অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एका गाढवाची गोष्ट

एका गाढवाची गोष्ट

एक धोबी आपल्या गाढवाकडून दिवसभर ओझी वाहण्याचे काम करून घेई आणि रात्री तो त्याला गावाबाहेर चरायला सोडून देई. रात्रभर गवत, नाही तर कुणा ना कुणाच्या शेतातली धान्याची रोपे पोटभर खाऊन झाल्यावर पहाटे पहाटे ते गाढव आपल्या घरी जाई. या रात्रीच्या भ्रमंतीत त्याची एका कोल्ह्याशी ओळख झाली.

एके रात्री पुनवेचे पिटूर चांदणे पडले असताना ते गाढव म्हणाले, 'कोल्होबा, या चांदण्यांमुळे मन कसे प्रफुल्लित झाले आहे. मी थोडा वेळ गाऊ का?'

कोल्हा म्हणाला, 'मामा, तुम्ही आणि गाणार? म्हणजे प्रलयच धडकला म्हणायचा!'

'का रे, मला गाण्याची माहिती नाही, असे का तुला वाटते?' असा प्रश्न विचारून ते गाढव स्वर किती, सप्तके किती व राग किती वगैरे माहिती देऊन त्या कोल्ह्याला म्हणाले, 'आता तरी माझ्या रागदारीच्या ज्ञानाबद्दल तुझ्या मनात संशय उरला नाही ना?

कोल्हा म्हणाला, 'नुसते ज्ञान असणे वेगळे आणि गाण्याचा आवाज वेगळा. त्यातून कुणी, कुठे व कसे वागायचे याबद्दल मार्गदर्शक असे काही नियम आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर या जगात सुरळीतपणे जगण्याची इच्छा असेल, तर खोकला झालेल्याने व जो झोपाळू आहे त्याने चोरी करण्याच्या फंदात पडू नये व रोगग्रस्ताने जिभेचे चोचले पुरवू नयेत. खोकला झालेला जर कोणी चोरी करायला गेला आणि चोरी करता करता त्याला खोकला आला, तर ज्याप्रमाणे घरमालकाकडून मार खाण्याचा त्याच्यावर प्रसंग येईल, त्याचप्रमाणे तुम्ही जर या रात्रीच्या वेळी गाऊ लागलात, तर ज्याच्या शेतातली कोवळी कणसे आपण चोरून खात आहोत, तो शेतकरी जागा होईल आणि आपल्या दोघांनाही चोप देईल.'

गाढव म्हणाले, 'कोल्होबा, तू अगदीच अरसिक कसा रे? तो स्मशानात राहणारा रुक्ष मनोवृत्तीचा शंकर जर त्या रावणाने सुकवलेल्या स्नायूंपासून तयार केलेल्या तंतुवाद्यातून रागदारीचे मधुर स्वर काढताच त्याच्यावर प्रसन्न झाला, तर माझे गोड गाणे ऐकून त्या शेताची रखवाली करणारा माणूस मला मारणे शक्य आहे का? उलट तो माझा सन्मानच करील.'

हा आपले ऐकण्याचे लक्षण दिसत नाहीसे पाहून तो कोल्होबा त्या शेताच्या कुंपणाबाहेर पडून दूर उभा राहिला आणि त्या गाढवाने टिपेत गायला प्रारंभ केला. त्याबरोबर त्या शेताच्या जाग्या झालेल्या राखणदाराने त्याला बेदम मार दिला. त्या माराने ते गाढव मूच्र्छा येऊन जमिनीवर कोसळताच त्या राखणदाराने त्याच्या गळय़ात दोरखंडाने एक उखळ बांधले.

एवढे करून तो पहारेकरी आपल्या झोपडीत जाताच शुध्दीवर आलेले ते गाढव गळय़ात बांधण्यात आलेल्या उखळासह कसेबसे घराकडे जाऊ लागले, तेव्हा दूर उभा राहिलेला कोल्हा त्याला म्हणाला, 'गाढवमामा, तुमचा दिव्य गायनावर बेहद्द खूष होऊन त्या पहारेकर्‍याने तुमच्या सन्मानार्थ हा 'भव्य मणी' तुमच्या गळय़ात बांधला का?' पण लाजेने चूर झालेले ते गाढव एकही शब्द न बोलता निघून गेले.

माहिती संकलन - अमरीन पठाण

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate