किल्लारीच्या भूकंपाने घडवला चित्रकार... चित्रकार नितीन मरडेचा कलासंघर्ष जहांगीरमध्ये कॅनव्हासवर.
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १९९३ मध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने हजारो कुटुंब उध्वस्त झाली. आज तेवीस वर्षानंतरही या भूकंपानंतरच्या वेदना अजुनही तितक्याच वेदनादायी आहेतच पण आप्तजनांच्या मृत्यूच्या वेदना चीरकाल टिकणाऱ्या असल्या तरी नव्या पिढीने दु:ख बाजूला सारून जगण्याच्या लढाईला नव्याने सुरुवात केली आहे.
किल्लारीच्या भूकंपात ज्या नितीन मरडेने कुटूंब गमावलं तो नितीन मरडे पुन्हा जिद्दाने परिस्थितीशी लढायला समर्थ झाला आहे. या भुकंपात आणि पुर्ण या 23 वर्षाच्या प्रवासात सुदैवाने या भुकंपाच्या वेळी पाळण्यात असलेला भाऊ सोबतीला होता. देऊळ, संस्था आणि वाट्टेल तिथे आश्रय घेऊन भावाला जमेल तसं सांभाळत त्याने जगण्यासाठी संघर्ष केला. मन व्यक्त करण्यासाठी शब्द होते पण आपलं असं कोणी नव्हतं, तेव्हा त्याने रेषांचा आधार घेतला. त्या रेषांच्या सहाय्याने त्याने आयुष्यातील संघर्षाच्या भूकंपावर मात केली. नितीन मर्डे याने त्याच्या आयुष्यातील एक स्वप्न पूर्ण करत नुकतेच जे.जे कलादालनात त्याच्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं, आणि या प्रदर्शनाला चांगला प्रतिसादही मिळाला...
कोणत्याही कलेचं क्षेत्र हे अत्यंत बेभरवशाचं क्षेत्र. त्यात यश मिळविण्यासाठी अपरंपार कष्ट उपसावे लागतात, परंतु ते मिळण्याची शाश्वती नसते. म्हणून अलीकडे स्टंटगिरी करुन लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधणारे अनेक कलाकार आपण रोज पाहतो.. काही कलावंत या प्रसिद्धीपासून दूर राहूनही कलेच्या क्षेत्रात काही करण्याची जिद्द बाळगतात..
मी सांगणार आहे आई वडीलाची सावली बालपणी हरवलेल्या, अनाथ आश्रमात वाढून चित्रकार होण्याचं स्वप्न पाहिलेल्या नितीन मरडे या कलाकाराचा औराद शहाजानी ते मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीपर्यंतचा चित्रप्रवास.
नितीन मरडे आणि त्याच्या भावाला आईवडील देवाघरी गेल्यावर म्हाताऱ्या आजोबांनी अनाथ आश्रमात सोडलं. वडील भूकंपग्रस्त भागातले होते एवढंच नितीनला माहीत होतं. वडील गेले तेव्हा तो तीन वर्षाचा होता. काही महिन्यांनी आजोबाही वारले.. नितीनचे नात्याचे पाश तुटले. लातुरच्या यशवंत हायस्कूलमधे दहावीपर्यंत शिकला. आजाराने दोनवेळा शिक्षणात व्यत्यय आला. कलाशिक्षक शिवाजी हांडे यांनी त्याची चित्रकलेची आवड पाहून प्रोत्साहन दिलं आणि तो चित्रात रमायला लागला. तो चित्रकलेत बारावी करण्यासाठी औराद शहाजनीच्या मंगेशकर महाविद्यालयात आला. तिथंच चित्रकला विभागाशी त्याचा संबंध आला.. कामातील प्रावीण्य पाहून कलाशिक्षकांनी प्रोत्साहन दिले. प्रचंड कामे तो करायचा, त्यामुळे तो चित्रकला विभागाचं आकर्षण बनला. लँडस्केप, स्केचिंग पाहून त्याचे शिक्षक अवाक व्हायचे. तो पेपर एवढे वापरतो का, यासंबंधी आश्रमातून चौकशीचे फोन यायचे.. तो चित्रकार बनण्याचं स्वप्न पाहू लागला..
बारावी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर नितीनने नागपूरच्या कला महाविद्यालयात बी एफ ए पेंटिंगचे कलाशिक्षण पूर्ण केले. वर्गातील कामे करुन वेगळी कामे केल्याने पेपर रंग आधीच संपायचे. आश्रमात त्याचा हिशोब द्यावा लागायचा. एखाद्या सुट्टीला तो मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत जायचा. तिथे चित्रकार कसे चित्रप्रदर्शन करतात ते पाहायचा. लातुरचे चित्रकार प्रा.सुरेन्द्र जगताप यांची मुंबईत त्याने भेट घेतली. मुंबईत नेहरु सेंटरला ग्रुप शो मधे तो सहभागी झाला. चित्राला फ्रेम नव्हती म्हणून त्याने चित्रातच फ्रेमचा आभास केला.. लातूर फेस्टिवलमधेही त्याने अनेकाबरोबर चित्र लावून लक्ष वेधून घेतले.
नागपूरला प्रा.संजय जठार, प्रा.विरेंद्र चोपडे यांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्याची दोन चित्रे मुंबई आर्ट सोसायटीला लागली. कामाला ऊर्जा मिळाली. पण वर्गातील चित्रकामात मन रमत नव्हतं. तो नेटवर चित्रकाराची कामे पाहायचा.. डेमो पाहायचा. चित्रकारांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून संवाद साधायचा. आपण काहीतरी वेगळं नवीन केलं पाहिजे, याची धडपड करायचा. पेपर खराब व्हायचे. काही मित्र थट्टा उडवायचे. वर्गात अपमानीतही व्हावं लागायचं. या काळात कोलकत्याचे गोपाल चौधरी या विख्यात चित्रकाराशी तो फेसबुकच्या माध्यमातून जोडला गेला. त्यांनी नितीनची चित्रे पाहून त्याला प्रेरणा दिली.. सूचनाही केल्या. चित्राचे मुंबईला प्रदर्शन कर, असा मायेचा सल्ला दिला. मग तो कागदावर स्वत:ला शोधत राहिला. बीएफए पेंटिंग ची डिग्री घेऊन तो बाहेर पडला. नेटवर पाश्च्यात्य देशातील काही चित्रकाराशी त्याचा संवाद होत गेला.
नितीनला पुढे एमएफए करायचं होतं. पण आश्रमात २५ वर्षानंतर खर्च मंजूर नव्हता. त्यांनी तुझा खर्च तू पाहा, किंवा नोकरी कर. अशी सूचना केली. आश्रमातल्या काही व्यक्तीच्या प्रयत्नाने शाळेत मानधनावर नोकरी तर मिळाली. पण काम करुनही शाळा पगाराचं नाव निघेना. या वाईट अनुभवानं त्यानं नोकरी आणि लातूर सोडले..
तो नागपुरला गेला, मिळेल ते काम करु लागला. बागेत बसून पेंटिंग करणे, लोकांची रेखाटने करणं, ते लोकांना विकणे, चित्राची कामे घेणे असा त्याचा दिवस चालू झाला. त्यातून रुमचे भाडे, चित्राचा खर्च भागवणं, पेंटिंग करणं चालू झालं. चित्रप्रदर्शनासाठी जहांगीरला त्यानं फॉर्मही भरला होताच.. कामाचे पैसे अनेकजण बुडवित. उशीरा देत.. जगणं अवघड झालं होतं. आश्रमाची आर्थिक मदत बंद पडल्यानं जगण्याचा हा नवा संघर्षच चालू झाला.
एका व्यक्तीच्या मदतीने तो एका कामासाठी हैदराबादला रामोजी फिल्मसिटीमधे गेला. सेट बनवण्यासाठी कारागीर म्हणून रोजंदारीचे काम होते. रोजचे ७०० रु.मिळतील असं सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात पैसे कमीच मिळायचे. चित्राचं काम म्हणून त्यानं काम स्वीकारलं होतं पण प्रत्यक्षात मोठमोठे जाड थर्माकोल कटिंग करायचं किचकट काम करायचं होतं. कटिंग करुन मूर्ती बनवायच्या होत्या. हात कापायचे. १२ तास काम करताना एकदा व्याकूळ होऊन पडला.. हा त्याचा वाईट काळच होता. 'सर, मला मरावे वाटते' असा फोन त्याने त्याच्या चित्रकलेच्या शिक्षकांना केला.. त्यांनी त्याला समजावले. मग चित्रकार कसा बनणार, असं विचारल्यावर तो हसला.. पुढे आर्ट डायरेक्टरला त्याचं काम आवडल्यानं तो त्याचं कौतुक करु लागला. त्याची चित्रेही डायरेक्टरला आवडली. मात्र सोबतचे मित्र चिडले. त्याला स्वतंत्र काम देतो म्हणून आर्ट डायरेक्टरने सांगितल्यावर मित्रांनी कहरच केला. त्याला मारझोड इतकी केली की दवाखान्यामधे अॅडमीड व्हावं लागलं.. मग कामातून मिळालेले सात हजार रुपये घेऊन तो नागपूरला परतला.
एमएफए ला प्रवेश घेण्यापुरते पैसे जमा केले होते. प्रवेश तर मिळाला. पण पैशाच्या अडचणी, कॉलेज रोज करणं शक्य नसायचं.. कामं मिळवायची, पेंटिंग करत राहायच्या. मुंबईत गॅलरीत जावून चित्रप्रदर्शनासाठी अर्जही केला होता. आपलं कधी प्रदर्शन लागणार याचा कीडा डोक्यात वळवळायचा.. कॉलेजातलं अॅकॅडमीक शिक्षण रुक्ष वाटायचं.
जहांगीर आर्ट गॅलरीचा एके दिवशी खरेच निरोप आला. त्याला चित्रप्रदर्शनासाठी २०१६ सप्टेंबरमधे गॅलरी मिळाली होती. त्याला या बातमीने प्रचंड आनंद झाला. त्याच्या डोळ्यात पाणीच आले... पण गॅलरीचे भाडे भरायचे कसे, हा प्रश्न मोठा होता. पेंटिंग कॅनव्हास, कलर, कॅटलॉग, स्ट्रेचर यासाठी रक्कम लागणार होती. त्याची झोप उडाली. आश्रमाच्या लोकांनी प्रयत्न केला पण मदत मिळेना. प्रायोजक मिळेनात.
एके दिवशी तो औराद शहाजानीला आला. त्याची धडपड त्याच्या शिक्षकांनी ऐकली. कारण नागपुरचे प्रा.संजय जठार या शिक्षकांचे मित्र होते. त्याच्याकडून नितीनचा संघर्ष या सरांना नेहमी कळत होता.. पैसे भरायला वेळ कमी होता. रक्कम मोठी होती. मग शाळेच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल गोविंदराव सूर्यवंशीच्या माध्यमातून औरंगाबादचे रवी मसालेचे उद्योजक फुलचंद जैन यांच्याशी संपर्क केला. ते मंगेशकर महाविद्यालयाचे विद्यार्थी. त्यांनी त्याला औरंगाबादला बोलावून घेतले. त्याची चित्रे पाहून धीर दिला. आर्थिक मदतही केली.. चित्रे बनविण्यासाठी राहायची व्यवस्था केली.. वाईट काळात देवासारखं पाठीमागे राहिलेल्या या माणसाने नितीनचा मार्ग सुकर केला..
पुढच्या काही काळात औरंगाबादच्या रामा इंटरनॅशनलमधे नितीनचे चित्रप्रदर्शन करुन त्याला लोकांसमोर आणले. त्या प्रदर्शनातली नितीनची चित्रे खूपच प्रभावी होती ! औरंगाबादकरांनी चांगली दाद दिली.. औरंगाबादमध्ये दिवस रात्र एक करुन त्याने कॅनव्हास रंगविली.. तो कधी म्हणायचा, 'सर, चित्र मला बोलल्यासारखे वाटतात!' व्हाटस् अॅपवर चित्राचे फोटो पाठवायचा. त्याचे शाळेतले शिक्षक, चित्रकार गोपाल चौधरी त्याच्या चित्रातील बदलाचे साक्षीदार होते.. त्याचे चित्रविषय रंगसंगती- मांडणीतील बदल खूपच आश्वासक होते. तो फोनवर तासनतास चित्राबद्दलच बोलायचा. जणू चित्रात तो एकरुप झाला होता.. ग्रंथपाल गोविंद सूर्यवंशी, प्रा.अशोक नारनवरे, प्रा.शंकर कल्याणे या शिक्षकांनीही नितीनला वेळोवेळी मदत केली. फुलचंद जैन यांना तो आपला आदर्श मानतो आणि औरादच्या शिक्षकाना तो आपले कुटुंब मानतो..
अखेर जहांगीर आर्ट गॅलरीत नितीनच्या ‘भाव- लावण्य योजनम्’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले.. 6 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या या प्रदर्शनाचे प्रसिद्ध चित्रकार संतोष शहा यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. जहांगीर गॅलरीच्या मेनन मॅडम, सुरेन्द्र जगताप शुभेच्छा द्यायला उपस्थित होते. औराद शहाजनीचे अनेक शिक्षक होते. फुलचंद जैन यांचा परिवार झटत होता.. या प्रदर्शनात नितीनची वास्तववादी शैलीची भावस्पर्शी चित्रे होती. भारतीय स्त्रीची विविध रुपे सुंदर रंगसंगतीत त्याने रंगवली होती. महत्वाचे म्हणजे भूक, गरीबीवरही सुंदर चित्रे आणि अध्यात्म या विषयालाही त्याने स्पर्श केला होता..
प्रदर्शनाला एमएफ हुसेन यांच्या मुलीने भेट देऊन चित्रही खरेदी केले आहे. डाबर या जिल्हाधिकाऱ्यांनी उद्घाटनापूर्वीच चित्र घेऊन नितीनला सुखद धक्का दिला.. मा.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीनेही चित्रप्रदर्शन पाहून आनंद व्यक्त केला.. दिल्लीचे चित्रकार विजेंद्र शर्मा, चित्रकार शशीकांत धोतरे या मान्यवर चित्रकारांनी प्रदर्शनाला भेट दिली. रसिकाची गर्दी नितीनला प्रतिसाद देत होती, ह्याच प्रतिसादाच्या बळावर नितीन जानेवारीत पुन्हा मुंबईत आपला कलाविष्कार सादर करणार आहे.....
लेखक - नेहा पुरव
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 2/21/2020
उतामारो, कितागावा विषयी
अकबराच्या दरबारी असलेला सुलेखनकार व चित्रकार. मूळच...
एल ग्रेको श्रेष्ठ स्पॅनिश चित्रकार.
विख्यात आधुनिक भारतीय चित्रकार.