অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नारू

नारू

अपृष्ठवंशी प्राण्यांच्या गोलकृमी संघातील एक परजीवी. याचे शास्त्रीय नाव ड्रॅक्युन्क्युलस मेडिनेन्सिस असे असून या परजीवीपासून होणाऱ्या रोगालादेखील नारू असे म्हणतात. अठराव्या शतकात दक्षिण आफ्रिकेच्या गिनी समुद्रकिनाऱ्यावर नारूचा कृमी प्रथम आढळला. म्हणून त्याला गिनी वर्म हे नाव पडले आहे. काही वेळा घोडा, कुत्रा अशा पाळीव प्राण्यांनादेखील नारू रोग झाल्याचे आढळून आले आहे.

नारूचा जीवनक्रम दोन पोशिंद्यांमध्ये पूर्ण होतो. सायक्लॉप्स हा संधिपाद संघातील प्राणी नारूचा प्राथमिक पोषिंदा तर मनुष्य हा नारूचा द्वितीयक पोषिंदा आहे. सायक्लॉप्स सामान्यपणे गोड्या पाण्यात आढळतात. नारूचे डिंभ सायक्लॉप्समध्ये वाढतात. असे सायक्लॉप्स पिण्याच्या पाण्याबरोबर मनुष्याच्या जठरात गेल्यास त्यांचा द्वितीय पोशिंद्यामध्ये प्रवेश होतो. जठरातील आम्लामुळे सायक्लॉप्स मरतात.

परंतु सायक्लॉप्सच्या शरीरातील नारूच्या डिंभावर जठरातील आम्लाचा परिणाम होत नाही. जठरातून नारूचे डिंभ लहान आतड्यात येतात. आतड्याच्या भित्तिकेमधून आंतरांग उदरच्छदातून हे डिंभ उदरपोकळीत येतात. उदरपोकळीत नारूच्या डिंभांची वाढ होते. नर आणि मादीचे मीलन उदरपोकळीत होते. मीलनानंतर नराचा मृत्यू होतो.

. मादी उदरपोकळीच्या पार्श्वउदरच्छदातून संयोजी ऊतीत येते. नंतर मादी लसिकावाहिन्यांवाटे मनुष्याचे जे अवयव पाण्याच्या संपर्कात येतात तेथील त्वचेच्या पृष्ठभागाखाली येते. त्यामुळे नारू हा रोग पाय, हात किंवा खांद्याजवळ झालेला दिसून येतो. मादीच्या विषारी स्रावापासून त्वचेखाली फोड तयार होतो आणि फोड फुटून तेथे व्रण बनतो. या व्रणाच्या तळाशी एक बारीक छिद्र असून त्यातून द्रव बाहेर पडत राहतो.

नारूच्या मादीच्या शरीराचा बराचसा भाग गर्भाशयाचा असून त्यात अनेक डिंभ असतात. फोड फुटल्यानंतर नारू झालेला अवयव जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा या छिद्रातील डिंभ बाहेर पडून पाण्यात मिसळतात. हे डिंभ पाण्यातून सायक्लॉप्सच्या शरीरात येतात व नारूचे जीवनचक्र पुन्हा सुरू होते. मादीला शरीरातील सगळे डिंभ बाहेर टाकायला पंधरा दिवस लागतात. त्यानंतर मादी त्या व्रणातून बाहेर पडते आणि व्रण बरा होतो.

नारू झाल्यास फोड उठण्यापूर्वी मळमळते. क्वचित उलट्या होतात आणि चक्कर येते. फोडाचे रूपांतर गँगरीन (कोथ) किंवा धनुर्वातात होऊ शकते. एकदा नारूच्या कृमीचा संसर्ग झाल्यास मानवी शरीरात त्याविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होत नाही. त्यामुळे पुन:पुन्हा संसर्ग होऊ शकतो. त्यावर दूषित पाण्याचा उपसा करणे आणि नारू झालेल्या रुग्णाला पिण्याच्या पाण्याजवळ येऊ न देणे, हे करणे गरजेचे असते. तसेच पाण्यात मोठ्या प्रमाणावर क्लोरिन मिसळणे, पाणी गाळणे व उकळणे हे देखील उपाय उपयुक्त ठरतात.

नारू हा रोग जीवघेणा नाही. नारूमुळे त्वचेवर फोड निर्माण झाल्यास पायाच्या भागावर कृमीच्या मार्गानुसार हळूवार मालीश (खालच्या दिशेने) करून व फोडाची जागा छेद देऊन थोडी मोठी करतात. त्यानंतर नारूचा कृमी काडीला गुंडाळून हळूहळू बाहेर काढतात आणि व्रणावर प्रतिजैविकयुक्त मलम लावतात.

मेट्रोनिडेझॉल किंवा थायबेंडाझॉल औषधे मादीचा नाश करतात. ही औषधे या रोगावर प्रभावी समजली जातात. भारतात राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडू या राज्यांत १९९५ सालापर्यंत नारू रोगाचे रुग्ण आढळत असत. मात्र १९९६ सालापासून भारतात नारू रोगाचे रुग्ण आढळल्याची नोंद नाही. आफ्रि का खंडाच्या काही देशांत अजूनही या रोगाचे रुग्ण आढळतात. या रोगावर कुठलीही लस वा ठराविक औषध नाही. प्राथमिक उपचारांनी नारू या रोगाचे निर्मूलन करता येते.

 

लेखक - प्राजक्ता देशपांडे

स्त्रोत - कुमार विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate