অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पित्ताश्मरी


पित्तरसातील [→ पित्तरस] पित्तरंजक, कॅल्शियम व ⇨ कोलेस्टेरॉल या घटकांचे अवक्षेपण होऊन (न विरघळणाऱ्या घन पदार्थांत रुपांतर होऊन) पित्तमार्गात जे खडयासारखे गोळे बनतात, त्यांना ‘पित्ताश्मरी’ म्हणतात. एके काळी हा विकार स्थूल शरीराच्या, जननक्षम, उदरात नेहमी वायू होणाऱ्या पन्नाशीच्या स्त्रीमध्ये बहुतकरुन आढळतो, असे वर्णन केले जात असे. आज बदलत्या काळानुसार प्रथम प्रसवेच्या प्रसूतिपश्च काळात, विशेषेकरुन गर्भारपणात संततिप्रतिबंधक गोळ्या घेणाऱ्या स्त्रियांत या विकाराचे अधिक प्रमाण आढळू लागले आहे. तरीदेखील हा विकार कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषांत आणि बालवयातही आढळू शकतो. वृध्दावस्थेत त्याचे प्रमाण २०% एवढे वाढते. एकूण स्त्रियांमध्ये त्याचे प्रमाण जननक्षम वयोगटात २०% एवढे वाढते. नित्यक्रमात करण्यात येणाऱ्या शवपरीक्षांमध्ये पित्ताश्मरीचे प्रमाण २० ते २५ % आढळते

पित्ताश्मरीचा बहुसंख्य पित्तमार्ग विकारांशी संबंध असतो. अमेरिकेतील दीड कोटी लोकांना पित्ताश्मरी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून तेथे या विकाराच्या उपचारासाठी दरवर्षी जवळजवळ ३,५०,००० रुग्णांवर पित्ताशयोच्छेदन (पित्ताशय संपूर्णपणे काढून टाकण्याच्या) शस्त्रक्रिया केल्या जातात. पश्चिम यूरोप आणि युनायटेड किंग्डम या भागातही पित्ताश्मरीचे प्रमाण अधिक आहे. उष्ण कटिबंधीय प्रदेशातून या विकाराचे प्रमाण कमी आढळते. भारतात दक्षिणेपेक्षा उत्तर भागात त्याचे प्रमाण अधिक आहे.

कारणे

पित्ताश्मरीचा विकार ४,००० वर्षांपेक्षाही अधिक पूर्वीपासून ज्ञात असूनसुध्दा त्याचे निश्चित कारण अद्याप अज्ञात आहे.काहींच्या मताप्रमाणे हा विकार कौटुंबिक स्वरुपाचा असून त्याला आनुवंशिकता कारणीभूत असावी. याची आहारजन्य व पोषणज कारणेही असावीत.

पित्ताश्मरी तयार होण्यास पुढील कारणे मदत करीत असावीत.

चयापचयात्मक

चयापचयाचा व कोलेस्टेरॉलाच्या विद्राव्यतेचा (विरघळण्याच्या क्षमतेचा) घनिष्ट संबंध आहे. पित्ताम्ले कोलेस्टेरॉलापासून यकृतात तयार होतात. पित्ताम्ले व कोलेस्टेरॉल यांचे प्राकृतिक (सर्वसाधारणत: आढळणारे) प्रमाण २५१ असते.हे प्रमाण जेव्हा १३१ होते तेव्हा अवक्षेपणाची शक्यता उत्पन्न होते. कोणत्याही कारणामुळे [उदा., यकृत विकृती, शेषांत्रोच्छेदन(शेषांत्रलहान आतडयाचा शेवटचा ३/५ भाग-काढून टाकल्यामुळे पित्ताम्लांच्या नेहमीच्या आंत्र-यकृत अभिसरणात व्यत्यय येतो)]पित्ताम्ले कमी पडताच वरील प्रमाण बदलते. अशा पित्ताम्ले कमी असणाऱ्या पित्तरसाला ‘अश्मरी उत्पादक’ पित्तरस म्हणतात.त्यातील कोलेस्टेरॉल विद्राव्य अवस्थेत न राहू शकल्यामुळे त्याचे अवक्षेपण होते व ‘कोलेस्टेरॉल पित्ताश्मरी’ तयार होतो.

सूक्ष्मजंतु–संक्रामण

स्ट्रेप्टोकोकाय, कॉलिफार्म बॅसिलाय, टायफॉइड बॅसिलाय, अ‍ॅक्टिनोमायसीज इ. सूक्ष्मजंतू पुष्कळ वेळा पित्ताश्मरीच्या गाभ्यात आढळतात. हे सूक्ष्मजंतू पित्ताशयापर्यंत रक्तप्रवाहातून पोहोचतात किंवा आंत्रमार्गातून (आतड्याच्यामार्गातून) लसीकावाहिन्यांतूनही (ऊतकांकडून-समान रचना आणि कार्य असणाऱ्या पेशीसमूहांकडून-रक्तात मिसळणारा व रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतूनही) तेथे जातात. तेथे शोथ (दाहयुक्त सूज) उत्पन्न करतात आणि या शोथजन्य पदार्थावर (मृत श्लेष्मकोशिका, मृतसूक्ष्मजंतू वगैरे) पित्ताश्मरी बांधला जातो. कधीकधी जंताच्या अंडयाभोवती पित्ताश्मरी तयार होतो. क्वचित वेळा टोमॅटोच्या सालीचा तुकडा किंवा इतर बाह्य पदार्थावरही पित्ताश्मरी तयार झाल्याची उदाहरणे आहेत

पित्तरस स्तंभन

पित्तरस पित्ताशयातून बाहेर पडण्यास नेहमीपेक्षा विलंब लागल्यास तो काही काळापर्यंत तेथेच साचून राहतो,याला स्तंभन म्हणतात व ते पित्ताश्मरी बनविण्यास मदत करते. गर्भारपणात स्तंभन अनेक वेळा होते. बहुप्रसवा स्त्रियांतील पित्ताश्मरींच्या जादा प्रमाणाचे हे एक कारण असावे. याशिवाय पित्ताशयातील पित्तरस आणि त्यात जमा होण्याकरिता येणारा पित्तरस यांच्या विशिष्ट गुरुत्वातील फरकामुळे थरावर थर तयार होतात.

रचना व प्रकार

पित्तरसतील घटकांपासून पित्ताश्मरी बनतात. कोलेस्टेरॉल, मोनोहायड्रेट कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम बिलिरुबिनेट हे घटक पित्ताश्मरी उत्पन्न होण्यात प्रमुख असतात. यांशिवाय काही अकार्बनी कॅल्शियम लवणे, काही कार्बनी पदार्थ व प्रथिनेही पित्ताश्मरी तयार होण्यात भाग घेतात. बहुतेक पित्ताश्मरी कोलेस्टेरॉल व कॅल्शियम बिलिरुबिनेट यांच्या एकाआड एक असलेल्या थरांचे बनतात. रक्तविलयनजन्य (रक्तातील तांबड्या पेशींपासून रक्तारुण म्हणजे हीमोग्लोबिन अलग होण्यामुळे निर्माण होणाऱ्या) विकृतीत ⇨ पित्तारुणाचे प्रमाण वाढून या पित्तरंजकापासून पित्ताश्मरी तयार होतात. शुध्द कोलेस्टेरॉल किंवा शुध्द पित्तरंजक पित्ताश्मरी फार कमी प्रमाणात आढळतात. पित्ताश्मरींचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत (आ.१).

शुध्द कोलेस्टेरॉल पित्ताश्मरी

क्वचित आढळणारा हा प्रकार कोलेस्टेरॉल अवक्षेपणापासून बनतो.बहुधा एकटाच आढळणारा हा पित्ताश्मरी १ ते ४ सेंमी. व्यासाचा, आकाराने अंडाकृती किंवा गोलअसतो. तो वजनाने हलका असून त्याचा रंग फिक्कट पिवळा असतो. तो कापल्यास त्याचा अंतर्भागकोलेस्टेरॉल स्फटिकांच्या अरीय रचनेचा बनलेला दिसतो. अपारदर्शी नसल्यामुळे तो साध्या क्ष-किरण चित्रणात दिसत नाही. एकूण पित्ताश्मरींमध्ये याचे प्रमाण ६% असते.

पित्तरंजक पित्ताश्मरी

फक्त कॅल्शियम बिलीरुबिनेटापासून हा पित्ताश्मरी बनतो. बहुधा अनेक पित्ताश्मरी असतात. ५ मिमी. ते अगदी बारीक वाळूच्या खडयाच्या आकारमानाचे हे अश्मरी रंगाने काळे किंवा काळपट हिरवे असतात. आकाराने ओबडधोबड असून अंतर्भाग अस्फटिकी असतो. ते साध्या क्ष-किरण चित्रणात दिसत नाहीत. त्यांचे प्रमाण १२% असते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate