जे रूग्ण नियमित व वेळेवर औषध उपचार घेत नाहीत. औषधांच्या मात्रा चुकवितात अशा क्षयरूग्णांच्या शरीरात औषधांना दाद न देणारे जंतू निर्माण होतात. त्यानंतर कितीही क्षयरोगाची औषधे घेतली तरी त्याचा परिणाम शरीरावर होत नाही. परिणामी क्षयरोगाचे रूपांतर एमडीआर क्षयरोगात होते. एमडीआर क्षयरोगामुळे उपचाराचा कालावधी, औषधे आणि रूग्णांची जोखीम यात सर्व गोष्टीत वाढ होते. बहुतेकदा अशिक्षितपणा आणि गरीबी यामुळे क्षयरोग बरा न होण्यास मोठा हातभार लागतो. अज्ञानामुळे नियमित आणि औषधाचे उचित डोस न घेणे त्याचबरोबर सकस आहार न मिळणे यामुळे बरा न होणारा क्षयरोग होतो. पुढे या आजाराचे रूपांतर एमडीआर/एक्सडीआर टीबी मध्ये होतो. शासनाने मोफत निदान आणि औषधाची सुविधा उपलब्ध केल्या असल्या तरी सकस आहार न मिळाल्याने रोगाच्या जीविताची जोखीम वाढते. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने आरोग्यवर्धिनी योजना ३० जानेवारी २०१५ रोजी सायन आणि कुर्ला भागात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली. या उपक्रमात टी.बी.च्या एक्सडीआर/एमडीआर रूग्णांना मोफत पुरक पोषण आहार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देण्यात येत असून १८ फेब्रुवारीला या योजनेचा प्रारंभ झाला.
आरोग्यवर्धिनी योजनेमध्ये एमडीआर आणि एक्सडीआर या क्षयरूग्णांना मोफत पुरक पोषण आहार ‘रेडी टू इट’ या स्वरूपात दिला जातो. मुंबई महानगर पालिका क्षेत्रासाठी आयडीबीआय या बँकेने पुढाकार घेतला असून सामाजिक दायित्वाच्या भावनेतून चार कोटी रूपये उपलब्ध केले आहे. ही योजना राज्यभरातील एमडीआर आणि एक्सडीआर या क्षयरोग्यांकरिता लागू करण्यात आली. क्षयरोग्यांना पुरक पौष्टिक आहार देण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आयडीबीआयसह अन्य कंपन्यांना आवाहन केले आहे.
सध्या राज्यातील १०० टक्के लोकसंख्येला सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष निरीक्षणाखाली मोफत औषधोपचार दिला जात आहे. राज्यातील रूग्णसंख्या, क्षेत्र आणि साधनसामग्री यांची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे :-
एमडीआर क्षयरोग म्हणजे मल्टी ड्रग रेझिस्टंट टीबी. थोडक्यात नियमित आणि योग्य प्रमाणात औषधाचा डोस घेतला नाही तर क्षयरोगाची अनेक औषधे घेऊनही सहजासहजी हा रूग्ण बरा होत नाही. त्याही पलिकडे एक्सडीआर क्षय म्हणजे एक्सट्रिमली ड्रग रेझिस्टंट टीबी. थोडक्यात टीबीच्या औषधांना प्रतिसाद न देणारा क्षयरोग. अशा रूग्णांना नियमित औषधोपचारासह पौष्टिक आहाराची अत्यंत गरज असते. त्यामुळे अशा रूग्णांना औषधाबरोबरच पुरक पोषण आहार देण्याची योजना शासनाने आखलेली आहे. साधारणत: क्षयरोगासाठी ६ ते ८ महिने औषधोपचार घ्यावा लागतो. तथापि, एमडीआर व एक्सडीआर प्रकारच्या क्षयरोगासाठी हा कालावधी २ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. यासाठी क्षयरूग्णाने औषधाचे सेवन नियमित तसेच योग्य मात्रेत घेणे हिताचे असून त्याचबरोबर पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे.
एमडीआर क्षयरोग निदानाची सुविधा राज्यात २३ ठिकाणी उपलब्ध आहे. १६ ठिकाणी ड्रग रेझिस्टंट क्षयरोग वार्ड उपलब्ध आहेत. या सर्व रूग्णांना मोफत निदान व उपचार दिले जातात. मुंबईत क्षयरोग निदानाची १४४ सुक्ष्मदर्शी केंद्रे तर एमडीआर क्षयरोग निदानासाठी 10 केंद्रे कार्यरत आहे. २०१६ डॉट्स केंद्रे आणि ७ ड्रग रेझिस्टंट क्षयरोग वार्ड उपलब्ध आहेत. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमांतर्गत मुंबईमध्ये ३० हजार क्षयरूग्णांना आणि ३ हजार औषधांना दाद न देणाऱ्या एमडीआर व एक्सडीआर क्षयरूग्णांना औषधोपचार दिले जातात. संपूर्ण राज्यात सध्या १४६३४ एमडीआर व ६५४ एक्सडीआर रूग्णांवर शासन औषधोपचार करीत आहे.
क्षयरोगामध्ये रूग्णाच्या वजनात घट होते. पोषक तत्त्वाची कमतरता जाणवते, भूक मंदावते, शरीराच्या चयापचय क्रियेत बदल होतात. योग्य आहार न मिळाल्याने प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. पोषण आहार क्षयरोग बरा करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. मुंबई शहरामध्ये आयडीबीआय बँकेच्या आर्थिक साहाय्याने आरोग्यवर्धिनी पोषण आहाराची सुरूवात केली असून हा कार्यक्रम एक वर्षाकरिता मुंबईतील एमडीआर आणि एक्सडीआर क्षयरूग्णांसाठी वरदान ठरेल यात शंका नाही. यामुळे पुढील काळात हा उपक्रम पथदर्शी ठरावा, असाच आहे. पोषण आहारात उपमा आणि शिरा यांचा समावेश असून यात गहू, सोया, मीठ, शेंगदाणे यांचे मिश्रण आहे. यातून शरीराला ९०० ग्रॅम ऊर्जा, कल्शियम आणि इतर पोषणतत्त्वासह प्रत्येक दिवसाला ३० ग्रॅम प्रथिने मिळतील. हा पुरक आहार प्रत्येक दिवशी क्षयरूग्णाला त्याच्या नियमित आहाराच्या अतिरिक्त स्वरूपात दिला जाणार आहे.
या प्रकारच्या कार्यक्रमाच्या आहाराची स्वीकाराहर्ता पाहणे, तपासणे व त्यानुसार महाराष्ट्रामध्ये या योजनेची अंमलबजावणी करणे हे पुढील काळातील शासनाचे उदिष्ट आहे. जनतेने टीबी सारखा आजार होऊन स्वत: काळजी घेण्यासाठी चांगला सकस आहार, स्वच्छता याबरोबरच क्षयरूणांशी संपर्क आल्यास योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. दोन आठवड्यापेक्षा अधिक दिवस खोकला असल्यास ताबडतोब जवळच्या शासकीय रूग्णालयाशी संपर्क साधणे उत्तम.
लेखक : आकाश जगधने / संजय ओरके
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 1/28/2020