অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

क्रिप्टॉन

वायुरूप मूलद्रव्य; रासायनिक चिन्ह Kr; अणुभार ८३·८०; अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटानांची संख्या) ३६; विरल वायू; आवर्त सारणी (मूलद्रव्यांच्या कोष्टकरूपाने केलेल्या मांडणीतील) गट ०; वि. गु. २·८१८ (हवा = १); वितळबिंदू-१५०० से. (५४९ मिमी. दाबास); उकळबिंदू-१५३–२३० से.; क्रांतिक तापमान (ज्या तापमानापेक्षा जास्त तापमानास वायू द्रवरूप होत नाही) -६३·७७ से.; क्रांतिक दाब (क्रांतिक तापमान असता ज्या दाबास वायू द्रवरूप होऊ लागतो तो दाब) ५४·१८ वातावरणे; विद्युत् विन्यास (इलेक्ट्रॉनिकांची अणूतील मांडणी) २,८, १८,८; निसर्गातील समस्थानिक (एकाच अणुक्रमांकाचे भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) ७८ (०·३६%), ८० (२·२७%), ८२ (११·५६%), ८३ (११·५५%), ८४ (५६·९०%) व ८६ (१७·३७%); वातावरणातील प्रमाण १:१०,००,००० (आकारमानाने). हा एकाणुक (रेणूत एकच अणू असलेला) आहे. घनरूपी वायूचे पृष्ठ-केंद्रित घनीय स्फटिक [ स्फटिकविज्ञान] असतात.

सर रॅम्झी व ट्रॅव्हर्झ यांनी १८९८ मध्ये हा अक्रिय (रासायनिक विक्रियेत सहज भाग न घेणारा) वायू शोधून काढला. इतर अक्रिय वायुमिश्रित द्रवरूप आर्‌गॉनाचे भागशः ऊर्ध्वपातन (वेगवेगळ्या तापमानांस बनणाऱ्या वाफा वेगवेगळ्या थंड करून मिळणारे पदार्थ जमविण्याने) केल्याने हा त्यांना मिळाला. या वायुमिश्रणात तो जणू काय जडलेला होता म्हणून त्यास ‘क्रिप्टॉन’ (ग्रीक : क्रिप्टॉन म्हणजे दडलेला) असे नाव देण्यात आले.

प्राप्तिस्थान

क्रिप्टॉन खनिजांत आणि अशनींत आढळतो, पण पृथ्वीचे वातावरण हेच त्याचे प्राप्तिस्थान होय. युरेनियमाच्या अणुभंजनाने क्रिप्टॉन (८५) हा किरणोस्तर्गी (किरण बाहेर टाकण्याचा गुण असलेला) समस्थानिक काही प्रमाणात निर्माण होतो.

रासायनिक गुणधर्म

हे  आर्‌गॉनासारखेच आहेत. बऱ्याच कार्बनी पदार्थांबरोबर त्याची समावेशक (इतर अणू अथवा रेणू सामावून घेतलेली) संयुगे बनतात. उदा., फिनॉलाबरोबर Kr.2C6H5OH हे संयुग बनते. त्याची अस्थिर क्लॅथ्रेट (संयुगात अथवा स्फटिक जालात असणाऱ्या पोकळीत अंतर्भाव होऊन झालेली) नामक संयुगे आढळतात. बेंझिनाबरोबर स्फटिकी आणि हायड्रोक्विनोनाच्या जलीय विद्रावाबरोबर ४० वातावरण दाबाखाली तशीच अस्थिर संयुगे बनतात.

उपयोग

विजेच्या दिव्यात भरण्यासाठी व निरनिराळ्या प्रकारच्या इले्क्ट्रॉनीय उपकरणांत क्रिप्टॉन मुख्यतः वापरतात. क्रिप्टॉन आणि आर्‌गॉन यांची मिश्रणे अनुस्फुरित दिवे (फ्‍लुओरेसंट लँप) भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडतात. यांनी भरलेले दिवे आर्‌गॉनाने भरलेल्या दिव्यांच्या इतकाच प्रकाश देतात, पण जास्त टिकतात.

विद्युत् प्रज्योत-दिव्यातही (दोन कार्बन विद्युत् अग्रांमध्ये विद्युत् ज्योत निर्माण करणाऱ्या दिव्यातही) क्रिप्टॉन वापरतात. अशा तऱ्हेच्या एका नवीन दिव्याचा प्रकाश धुक्यातूनही ३०० मी. पर्यंत जाऊ शकतो. म्हणून या प्रकारचे दिवे विमानांना रात्री मार्गदर्शनासाठी उड्डाणमार्गावर वापरतात.

किरणोत्सर्गी क्रिप्टॉन (८५) उत्पन्न करण्यास तुलनेने कमी खर्च येतो; म्हणून त्याचा उपयोग पुष्कळ ठिकाणी करतात. हवाबंद पात्रांच्या गळतीच्या चाचणीसाठी, तसेच धातू व प्लॅस्टिक पत्र्यांची जाडी अखंडपणे मोजण्यासाठी क्रिप्टॉन (८५)चा उपयोग करतात. क्रिप्टॉन (८५) च्या किरणोत्सर्गाने प्रदीर्घ काळ प्रकाश देणारे दिवे बनविता येतात. हा वायू मानवी शरीरात फार काळ रहात नाही म्हणून याचा उपयोग रोग निदानात करता येतो.

लेखक : ज.वि.जमदाडे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate