शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 8 वी ), कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती व संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्तीविषयक योजनांसाठी आता राज्य शासनाकडून नव्याने महाडीबीटी (MAHADBT) पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आता ऑनलाईन अर्ज भरता येणार असून त्यामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांचीही मोठी सोय होणार आहे.
हे पोर्टल दिनांक ३ ऑगस्ट २०१७ पासून सुरु करण्यात आले आहे. यामुळे आता विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना ऑनलाईन प्रक्रियेमुळे वेळेची बचत होणार असून पारदर्शकता वाढणार आहे. या योजनेसंदर्भातील माहिती शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत आणि पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ 5वी) व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ 8 वी)
राज्यात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येत असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांच्या निकालावर प्रामुख्याने गुणवत्तेनुसार उच्च प्राथमिक (इ. 5 वी ) व माध्यमिक (इ. 8 वी ) शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या दिल्या जातात. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची समाधानकारक प्रगती व चांगल्या वर्तणुकीच्या आधारे पुढे चालू राहते. उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचा (इ. 5 वी ) कालावधी 3 वर्षे व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. 8 वी) कालावधी 2 वर्षे आहे. ही शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षातील 10 महिन्यांसाठी दिली जाते. शैक्षणिक वर्षे 2017 मधील माहे फेब्रुवारी 2017 च्या परीक्षेमधील अर्हताधारक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
माध्यमिक शालांत परीक्षेत कमीत कमी 60 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गणुवत्तेनुसार ही शिष्यवृत्ती देण्यात येते. समाधानकारक प्रगती आणि कनिष्ठ महाविद्यालय पहिल्या वर्षाच्या ( इ. 11 वी ) अखेरीस घेण्यात येणाऱ्या परीक्षेत किमान 45 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्या इ. 12 वीमध्ये पुढे चालू राहतात. ही योजना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
आथिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील हुशार मुले- मुली जे माध्यमिक शालांत परीक्षेत पहिल्या वेळी 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. अशांना पुढील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. इ. 11 वी मध्ये 50 टक्के गुण मिळवून पहिल्याच वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती 12 वीपर्यंत चालू राहते. या शिष्यवृत्तीसाठी पालकांचे उत्पन्न रुपये 30 हजारापेक्षा जास्त नसावे.ही योजना अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्ती
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेच्या अभ्यासाकडे आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेच्या गुणवत्ता शिष्यवृत्या दिल्या जातात. इयत्ता 8 वीमधील वार्षिक परीक्षामध्ये संस्कृत या विषयात प्राप्त केलेल्या गुणवत्तेवर इ. 9 वी व 10 वी आणि 10 वीच्या गुणवत्तेवर इ. 11 व 12 मध्ये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. ही योजना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
योजनांची मंजूर रक्कम विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्याकरिता विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड क्रमांक बॅंक खात्याशी संलग्नित करुन घेण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत
सन 2017-18 पासून विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र शासनाकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय डीबीटी पोर्टल (Mahadbt Portal (www.mahadbt.gov.in ) वर आलेल्या युजर मॅन्यूअल एफएक्यूचा वापर करुन ऑनलाईन पद्धतीने व पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे पालन करुन अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्नित नाहीत, त्यांनी जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्न करुन घ्यावे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचनाही शिक्षण संचालनालयाने जारी केल्या असून योजनांच्या पात्रतेचे निकष व संबंधित शासन निर्णय www.mahadbt.gov.in वर ज्ञान बँक ( Knowledge Bank ) याठिकाणी उपलब्ध आहेत. या योजनांची मंजूर रक्कम विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. पात्र प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतंत्र युजर आयडी तयार करुन ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती या पोर्टलवर देण्यात आली आहे.
संकलन-जिल्हा माहिती कार्यालय, अहमदनगर.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 7/21/2020