कविता शिक्षणाची: अगतिक .....( from Divya Marathi)
..घरी काय हाय
शाळेत तरी
मातीची जमीन नाई-फरशी हाय
कुडाच्या भिंती नाहीत-विटा सिमेंटच्या हायेत
आणखी दररोज भात मिळतो
भाजी मिळते
कधी कधी बिस्किटे मिळतात
छान छान पुस्तकं
बसायला पट्ट्या
ड्रेस
फक्त गुरजी सांगतात तसं
लिवायचं
वाचायचं
खेळायचं
गाणी म्हणायची ......
‘‘गुरजी, इतक्या लवकर
घरी जाऊ नका ना
थांबा ना
गमते आमाला....’’
‘‘बाळांनो
आभाळ चारीकडून भरून आलंय
फुरफुरी सुरू झालीय
एकदा हे जोरात सुरू झालं की -
आमच्या गाड्या काढता येणार नाहीत
या खेड्यांतून
आम्ही अडकून पडू
घरी आमचीही चिली पिली आहेत वाट पाहत........
कवी- संजय डोंगरे
(कवी विदर्भातील अकोला जिल्ह्यात
प्राथमिक शिक्षक आहेत
‘अगतिक’, ही कविता एका वेगळ्याच वास्तवाची जाणीव करून देते. विदर्भातल्या संवेदनशील ग्रामीण शिक्षकाने लिहिलेली असल्याने विदर्भातील अपार दु:खाचा-दारिद्र्याचा स्पर्श या कवितेला आहे. कवितेची भाषाही विदर्भाच्या मायेची आहे. शाळेत मुले का येतात आणि मुले का येत नाहीत, याचे आमच्यासारखे शिक्षणाचे तथाकथित अभ्यासक वेगवेगळे अर्थ लावत असतात. शिक्षण मुलांच्या भावविश्वाला स्पर्श करत नाही म्हणून मुले शाळेत रमत नाहीत आणि मुलांना शाळेच्या आपल्या भावविश्वाची ओळख पटली, की मुले शाळेत येतात असे पुस्तकी अर्थ लावतो, परंतु या कवितेतला संवाद आमच्या पोथीनिष्ठ विश्लेषणाला ओलांडून पलीकडे जातो. मुलांना शाळा ज्ञानाने भूक भागते म्हणून आवडत नाही तर खिचडीने पोट भरवते म्हणून ती शाळा त्यांना आपली वाटते हा धक्का ही कविता देते. शाळेच्या भिंती त्यांना मायेची ऊब देतात म्हणून त्यांना शाळा आपली वाटत नाही तर पावसात त्यांच्या झोपड्यात ते भिजून जातात म्हणून हा निवारा त्यांना जवळचा वाटतो. शाळेत ते शाळा सुटल्यावर रात्रभर थांबायलाही तयार आहेत ते केवळ शाळेने त्यांना शिक्षणाच्या आशयाने गुंतवून ठेवले आहे म्हणून नाही तर कोसळणा-या या पावसात घर त्यांचं रक्षण करणार नाही म्हणून....
शाळेत येण्याची ही अपरिहार्यता आपल्या संकल्पनांनाच धक्का मारत मुलांच्या वास्तवाविषयी एक कणव निर्माण करते... दुसरीकडे शिक्षक मात्र त्या मुलांसोबत थांबायला तयार नाही. पाऊस सुरू झाला, की घरी वाट पाहणा-या या मुलांकडे जाता येणार नाही ही त्यांची चिंता आहे. कवी त्यांच्यावर टीका न करता त्यांचीही अगतिकता समजून घेतो... पण कविता तिथेच न संपता शिक्षक आणि मुलं शाळेबाहेर दोन वेगवेगळ्या जगात राहतात हे वास्तव पुढे आणते. शिक्षकाचे भावविश्व मुलांशी जोडले कसे जाईल हा मौलिक प्रश्न उपस्थित करते. ‘शिक्षक हा दरिद्रीच असला पाहिजे’, या लेखावर महाराष्टÑात खूप वाद झाला होता, पण त्या लेखामागची भावना फक्त हीच होती, की मुलांच्या भावविश्वाशी जवळीक व्हायला शिक्षक आणि ग्रामीण मुले यांच्या जीवनशैलीत फारसे अंतर नसले पाहिजे. एका जुन्या काळच्या मुख्याध्यापकाचा प्रसंग आठवतो. हिवाळ्यात एका खेड्यातल्या शाळेत शिक्षक स्वेटर, बूट, टोपी घालून आले आणि मुले मात्र इतकी गरीब की शर्टच्या आत बनियनही नाही. पायात चपला नाहीत, अशी थंडीत कुडकुडत आलेली. मुख्याध्यापकाने सर्व शिक्षकांना सांगितले, की अशी थंडीत मुलं कुडकुडताना तुम्ही इतकं ऊबीत यायचं नाही अन्यथा या मुलांना तुम्ही त्यांचे वाटणारच नाही. शिक्षकांनीही ते ऐकले. आज नव्या पिढीतल्या शिक्षकांना हा वेडेपणा वाटेल. आपण गरिबासारखे राहिल्याने मुलांची गरिबी दूर होते का, असे ते विचारतील, पण किमान मुलांना तुम्ही त्यांच्यातले वाटाल. मुलांमध्ये न्यूनगंड तर वाढणार नाही...या कवितेतल्या घरी जाण्याची घाई करणा-या शिक्षकाला कविता हेच सांगते आहे का... प्रसंगी घरच्या मुलाची काळजी दूर ठेवून या भिजणा-या मुलाची काळजी घ्यायला सांगते आहे का... अर्थ ज्याने त्याने लावावा...
साभार - हेरंब कुलकर्णी
अंतिम सुधारित : 5/2/2020