অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुस्ती

कुस्ती

  1. पूर्वेतिहास
  2. उद्देश
  3. विविध पद्धती
    1. हनुमंती कुस्ती
    2. भीमसेनी कुस्ती
    3. जांबुवती कुस्ती
    4. जरासंधी कुस्ती
  4. भारताबाहेरील जगातील काही प्रमुख कुस्तीप्रकार
    1. ग्रीको-रोमन पद्धती
    2. फ्री-स्टाईल पद्धती
    3. कंबरलंड व वेस्टमूरलंड पद्धती
    4. कॉर्नवॉल व डेव्हन पद्धती
    5. आयरिश व स्कॉटिश पद्धती
    6. जुजुत्सू अथवा जुडो पद्धती
  5. काही दुय्यम कुस्तीप्रकार
  6. हौशी व धंदेवाईक कुस्तीगीर
  7. कुस्तीची साधने, पोशाख व आखाडा
  8. कुस्तीचे नियम
  9. कुस्तीचे डावपेच
  10. प्रसिद्ध भारतीय कुस्तीगीर
  11. भारताची ऑलिंपिक क्रीडासामन्यांतील कामगिरी
  12. कुस्तीला चालना देणारे उपक्रम
  13. खेळाची शान वाढविणाऱ्‍या कुस्तीगिरास भारत सरकारतर्फे पुरस्कारही देण्यात येतो.

कुस्ती हा मराठी शब्द ‘कुश्ती’ या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मल्लयुद्ध, अंगयुद्ध किंवा बाहुयुद्ध असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुद्ध खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत, त्याला कुश्ती हे नाव होते. त्यांना धरून जे द्वंद्व खेळले जाई, त्यास कुस्ती हे नाव प्राप्त झाले. फार्सी भाषेत कुश्त म्हणजे ठार मारणे किंवा कत्तल करणे. लक्षणेने प्रतिस्पर्ध्यावर शक्तीने वा युक्तीने मात करून त्याला नामोहरम करणे, हा कुस्ती या शब्दाचा अर्थ आहे. कुस्ती प्रधान हेतू तोच असतो.

आदिमानवापासून आत्मसंरक्षणासाठी मानव ज्या लढाया व चढाया करीत आला, त्यांतूनच कुस्तीच्या द्वंद्वाचा उगम झाला. छोटे प्राणी मोठ्या प्राण्यांवर युक्तीने कशी मात करतात व स्वतःचा बचाव करू शकतात हे पाहून, मानवाने मल्लविद्येची उपासना व जोपासना सुरू केली. पुढे मानवामानवांमधील द्वंद्वात स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मल्लविद्या उपयुक्त ठरली. कालांतराने या प्राथमिक द्वंद्वास जागतिक स्वरूप प्राप्त झाले व त्याचे स्वतंत्र असे शास्त्र बनत गेले. देशोदेशी त्यामध्ये विविधता निर्माण झाली असली, तरी त्यातील मूलभूत तत्त्वे कायमच आहेत.

पूर्वेतिहास

कुस्तीची वा मल्लयुद्धाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भारतात वैदिक वाङ्‌मयात, तसेच रामायण, महाभारत  आदी ग्रंथांत मल्लविद्येचा उल्लेख अनेक प्रसंगी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किष्किंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुद्ध होऊन सुग्रीवाने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनानुसार कृष्ण, बलराम व भीम हे मल्लविद्येत प्रवीण होते, हे त्यांनी केलेल्या मल्लयुद्धांतील पराक्रमावरून दिसून येते. कृष्णाने मुष्टिक व चाणूर ह्या कंसाच्या दरबारातील महामल्लांना मल्लयुद्धात मारून शेवटी कंसालाही मारले. पांडव अज्ञातवासात असताना भीमाने जीमूत नावाच्या मल्लाला मल्लयुद्धात ठार केले आणि पुढे कीचकाला व जरासंधालाही ठार मारले.

इ. स. पू. ३००० वर्षे ईजिप्त देशातील नाईल नदीजवळ बेनीहसन येथील मशिदीच्या व दर्ग्याच्या भिंतींवर केलेल्या कोरीव कामात कुस्त्यांतील डावपेचांचे शेकडो देखावे पहावयास मिळतात. प्राचीन ग्रीक वाङ्‌मयातही मल्लयुद्धाचा उल्लेख आढळतो. होमरच्या इलिअड  या सुप्रसिद्ध महाकाव्यात अ‍ॅजेक्स व ओडिसियस यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीचा उल्लेख आहे. ग्रीक संस्कृतीत सुरू झालेल्या ऑलिंपिक क्रीडासामन्यांत मल्लयुद्धाचा समावेश केलेला होता. पायथॅगोरस या सुप्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्त्याचा शिष्य मिलो याने मल्लयुद्धात महापराक्रम केला होता. ऑलिंपिक सामन्यांत त्याने सलग सहा वेळा कुस्तीत अजिंक्यपद मिळविले होते. ग्रीक लोकांनी कुस्तीची कला बरीच प्रगत केली होती. त्यांच्या पँक्रॅशियन या कुस्तीपद्धतीत प्रतिस्पर्ध्यास ठोसे मारून, फेकून, जायबंदी करून शरण यावयास लावीत. हा प्रकार ऑलिंपिक सामन्यात रूढ होता. पुढे त्यात बदल होत जाऊन साधी निरुपद्रवी चितपटीची कुस्ती आली.

पौर्वात्य देशांतील मंगोलिया, चीन, जपान या राष्ट्रांतही कुस्तीचा इ. स. पूर्वकालीन उल्लेख आढळतो. या देशांच्या धार्मिक उत्सवांमध्ये मल्लयुद्धाचा प्रामुख्याने अंतर्भाव केलेला होता. त्या काळी कुस्तीगिरांना वजनाचे बंधन नसे. त्यामुळे सामान्यतः ३०० पौंडांवरील (१३५ किग्रॅ.) वजनाचे अगडबंब मल्ल असत व त्यांचा युक्तीपेक्षा शक्तिसामर्थ्यावरच विशेष भर असे, जपानमधील इ. स. पू. २३ मध्ये विजयी झालेल्या साकुने या मल्लास मल्लविद्येचा देव मानतात. इसवी सनाच्या आठव्या शतकात शोनू या बादशहाने कापणीच्या हंगामात कुस्त्यांचा हंगाम ठेवण्याची प्रथा पाडली व त्यावेळेपासून कुस्ती हा खेळ लोकप्रिय होत गेला. त्याच्या नावावरून पुढे सुमो नावाची कुस्तीपद्धत सुरू झाली. जपानमधील सुमो पद्धतीची कुस्ती खेळणारे कुस्तीगीरसुद्धा आपल्या वजनावर व शक्तीवरच विशेष भर देत असत.

मध्ययुगीन इंग्‍लंडमध्ये सॅक्सन व केल्टिक लोकांनी मल्लयुद्धाला विशेष चालना देऊन ती लोकप्रिय केली. त्या काळातील मल्लविद्येला राजाश्रय होता. आठवा हेन्‍री हा स्वतः सामर्थ्यवान कुस्तीगीर होता, असे म्हणतात. त्यानंतरच्या काळात इंग्‍लंडमधील निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या मल्लयुद्धाच्या पद्धती रूढ होत गेल्या व त्यांना त्यांच्या प्रांतीय वैशिष्ट्यांमुळे वेगवेगळी नावे प्राप्त झाली. आधुनिक ऑलिंपिक क्रीडासामन्यांत ग्रीको-रोमन व फ्री-स्टाइल अशा दोन कुस्तीपद्धतींचा समावेश केलेला आहे. भारतात रामायण व महाभारत काळानंतरही बुद्धीप्रमाणे बलोपासना व मल्लयुद्ध यांच्या शिक्षणावर भर दिला जात असे. मध्ययुगीन काळात अनेक राज्ये होती व राजांच्या आश्रयास अनेक कुस्तीगीर व मल्ल असत. जत्रा व उत्सव या प्रसंगी त्यांच्या प्रेक्षणीय कुस्त्या गावोगाव होत.

मोगल बादशहांच्या काळात कुस्तीला राजाश्रय मिळत असे. हिंदू राजे, सरदार तसेच मुस्लिम नबाब आपल्या पदरी नामांकित मल्ल बाळगत. विजयानगरचा सुप्रसिद्ध हिंदू राजा कृष्णदेवराय याच्या दरबारात  दररोज मल्लांच्या कुस्त्या होत असत, असा उल्लेख एका पोर्तुगीज वकिलाच्या लेखनात आढळतो. महाराष्ट्रात शिवकाळात व त्यानंतर पेशवाईत नामांकित कुस्तीगिरांना राजाश्रय होता. स्वतः थोरले बाजीराव व सदाशिवरावभाऊ मल्लविद्येचे उत्तम जाणकार होते. दुसऱ्‍‌या बाजीरावाच्या पदरी बाळंभटदादा देवधर नावाचे तरुण कुस्तीगीर आणि मल्लखांबपटू होते. त्यांनी निजामाच्या दरबारातून आव्हान स्वीकारून   त्यांना पराभूत केले. त्यांनीच मल्लखांब हा कुस्तीच्या अभ्यासास कसा पोषक आहे, हे सप्रमाण पटविले. त्यावेळेपासून मल्लविद्येच्या तयारीसाठी मल्लखांबाचा खास उपयोग होऊ लागला व जोडीदाराशिवाय कुस्तीतील पकडा, डंक्या, चाय, मुरडी यांची सरावाने तयारी करता येते, असे दिसून आले.

उद्देश

मल्लयुद्धाचा मुख्य उद्देश प्रतिस्पर्ध्यास नामोहरम करणे हा आहे. त्यासाठी शरीरास योग्य त्या व्यायामाने बलवान करून त्या बलाचा युक्तीने उपयोग करावा लागतो. मल्लयुद्धासाठी पूर्वतयारी म्हणून विविध प्रकारच्या व्यायामसाधनांचा वापर करून शरीर सुद्दढ, काटक व बलवान करून आत्मविश्वास वाढविणे जरूर आहे. बलसंवर्धनासाठी व्यायाम, युक्ताहार, ब्रह्मचर्य, सदाचार यांचे पालन करावे लागते.

विविध पद्धती

मल्लयुद्धाची वाढ व तिचा जागतिक प्रसार गेल्या दीड-दोन शतकांत फार झपाट्याने होऊन ते एक स्वतंत्र शास्त्रच बनत चालले आहे. मल्लविद्येच्या विविध पद्धती अनेक राष्ट्रांत प्रचलित असल्या, तरी त्यांतील मूलभूत तत्त्वे सामान्यतः एकसारखीच आहेत. अर्वाचीन काळात  प्राचीन ऑलिंपिक क्रीडासामन्यांचे पुनरुज्जीवन झाल्यामुळे व त्यातही मल्लयुद्धाला विशेष प्राधान्य दिले गेल्यामुळे मल्लविद्येला जागतिक मान्यता मिळाली. आपापल्या राष्ट्रांतील नामांकित मल्ल म्हणवून घेण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय आखाड्यात उतरून आंतरराष्ट्रीय मल्ल किंबहुना जगज्जेता मल्ल होण्याची ईर्षा निर्माण होऊ लागली. विविध देशांत कुस्त्यांच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. भारतीय कुस्त्यांचे चार प्रमुख प्रकार पडतात, ते असे

हनुमंती कुस्ती

बुद्धीच्या जोरावर प्रतिपक्षावर मात करण्याचे डावपेच असलेला प्रकार. पौराणिक कल्पनेनुसार या कुस्तीच्या प्रकाराचा कर्ता रामायणकाळातील वायुपुत्र हनुमान असून त्याने बुद्धीच्या जोरावर शक्तीवर मात करता येईल असे डावपेच निर्माण केले आहेत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तत्त्व या प्रकारच्या कुस्तीत प्रामुख्याने आढळते. त्यामुळे प्रतिस्पर्धी शरीराने व बलाने मोठा असला, तरी त्यावर मात करता येते. यावरून या कुस्तीप्रकारास हनुमंती कुस्ती हे नाव पडले.

भीमसेनी कुस्ती

शरीरसामर्थ्यावर प्रतिस्पर्ध्याला चीत करण्याचे डावपेच असलेला प्रकार. या प्रकारच्या कुस्तीत केवळ शरीरबलावरच आधारित असे अनेक डावपेच आहेत. महाभारतात पांडवांपैकी भीम हा मल्लविद्येत प्रवीण होता, तसाच तो अत्यंत बलवानही होता. त्याने आपल्या प्रचंड सामर्थ्यावर जीमूत, कीचक, बकासुर, जरासंध यांचा निःपात केला होता. यावरून या कुस्तीप्रकारास भीमसेनी कुस्ती हे नाव पडले.

जांबुवती कुस्ती

विविध डावपेचांनी प्रतिस्पर्ध्याला बांधून शरण यावयास लावणारा प्रकार. यात प्रतिस्पर्ध्याला चीत न करता विविध डावपेचांनी त्याचे हातपाय बांधून त्याला ताब्यात घेऊन शरणागती पतकरावयास लावणे, या गोष्टीवर प्रामुख्याने भर दिला जातो. याच एका दृष्टिकोनातून यातील डाव, पेच व पकडा बसविलेल्या आहेत.

जरासंधी कुस्ती

प्रतिस्पर्ध्याचा संपूर्ण निःपात करण्याचे डावपेच असलेला प्रकार. महाभारतात भीम व जरासंध यांच्या मल्लयुद्धाचे वर्णन आहे. भीमाला जरासंधावर बराच वेळ मात करता येईना;  तेव्हा श्रीकृष्णाने भीमाला एक गवताची काडी चिरून तिचे दोन भाग उलटसुलट टाकून सूचना केली व त्या सूचनेचा अवलंब केल्यामुळे भीमाने जरासंधाला दोन्ही पाय ताणून चिरून ठार केले. तेव्हा या प्रकारच्या कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला जायबंदी करण्याच्या किंवा जीव घेण्याच्या दृष्टीने डावपेच बसविलेले आहेत. प्रतिस्पर्ध्याला कोणत्याही प्रकाराने कायमचा नेस्तनाबूद करण्याच्या प्रमुख तत्त्वावर हे डावपेच आधारित आहेत.

वरील चार प्रकारांतील शरीरास इजा होणाऱ्‍या डावपेचांस कालांतराने मनाई होत गेली आणि कुस्तीला खेळाचे स्वरूप आले. अलीकडे भारतात हनुमंती, भीमसेनी, जांबुवती या प्रकारांतील निरुपद्रवी डावपेचांचे मिश्रण असलेला कुस्तीप्रकार प्रचारात आहे.

भारताबाहेरील जगातील काही प्रमुख कुस्तीप्रकार

यांत प्रामुख्याने पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रचलित असलेले कुस्त्यांचे प्रकार मोडतात. त्याचप्रमाणे जपानमधील जुजुत्सू कुस्तीचा प्रकार भारताबाहेरील एक महत्त्वाचा म्हणून यात अंतर्भूत केला आहे. पाश्चिमात्य कुस्तीप्रकारांत मुख्यतः पुढील कुस्त्यांच्या पद्धती लोकप्रिय आहेत

ग्रीको-रोमन पद्धती

:ही पद्धती मूलतः ग्रीक व रोमन कालापासून चालत आलेली आहे; परंतु यूरोपातील इंग्‍लंड, फ्रान्स या देशांतील पद्धतींचा प्रभाव तिच्यावर पडून तीत बराच बदल झालेला आढळतो. या पद्धतीत कमरेखाली पकड करण्यास व चाट मारण्यास मनाई आहे. तसेच बोटे बांधणे व पायांनी आक्रमक क्रिया करणे यांस बंदी असल्यामुळे  या पद्धतीची कुस्ती खडी न होता बहुतेक जमिनीवरच चालते. ही पहावयास मनोवेधक नसते. प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही खांदे जमिनीस एकाच वेळी टेकविले गेले की कुस्ती चीतपट झाली, असे मानतात. फ्रान्समधील कुस्तीच्या पद्धतीचा यावर विशेष प्रभाव पडला व इंग्‍लंडमध्ये इ. स. १८७० साली ही पद्धती स्वीकारली गेली. पुढे जागतिक ऑलिंपिक क्रीडासामन्यांत या पद्धतीचा अंतर्भाव झाल्यामुळे तिला जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पद्धतीतील प्रमुख डावपेच मानपकड (नेकहोल्ड), धोबीपछाड (फ्लाईंग मेअर), पायपंजा पकड (टो होल्ड) हे आहेत. यात वजनाचे सर्वसामान्य आठ गट असतात.

फ्री-स्टाईल पद्धती

या पद्धतीला कॅच-अ‍ॅज-कॅच-कॅन असेही नाव आहे. या पद्धतीत कशाही पद्धतीने पकडी-डाव-पेच करण्यास बंधन नसल्यामुळे ही विशेष लोकप्रिय आहे. फक्त गळा दाबणे, अवयवास इजा होईल अशा पकडी करणे, लाथा मारणे, ठोसे मारणे व प्रतिस्पर्ध्याचे कपडे धरणे यांना मनाई आहे. या पद्धतीत तीन तीन मिनिटांच्या तीन पाळ्या असतात. तेवढ्यात प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमिनीस टेकविले की तो चीतपट झाला, असे समजतात. या पद्धतीतील प्रमुख डावपेच हाफ्-नेल्सन, डबल नेल्सन, क्रच होल्ड हे आहेत. यातही वजनाचे सर्वसामान्य आठ गट असतात. याही पद्धतीचा समावेश जागतिक ऑलिंपिक क्रीडासामन्यांत झालेला आहे.

कंबरलंड व वेस्टमूरलंड पद्धती

या पद्धतीत दोन्ही कुस्तीगीर  एकमेकांच्या छातीला छाती लावून आपापल्या हनुवट्या एकमेकांच्या खांद्यावर टेकवून दोन्ही हातांनी परस्परांचे हात पक्के आवळून धरून कुस्तीस सुरुवात करतात. प्रतिस्पर्ध्याला चाटा मारण्यास मनाई नाही, पण लाथा मारण्यास मनाई आहे. सुरुवात केलेल्या पाठीवरील हाताची पकड सुटल्यास तो गडी बाद झाला, असे मानतात. त्यामुळे हातांची पकड हीच महत्त्वाची व ती न सुटता कोणत्याही पद्धतीचे डावपेच करण्यास परवानगी असल्यामुळे ही फारशी धोक्याची नसते. म्हणून मुलांना भाग घेण्याच्या दृष्टीने ती सुरक्षित व चांगली आहे. ही कुस्ती खेळत असताना जर एखाद्या खेळाडू बाजूवर पडला, तर पुन्हा उभ्याने सुरुवात करतात; परंतु दोन्ही खेळाडू जमिनीवर पडल्यास प्रथम जमिनीवर पडणारा बाद झाला, असे मानतात. या पद्धतीत बॅक-हील, बटक, हँक, क्रॉस-बटक, आउटसाइड स्ट्रोक, हाइप (उखड) इ. विविध डावपेच आहेत.

कॉर्नवॉल व डेव्हन पद्धती

या पद्धतीत खेळाडू कॅन्व्हासची बंडी वापरतात व कमरेच्या वर किंवा बंडीला पकड करून डावपेच करतात. ज्या खेळाडूचे दोन्ही खांदे व एक कुल्ला किंवा दोन्ही कुल्ले व एक खांदा एकाच वेळी जमिनीवर टेकतील, तो गडी चीतपट झाला, असे मानतात. ही कुस्ती बहुधा उभ्यानेच चालते. जमिनीवर पडून डावपेच करण्यास मनाई असते. त्यामुळे ही कुस्ती बराच वेळ चालते व कंटाळवाणी होते. यांतील महत्त्वाचे डावपेच व पकडी दोन-तीन आहेत. त्यांपैकी इनसाइड लॉक, फोर-हिप या डावांचे अनुक्रमे क्रॉस-बटक आणि हँक या कंबरलंड व वेस्टमूरलंड पद्धतींतील डावांशी साम्य आढळते.

आयरिश व स्कॉटिश पद्धती

या पद्धतीच्या कुस्तीचे फ्री-स्टाईल पद्धती व कंबरलंड व वेस्टमूरलंड पद्धतींशी बरेच साम्य आहे. प्रतिपक्षाचे दोन्ही खांदे जमिनीवर एकाच वेळी टेकविले गेले म्हणजे तो चीतपट झाला, असे मानतात. आयर्लंड व स्कॉटलंडमध्ये ही पद्धती रूढ आहे, पण आयर्लंडमध्ये पकडीत थोडा फरक आहे. तेथे प्रतिपक्षाचे कोपर व मान पकडून कुस्तीस सुरुवात करतात. ही मुख्यतः उभ्यानेच चालते. उत्तर आयर्लंडमध्ये प्रतिस्पर्ध्यास जमिनीवर फेकला. की तो चीतपट झाला असे मानतात. या पद्धतीतही हँक (ढाक), हाइप (उखड), बटक (ढुंगणी) यांसारख्या विविध डाव-पेच-पकडा आहेत.

जुजुत्सू अथवा जुडो पद्धती

हा जपानी कुस्तीप्रकार फ्री-स्टाईलसारखाच असून त्यात केसाशिवाय कोणत्याही अवयवांना पकडून ३-४ मी. व्यासाच्या आखाड्यात खेळास सुरुवात होते. जो गडी या वर्तुळाच्या बाहेर जाईल, तो चीतपट झाला असे समजतात. भारी प्रतिस्पर्ध्याला, गैरसावध असताना पकडून त्यावर विविध प्रकारच्या पकडा (लॉक्स), फेकी (थ्रोज) करून त्याचप्रमाणे त्याचे अवयव पिरगळून, रक्तवाहिन्या किंवा नसा दाबून झटपट व कमी शक्तिसामर्थ्य वापरून त्यास शरण यावयास लावणे, यांवर ही पद्धत प्रामुख्याने आधारलेली आहे. या कुस्तीत शरीराच्या विविध अवयवांना इजा होण्याचा संभव फार असतो. ही पद्धत सैनिकांना स्वसंरक्षणार्थ उपयुक्त  आहे, म्हणून शिकविली जाते. मनगट व कोपर यांची पकड, आतील व बाहेरील मनगटपकड आणि सरळ हातपकड या तीन पकडी या पद्धतीत महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे घुठणी फेक, गुडघी फेक, ढुंगणी फेक, खांदी फेक व पोट फेक या प्रमुख फेकी त्यांत आहेत. जुजुत्सू हा कुस्तीचा प्रकार चीन मधून जपानमध्ये आला असावा; परंतु गेल्या दोन हजार वर्षांत हा प्रकार जपानमध्ये लोकप्रिय झाला असून विसाव्या शतकात या कुस्तीचा जगभर प्रसार झालेला आढळतो.

काही दुय्यम कुस्तीप्रकार

  1. स्वित्झर्लंडमध्ये स्विजेन ही त्यांची राष्ट्रीय पद्धती असून तेथील थंड हवामानामुळे ती कपडे घालून खेळतात. यात प्रतिस्पर्ध्याच्या कपड्याला धरून डावपेच खेळतात व त्याला अधांतरी उचलून आपटल्यास तो बाद झाला, असे मानतात.
  2. ग्‍लिमा नावाची कुस्तीची पद्धती आइसलँडमध्ये चालते. कपड्यावर कातडी कमरपट्टा चढवितात व त्याला धरूनच विविध पकडी व फेकी केल्या जातात. प्रथम जमिनीवर पडणारा बाद झाला, असे मानतात.
  3. ऑल-इन स्टाईल ही पद्धती इ. स. १९३० पासून इंग्‍लंडमध्ये रूढ झाली आहे. तिच्यात नियम फार कमी आहेत. मुष्टियुद्धाच्या आखाड्यात ती खेळतात. केस पकडण्याशिवाय शरीराचा कोणताही भाग कसाही पकडून यातील डाव-पेच-पकडीपैकी चालतात.
  4. खेळाडू एकमेकांस थपडाही मारू शकतात. ही कुस्ती उभ्याने सुरू होते, मुष्टियुद्धातील पाळ्यांप्रमाणे यातही पाळ्या असतात. तीन वेळा बाद होणे किंवा तीन वेळा चीतपट करणे यावर निर्णय अवलंबून असतो.
  5. अमेरिकेत प. यूरोपातील फ्री-स्टाईल पद्धतीचीच कुस्ती रूढ आहे.

हौशी व धंदेवाईक कुस्तीगीर

कुस्तीगिरांत हौशी व धंदेवाईक असे दोन प्रकार आहेत. हौशी कुस्तीगीर खास खेळातील मौज लुटण्यासाठीच खेळतात. पैशाचा मोबदला ते स्वीकारत नाहीत. ऑलिंपिक क्रीडासामन्यांसारख्या जागतिक सामन्यात हौशी खेळाडूंनाच प्रवेश असतो. धंदेवाईक म्हणजे पैशाचा मोबदला घेऊन कुस्ती करणारे. धंदेवाईक कुस्तीचा प्रकार गेल्या शतकात इ. स. १८७० पासून सुरू झाला.

कुस्तीची साधने, पोशाख व आखाडा

भारतीय पद्धतीत ५ x ५ मी. लांबीरुंदीचा व १ मी. खोलीचा आखाडा लागतो. त्यात ५० सेंमी. जाडीची तांबडी माती, काव व राख घालतात. तीवर प्रथम पाणी, लिंबाचा रस, ताक, तेल यांचा वापर करून तो मऊ व निर्जंतूक करून घेतात. वारंवार पाणी मारून ती खोऱ्‍याने दररोज तोडून भुसभुशीत ठेवावी लागते. विदेशी पद्धतीच्या सर्व प्रकारच्या कुस्त्यांना ६ x ६ मी. लांबीरुंदीचा उंचावलेला आखाडा असतो. त्यावर जाड काथ्याची चटई (मॅट) पसरतात, त्यामुळे खेळाडू फेकले वा आपटले गेल्यास इजा होत नाही. या आखाड्यासभोवती खेळाडू बाहेर जाऊ नये म्हणून जाड दोरखंडे बांधतात.

देशी पद्धतीत लंगोट व त्यावर जाड, घट्ट बसणारा असा जांघिया (किश्ताक) घालतात. खेळाडूस सामन्याच्या वेळी अंगास तेल लावण्यास मनाई आहे. विदेशी पद्धतीत थंड हवामानामुळे बनियन, चड्डी व पायात बूट घालून कुस्ती खेळतात. जपानी पद्धतीत सैल अंगरखा व घुटण्यापर्यंतची विजार व कमरपट्टा हा पोशाख असतो. स्विस व पठाणी पद्धतींत अंगरखा, तंग विजार व कमरपट्टा वापरतात.

कुस्तीचे नियम

प्रत्येक कुस्तीपद्धतीचे स्वतंत्र असे नियम असतात व ते कटाक्षाने पाळणे खेळाडूंचे कर्तव्य आहे. ते तसे पाळले जातात किंवा नाही हे पहाण्याचे काम पंचांचे असते. पंच व सरपंच हे कुस्ती चालू असताना देखरेख ठेवून, शेवटी कुस्ती निकाली न झाल्यास, चांगल्या कुस्तीगिरास त्याच्या डाव-पेच-पकडी यांवर गुण देऊन त्याला विजयी ठरवितात. कुस्ती होण्यापूर्वी कुस्तीगिरांची वजने घेऊन वजनाप्रमाणे त्या त्या वजनांच्या गटात त्यांना खेळावे लागते. ऑलिंपिकसारख्या जागतिक सामन्यांत कुस्तीगिरांच्या वजनांचे आठ गट आहेत.

काही सामन्यांत प्रत्येक गटात दाखल असलेल्या सर्व खेळाडूंना आळीपाळीने त्या गटातील प्रत्येकाशी खेळावे लागते व त्यात शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाशी खेळलेल्या कुस्तीत मिळालेल्या गुणांची बेरीज करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात येतात. काही पद्धतींत जोड्या पाडून शेवटपर्यंत सर्व फेऱ्‍या जिंकत जाऊन शेवटी जिंकणारा विजेता व हरणारा उपविजेता ठरवितात. काही पद्धतींत खेळाडूने केलेल्या दोषांबद्दल त्याचे दोषगुण (बॅड पॉइंट्स) उणे करण्यात येतात. त्यामुळे पुष्कळदा कमी गुण मिळविणारा विजेता ठरतो. पंच-सरपंचांनी दिलेले निकाल बंधनकारक मानतात.

कुस्तीचे डावपेच

कुस्ती हे साधनरहित असे द्वंद्व असल्यामुळे त्यात प्रतिस्पर्ध्यास चीतपट करण्यासाठी विविध प्रकारचे डावपेच योजावे लागतात. भारतीय पद्धतीत सामान्यतः कुस्तीला सुरुवात होताना दोन्ही प्रतिस्पर्धी समोरासमोर उभे राहून सलामी करतात. पाश्चिमात्य कुस्तीपद्धतीत प्रतिस्पर्धी आखाड्याच्या कोपऱ्‍यात थांबतात. पंच त्यांना मध्यभागी बोलावून त्यांचे हस्तांदोलन करवतात व शिटीचा इशारा मिळताच कुस्तीस प्रारंभ होतो. प्रतिस्पर्धी वजनाने भारी असल्यास कोणते डाव करावेत, तो पाठीवर असताना कोणते डाव योजावेत, प्रतिस्पर्धी खाली असताना कोणते डाव करावेत, प्रतिस्पर्ध्यांनी केलेल्या डावावर प्रतिडाव करून मात कशी करावी व आपली सुटका कशी करावी इ. बाबी अगदी झटपट ठरवून चापल्याने कराव्या लागतात.

कुस्तीतील डावपेचांचे सामान्यतः पुढीलप्रमाणे प्रमुख भाग पाडता येतील

  1. उभ्याने करावयाचे डाव,
  2. प्रतिस्पर्ध्यावर समोरून करावयाचे डावपेच,
  3. बसलेल्या स्थितीत प्रतिस्पर्धी वर किंवा खाली असताना करावयाचे डावपेच,
  4. एकमेकांच्या डाव्या अगर उजव्या बाजूने बसलेल्या स्थितीत करावयाचे डावपेच. याशिवाय एकलंगी टांग, आतली व बाहेरची टांग, मुलतानी, धोबीपछाड, घिस्सा, लुकान, पट काढणे, उखड, स्वारी, कलाजंग, हरणफास ही कुस्तीतील प्रमुख डावपेचांची नावे आहेत.

याशिवाय दसरंग करणे, डंकी वा डूब घेणे ह्या प्रतिस्पर्ध्याच्या पकडीतून निसटण्याच्या तोडी होत.

प्रसिद्ध भारतीय कुस्तीगीर

भारतीय मल्लविद्येचे श्रेष्ठत्व जगाला पटवून देणाऱ्‍या जगज्जेत्या गामाचे नाव अजरामर झाले आहे. इ. स. १९१० साली त्याने लंडन येथे कुस्तीचे जागतिक अजिंक्यपद मिळविले. गामाचा धाकटा भाऊ इमामबक्ष हा गामाप्रमाणे नामांकित मल्ल होता. या दोघांच्या तोडीचा गुंगा नावाचा पैलवानही प्रसिद्ध आहे. गुलाम अलिया याने इ. स. १९०२ मध्ये यूरोपातील सर्व प्रसिद्ध मल्लांना जिंकून रुस्तम-इ-हिंद ही पदवी मिळविली होती. कल्लू अलिया व  त्याचा मुलगा गामा कल्लू हेही सुप्रसिद्ध मल्ल होते. अहमदबक्ष या मल्लाने इ. स. १९१२ मध्ये यूरोपात जाऊन तेथील मध्यमगट वजनाच्या सर्व प्रसिद्ध पैलवानांना हरविले होते.

भारताची ऑलिंपिक क्रीडासामन्यांतील कामगिरी

इ. स. १९२० साली सर दोराबजी टाटांच्या सक्रिय सहानुभूतीने काही कुस्तीगीर व खेळाडू अँटवर्प ऑलिंपिक सामन्यासाठी गेले होते. त्यावेळी शिंदे याने कुस्तीत थोडी चुणूक दाखविली. त्यानंतर इ. स. १९४८ च्या लंडन ऑलिंपिक क्रीडासामन्यात भारताच्या खाशाबा जाधवने फ्री-स्टाईल कुस्तीच्या फ्लायवेट गटात दोन कुस्त्या जिंकून सहावा क्रमांक मिळविला. पुढे इ. स. १९५२ च्या हेलसिंकीच्या ऑलिंपिक सामन्यात मात्र त्याने बँटमवेट गटात तिसरा क्रमांक मिळवून भारताला एकमेव ब्राँझ पदक मिळवून दिले. त्याच सामन्यात के. डी. माणगावे याचा पाचवा क्रमांक लागला. इ. स. १९५६ च्या मेलबर्न ऑलिंपिक सामन्यात भारताच्या बी. सिंग याने एक कुस्ती जिंकली.

इ. स. १९६० च्या रोम येथील सामन्यात भारताच्या उदयचंद, ग्यान, एस्. श्याम, महादेवसिंग यांनी आपापल्या पहिल्या फेऱ्‍या जिंकल्या व सज्‍जनसिंग याने दोन फेऱ्‍या जिंकल्या, पण पुढे त्यांचा प्रभाव पडला नाही. इ. स. १९६४ च्या टोकिओ सामन्यांत फ्री-स्टाईल कुस्तीत भारताचा विश्वंभर सहावा आला. गणपत आंदळकर, मारुती माने, जीतसिंग, माधोसिंग, बंडू पाटील व मालवा हे तिसऱ्‍या व चौथ्या फेरीपर्यंत गेले पण पुढे बाद झाले. ग्रीको-रोमन पद्धतीच्या कुस्तीत विश्वंभर तिसऱ्या फेरीत, मालवा दुसऱ्‍या फेरीत व बाकीचे पहिल्या फेरीतच बाद झाले. या नवीन पद्धतीच्या कुस्त्यांची माहिती नसल्यामुळे काहींना दुखापती झाल्या. इ. स. १९६८च्या मेक्सिको येथे झालेल्या सामन्यांत पाठविलेले कुस्तीगीर विशेष चमकले नाहीत.

कुस्तीला चालना देणारे उपक्रम

कुस्तीला चालना देण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर दिल्लीला १९५९ साली इंडियन स्टाईल रेसलिंग फेडरेसन ऑफ इंडिया या मध्यवर्ती संस्थेची स्थापना झाली व तिच्यातर्फे हिंदकेसरी पदवीसाठी भारी वजनाच्या अखिल भारतीय कुस्तीगिरांचे सामने सुरू झाले.  पहिला हिंदकेसरी हा बहुमान महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या श्रीपती खंचनाळे याने बुत्तसिंगाला चीत करून मिळविला. त्यानंतर गणपत आंदळकर (१९६०) व मारुती माने (१९६५) या महाराष्ट्रीय पैलवानांनी हा बहुमान मिळविला आहे.

मल्लविद्येची मायभूमी असलेल्या महाराष्ट्रात कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचा काळ हा मल्लविद्येचा वैभवकाळ समजला जातो. या काळात मल्लविद्येला उत्तम राजाश्रय मिळाला. छोटेमोठे संस्थानिकही आपल्या पदरी मोठ्या अभिमानाने मल्ल बाळगीत. गावोगाव जत्रा, उत्सव, उरूस यांमध्ये कुस्त्यांचे फड होत. याच काळात प्रसिद्ध तालीमखाने निर्माण झाले. कोल्हापूरला अखिल भारतीय कीर्तीचे खास कुस्तीसाठी असे खासबाग मैदान तयार करण्यात आले. त्यात भारतातील सुप्रसिद्ध मल्लांच्या कुस्त्या होत असतात. श्रीपती खंचनाळे, गणपत आंदळकर, मारुती माने हे हिंदकेसरी पदकाचे मानकरी तसेच खाशाबा जाधव, श्रीरंग जाधव, माणगावे मास्तर यांसारखे ऑलिंपिक क्रीडासामन्यांत भाग घेणारे मल्ल याच मातीत तयार झाले आहेत.

महाराष्ट्रात कुस्तीला चालना देण्यासाठी स्वातंत्र्यानंतर पुणे तालीम संघाने पुढाकार घेतला व पडेल पैलवानांना पुन्हा जोड मिळवून देऊन प्रोत्साहन देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला. यातूनच पुढे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेचे पहिले अधिवेशन पुणे येथे १९५३ साली भरले होते. या परिषदेला महाराष्ट्र राज्य सरकारचे सक्रिय उत्तेजन मिळू लागले. पुढील अधिवेशने मुंबई, सोलापूर, सांगली, नागपूर इ. महाराष्ट्रातील प्रमुख शहरी भरत गेली.  याच परिषदेच्या अधिवेशनात महाराष्ट्र केसरी या पदवीसाठी कुस्त्या घेण्याचे ठरले व त्याप्रमाणे १९६१ मध्ये औरंगाबादच्या अधिवेशनात कोल्हापूरच्या दिनकर दह्यारी यास पहिली महाराष्ट्र केसरी ही पदवी मिळाली. त्यानंतर भगवान मोरे, गणपत खेडकर आदींनी हा मान मिळविला.

१९६३ साली साताऱ्‍यास झालेल्या अधिवेशनाने नवोदित कुस्तीगीर, कुस्तीशिक्षक, महाराष्ट्र केसरी पदाचे विजेते-उपविजेते, जुने प्रसिद्ध कुस्तीगीर, यांना वार्षिक मानधन देण्यासंबंधी केलेल्या शिफारशी महाराष्ट्र सरकारने मान्य केल्या आहेत. या खेळासाठी काम करणाऱ्‍या संस्थांना अनुदानही आता मिळू लागले आहे. महाराष्ट्रातील वरील संस्था मध्यवर्ती इंडियन-स्टाईल रेसलिंग फेडरेशनला संलग्न आहे.

जागतिक दर्जाच्या ऑलिंपिक क्रीडासामन्यांमध्ये ग्रीको-रोमन व फ्री-स्टाईल पद्धतींच्या कुस्त्यांत भारतीय मल्ल विशेष कामगिरी करू शकत नाहीत. कारण या कुस्त्यांच्या पद्धतीत कुस्तीगिरांना बनियन, चड्डी व बूट घालून चटईवर कुस्ती खेळावी लागते. तसेच या कुस्तीप्रकारांत प्रतिस्पर्ध्यास चीतपट करण्याचे डावपेच व नियमही भारतीयांना नवीन असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाची सोय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, पतियाळा येथे आता करण्यात आली आहे. त्याचा फायदा भारतीय मल्लांना होण्याची शक्यता आहे.खेळातील इतर क्षेत्रांप्रमाणे कुस्तीच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून त्या

खेळाची शान वाढविणाऱ्‍या कुस्तीगिरास भारत सरकारतर्फे पुरस्कारही देण्यात येतो.

  • उदयचंद (१९६१)
  • मालवा (१९६२)
  • गणपत आंदळकर (१९६३)
  • भीमसिंग (१९६६)
  • मुख्तियारसिंग (१९६८)
  • चंदगीराम (१९६९)

हे कुस्तीगीर अर्जुन पुरस्काराचे मानकरी आहेत.

संदर्भ : १. सूर्यवंशी, कृ. गो. भारतीय मल्लविद्या, उदय आणि विकास, पुणे, १९६५.

२. सोमण, विठ्ठलराव, संकलक, सुलभ कुस्ती (मल्लविद्या), सातारा, १९६३.

लेखक: कृ. ग. वझे ; शा. वि. शहाणे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate