आशा म्हणजे अधिकृत सामाजिक आरोग्य कार्यकर्ती. हिचे शिक्षण किमान10वी असावे. ही स्त्री गावात रहिवासी असावी अशी अट आहे. ग्रामसभा तिची निवड करते. निवडीनंतर तिला एकूण 23 दिवसांचे प्रशिक्षण मिळते. त्यानंतर मधून मधून प्रशिक्षण शिबिरे असतात. तिच्या 8 कामांमध्ये प्रमुख काम म्हणजे गरोदर व बाळंतीण स्त्रियांना वेळोवेळी रुग्णालयात नेणे.
इतर कामे पुढीलप्रमाणे -
गावातील किरकोळ आजारांना प्रथमोपचार करणे, लसीकरणासाठी मुलांना जमा करणे,गावातील आरोग्यसेवांचे सूक्ष्म नियोजन, कुटुंब नियोजनासाठी जोडप्यांना प्रवृत्त करणे आणि सल्ला देणे, किशोरी मुलींना आरोग्य सल्ला देणे,टी.बी, कुष्ठरोग,हिवताप या आजारासाठी उपचाराची व्यवस्था करणे. आशाला अद्यापपर्यंत मासिक मानधन देण्याची तरतूद नाही. वरील कामांमधून तिला काही मानधन मिळावे अशी सोय आहे. महिन्याला सरासरी 1000-1500 रु. मानधन मिळावे अशी जरी अपेक्षा असली तरी तिला कमीच पैसे मिळतात. तिच्याकडे निवडक औषधांची पेटी असते. सध्या यात पॅमॉल, जलसंजीवनी, लोहगोळया आणि हिवतापाची गोळी असते. याशिवाय काही आयुर्वेदिक व होमिओपॅथीची औषधे पेटीत असायला पाहिजेत. तसेच स्थानिक औषधी वनस्पती आणि घरगुती प्रथमोपचार देखील तिला शिकवलेले असतात. या सर्वांचा वापर करून गावातल्या किरकोळ आजारांना आशाने वेळीच प्रथमोपचार करावा आणि गावाचा खर्च वाचवावा.
ग्रामीण आरोग्य रुग्णालयात मुख्य म्हणजे बाळंतपणाचे सर्व उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याची सोय असायला पाहिजे. या दृष्टीने प्रशिक्षित स्टाफ व डॉक्टर्स,उपकरणे, छोटी रक्तपेढी वगैरे सज्जता अपेक्षित आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ हे दोन तज्ज्ञ ग्रामीण रुग्णालयात असले पाहिजेत तरच शस्त्रक्रिया होतील. मिशनमुळे ग्रामीण रुग्णालय रंगरंगोटी झाल्यानंतर अधिक आकर्षक दिसत आहेत. रुग्ण कल्याण समितीने स्थानिक पातळीवर येणा-या समस्या वेळोवेळी सोडवाव्यात असा शासनाचा प्रयत्न आहे. औषध पुरवठाही वाढला आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...