অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह; शिक्षण घेणं झालं सोईचं !

अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह; शिक्षण घेणं झालं सोईचं !

‘शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. ते प्राशन केलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल होण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे. शिक्षणाने माणसाच्या आयुष्यात अनेक बदल होतात. फक्त नोकरी मिळवण्यासाठीच शिक्षण असते असे नाही तर व्यक्तीच्या एकूणच व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी, जगण्याला आत्मविश्वास देण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. अल्पसंख्याक समाज तसा शिक्षणापासून दूरच होता. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावेत म्हणून महाराष्ट्र शासन विशेष प्रयत्नशील आहे. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेली वसतीगृहांची सोय त्याबाबत….

औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आणि तेथून जवळच असणाऱ्या शासकीय विज्ञान संस्थेत महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थीनींसाठी तीन मजली दोन वसतीगृह उभारले आहेत. त्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा खर्च केला आहे. अल्पसंख्याक समाजातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण तसे कमीच! ते वाढीस लावण्यासाठी राहण्याची सोय चांगल्याप्रकारे व्हावी म्हणून वसतीगृहांची उपलब्धता करुन दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या या वसतीगृहाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. प्रत्येकी शंभर मुलींसाठी सुसज्ज असे दोन वसतीगृह बांधले आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आर्थिकदृष्ट्या मागास मुलींसाठी दोनशे मुली राहू शकतील एवढ्या क्षमतेचे वसतीगृह विद्यापीठात महाराष्ट्र शासनाने उभारले आहे.

अल्पसंख्याक मुलींच्या या वसतीगृहांमध्ये एकाच छताखाली जेवण, राहणे, अभ्यासिका, वायफाय आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. शिवाय अत्याधुनिक प्रकारचे पंखे, टेबल-खुर्च्या, कपाट, पिण्यासाठी शुद्धीकरण केलेले पाणी, आंघोळीसाठी सोलरचे गरम पाणी, अल्प दरात सॅनिटरी नॅपकीन्सची मशीनव्दारे सोय या गोष्टींनी ही वसतीगृहे परिपूर्ण आहेत. वसतीगृहामध्ये सुरक्षा रक्षक, वॉर्डन, सफाई कर्मचारी यांच्या नेमणुका केलेल्या आहेत. वास्तव्यास असणाऱ्या मुलींच्या अडचणी तत्काळ दूर केल्या जातात.

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींसाठी वसतीगृह उभारण्यामागे या मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास अडचण येऊ नये, हा उद्देश शासनाचा होता. एरव्ही महानगरात भाड्याने घर करुन राहायचे असेल तर भरपूर भाडे द्यावे लागते. सुरक्षेचा मोठा प्रश्न असतो. शिकत असलेल्या संस्थेजवळच भाड्याने घर उपलब्ध होईल याची शाश्वती नसते. दूर अंतरावर मिळाले तर येण्याजाण्यासाठी वेगळा खर्च येतो. शिवाय जेवणाचा खर्च वेगळाच!! या अडचणी दूर व्हाव्यात यासाठीच या वसतीगृहांची सोय केली आहे.

वसतीगृहात राहणाऱ्या मुलींच्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत. विद्यापीठात एम. ए. मराठी प्रथम वर्षात शिकणारी रोशनी टाकणखार म्हणते, ‘ मी बीड जिल्ह्यातील माजलगावची राहणारी.. पहिल्यांदाच शिक्षणासाठी घराबाहेर पडले. मी अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहात राहते. येथे व्हीआयपी सुविधा मिळतात असं म्हटलं तर वावगं ठरु नये. माझा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे होतो.’ उस्मानाबादची सादिया पठाण म्हणते, ‘या वसतीगृहामुळे माझ्या पालकांनी निर्धास्तपणे मला दूरवर शिकायला पाठवले. माझी बाहेर खोली करुन राहण्याएवढी आर्थिक परिस्थिती नाही. पण वसतीगृहामुळे मला कोणतीही अडचण जाणवत नाही. केवळ दोन हजार रुपयात माझी वर्षभराची राहण्याची सोय झाली आहे. त्यामुळे मी राज्य शासनाची आभारी आहे.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. सुहास मोराळे वसतीगृहाविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींसाठी उभारलेल्या वसतीगृहाचा मुलींना उत्तम लाभ होत आहे. वसतीगृहातील सर्व साहित्य चांगल्या दर्जाचे आहे. मुलींना कोणतीही अडचण भासू नये यावर आमचा कटाक्ष असतो. अशाच प्रकारचे वसतीगृह मुलांसाठी उभारावे यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.’

या वसतीगृहात प्रवेश मिळविण्यासाठी जूनमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर फॉर्म भरावा लागतो. गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यावर विद्यार्थीनींना प्रवेश दिला जातो. या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ करुन घ्यावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

लेखन- क्षितीजा हनुमंत भूमकर,

विभागीय माहिती कार्यालय, औरंगाबाद.

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/25/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate