অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कथिल

कथिल

 

धातुरूप मूलद्रव्य. चिन्ह Sn; अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या दर्शविणारा अंक) ५०; अणुभार ११८⋅६९; विद्युत्‌ विन्यास (इलेक्ट्रॉनांची अणूमधील मांडणी) २, ८, १८, १८, ४; आवर्त सारणी (मूलद्रव्यांची कोष्टकरूपाने केलेली विशिष्ट मांडणी) गट ४; वि. गु. ७⋅३ (पांढरे कथिल); वितळबिंदू २३१⋅८५० से.; उकळबिंदू २,६८७⁰ से.; नैसर्गिक समस्थानिक [अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेला त्या मूलद्रव्याचा प्रकार,  समस्थानिक] : ११२, ११४, ११५, ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२२, व १२४; यांपैकी १२४ अणुभाराचा समस्थानिक किरणोत्सर्गी (किरण वा कण बाहेर फेकण्याचा गुणधर्म असलेला) असून त्याचे अर्धायुष्य (किरणोत्सर्गी पदार्थाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काल) ६ × १०१५ वर्षे आहे; काही कृत्रिम किरणोत्सर्गी समस्थानिक तयार करण्यात आलेले आहेत. पृथ्वीच्या कवचातील प्रमाण ०⋅००४%. संयुजा [अणूंची परस्परांशी संयोग पावण्याची क्षमता,  संयुजा] २ व ४; ही धातू उष्णता व वीज यांची संवाहक असून फारशी तन्य (तार काढता येईल अशी ) नाही. फार मऊ असल्यामुळे तिची तार काढता येत नाही. ती फार वर्धनशील आहे म्हणून ठोकून तिचा वर्ख (अतिशय कमी जाडीचा पातळ पत्रा) तयार करता येतो.
इतिहास : फार प्राचीन काळापासून मानव कथिलमिश्रित धातूचा उपयोग करीत आहे. बायबलामध्ये कथिलाचा उल्लेख आहे. फिनिशियन लोकांनी इ. स. पू. १००० च्या सुमारास इंग्‍लंडमधील कॉर्नवॉल येथे कथिलाच्या खाणी खोदल्याचा उल्लेख आढळतो. ईजिप्तमधील पुरातन थडग्यांतून शुद्ध कथिलाच्या वस्तू मिळालेल्या आहेत. ते कोणी व कधी प्रथम शुद्ध स्वरूपात शोधून काढले हे अज्ञात आहे. ते पाश्चात्त्यांनी पूर्वेकडून प्रथम मिळविले असल्याचा संभव आहे. संस्कृतमध्ये कथिलाला ‘कस्तीरम्‌‌ ’ असे म्हणतात. कथिलाच्या मुख्य खनिजाचे ‘कॅसिटेराइट’ हे इंग्रजी नाव, ग्रीकांचा ‘कॅसिटिरॉस ’ हा शब्द व संस्कृत ‘कस्तिरम्‌ ’ यांत पुष्कळच साम्य आहे. शिसे, कथिल व बिस्मथ या धातूंत फार साम्य आहे.रोमन लोक शिशाचा उल्लेख काळे शिसे व कथिलाचा पांढरे शिसे असा करीत असत. ज्यूलियस सीझर यांच्या ब्रिटनवरील स्वारीनंतर इटलीमध्ये कथिलाची आवक झाली.
उपस्थिती : ही धातू निसर्गात केवळ धातूच्या स्वरूपात आढळत नाही, संयुगांच्या स्वरूपात आढळते. या संयुगांपैकी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे SnO2 हे होय. ते कॅसिटेराइट किंवा टिनस्टोन या खनिजाच्या स्वरूपात आढळते.
कथिलाच्या एकूण जागतिक उत्पादनापैकी ९०% मलेशिया, इंडोनेशिया, बोलिव्हिया, थायलंड, काँगो प्रजासत्ताक, नायजेरिया आणि चीन या देशांत होते. ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम, ब्रह्मदेश, जपान, कॅनडा, पोर्तुगाल व स्पेन या देशांतही थोडेसे उत्पादन होते. भारतात बिहार राज्यातील हजारीबाग, रांची व गया ह्या जिल्ह्यांत कथिलाची थोडी धातुके (नैसर्गिक फायदेशीर नसल्यामुळे भारतात कथिलाचे उत्पादन होत नाही. त्यामुळे भारताला कथिलाकरिता पूर्णपणे आयातीवरच अवलंबून रहावे लागते. कथिलाच्या आयातीची आकडेवारी कोष्टकात दिली आहे.
धातूमिळविणे : निसर्गात आढळणाऱ्या कथिलाच्या धातुकात कॅसिटेराइटाशिवाय बऱ्याच अशुद्धी असतात. कॅसिटेराइटाचे वि. गु. सु. ७ असते. इतर अशुद्धींचे वि. गु. बरेच कमी, जवळजवळ ३ इतकेच असते. धातुकाचा चुरा करून व त्या चुऱ्यावर वाहते पाणी सोडून त्याच्यातील हलके पदार्थ काढून टाकले जातात. उरलेला भाग मुख्यतः कॅसिटेराइट खनिजाचा असतो. त्याच्यात गंधक, आर्सेनिक व अँटिमनी यांची थोडी संयुगे राहिलेली असतात. ती काढून टाकण्यासाठी कॅसिटेराइटाचा अवशिष्ट (राहिलेला) भाग विस्तवात भाजतात. त्यामुळे व उल्लेख केलेली द्रव्ये बाष्पनशील (वाफ होऊन उडून जाणाऱ्या) ऑक्साइडांच्या रूपाने निघून जातात. भाजून शुद्ध केलेल्या कॅसिटेराइटाचे चूर्ण दगडी कोळशाच्या चूर्णाशी मिसळून ते मिश्रण एका परावर्तनी भट्टीत (जळणाशी संबंध न येता त्याच्या ज्योतीच्या उष्णतेशी संबंध येईल अशा रचनेच्या भट्टीत) घालून सु. १,३००० से. तापमान होईपर्यंत तापवितात. कॅसिटेराइटाचे  क्षपण होऊन कथिल बनते ते वितळलेल्या स्थितीत असून मधून मधून भट्टीतून काढून घेतले जाते.
SnO2                 +      2C    →   Sn     +             2CO
स्टॅनिक ऑक्साइड       कार्बन         कथिल         कार्बन मोनाॅक्साइड
अशा तऱ्हेने मिळविलेल्या कथिलात अनेक अशुद्धी असतात म्हणून ते एका उतरत्या पृष्ठावर ठेवून तापवितात. त्यामुळे कथिल वितळून सखल जागेकडे वाहू लागते व त्याच्यापेक्षा वितळण्यास कठीण अशा अशुद्धी मागे राहतात. वितळून खाली गेलेले कथिलही पूर्ण शुद्ध नसते. त्यातील अशुद्धी काढून टाकण्यासाठी ते कथिल वितळलेल्या स्थितीत उघड्यावर हवेत ठेवतात. कथिलापेक्षा अधिक धन विद्युती [सापेक्ष विद्युत्‌ स्थितीनुसार लावलेल्या मूलद्रव्यांच्या श्रेणीतील खालच्या स्थानी असलेल्या, विद्युत्‌ रासायनिक श्रेणि] धातूंच्या ज्या अशुद्धी कथिलात राहिलेल्या असतात त्यांची ऑक्साइडे तयार होतात. त्यांचा सायटा बनून तो धातूच्या पृष्ठावर तरंगतो व जवळजवळ ९९ टक्के शुद्ध कथिल खाली राहते.
गुणधर्म : ही धातू मऊ व वर्धनशील असून तिचा रंग व चकाकी रुप्यासारखी आहे. ही  अनेकरूपी (एकाच मूलद्रव्याच्या निरनिराळ्या भौतिक स्वरूपांत असणारी) असून ती करडे कथिल, पांढरे कथिल व समचतुर्भुजी [ स्फटिकविज्ञान] कथिल अशा तीन स्वरूपांत असू शकते. आपण सामान्यतः पहातो ते पांढरे कथिल होय. करडे कथिल १३⋅२० से.च्या खाली स्थिर असते. त्या तापमानाला त्याचे पांढऱ्या कथिलात परिवर्तन होते व १६१० से. तापमानाला पांढर्‍या कथिलाचे समचतुर्भुजी कथिलात रूपांतर होते. ही परिवर्तने पुढील व्युत्क्रमी (उलट सुलट होणाऱ्या) समीकरणाने दाखविली जातात.
१३⋅२ ०से.                                                   १६१०से.
करडे कथिल ⇌ पांढरे कथिल ⇌     समचतुर्भुजी कथिल.
पांढरे कथिल हे १३⋅२० से. पेक्षा अधिक तापमानात स्थिर असते, पण तापमान त्यापेक्षा कमी झाल्यास त्याचे करड्या कथिलात परिवर्तन होण्याची जी क्रिया असते ती अत्यंत मंद असते, इतकी की, शून्य अंश तापमानातही पांढरे कथिल अतिदीर्घकाळ परिवर्तन न होता तसेच टिकून राहते. तापमान फारच कमी म्हणजे सु.  – ५०० से. झाले म्हणजे मात्र पांढऱ्या कथिलाचे करड्या कथिलात वेगाने रूपांतर होते. पांढरे कथिल फुगते व त्याचा भुगा होऊन करड्या कथिलाची पूड तयार होते. करड्या कथिलाचा संपर्क झाला असता पांढऱ्या कथिलाचे करड्या कथिलात लवकर रूपांतर होते. ही धातू विक्रियाशील (रासायनिक परिणाम होईल अशी) नसून हवेत उघडी राहिली असता गंजत नाही. १,२००० से. पेक्षा अधिक तापमान असताना मात्र तिचा ऑक्सिजनाशी संयोग होतो. ती तापलेली असतानाही नायट्रोजन किंवा कार्बन यांच्याशी संयोग पावत नाही, पण क्लोरीन किंवा हायड्रोजन क्लोराइड किंवा गंधक यांचा संयोग होऊन अनुक्रमे स्टॅनिक क्लोराइड, स्टॅनस क्लोराइड व स्टॅनस सल्फाइड ही संयुगे तयार होतात. विरल (पाण्याचे प्रमाण बरेच असलेल्या) हायड्रोक्लोरिक अम्‍लाची त्याच्यावर मंद क्रिया होते पण संहत (पाण्याचे प्रमाण कमी असलेल्या) हायड्रोक्लोरिक अम्‍लाची त्याच्यावर पुढे दाखविल्याप्रमाणे वेगाने विक्रिया होते.
Sn         +           2HCl                →        SnCl2            +     H2
कथिल      हायड्रोक्लोरिक अम्‍ल      स्टॅनस क्लोराइड     हायड्रोजन
विरल सल्फ्यूरिक अम्‍लाची त्यावर फारशी विक्रिया होत नाही. परंतु उष्ण व संहत सल्फ्यूरिक अम्‍लाची विक्रिया होऊन सल्फर डायऑक्साइड बनतो. थंड विरल नायट्रिक अम्‍लात कथिल विरघळते व स्टॅनस नायट्रेट व अमोनियम नायट्रेट ही तयार होतात.
4Sn   +          10HNO3     →        4Sn (NO3)2 + NH4NO3 +   3H2O
नायट्रिक             स्टॅनस नायट्रेट     अमोनियम
अम्‍ल                                              नायट्रेट
ज्याच्यात लेशमात्र पाणी आहे अशा संहत नायट्रिक अम्‍लाची कथिलावर तीव्र क्रिया होते. तांबड्या वाफा बाहेर पडतात व अल्प प्रमाणात कथिलाचे विद्राव्य (विरघळणारे) लवण व विपुल प्रमाणात मेटास्टॅनिक अम्‍लाची (H2Sn5O11 याची) पांढरी पूड तयार होते.
उष्ण संहत नायट्रिक अम्‍लाची कथिलावर विक्रिया होऊन स्टॅनिक नायट्रेट तयार होते; पण त्याचे लगेच जलीय विच्छेदन होऊन (पाण्याच्या विक्रियेने घटक द्रव्ये सुटी होऊन) अविद्राव्य अशा मेटास्टॅनिक अम्‍लाचा (H2Sn5O11.4H2O याचा) पांढरा अवक्षेप (साका) तयार होतो. अम्‍लराजात (एक भाग नायट्रिक अम्‍ल व तीन भाग हायड्रोक्लोरिक अम्‍ल यांच्या मिश्रणात) कथिल विरघळते व त्यापासून स्टॅनिक क्लोराइड (SnCl4) तयार होते. उष्ण संहत सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइडांच्या विद्रावात कथिल विरघळते व त्याच्यापासून सोडियम किंवा पोटॅशियम यांची स्टॅनेटे तयार होतात.
Sn        +                 2NaOH    +   H2O      →        Na2SnO3 +    2H2
सोडियम                             सोडियम
हायड्रॉक्साइड                            स्टॅनेट
उपयोग : कथिलाचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते गंजत नाही किंवा त्याचे संक्षारण (हवा, पाणी व रासायनिक पदार्थ यांच्या परिणामाने होणारा नाश) होत नाही हा होय. म्हणून तांबे, शिसे, लोह इ. धातूंच्या वस्तूंच्या पृष्ठावर कथिलाचा लेप (कल्हई) देण्यात येतो. उदा., आपण व्यवहारात कल्हई केलेली तांब्या-पितळेची भांडी व इतर वस्तू वापरतो. लोखंडाच्या किंवा मऊ पोलादाच्या पत्र्यावर कथिलाचा पातळ लेप देऊन बनविलेल्या पत्र्यापासून रॉकेलचे, चहा कॉफीचे व खाद्य पदार्थांचे डबे केलेले असतात. विरल सल्फ्यूरिक अम्लाने ज्यांचे पृष्ठ अगदी स्वच्छ केलेले आहे असे पत्रे वितळलेल्या कथिलात बुडवून काढल्यावर त्यांच्यावर कथिलाचा लेप बसतो. विद्युत्‌ विलेपन पद्धतीनेही पत्र्यावर कथिलाचा लेप देतात. कथिलाचा लेप जोपर्यंत अभंग आहे तोपर्यंत त्याच्या आतील लोहाचे रक्षण होते व ते गंजत नाही. परंतु काही कारणाने ओरखडा किंवा चरा उठून तेथील थोडेसे कथिल जरी निघून गेले, तरी त्या जागेपासून तेथल्या लोहाचे गंजणे वेगाने सुरू होते. विद्युत्‌ रासायनिक श्रेणीत लोह हे कथिलापेक्षा जास्त धन विद्युती असल्यामुळे त्याच्यावर हवेचा मारा सहज होतो व लवकरच ते गंजून त्या जागी भोके पडतात. सारांश, कथिलाचा लेप असलेल्या वस्तू गॅल्व्हानीकृत (जस्तलेपित) लोहाच्या वस्तू इतक्या टिकाऊ नसतात. परंतु खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी जे डबे वापरतात ते मात्र कथिलाची कल्हई दिलेल्या लोखंडाचे असतात. कारण काही कारणाने कल्हई जाऊन उघडे पडलेले लोह गंजले, तरी ते विषारी नसते व तो गंज मिसळल्यामुळे खाद्ये निरुपयोगी होत नाहीत. उलट जस्त विषारी असते म्हणून जस्तलेपित डबे खाद्यपदार्थांकरिता वापरीत नाहीत [ कल्हई; कथिलाच्छादित पत्रे].
कथिलाची तार वितळतार (विजेचा प्रवाह जादा झाल्यास किंवा मंडलसंक्षेप झाल्यास वितळणारी तार, फ्यूज वायर) म्हणून व वर्ख विद्युत्‌ धारित्रासाठी (विद्युत्‌ भार साठविणाऱ्या साधनासाठी) वापरतात. कथिलाच्या दबणाऱ्या नळ्या (पाहिजे तेवढाच पदार्थ नळी दाबून बाहेर काढता येणाऱ्या नळ्या) काही विशिष्ट औषधे व अन्नपदार्थ तसेच चित्रकारांचे रंग यांकरिता वापरतात.
मिश्रधातू बनविण्यासाठी कथिलाचा बराच उपयोग केला जातो. या मिश्रधातूंपैकी महत्त्वाच्या मिश्रधातू पुढील आहेत. ब्राँझ या मिश्रधातूत तांबे ९२% व कथिल ८% असते. जुन्या कालातील ‘प्यूटर’ या मिश्रधातूत कथिल ८०% आणि शिसे २०% असते. आधुनिक ‘प्यूटर’ मध्ये कथिल, तांबे, बिस्मथ व थोडीशी अँटिमनी या धातू असतात. डाख देण्याच्या धातूत (प्लंबर्स सॉल्डर) सामान्यतः ६७% शिसे व ३३% कथिल असते. धारव्यांच्या (यंत्रातील फिरणारे दंड योग्य स्थितीत ठेवण्यासाठी लागणाऱ्या आधारांच्या) मिश्रधातूत कथिल ९०%, तांबे ५%, व अँटिमनी ५% असते. छपाई करण्याच्या अक्षरांच्या खिळ्यांची मिश्रधातू शिसे, कथिल व अँटिमनी यांच्या मिश्रणाची असते.
संयुगे : कथिलापासून स्टॅनस व स्टॅनिक अशा दोन प्रकारची संयुगे तयार होतात. स्टॅनस संयुगांतील कथिल दिसंयुजी (दोन संयुजा असलेले) असून स्टॅनिक संयुगांतील कथिल चतुःसंयुजी (चार संयुजा असलेले) असते. स्टॅनस लवणापासून स्टॅनस आयन (Sn+2) तयार होतात. पण काही संयुगे इलेक्ट्रॉनदात्यांपासून इलेक्ट्रॉन घेतात व [SnCl4]-2 अशासारखे जटिल आयनही (आयन म्हणजे विद्युत्‌ भारित अणू, रेणू किंवा अणुगट) तयार होतात. स्टॅनस संयुगांचे  ⇨ ऑक्सिडीभवन सहज होते, त्यामुळे क्षपणकारक म्हणून त्यांचा उपयोग होतो. स्टॅनिक संयुगे ही सामान्यतः सहसंयुजी (ज्यामध्ये जोडलेल्या दोन्ही अणूंनी इलेक्ट्रॉन दिलेले असल्यामुळे बंध बनलेला असतो अशी) असतात. चतुःसंयुजी कथिलाचे SnCl6-- यासारखे काही जटिल आयनही तयार होतात व ते स्थिर  असतात.
(१)स्टॅनस ऑक्साइड : SnO. हवेचा किंवा ऑक्सिजनाचा संपर्क होणार नाही अशा रीतीने स्टॅनस ऑक्झलेट तापविल्यावर हे तयार होते. तसेच स्टॅनस हायड्रॉक्साइड तापवूनही हे तयार होते. हे करड्या रंगाचे असून पाण्यात अविद्राव्य असते. हवेत किंचित गरम केल्यावर त्याचे ऑक्सिडीभवन होऊन स्टॅनिक ऑक्साइड तयार होते. स्टॅनस ऑक्साइड हे उभयधर्मी (अम्लीय व अम्लाशी विक्रिया करून लवण देण्याचा गुणधर्म असणाऱ्या पदार्थाचे म्हणजे क्षारकीय असे दोन्ही गुणधर्म असणारे) असून त्याची विरल अम्लाशी विक्रिया झाली असता स्टॅनस लवणे तयार होतात. हवेचा संपर्क होणार नाही अशा परिस्थितीत विरल क्षारकांशी विक्रिया झाली असता स्टॅनाइटे तयार होतात. हवेचा संपर्क होत असेल तर स्टॅनाइटांचे सहज ऑक्सिडीभवन होते व स्टॅनेटे तयार होतात. परंतु संहत क्षारकाशी क्रिया झाली असता स्टॅनेट व धातुरूप कथिल तयार होतात.
(२)स्टॅनस क्लोराइड : SnCl2. तापविलेल्या कथिलावर हायड्रोजन क्लोराइड वायूचा प्रवाह जाऊ दिल्याने निर्जल स्टॅनस क्लोराइड तयार होते. ते काचेसारखे पारदर्शक असते व अल्कोहॉलात व ईथरात विरघळते. हायड्रोक्लोरिक अम्लात त्याचा विद्राव केला असता त्याच्यापासून H2SnCl4 असे संघटन असलेले अम्ल तयार होते व त्या अम्लापासून (NH4)2 SnCl4 यासारखी लवणे तयार होतात. संहत हायड्रोक्लोरिक अम्लात कथिल विरघळवून स्टॅनस क्लोराइडाचा विद्राव मिळतो. त्या विद्रावाचे बाष्पीभवन केले म्हणजे जे स्फटिक मिळतात त्यांचे संघटन SnCl2.2H2O असे असते. तापविल्यावर त्याचे पुढे दाखविल्याप्रमाणे अंशतः अपघटन (मूळ रेणूचे तुकडे पडून लहान रेणू किंवा अणू बनणे) होते.
SnCl2.2H2O           ⇌        Sn(OH)Cl       +      HCl    +            H2O
सजलस्टॅनसक्लोराइड              स्टॅनसऑक्सिक्लोराइड    हायड्रोक्लोरिकअम्ल        पाणी
स्टॅनस क्लोराइड हे पाण्यात सहज विरघळते, पण त्या विद्रावात अधिक पाणी घालून तो विरल केल्यास स्टॅनस ऑक्सिक्लोराइड अवक्षेपित होते व विद्राव गढूळ होतो.
स्टॅनस क्लोराइडाचा जलविद्राव व सोडियम हायड्रॉक्साइड यांची विक्रिया होऊन सजल स्टॅनस ऑक्साइड अवक्षेपित होते. स्टॅनस क्लोराइड हे प्रबल क्षपणकारक आहे. ते मर्क्युरिक क्लोराइडाचे मर्क्युरस क्लोराइडात किंवा धातुरूप पाऱ्यात आणि फेरिक क्लोराइडाचे फेरस क्लोराइडात व क्युप्रिक क्लोराइडाचे क्युप्रस क्लोराइडात रूपांतर करते.
(३)स्टॅनस फ्ल्युओराइड : SnF2. कथिलावर किंवा स्टॅनस ऑक्साइडावर हायड्रोफ्ल्युओरिक अम्लाची क्रिया करून हे मिळू शकते. ते प्रबल क्षपणकारक असून पाण्यात सहज विरघळते. फ्ल्युओराइडयुक्त दंतमंजनात याचा वापर करतात.
(४)स्टॅनस सल्फाइड : SnS. गंधक व कथिल यांचे मिश्रण तापविल्यावर हे काळसर रंगाच्या स्फटिकमय राशीच्या स्वरूपात मिळते. किंचित हायड्रोक्लोरिक अम्ल मिश्रित स्टॅनस क्लोराइडाच्या विरल विद्रावातून सल्फ्युरेटेड हायड्रोजन जाऊ दिल्यावर जो तपकिरी रंगाचा अवक्षेप तयार होतो, तो याचाच असतो. स्टॅनस सल्फाइड हे उष्ण संहत हायड्रोक्लोरिक अम्लात विरघळते व त्याचे स्टॅनस क्लोराइड तयार होते. स्टॅनस सल्फाइड हे पिवळ्या अमोनियम सल्फाइडातही विरघळते व त्याच्यापासून अमोनियम थायोस्टॅनेट (NH4)2SnS3 तयार होते, ही क्रिया पुढील टप्प्याने होते. पिवळ्या अमोनियम सल्फाइडात जे अतिरिक्त गंधक असते त्याच्यामुळे स्टॅनस सल्फाइडाचे स्टॅनिक सल्फाइडात परिवर्तन होते. त्याची व अमोनियम सल्फाइडाची विक्रिया होऊन अमोनियम थायोस्टॅनेट तयार होते.
(५)स्टॅनिक ऑक्साइड : SnO2. निसर्गात हे कॅसिटेराइट या खनिजाच्या स्वरूपात आढळते. कथिल हवेत किंवा ऑक्सिजनात तापवूनही ते तयार करता येते. स्टॅनिक क्लोराइडाचे जलीय विच्छेदन झाल्यानेही ते तयार होते. कथिलावर संहत नायट्रिक अम्लाची क्रिया केल्यावर सजल स्टॅनिक ऑक्साइड मिळते. ते भाजून कथिलाचे डाय-ऑक्साइड मिळते.
ते घन व पांढरे असून पाण्यात अविद्राव्य आहे. ते उभयधर्मी असून संहत सल्फ्यूरिक अम्लाशिवाय इतर अम्लां ची क्रिया त्याच्यावर विशेष होत नाही. संहत सल्फ्यूरिक अम्लाच्या क्रियेने त्याचे स्टॅनिक सल्फेट [Sn (SO4)2] होते. सोडियम हायड्रॉक्साइड व स्टॅनिक ऑक्साइड यांचे मिश्रण तापवून वितळविल्यास सोडियम स्टॅनेट (Na2SnO3) तयार होते. सोडियम स्टॅनेट हे पाण्यात विद्राव्य असून त्याच्या विद्रावाचे बाष्पीभवन होऊ दिल्यावर Na2SnO3.3H2O असे रासायनिक संघटन असणारे स्फटिक तयार होतात.
(६)स्टॅनिक क्लोराइड : SnCl4. वितळलेल्या कथिलावरून कोरडा क्लोरीन वायू जाऊ दिल्यास, याचे बाष्प तयार होते व ते बाष्प निववून या संयुगाचे द्रव मिळते. त्याचा वितळबिंदू ११४० से. असून दमट हवेत ते खूप वाफाळते. याच्यात अगदी थोडे पाणी घातले असता त्याचा जो विद्राव तयार होतो, त्याच्यात विगमन ( रेणूतील किंवा अणुगटातील घटक आयनरूपाने वेगळे होणे) झालेले काही रेणू असतात व त्यांचे अंशतःजलीय विच्छेदन होऊन स्टॅनिक अम्ल तयार झालेले असते. ही गोष्ट पुढील समीकरणावरून कळून येईल :
SnCl4           +        4H2O               ⇌      Sn(OH)4         +     4HCl
स्टॅनिक क्लोराइड                                        स्टॅनिकअम्ल
स्टॅनिक क्लोराइड हे अल्कोहॉल आणि ईथर यांसारख्या कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या द्रवांत) विरघळते. स्टॅनिक क्लोराइडाच्या जलविद्रावांपासून अनेक हायड्रेटांचे स्फटिक मिळविता येतात. त्यांपैकी मुख्य म्हणजे SnCl4⋅5H2O होय. रंगबंधक (तंतूवर रंग पक्का बसविणारे) म्हणून त्याचा उपयोग होतो. स्टॅनिक क्लोराइडापासून अनेक जटिल संयुगे तयार होतात. उदा., अमोनियम क्लोराइडाशी संयोग होऊन (NH4)2SnCl6 अशी संयुगे तयार होतात. अमोनिया व फॉस्फरस पेंटाक्लोराइड यांच्याशी संयोग होऊन अनुक्रमे SnCl4⋅4NH3 व SnCl4⋅PCl5 ही संयुगे मिळतात.
(७)स्टॅनिक फ्ल्युओराइड:   SnF4. तापविलेल्या कथिलावर फ्ल्यूओरिनाची क्रिया करून स्टॅनिक फ्ल्यूओराइड तयार करता येते. हायड्रोजन फ्ल्यूओराइड व स्टॅनिक क्लोराइड यांचे मिश्रण तापवूनही ते तयार करता येते. ते स्फटिकमय लवण असून ७००० से. ला त्याचे संप्लवन (घनावस्थेतून सरळ वायुरूपात बदल होणे) होते. पाण्याने त्याचे सहज जलीय विच्छेदन होते.
(८)स्टॅनिक सल्फाइड : SnS2. स्टॅनिक क्लोराइडाच्या जलविद्रावात हायड्रोजन सल्फाइडाची भर घातल्यावर जो पिवळा अवक्षेप मिळतो तो याचा असतो. हा अवक्षेप अमोनियम सल्फाइडात विरघळतो व अमोनियम थायोस्टॅनेट तयार होते.
गिल्डिंग करण्यासाठी किंवा मुलामा देण्यासाठी जे सोनेरी रंग वापरतात त्यासाठी स्फटिकमय स्टॅनिक सल्फाइडाचा (मोझेइक गोल्डाचा) उपयोग केला जातो. कथिलाचा कीस, गंधक व अमोनियम क्लोराइड यांचे मिश्रण तापवून स्फटिकमय स्टॅनिक सल्फाइड तयार करतात.
(९)टिनहायड्राइडकिंवास्टॅनेन:  SnH4. कथिलाचे ज्ञात असे एकच हायड्राइड असून ते सहसंयुजी संयुग आहे व ते अतिशय अस्थिर असल्यामुळे तयार करण्यास कठीण आहे. स्टॅनिक क्लोराइडाचे लिथियम-अ‍ॅल्युमिनियम हायड्राइड (LiAlH4) याने क्षपण करून ते तयार करता येते. सामान्य तापमानास ते वायुरूप असून विषारी असते.
(१०)इतर लवणे : कथिलाची स्टॅनस सल्फेट (SnSO4), स्टॅनिक सल्फेट [Sn(SO4)2], स्टॅनस नायट्रेट [Sn(NO3)2], स्टॅनिक नायट्रेट [Sn(NO3)4] इ. लवणेही तयार करता येतात, परंतु त्याची कार्बोनेटे होत नाहीत. याचे कारण स्टॅनस हायड्रॉक्साइड अतिदुर्बल क्षारक आहे.
कथिलाच्या कार्बनी संयुगांत कथिल एका किंवा अधिक कार्बन अणूंना जोडलेले असते. डायब्युटिल-टिन संयुगे प्लॅस्टिसोल्स व व्हिनिल रेझिने यांच्या निर्मितीत वापरतात. ट्रायब्युटिल-टिन ऑक्साइड हे संयुग लाकडाच्या संरक्षणासाठी; कापड, कातडी व कागदाचा लगदा यांत कवकनाशक (हरितद्रव्यरहित बुरशीसारख्या सूक्ष्म वनस्पतींचा नाश करणारे द्रव्य) म्हणून तसेच रुग्णालयात सूक्ष्मजंतुनाशक म्हणून वापरतात. स्टॅनस ऑक्टोएट व स्टॅनस ओलिएट यांसारखी कार्बनी अम्लांची कथिलाची लवणे यूरेथेन फोम-रबराच्या निर्मितीत उत्प्रेरक (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणारा पदार्थ) म्हणून वापरतात.
कथिल ओळखून काढणे : स्टॅनस लवणांचे विद्राव पुढील विक्रिया घडवितात.
(१) विरल हायड्रोक्लोरिक अम्लाच्या सान्निध्यात त्यातून हायड्रोजन सल्फाइड वायू जाऊ दिला तर स्टॅनस सल्फाइडाचा तपकिरी अवक्षेप मिळतो. हा अवक्षेप पिवळ्या अमोनियम सल्फाइडात आणि उष्ण व संहत हायड्रोक्लोरिक अम्लात विरघळतो.
(२) मर्क्युरिक क्लोराइडाच्या विद्रावाबरोबर त्यापासून पांढऱ्या रंगाचा मर्क्युरस क्लोराइडाचा अवक्षेप मिळतो आणि तो तसाच राहू दिला तर त्याला करडा रंग येतो.
स्टॅनिक लवणांच्या बाबतीत पुढील विक्रिया घडते. स्टॅनिक लवणाच्या विद्रावातून विरल हायड्रोक्लोरिक अम्लाच्या सान्निध्यात हायड्रोजन सल्फाइड वायू जाऊ दिला तर स्टॅनिक सल्फाइडाचा पिवळा अवक्षेप मिळतो. हा अवक्षेप अमोनियम सल्फाइडात तसेच उष्ण व संहत हायड्रोक्लोरिक अम्लात विरघळतो. वरील विक्रियांवरून स्टॅनस व स्टॅनिक स्वरूपांतील कथिल ओळखता येते.
लेखक : अ.ना.ठाकूर

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate