अल्पसंख्याक समाजातील म्हणजेच मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोरास्ट्रिअन (पारशी) आणि जैन समाजातील विद्यार्थ्यांनी शाळेत जावे, त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी सहाय्य व्हावे, आपल्या पाल्याच्या शिक्षणावरील खर्च कमी होऊन या समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी मॅट्रीक पूर्व व मॅट्रीकोत्तर आणि गुणवत्ता-नि-उत्पन्न आधारित शिष्यवृत्ती योजना केंद्र शासनामार्फत राबविण्यात येते. योजनेअंतर्गत नवीन शिष्यवृत्ती आणि या आधी घेतलेल्या शिष्यवृत्तीच्या नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज शनिवार ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत करु शकतात.
मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती योजना
पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. शासनमान्य संस्था, राज्य/केंद्र शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या पहिली ते दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांनी मागील परीक्षा कमीत कमी ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नाही असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना
अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्टया मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी, उच्च शिक्षणात त्यांची संख्या वाढावी हा या योजनेचा उद्देश आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर मागील वर्षाची परीक्षा कमीत कमी ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण केली आहे किंवा समकक्ष श्रेणी प्राप्त केली असेल आणि ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा जास्त नाही अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते.
या शिष्यवृत्तीचा लाभ भारतातील शासकीय किंवा खाजगी उच्च माध्यमिक शाळा / विद्यापीठ / विश्व विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यास घेता येतो. दहावी आणि बारावी स्तरावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था/औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील तांत्रिक तथा व्यावयासायिक पाठ्यक्रम शिकणाऱ्या विद्यार्थीही या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
गुणवत्ता-नि-उत्पन्न आधारित शिष्यवृत्ती योजना
अल्पसंख्याक समुदायातील गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रम शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्यता देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
ही शिष्यवृत्ती केवळ भारतात शिक्षण घेण्यासाठी असून राज्य शासन/ केंद्र राज्य क्षेत्र/प्रशासन किंवा या उद्देशासाठी नेमण्यात आलेल्या अन्य संस्थेमार्फत प्रदान करण्यात येते. पूर्व परीक्षेच्याआधारे विद्यालयात तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दाखला प्राप्त करणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. प्रतियोगी परीक्षेविना तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रम दाखला प्राप्त करणारे विद्यार्थीही या योजनेसाठी पात्र असून त्यांनी उच्च माध्यमिक/पदवी स्तरावर किमान ५० टक्केपेक्षा गुण नसावेत. या विद्यार्थ्यांचा समावेश पूर्णत: मॅरीटवर केली जाईल. लाभार्थी/लाभार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी http://www.momascholarship.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्जदारांना शिष्यवृत्ती योजनांपैकी कोणत्याही एका योजनेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर https://scholarships.gov.in किंवा www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्ज करण्यापूर्वी अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना आणि ''फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्वेश्चन्स ''(एफ-ए-क्यूज) या वाचून घ्याव्यात.
विद्यापीठ/संस्था/महाविद्यालये/विद्यालये यांनीही जिथे अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत आहे. अशा विद्यापीठ/संस्था/महाविद्यालय/विद्यालयांनी ऑक्टोबर २०१७ पर्यंत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करुन घ्यावयाची आहे.
लेखक: विलास सागवेकर
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 7/14/2020