौगोलिक परिस्थिती तसेच राज्य आणि त्याची शक्ती यांचे परस्परसंबंध आणि त्यांचे महत्त्व प्राचीन काळापासून ज्ञात होते. किंबहुना राज्यसंस्थेच्या उदयाबरोबरच हा संबंध निसर्गतः अस्तित्वात होता. या दृष्टीने जेव्हा भूगोलाचा किंवा त्यातील मुख्य बाब अवकाश याचा विचार केला जातो, तेव्हा त्या घटकामुळे राज्याची सत्ता किती प्रबळ किंवा दुर्बळ झाली आहे, याची कल्पना येते. भूराजनीती हा विचार जरी नव्याने उदयास आला असला, तरी राजसत्तेचा आणि भूगोलाचा संबंध तसा जुनाच आहे.

लष्करी मोहीम आखताना भूगोलकडे दुर्लक्ष केल्यास अपरिमित हानी संभवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पहिल्या नेपोलियनची रशियावरील स्वारी होय (१८१२). मुत्सद्यांनी दाखविलेली भूराजनैतिक दृष्टीची इतिहासातील उदाहरणे म्हणून अमेरिकेतील मन्रो सिद्धांत किंवा लुइझिॲना प्रदेशाची खरेदी ही दाखविता येतील. जेम्स मन्रो याने १८२३ मध्ये रशिया व इतर यूरोपीय राष्ट्रांना अलास्कात पायबंद घातला. तत्पूर्वी अमेरिकेने लुइझिॲना हा विस्तीर्ण मुलूख नेपोलियनकडून विकत घेऊन अटलांटिक व पॅसिफिक महासागरांतील तिसऱ्या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापिले. शांतता ही अविभाज्य आहे, या फ्रँक्लिन रूझवेल्टच्या विधानाप्रमाणे दोस्त राष्ट्रांनी हाती घेतलेल्या सत्तेच्या घटकांचा सर्वांगीण अभ्यास हेही या दृष्टीचेच एक उदाहरण मानले पाहिजे.शासनाचे कार्यक्षेत्र असलेल्या भूखंडाच्या भागास राज्य असे म्हणतात. राजधानीचे स्थान आणि कार्यवाही यांवरून शासन गाजवीत असलेल्या अधिकाराचे स्वरूप आणि व्याप्ती समजते. काही राज्ये प्रबळ तर काही राज्ये दुर्बळ असतात. म्हणून राज्याचे बल वाढविण्यात पुढील भूराजनैतिक घटकांचा महत्त्वाचा वाटा असतो.

भौगोलिक स्थान

एखाद्या राज्याचे भौगोलिक स्थान या दृष्टीने महत्त्वाचे असते; कारण हवामानावर अक्षांशाचा प्रत्यक्ष परिणाम जास्त होतो. सध्याच्या बड्या शक्ती मध्य अक्षांशामध्ये आहेत. उत्तर गोलार्धातील अधिक अक्षांशाच्या स्थानास डावपेचांच्या दृष्टीने जास्त महत्त्व प्राप्त होईल; पण त्यासाठी उत्तर ध्रुवामार्गे विमान वाहतूक सुरू झाली पाहिजे. कोणत्याही देशाचे भूभाग आणि समुद्र यांना आक्रमक व संरक्षक व्यूहतंत्राच्या दृष्टीने महत्त्व आहे. सामान्यतः महाद्वीपीय देशांत भूसेनेची वाढ होते, तर सागरी राज्यात नौदल वाढते. स्थान हे सुगमतेच्या दृष्टीने मध्यवर्ती असू शकेल किंवा टोकाचे असू शकेल; मध्यवर्ती असल्यास सुगमता सहजसाध्य असते; टोकाची असल्यास सुगमता कठीण होते. व्यूहतंत्रात्मक स्थानांना भूराजनीतीमध्ये महत्त्व असते; कारण शांततेच्या काळात ती व्यापाराला उत्तेजन देतात, तर युद्धकाळात की युद्धास आधारभूत ठरतात. सामुद्रधुनी, द्वीपकल्पे, घाट, दऱ्या, नद्यांची मुखे, सागरी मार्गांतील प्रमुख बेटे व कालव्यांचे क्षेत्र ही युद्धनीतीतील काही महत्त्वाची स्थाने होत.

आकार आणि स्वरूप

राज्याचा आकार मोठा किंवा आटोपशीर व लहान असू शकेल. युद्धपरिस्थितीमध्ये कित्येक वेळा आटोपशीर क्षेत्र फायद्याचे असते. भविष्यकाळात ज्या राज्यांना बचावासाठी विस्तृत क्षेत्र असेल, अशी राष्ट्रे महत्त्वाची ठरतील. दुसऱ्या महायुद्धातील घटनांनी स्थळाचे आक्रमणातील तसेच संरक्षणातील महत्त्व सिद्ध केले आहे. छोट्या राष्ट्रांवर त्यांच्या बड्या शेजाऱ्यांनी सहज आक्रमण केले. यूरोपातील छोट्या राष्ट्रांनी जर्मनीविरूद्ध रशियाप्रमाणेच कडवा प्रतिकार केला; परंतु थोड्याच दिवसांत त्यांचा पराभव झाला. रशिया विस्तृत भूप्रदेशात माघार घेऊ शकला. त्यामुळे जर्मनीची पुरवठा फळीची लांबी वाढत जाऊन ती कमकुवत झाली. त्याचप्रमाणे १९३७ मध्येच पूर्वेकडे जपानने चीनविरूद्ध युद्ध सुरू केले; पण चीनच्या विस्तीर्ण प्रदेशामुळे जपानला चीनचा पराभव करता आला नाही.

हवामान

माणसांची प्रकृती आणि उत्साह हा नेहमीच हवामानावर अवलंबून असतो तसेच अन्नपुरवठा आणि त्याचे विभाजन, निवारा आणि पोशाख हेही हवामानाने निश्चित केले जातात. मोठी राष्ट्रे मध्य अक्षांशामध्ये आहेत. माणसाच्या हालचालींवर हवामानामुळे बंधने पडतात. युद्धतंत्राच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी काही क्षेत्रे अतिथंडीमुळे निरुपयोगी होतात.काही प्रदेश मानवाच्या उच्च सांस्कृतिक प्रगतीच्या दृष्टीने अतिउष्ण वा अतिपर्जन्याचे ठरतात. मेझॉनचे विषुववृत्तीय जंगल, ब्राझीलचा सखल प्रदेश आणि दक्षिण आफ्रिकेतील काँगोचे खोरे ही याची काही टळक उदाहरणे होत. तसेच वाळवंटाचा कोरडा प्रदेश हाही देशांना विवंचनेचा विषय आहे. कोणतेही राष्ट्र जागतिक दृष्ट्या बलशाली म्हणून गणले जाणार नाही.

जागतिक सत्ता म्हणून विकसित होण्यास अनुकूल हवामान हे मध्य अक्षांशामधील दमट भागात आढळते किंवा कमी अक्षांशामघील उंच प्रदेशात असते. आधुनिक काळात जीवनासाठी आदर्श हवामान म्हणजे उष्ण प्रदेशात दमट हवा इष्ट असते. उन्हाळ्यामध्ये हवा गरम असावी, पण फार उष्ण नको; थंडीमध्ये बौद्धिक कामासाठी हवा थंड असावी, पण फार थंड नको. इंग्लंड आणि यूरोपमधील बहुतेक देश, उत्तर अमेरिका, आग्नेय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अर्जेंटिना, जपान व चिलीचा काही भाग येथे त्या दृष्ट्या हवामान अनुकूल आहे.

लोकसंख्या

युद्धकाळामध्ये रणक्षेत्रावरील मनुष्यबळ आणि गृहफळीवरील स्त्री-पुरुष यांची विजयासाठी गरज असते. बलशाली व्हावयाचे असेल, तर कब्जा करण्यासाठी सैन्य पाहिजे; परंतु केवळ लोकांच्या संख्येचा विचार करून भागणार नाही. लोकसंख्येचे जे महत्त्वाचे विशेष आहेत ते म्हणजे वंश, भाषा, धर्म इ. होत. या विशेषांबाबत लोकसंख्येत फार भेद असू नयेत. शक्यतो विचार, संस्कृती, वंश, भाषा व धर्म यांबाबत एकी असावी. या बाबतीत भारत दुर्दैवी आहे. गुणांशिवाय संख्येचा विचार सबळ राष्ट्राला प्रस्तुत नाही. लोक बुद्धिमान उद्योगी, देशाभिमानी आणि संघटक असावेत.

नैसर्गिक साधनसंपत्ती आणि औद्यागिक क्षमता

आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि औद्योगिक क्षमता भूराजनीतीला पोषक ठरते. लष्करी विजय हा विमाने, रणगाडे, युद्धनौका, बंदुका इ. श्रेष्ठ सामग्रीवर अवलंबून असतो आणि ती सामग्री देशाच्या औद्यौगिक क्षमतेवर अवलंबून असते. जागतिक सत्तेजवळ तिच्या प्रदेशामध्ये ही नैसर्गिक संपत्ती असावी लागते किंवा तिला ती मिळेल याची ग्वाही असावी लागते. कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याची सोय पाहिजे. कोणतेही राज्य आपणहून स्वयंपूर्ण नसते; परंतु दुसऱ्या महायुद्धापूर्वी बऱ्याचशा मोठ्या सत्तांजवळ पुष्कळ सामग्री होती, ती बव्हंशी स्वयंपूर्ण होती. उदा., अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सोव्हिएट संघराज्य आणि ग्रेट ब्रिटन. पहिल्या दोहोंजवळ भौगोलिक आटोपशीरपणा होता; परंतु ब्रिटिश साम्राज्य जगाच्या चौथ्या क्षेत्रफळात पसरले होते. अक्षराष्ट्रे-जर्मनी, इटली आणि जपान-त्यांच्या मानाने फार कमकुवत व खालच्या पातळीवर होती.

आज राष्ट्रीय सत्ता ही मुख्यत्वे देशाच्या औद्योगिक क्षमतेवर ठरविली जाते. औद्योगिक क्षमता ही मुख्यत्वे उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालावरून ठरविली जाते. सध्याच्या राजकीय सीमांचा आकृतिबंध आणि नैसर्गिक संपत्तीची विषम भौगोलिक वाटणी, यांमुळे आंतरराष्ट्रीय स्वरूपाची समस्या निर्माण होते. स्वयंपूर्णतेसाठी औद्योगिक कच्च्या मालाची आवश्यकता असते. या दृष्टीने अमेरिका आणि रशिया हे देश जगातील जास्तीतजास्त स्वयंपूर्ण देश समजले जातात.कच्च्या मालांपैकी खनिज तेलाला सद्यःस्थितीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे आणि त्याला भावी काळात पर्याय सापडेपर्यंत हे महत्त्व कायम राहणार आहे. लष्करी उपयोगासाठीच केवळ नव्हे तर देशातील उद्योग, वाहतूक आणि शेती यांसाठी त्याची आवश्यकता आहे.

राजकीय आणि सामाजिक संघटना

राजकीय आणि सामाजिक संघटन हेही एक महत्त्वाचे अंग असून दुसऱ्या महायुद्धापूर्वी जगाच्या राजकीय नकाशामध्ये खालील वसाहती राजवटींचे जगावर वर्चस्व असलेले दिसत होते-इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, बेल्जियम, जपान, इटली. पहिले जागतिक युद्ध वसाहती सत्तांच्या दोन गटांत लढले गेले. पहिल्या जागातिक युद्धापूर्वी काही देशांमध्ये लोकशाही असली, तरी खरे म्हणजे प्रस्थापित वसाहतींची सत्ता व राजेशाही यांविरूद्ध मोठा राजकीय संघर्ष करूनच लोकशाही प्रस्थापिण्यात आली होती. अशा राज्यांमध्ये राजकीय विचारांची परिपक्वता गाठली होती. लोकसत्ताक राजवटीबरोबरच राजेशाही आणि हुकूमशाही या राजवटी त्याच वेळी रूढ असताना इतर राष्ट्रे लोकसत्ताक राजवटीकडे आकर्षिली गेली.

ऐतिहासिक आढावा

प्रगत देशांमधील लोकांच्या विचारांना वळण देण्याच्या कामी अलीकडे राजकीय विचारवंतांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. फ्रीड्रिक राटसेल (१८४४ - १९०४) याचे भूराजनीतीच्या संदर्भातील विचार महत्त्वाचे आहेत. हा म्यूनिक येथील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील भूगोलाचा प्राध्यापक. पुढे तो लाइपसिक विद्यापीठात प्राध्यापक म्हणून गेला. त्याच्या दृष्टीने राज्य लोकसंख्या आणि भूभाग यांचे मिळून होत असून, तो एक स्वतंत्र जीव असतो. इतर जीवांप्रमाणेच राज्यही वृद्धिंगत होत असते. अवकाश ही एक मोठी राजकीय शक्ती असून अवकाशाला उतरती कळा लागणे, म्हणजे राज्याची सत्ता कमी होणे होय. जीवनास आवश्यक अवकाशाची कल्पना (लेबन्झराउम) यातूनच निघाली. भावी भूराजनीतिज्ञांचे विचार आणि शैली यांचा साचाच राटसेलने तयार केला होता. संदिग्ध मांडणी आणि दुर्बोध तंत्र हे विशेष बहुतेक भूराज नीतिज्ञांमध्ये कायम राहिले आहेत.

स्वीडिश राजनीतिज्ञ रूडॉल्फ जेलेन (१८८४ - १९२२) हा भूराजनीतीचा जनक समजला जातो. त्याने राटसेलच्या मूल संकल्पनेचा आधार घेतला आणि दोन शतकांतील जर्मन विचारवंतांच्या विचार सरणीचे सार काढून या संकल्पनेच्या आधारे भूराजनीतीचे एक स्वतंत्र शास्त्र बनविण्याचा प्रयत्न केला. जेलेन हा विशाल (संयुक्त) जर्मनीचा भोक्ता आणि प्रवक्ता होता. बॅरन डीट्रिख हाइन्रिख फोन ब्यूलो याने द स्पिरिट ऑफ द न्यू सिस्टम ऑफ वॉर (इं. भा. १७९९) हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यामध्ये संयुक्त जर्मनीच्या फ्रान्सवरील स्वारीचे भाकित त्याने केले होते. त्यानंतरच्या पिढीत कार्ल रिटर, जॉर्ज हेगेल आणि कार्ल फोन क्लाउझेव्हिट्स यांनी जर्मन विचारसरणीमध्ये मोठी भर टाकली. त्याचा सारांश ’साध्य साधनांचे समर्थन करते’ यामध्ये होता. “युद्ध म्हणजे दुसरे तिसरे काही नसून भिन्न भिन्न साधनांचे अवमिश्रण करून चालू ठेवलेला तो राजकीय व्यवहार आहे,” असे क्लाउझेव्हिट्सचे विधान आहे. भूराजनीतीत लष्करी मोहिमेला हे विधान लागू पडते. जेलेन याने राटसेलचे तत्त्वज्ञान तत्कालीन परिस्थितीस लागू केले. स्वीडनची खरी प्रगती विशाल जर्मनीमध्ये सामावून अवकाशप्राप्ती करू घेण्याने आणि अंतर्गत संलग्नता व संचारस्वातंत्र्य मिळविण्यानेच होईल, असे त्याने प्रतिपादले.

आल्फ्रेड थेअर माहॅम (१८४० - १९१४) हा नाविक सत्तेसंबंधीच्या विपुल ग्रंथलेखनासाठी प्रसिद्ध आहे. त्याने असा सिद्धांत मांडला, की जागतिक सत्ता होण्यासाठी कोणत्याही राष्ट्राला प्रथम समुद्रावर नियंत्रण मिळाले पाहिजे; किंबहुना नाविक आधिपत्य हेच त्याचे गमक होय. त्याबरोबर त्याचा दुसरा सिद्धांत असा होता, की ’कोणतेही राष्ट्र एकाच वेळी भूसत्ता आणि नाविक सत्ता उपभोगू शकणार नाही’. अर्थात माहॅनच्या कल्पना तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात ध्यानी घेतल्या पाहिजेत. त्या वेळी ब्रिटिश आरमार जगातील समुद्रावर वर्चस्व गाजवीत होते आणि ब्रिटिश सत्तेला भौगोलिक आधार होता. जागतिक व्यापार ज्या अरुंद कालव्यांच्या मार्गांतून चालत असे, त्या समुद्रांवर ब्रिटिश सत्तेचे पूर्ण नियंत्रण होते.तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात यूरेशिअन भूप्रदेशाची कल्पना जर्मन मनावर मोहिनी घालत होती. राज्य हा एक जीव असल्यामुळे त्याचा नैसर्गिक स्वभाव वाढण्याचा होता आणि नवा भूप्रदेश मिळवून ही वाढ होत होती. एकदा जो जर्मन तो कायमचाच जर्मन, हे मूलतत्त्व म्हणून स्वीकारून जर्मन लोकसंख्या वाढविण्याचे अनेक उपाय त्या वेळी जर्मनीने अवलंबिले. पुढे नाझी राजवटीने लोकसंख्या वाढविण्यासाठी हरतऱ्हेचे उपाय योजिले.

पहिल्या महायुद्धातील जर्मनीच्या दारुण पराभवामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांची जेलेनला जाणीव असल्यामुळे त्याने राष्ट्रीय आर्थिक स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. नाझी राजवटीनेयूरोपमध्ये जी नवी व्यवस्था आणली होती, त्यामध्ये या कल्पनेचे प्रत्यक्ष विशदीकरण झाले आहे. भूराजनीतीची जेलेनने केलेली व्याख्या संदिग्ध आहे. जेलेन म्हणतो, ’भूराजनीती हा राजकीय विकासांच्या भूसंबंधांबद्दलचा सिद्धांत होय. या उपपत्तीद्वारा प्रत्यक्ष राजकारणाला त्या मर्यादेपर्यंत दिग्दर्शन करावयाचे असते, जेथून पुढे अज्ञातात पाऊल टाकावे लागते’. भूराजनीती हे राज्याची भौगोलिक सदसद्‌विवेकबुद्धी बनेल. जेलेनच्या या विचारातील ‘मर्यादा’, ‘अज्ञान’, ‘सदसद्‌बुद्धी’ यांसारख्या शब्दांचा अर्थ अर्थातच अतिशय संदिग्ध आहे.

मेजर जनरल डॉक्टर कार्ल हाउशोफर (१८६९ - १९४९) हा जेलेनचा अनुयायी. पूर्ववयात जपानी तोफखात्यामध्ये तो शिक्षक होता. जपानला जाण्यापूर्वीच तो राटसेलच्या तत्त्वांचा प्रवक्ता बनलेला होता. जेलेनच्या लिखाणामुळे आणि त्याच्याशी आलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे हाउशोफर हा भूराजनीतीचा मोठा उपासक बनला. जपानला भूराजनीतीचे तत्त्व लागू करून त्याने जिओपॉलिटिक्स इन द पॅसिफिक ओशन (इ. भा. १९३६) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. म्यूनिक विद्यापीठात १९२४ मध्ये तो इन्स्टिट्यूट ऑफ जिओपॉलिटिक्स या संस्थेत भूगोलाचा प्राध्यापक झाला. त्या सुमारासच ॲडॉल्फ हिटलरशी त्याचा प्रथम परिचय झाला. त्याच वेळी सर हॉलफोर्ड जॉन मॅकिंडर (१८६१ - १९४७) याने लंडनच्या रॉयल जिओग्राफिकल सोसायटीत १९०४ साली दिलेल्या ’इतिहासाचा भौगोलिक आधार’ या विषयावरील व्याख्यान हाउशोफरच्या वाचनात आले. मॅकिंडर याने प्रसिद्ध केलेल्या डेमॉक्रिटक आयडीअल्स अँड रिअँलिटी ( १९१९) या पुस्तकामध्ये आपल्या कल्पना विस्तारने मांडल्या होत्या. मॅकिंडर याच्या विचारांचा इंग्लंडमधील लोकांवर दुसऱ्या महायुद्धापर्यंत फारसा परिणाम झालेला दिसत नाही; परंतु हाउशोफर याच्या कल्पना पक्क्या करण्यास त्याचा उपयोग झाला. मॅकिंडर याने ’हार्टलँड’ ची कल्पना मांडली होती.

यूरेशिअन भूभाग हा तो हृदभूमी (हार्टलँड) असून ज्याचा या हृदभूमीवर ताबा असेल, तो जागतिक भूमीवर ताबा चालवेल, हे त्याचे प्रमुख सूत्र होते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, जपान हे केवळ किनाऱ्यालगतचे देश होत. मॅकिंडरच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते वस्तुनिष्ठ आणि सत्यान्वेषी होते हे होय.हाउशोफर हा म्यूनिक विद्यापीठातील जिओपॉलिटिक इन्स्टिट्यूटचा प्रमुख बनला. या इन्स्टिट्यूटमध्ये अनेक भूराजनीतिज्ञ जमा झाले व त्यांनी भूराजनैतिक सिद्धांताचा प्रचार केला. हाउशोफर याने मॅकिंडर याच्या लेखनाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे आणि त्याचा उपयोग जर्मनीमध्ये प्रचारात्मक सिद्धांत-बोधन करण्याच्या कामी कुशलतेने केला आहे.सुरुवातीच्या काळात राटसेल, जेलेन आणि मॅकिंडर यांच्या विचारांचे विश्लेषण करून पराभूत समाजाच्या पुनरुत्थानासाठी त्यांचा कसा उपयोग करावयाचा, ते ठरवून जर्मन लोकांना त्यांच्या हक्कांबद्दल जाणीव करून दिली. जसजशी ही जाणीव वाढत गेली, तसतसा मागण्यांचा (जर्मन) वाढता आशय व्यक्त होण्यास सुरुवात झाली. जेलेनच्या नियमाप्रमाणे प्रत्येक घासाबरोबर भूक वाढत होती. जर्मन वर्चस्वाच्या ध्येयाकडे जाण्यासाठी दोन मार्गांचा अवलंब करण्यात आला : (१) शैक्षणिक प्रचार व (२) शासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांपर्यंत पोहचणे. हाउशोफरचा शिष्य रूडॉल्फ हेस याच्यामार्फत हिटलरशी संबंध प्रस्थापित झाले होते आणि हिटलरच्या आत्मचरित्रातील बऱ्याच कल्पना हाउशोफरच्या प्रभावाखाली तयार झालेल्या दिसतात.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने भूराजनीतीस अधिकृत मान्यता दिली. त्या संकल्पनेचा लष्करी नेत्यांना देणगीसारखा उपयोग झाला. जर्मनीने केलेल्या आक्रमणाला अशा राष्ट्रातील नागरिकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी या सिद्धांताचा उपयोग झाला आणि इतर देशांत मानसशास्त्रीय दृष्ट्या युद्ध चालविण्यासाठी दारूगोळ्याप्रमाणे हा सिद्धांत उपयोगी पडला. त्यामुळे या सिद्धांताचा युद्धाशी विशेष संबंध लावला जातो; परंतु युद्धाचा किंवा क्रांतीचा या संकल्पनेशी येणारा संबंध आपापतः येतो; मुळात तसा संबंध नाही. हिटलरच्या महत्त्वाकांक्षेचे तांत्रिक समर्थन करण्याचे काम हाउशोफरने केले. ब्रिटिश साम्राज्याचा ऱ्हास वसाहती स्वायत्त होण्यामुळे होईल, अंतर्गत भांडणे व आर्थिक अरिष्टे यांमुळे फ्रान्स दुबळा होईल ही भाकिते करून तसेच छोट्या राष्ट्रांना स्वतंत्र अस्तित्वाचा हक्कच नाही, त्यामुळे हिटलरच्या यूरोपातील नव्या व्यवस्थेमध्ये ही राष्ट्रे जर्मन साम्राज्यामध्ये सामावली गेली, हे उदाहरण हाउशोफर दाखवून दिले. हाउशोफरचे लिखाण नाझी राजवटीमध्ये अधिकृत मानले जाऊ लागले. रशियाजवळ विस्तीर्ण भूभाग असल्यामुळे हाउशोफरला रशियाबद्दल आदर होता. रूसो-जर्मन करारामुळे (१९३९) त्यास आनंद झाला होता; परंतु हिटलरने जून १९४१ मध्ये रशियावर स्वारी केल्यापासून त्याला अस्वस्थ वाटू लागले. अमेरिकेच्या अलिप्ततेच्या धोरणाबद्दल त्याचा अंदाज साफ चुकीचा ठरला. मानसशास्त्रीय, आर्थिक आणि विचारधारात्मक साधने वापरून परकीय प्रतिकार बोथट करावयाचा; प्रत्येक देशामध्ये पंचमस्तंभी कारवाया सुरू करावयाच्या, यांवर हाउशोफरचा भर असे. अखेर वैफल्यामुळे हाउशोफरने १९४६ मध्ये आत्महत्या केली.

अशास्त्रीय विचारसरणी, विरोधकांच्या प्रतिकारशक्तीबद्दल अवास्तव अवमूल्यन आणि जर्मन भूराजनीतीची प्रत्यक्षात दिसलेली दिवाळखोरी, यांमुळे भूराजनीतीचे महत्त्वच काही काळ नाकारण्याची प्रवृत्ती तज्ञांमध्ये निर्माण झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये राजनीतीच्या संदर्भात भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व राहिले नाही.दुसऱ्या महायुद्धाचे वातावरण निर्माण होत असताना अमेरिकेमध्ये आयझेया बोमन याच्या जिऑग्रफी व्हर्सिस जिओपॉलिटिक्स (१९४२) या ग्रंथामध्ये भूगोलाने उभ्या केलेल्या राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्यात आली होती. इतर भूगोलज्ञांनीही यावर भर दिला. भूराजनीतीच्या अभ्यासाने या समस्यांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न झाला. निकोलस जे स्पायकमन याने अमेरिकाज स्ट्रॅटेजी इन वर्ल्ड पॉलिटिक्स हा ग्रंथ प्रकाशित केला (१९४२). जॉर्ज टी. राइनर यानेही भूराजनीतीवर लिखाण केले. भूरादनीतीचा कोणताही घटक महायुद्धोत्तर काळामध्ये स्वीकारार्ह राहिला नाही; परंतु त्यामधील बऱ्याचशा कल्पना संशोधित स्वरूपात पुढे स्वीकारल्या जाऊ लागल्या. भूराजनीतीचे महत्त्व दोस्त राष्ट्रांना समजले आहे. संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना व संरचना करताना डंबार्टन ओक्स किंवा सॅन फ्रॅन्सिस्को येथील परिषदांमध्ये जमलेल्या राष्ट्रांना राज्यसंस्था (स्टेट) व भूगोल यांच्या परस्परसंबंधांचे विस्मरण चालणार नाही, याची पुरेपूर जाणीव झाली.

विज्ञानातील शोध आणि तांत्रिक ज्ञान यांच्या विकासामुळे दोन भूभागांतील अंतराचे संरक्षक महत्त्व नष्ट झाले आहे. देशाचे युद्धसामर्थ्य अजमावताना केवळ सैन्यच नव्हे, तर संपूर्ण मनुष्यबळ लक्षात घ्यावे लागते. रशिया व अमेरिका या दोनच सत्ता सद्यःस्थितीत लक्षणीय असून त्याही उत्तर धृवाच्या प्रदेशातून परस्परांवर आक्रमण करण्याची शक्यता आधुनिक काळातील राजनीतिज्ञांना नाकारता येत नाही. रशियाप्रमाणेच अमेरिकाही आज हृदभूमीच झाली आहे. मॅकिंडरने मांडलेला हृदभूनीचा सिद्धांत विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कालबाह्य झाला आहे. भूराजनीतीच्या जर्मन आक्रमणाशी लावण्यात आलेल्या संबंधामुळे भूगोल आणि राजकारण यांची संगती युद्धाशी लावण्यात येते. भूराजनीती हा राजशास्त्राचाच एक भाग आहे, असे भूगोलज्ञ म्हणतात; तर राजशास्त्रज्ञ त्यास भूगोलाकडे टोलवितात. त्या संज्ञेला चिकटलेला द्वेषार्ह भाग कालमानानुसार कमी झाला हे खरे आणि विशेषतः अमेरिकेमध्ये लष्करी संरक्षणाच्या विश्लेषणामध्ये भूराजनीतीला थोडी मान्यताही मिळाली. आंतरराष्ट्रीय संबंधात भौगोलिक घटक हा राजकीय वा सैनिकी दृष्टीने दुर्लक्षून चालणार नाही, हे जर्मन भूराजनीती विचारांचे सार म्हणता येईल.

संदर्भ :1. Cox, K. R.; Reynolds, D. R. Ed. Locational Approaches to Power and Conflict, New York, 1974.
2. Dikshit, R. D. Political Geography, New Delhi, 1982.
3. Pounds, N. J. G. Political Geography, San Fancisco, 1972.
4. Prescott, J. R. V. The Geography of State Policies, Chicago, 1968.
5. Strausz-Hupe, Robert Geopolitics, New York, 1942.
6. Valkenburg, S. V.; Stotz, Carl L. Elements of Political Geography, New Delhi, 1963.

लेखक - दे. य. (इं.) गोहोकर व ना. र. (म.) देशपांडे
स्त्रोत- मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate