অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एचआयव्‍ही एड्स बाधित रुग्‍णांसाठी औषधोपचार देण्‍याचे धोरण

एचआयव्‍ही एड्स बाधित रुग्‍णांसाठी औषधोपचार देण्‍याचे धोरण

एचआयव्‍ही हा एक विषाणू आहे. सुदृढ व्‍यक्‍तीचा एचआयव्‍ही बाधित व्‍यक्‍तीशी लैगिक संबंध आला तर एचआयव्‍हीची लागण होते. एचआयव्‍हीची लागण 94 टक्‍के ही लैगिक संबंधाद्वारे, 1 टक्‍के लागण समलैगिक संबंधाद्वारे, 0.1 टक्‍के रक्‍तसंक्रमणाद्वारे, 0.9 टक्‍का दूषित सुया-सिरींजद्वारे, 3 टक्‍के मातेपासून बाळाला तर 1 टक्‍का इतर कारणाने एचआयव्‍ही लागण होते.

एचआयव्‍ही विषाणू शरीरात गेल्‍यानंतर सीडी 4 या पेशीवर हल्‍ला करतो. यामुळे सीडी 4 या पेशीची संख्‍या शरीरातून कमी होते व पर्यायाने एचआयव्‍ही बाधित रुग्‍णांची रोगप्रतिकारक शक्‍ती कमी होते. मग अशा व्‍यक्‍तीला वेगवेगळे आजार होतात.

सीडी 4 पेशी म्‍हणजे काय - शरीरामध्‍ये रक्‍त असते या रक्‍तामध्‍ये पांढऱ्‍या व लाल पेशी असतात. पांढऱ्‍या पेशीचे अनेक प्रकार असतात. त्‍यामध्‍ये लिंफोसाईट नावाची एक पेशी असते. लिंफोसाईटचे पण अनेक प्रकार असतात व त्‍यापैकी एक सीडी 4 लिंफोसाइट पेशी. एचआयव्‍ही विषाणू शरीरात गेल्‍यानंतर सीडी 4 वर हल्‍ला करतो आणि त्‍या पेशीमध्‍ये जाऊन त्‍याचे उत्‍पादन होते. म्‍हणजे येथे विषाणूची संख्‍या प्रचंड गतीने वाढते. मात्र विषाणूचे उत्‍पादन होण्‍यासाठी काही एन्‍जाइम्‍सची गरज भासते. आपण जे औषध एचआयव्‍ही एड्स बाधित रुग्‍णांना देतो ही औषधे एन्‍जाइम्‍सची निर्मिती होऊ देत नाही. त्‍यामुळे एचआयव्‍ही विषाणूचे उत्‍पादन थांबते व याप्रमाणे एचआयव्‍ही बाधित रुग्‍णांची सीडी 4 पेशीची संख्‍या कमी होत नाही व विषाणूंची संख्‍या आटोक्‍यात येते. त्‍यामुळे रुग्‍ण हा सुदृढ राहतो व संधिसाधू आजार होत नाहीत. त्‍याचे आयुष्‍य सर्व सामान्‍यासारखे राहते. याप्रमाणे एआरटी औषधाचा उपयोग होते.

विंडो पिरीयड म्‍हणजे काय - शरीरात एचआयव्‍ही विषाणूची बाधा झाल्‍यावर लगेच एचआयव्‍ही टेस्‍ट सकारात्‍मक येत नाही कारण शरीरात अॅन्‍टीबॉडिज तयार होण्‍यासाठी 4 ते 6 आठवडे किंवा यापेक्षाही कमी जास्‍त अवधी लागतो. अॅन्‍टीबॉडिज शरीरात तयार झाल्‍यानंतरच एचआयव्‍हीची चाचणी सकारात्‍मक येते.

सामान्‍य व्‍यक्‍तीमध्‍ये 500 ते 1500 सीडी 4 ची संख्‍या असते. एचआयव्‍ही विषाणूची लागण झाल्‍यानंतर सीडी 4 ची संख्‍या कमी होते. त्‍यानुसार रोगप्रतिकारक शक्‍ती कमी होते. मग संधिसाधू आजार होतात. उदा तोंडाला बुरशी लागणे, टी बी, बुरशीमुळे न्‍युमोनिया होणे इत्‍यादी.

शरीरात एचआयव्‍ही विषाणूची लागण झाली याचा अर्थ त्‍याला एड्स झाला असे नाही. एचआयव्‍ही विषाणूची लागण झाल्‍यानंतर 5 ते 10 वर्षे एचआयव्‍ही बाधित रुग्‍ण लक्षणे विरहित असतो. पण जेव्हा सीडी 4 ची संख्‍या 200 च्‍या खाली येते. तेव्‍हा त्‍याला एड्सची लागण होते व त्‍याला संधीसाधु आजार होतात आणि मग त्‍या रुग्‍णाचा मृत्‍यू होण्‍याची शक्‍यता असते.

भारतामध्‍ये सन 1986 मध्‍ये पहिला रुग्‍ण चेन्‍नई येथे आढळला. त्‍यानंतर नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम (एनएसीपी) व नॅशनल एड्स ऑर्गनायजेशन (नॅको) ची स्‍थापना झाली. सन 2004 मध्‍ये सीडी 4 संख्‍या 200 पेक्षा कमी झाली तर एआरटी औषधे देण्‍याचे धोरण व योजना राबवली व त्‍यासाठी एआरटी विभागाची स्‍थापना झाली. भारतात 535 एआरटी सेंटर आहेत. आर्थिक टंचाई व अपुरी साधनसामग्री उपलब्‍धतेमुळे 200 सीडी 4 चा नॅकोने नियम बनवला होता. यामुळे मृत्‍यू व संधीसाधू आजारावर थोड्याफार प्रमाणात आळा बसला. सन 2012 मध्‍ये सीडी 4 ची संख्‍या 350 पेक्षा कमी झाली तर एआरटी औषधे देण्‍याचा नियम बनला. यामुळे रोगाची तीव्रता कमी झाली म्‍हणजे एड्स होण्‍याचे प्रमाण कमी झाले आणि संधीसाधू आजारावर आळा बसला. सन 2015 मध्‍ये सीडी4 ची संख्‍या 500 पेक्षा कमी झाली तर औषधे देण्‍याचा नियम झाला. एचआयव्‍हीमुळे येणारी विकृती, मृत्‍यू व रोगाचा प्रसारावर आळा बसला. त्‍यानंतर 28 एप्रिल, 2017 नुसार सीडी 4 ची संख्‍या न पाहता सर्व एचआयव्‍ही बाधित रुग्‍णांना औषधेपचार करणे म्‍हणजेच टेस्‍ट अॅन्‍ड ट्रीट ऑल हे धोरण आहे. यामुळे विकृती व मृत्‍यूचा दर कमी होणे एचआयव्‍हीचा प्रसार कमी होणे संधीसाधू आजारावर व क्षय रोगावर नियंत्रण असणे यामुळे उत्‍तम प्रतीचे आयुष्‍य जगणे हे या पॉलिसीमुळे शक्‍य होईल.

औषधे सुरु करण्‍यापूर्वी रुग्‍णांचे समुपदेशन रक्‍ताचा मूळ चाचण्‍या, एक्‍स-रे, सोनोग्राफी, क्षयरोग तपासणी व इतर आवश्‍यक चाचण्‍या करुनच औषधोपचार सुरु करतो. शासनाला सन 2030 पर्यत एचआयव्‍ही एड्स संपवायचा आहे. त्‍यासाठी भारतात 90-90-90 हे धोरण आखलेले आहे. आजमितीला भारतात 21 लाख रुग्‍ण आहेत. त्‍यापैकी 90 टक्‍के रुग्‍णांचे रोगनिदान होणे व त्‍यापैकी 90 टक्‍के रुग्‍णांना औषधोपचारावर आणणे व औषधोपचार सुरु केलेल्‍या रुग्‍णांपैकी 90 टक्‍के रुग्‍णांमध्‍ये व्‍हायरल लोड कमी होणे अपेक्षित आहे. हे धोरण सन 2020 पर्यंत पूर्ण करावयाचे आहे.

सन 2014 मध्‍ये ऑप्‍शन बी प्‍लसनुसार सर्व गरोदर स्त्रियांना सीडी 4 न पाहता औषधोपचार सुरु केलेले आहे. बाळाला पण 6 ते 12 आठवडे औषध देतो. त्‍यामुळे बालकांना मातेपासून होणारा संसर्ग तीन टक्क्यापर्यंत आला आहे. रोग होऊ देणे व त्‍यानंतर त्‍याचा उपचार करण्‍यापेक्षा रोग होऊ न देणे हे महत्त्वाचे आहे. असुरक्षित लैंगिक संबंध न ठेवणे, प्रमाणित ब्‍लड बँकांतूनच रक्‍ताच्‍या बाटल्‍या घेणे, लग्‍नापूर्वी मुला-मुलीची एचआयव्‍हीची तपासणी करुन घेणे आवश्‍यक आहे. आपले अंतिम धोरण शून्‍य नवे लागण, शून्‍य मृत्‍यू व शून्‍य भेदभाव असा आहे.

लेखिका -डॉ. देविदास नंदराम धामणे,

वैद्यकीय अधिकारी,

एआरटी विभाग  जिल्‍हा रुग्‍णालय अहमदनगर

मो. 9421690450

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 6/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate