অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंहस्थ कुंभमेळा अन् रोचक दंतकथा

कुंभमेळा

पृथ्वीवरचा श्रद्धेचा सगळ्यात मोठा दृश्य सोहळा म्हणजे कुंभमेळा. बारा वर्षांतून एकदाच नाशिक आणि त्र्यंबक क्षेत्री भरणारा सिंहस्थ कुंभमेळा धार्मिक सोहळा राहिलेला नाही, तर तो आंतरराष्ट्रीय इव्हेन्ट झाला आहे. मात्र, कुंभमेळ्याची संस्कृती काही निराळीच आहे. संस्कृती नेहमी इतिहासाचा समृद्ध वारसा घेऊन वाटचाल करीत असते. विचारमंथनातून ती विकसित होत जाते. या मंथनात काळाशी अनुरूप ते स्वीकारले जाते अन् नको त्याचा त्याग केला जातो. कुंभमेळा संकल्पनाही अशा विचारातून अवतरली अन् रूजली. या संस्कृतीविषयी...

आपली संस्कृती ही धर्मप्राण असल्याने समाजाच्या ऐहिक आणि पारमार्थिक कल्याणाचा विचार करीत ती पुढे जाताना दिसते. या प्रक्रियेत समाजधारणेची क्षमता देशकाळाच्या गतीनुसार क्षीण होते तेव्हा तिला पुन्हा गती देण्यासाठी प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्री धर्मकार्याचे मंथन होताना दिसते. यातून समाजधारणेचा विचार उभा करण्यासाठी माणसे एकत्र येतात तेव्हा विश्वाच्या संरचनेतही व्यक्ति‌विचारांत पोषक बदल होतात. याच काळाला 'पर्वकाळ' म्हटले जाते. पंचांगातील विशिष्ट वर्ष, महिना, दिवस आणि ग्रहस्थिती नमूद केलेली एक ओळ हेच या पर्वकाळाचे निमंत्रण असते. म्हणूनच भारतात प्रयाग, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे दर १२ वर्षांनी येणारे पर्वकाळ कुंभमेळा म्हणून परिचित आहेत. मात्र, नाशिकचा कुंभमेळा सिंह राशीत येत असल्याने त्याला सिंहस्थ म्हटले जाते. यापर्वकाळात विविध आखाडे, खालसे, संप्रदाय, व विचार प्रवाह एकत्रित येऊन विचार मंथन करतात. म्हणूनच नाशिक आणि कुंभमेळा हे समीकरण धर्म, भक्ती, श्रद्धा अन् पवित्रतेचे प्रतीक बनले आहे. कुंभमेळ्याचा इतिहास खूपच रोचक अन् दंतकथांनी भरलेला आहे.

नाशिकमध्ये भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा सर्वश्रेष्ठ आहे. कारण तो सिंह राशी येतो अन् तो `अद्या सा गौतमी-गंगा द्वितीया जान्हवी स्मृत' म्हणजे आद्या व ज्येष्ठ नदी असलेल्या गोदातीरी साजरा केला जातो. सिंहस्थात सर्व महानद्या, तीर्थे, देव, ऋषी, समुद्र गौतमीकाठी वास करतात, असे म्हटले जाते. तर कृतयुगाची दोन लक्ष वर्षे संपल्यावर सिंह राशीत गुरू ग्रह असताना गौतमी गंगा भूतलावर प्रकटल्याने या काळाला 'सिंहस्थ' पर्व म्हटले गेले. हा सिंहस्थकाल १३ महिने असतो. म्हणून नाशिकमध्ये कुंभमेळ्याला सिंहस्थ म्हटले जाते. कुंभ म्हणजे पवित्रता आणि मांगल्य यांचे प्रतीक असणारा कलश. शास्त्रानुसार कुंभाच्या मुखात भगवान श्रीविष्णू, कंठामध्ये श्री महादेव आणि तळाशी श्री ब्रह्मदेव देवतांचा वास असतो. कलशाच्या मध्यभागात सर्व देवता, सर्व समुद्र, पर्वत, पृथ्वी आणि चारही वेद यांचा वास असल्याचे मानले जाते; म्हणूनच आपल्यासाठी कुंभाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. कुंभमेळ्याचा आरंभ कधीपासून झाला, याप्रश्नाचे उत्तर कोठेही मिळत नसले तरी महाभारतात एका ठिकाणी ओझरता उल्लेख आढळतो. गंगापुत्र भीष्माचार्य पुलस्त्य ऋषींना विचारतात की, 'त्रिथा' वर (म्हणजे संगम) जाऊन आत्मिक उन्नयन साधता येते. त्यांनी याबाबत स्नाने आणि दानाची दिलेली माहिती कुंभमेळ्याशी मिळतीजुळती आहे. अनेक पौराणिक ग्रंथांत कुंभमेळ्यासंदर्भात उल्लेख आढळतात. नारदपुराणात कुंभमेळा धर्मोत्सव आणि विचारमंथनाचा काळ असल्याचे म्हटले आहे. रामानुज संप्रदायाचे प्रमुख श्री गोपाळदत्त शास्त्री यांनी लिहिलेल्या 'कुंभमाहात्म्य' या पुस्तकात कुंभमेळ्याविषयी महर्षी दुर्वासांची कथा, कद्रू-विनताची कथा व समुद्रमंथनाची कथा या तीन प्रचलित कथांचा समावेश आहे.

दुर्वासांची कथा

महर्षी दुर्वासांच्या कथेत इंद्रदेव आणि दुर्वास ऋषी यांचा प्रसंग आला आहे. दुर्वास ऋषींनी दिलेल्या दिव्य पुष्पहाराचा इंद्रदेवाकडून अपमान झाला होता. तो अपमान ऋषींना सहन झाला नव्हता. इंद्रदेवांची हत्तीवरून स्वारी निघाली असता. दुर्वास ऋषींनी त्यांना पुष्पहार देऊ केला मात्र इंद्रदेवाने तो पुष्पहार हत्तीच्या पायाने तुडविला. त्याचा दुर्वास ऋषींना खूप राग आला. त्यांनी इंद्रदेवाला शाप दिला. शापाचा परिणाम इतका झाला की, सगळीकडे हाहाकार माजला. दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली. नंतर देवांनी समुद्रमंथन केले. त्यातून लक्ष्मी प्रकटली, वृष्टी झाली. त्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला. समुद्र मंथनातून अमृतकलश बाहेर आले होते. ते राक्षसांनी पळवून नाग लोकांत लपवून ठेवले. हा अमृत कलश गरुडाने तेथून क्षीरसागरापर्यंत पोचविण्यासाठी ज्या चार ठिकाणी अमृतकुंभ ठेवला ती चार ‍स्थळ म्हणजे नाशिक, उज्जैन, प्रयाग, हरिद्वार हे होय. त्यामुळे हे चार तीर्थक्षेत्रावर कुंभमेळा भरतो, असे म्हटले जाते.

राजा कश्यप कथा

दुसरी कथा ही राजा कश्यप यांच्या दोन पत्नींसंदर्भात आहे. एकदा कश्यप राजाच्या या दोन पत्नींमध्ये सूर्याचा अश्व (घोडा) काळा आहे की पांढरा, यावरून वाद झाला. जी खोटी ठरेल ती दासी बनेल, अशी त्यांच्यात शर्यत लागली. कद्रूचा मुलगा नागराज वासू व विनताचा पुत्र गरुड होता. कद्रूने आपल्या नागवंशाकडून प्रेरणा घेऊन आपल्या काळेपणामुळे सूर्याच्या अश्वाला झाकून टाकले. त्यामुळे सूर्याचा अश्व काळा दिसत होता. विनता आपली शर्यत हरली व ती दासी झाली. नागलोकांतून अमृतकुंभ आणला तर विनता शापातून मुक्त होणार असल्याने विनताच्या पुत्र गरूडाने दायित्व यशस्वी केले. गरुड अमृतकुंभ घेऊन भूलोकमार्गे पिता कश्यप मुनी यांच्या उत्तराखंडमधील गंधमादन पर्वतावरील आश्रमाकडे निघाला. दरम्यान, इंद्रदेवाने गरुडावर चार वेळा आक्रमण केले. हे युद्ध बारा दिवस (म्हणजे बारा वर्ष) चालले. त्याच्या युध्दात ज्या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले, ती चार ठिकाणे म्हणजे कुंभमेळ्याची चार स्थळे मानली जातात.

समुद्रमंथनाची कथा

कुंभमेळ्यासंदर्भात समुद्रमंथनाच्या कथेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. समुद्रमंथनातून अमृतकलश बाहेर आला व तो राक्षसांनी पळविला होता. तेव्हा स्वत: विष्णू भगवान यांनी मोहिनीचे रूप धारण करून राक्षसाकडून परत मिळविला होता. मोहिनीच्या नाचकामात अमृतकलशातील चार थेंब भूलोकी पडले. ही चार ठिकाणे म्हणजे प्रयाग (अलाहाबाद ), हरिद्वार, नाशिक व उज्जयिनी (उज्जैन). कुंभमेळ्याबाबत उपरोल्लेखित दंतकथा सर्वतोमुखी आहेत. तथाप‌ि, पुराणात व इतर धार्मिक ग्रंथांमध्ये कुंभमेळ्यासंदर्भात आणखीही बऱ्याच दंतकथा सांगितलेल्या आहेत.

लेखक : रमेश पडवळ

इमेल : rameshpadwal@gmail.com

संपर्क : 8380098107

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate