অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कालगणनेतील बदल

कॅलेंडर म्हणजे पंचांगाचाच नवा अवतार.

 

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या गतीमुळे होणारी कालाची पाच अंगे मानली गेली आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण.ही पाच अंगे दिवसागणिक ज्या पुस्तकात दिलेली असतात, त्या पुस्तकाला पंचांग म्हणतात. आजकालच्या कॅलेंडरमध्ये पुढच्या बाजूला इंग्रजी तारखा देतात आणि मागच्या बाजू लेख, वेळापत्रके इत्यादी माहितीने भरतात त्यात एखाद्या चौकटीत पंचांग असते. कॅलेंडर दैनंदिन जीवनाशी इतके निगडीत झाले आहे की ‘अतिपरिचयात अवज्ञा’ या उक्तीनुसार आपण त्याची शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून केलेली रचना बघतही नाही.

आज आपण ज्याला इंग्लिश कॅलेंडर म्हणून ओळखतो ते पूर्वी 10 महिन्यांचे आणि 304 दिवसांचे होते. मार्च महिन्यापासून वर्ष सुरू व्हायचे. मार्च, एप्रिल, मे, जून झाले की पाचवा महिना क्विंटिलिस, सहावा सेस्क्विड, सातवा सप्टेंबर, आठवा ऑकटोबर नववानोव्हेंबर आणि दहावा डिसेंबर असायचा. त्याची कालगणना चंद्राच्या कलांशी जुळायची नाही म्हणून मग ज्युलियस सीझरने ते कॅलेंडर 12 महिन्यांचे आणि 355 दिवसांचे केले. जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने वाढवले. तर क्विंटिलिसचे नाव ज्युलियस सीझर वरून जुलै केले आणि सेस्क्विडचे नाव एम्परर ऑगस्टस् वरून ऑगस्ट केले. ख्रिस्तपूर्व 46 हे वर्ष त्यामुळे 455 दिवसांचे केले. ख्रिस्तपूर्व 45 पासून वर्ष 12 महिन्यांचे गणले जाऊ लागले. या कालगणनेला ज्युलियन कॅलेंडर म्हणतात.ऋतू सूर्याच्या प्रभावाने होतात. सूर्याच्या वर्षात 365 दिवस असतात. नेमके सांगायचे तर 365 दिवस 6 तास 9 मिनिटे 10 सेकंद. म्हणजे नवे वर्ष इतक्या काळाने सुरू व्हायला पाहिजे पण दिवसाच्या मध्येच 6 तासांनी नवीन दिनांक सुरू करणे अव्यवहार्य असल्याने प्रत्येक वर्ष 365 दिवसांचे झाले. चार वर्षात 6 तासांची बाकी 24 तास म्हणजे पूर्ण दिवस होत असल्याने दर चार वर्षांनी 1 दिवस जास्त असणारे 366 दिवसांचे लीप वर्ष गणले जाऊ लागले.


आणखी एका पद्धतीने एक वर्ष हा कालावधी मोजता येतो. उत्तरायण ते उत्तरायण किंवा दक्षिणायण ते दक्षिणायण. या वर्षाला ऋतुंचे वर्ष किंवा आर्तव वर्ष म्हणतात. यालाच इंग्रजीत ईयर ऑफ सिझन्स किंवा ट्रॉपिकल ईयर म्हणतात. ते सौर वर्षापेक्षा 11 मिनिटे आणि 13.92 सेकंदांनी लहान आहे. ज्युलियन कालगणनेने याचा दखल न घेतल्याने 22 जून हा दक्षिणायलाचा दिवस इ. स. 1582 मध्ये 12 जूनपर्यंत अलिकडे सरकल्याचे पोप ग्रेगरी यांच्या लक्षात आले. 400 वर्षात 3 दिवस 2 तास 52 मिनिटे आणि 48 सेकंद एवढा फरक मापनात पडतो हे लक्षात घेऊन त्यांनी कॅलेंडरचे समायोजन करायचे ठरवले. चारशे वर्षात 3 दिवस कमी करण्यासाठी शतकी वर्षाला 400ने  नि:शेष भाग जात असेल तरच ते लीप वर्ष गणायचे असे सांगितले. म्हणजे 100 200 300 या वर्षांना 4 ने नि:शेष भाग बसत असला 400 ने नि:शेष भाग बसत नसल्यामुळे ती लीप वर्षे नाहीत. आधीच्या कालगणनेची दुरुस्ती करण्यासाठी 1582 या  वर्षी गुरुवारी 4 ऑक्टोबर होती तर लगतच्या शुक्रवारी 15 ऑक्टोबर ही तारीख गणण्यात आली. हा बदल युरोपात अनेक देशांनी स्वीकारला पण इंग्लंडने लगेच स्वीकारला नाही, 1752 साली स्वीकारला. त्या वर्षी 2 सप्टेंबर नंतर लगेचची तारीख घेतली 14 सप्टेंबर घेतली. त्यामुळे शिवाजी महाराजांची मान्य जन्मतारीख इंग्लंडच्या पत्रानुसार आणि कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी 1630 असल्याचे बाबासाहेब पुरंदरे गणित करून सांगतात ती ज्युलियन कॅलेंडर प्रमाणे आहे. पण, आपण ग्रेगोरीयन कॅलेंडर वापरतो तर शिवाजीची जन्मतारीख 1 मार्च 1630 गणली पाहीजे.
ग्रेगोरियन कॅलेंडरनध्येही काही त्रुटी आहेत -नाक्षत्र वर्ष आणि आर्तव वर्ष यातील 11 मिनिटे आणि 13.92 सेकंदांचा फरक 3333 वर्षांनी 1 दिवस इतका वाढेल. इ. स. 4915 साली ते वर्ष 364 दिवसांचे गणावे लागेल, तर तो फरक दूर होईल.

 

लेखक : श्री. हेमंत मोने

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

 

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate