অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खंडतालु

 

मुखकुहर (तोंडाची पोकळी) व नासाकुहर (नाकाची पोकळी) यांच्या मधल्या आडव्या पडद्यामधील जन्मजात दोषांमुळे उत्पन्न होणाऱ्या व्यंगाला ‘खंडतालु’ असे म्हणतात. भ्रूणाच्या (दोन महिन्यांच्या आतील गर्भाच्या) मुखकुहराची वाढ योग्य तऱ्हेने न झाल्यास हा विकार दिसतो. कित्येक वेळा वरचा ओठ, कठीण तालू आणि मृदू तालू या सर्वांमध्ये एकाच वेळी व्यंग दिसते.

या विकाराचे मूळ कारण अज्ञात आहे. आनुवंशिकता व गर्भारपणी मातेच्या आहारातील दोष ही कारणे सांगतात, परंतु त्यांसंबंधी निश्चित विधान करता येत नाही.

या व्यंगामुळे नाक बसके, थापटके असून एका बाजूस पसरलेले आणि वाकडे दिसते. मुख आणि नाक यांमधील पडद्यामध्ये खंड पडलेला असल्यामुळे गिळणे, चोखणे या क्रिया करीत असताना तोंडातून नाकात दुध व अन्न गेल्यामुळे ते नाकावाटे बाहेर पडते. मूल मोठे होऊ लागले म्हणजे बोलण्यात दोष दिसू लागतो. विशेषत: तालव्य उच्चार नीट होत नाहीत. आवाज नाकातून येतो. नाक व तोंडाची आतील पोकळी एकच असल्यामुळे रुची, गंध आणि क्वचित श्रवण या संज्ञांमध्ये उणीव दिसते.

भ्रूणावस्थेच्या पाचव्या आठवड्यापासून बाराव्या आठवड्यापर्यंत चेहऱ्यातील नाक, तोंड, कठीण व मृदू तालू, ओठ आणि पुढचे चार दात यांची वाढ होते. ही वाढ चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी होऊन नंतर त्या दोन्ही बाजू मध्य रेषेत एकमेकींस मिळून एकजीव होतात; त्यामुळे नाक, ओठ, दात आणि तालू या अवयवांचे एकसंधीकरण होते. ही क्रिया मध्येच खंडित झाली तर खंडतालू आणि खंडौष्ठ (फट असलेला ओठ) ही व्यंगे उत्पन्न होतात.

खंडतालूचे तीन प्रकार दिसतात: (१) कठीण तालू पूर्णपणे वाढली असून मृदू तालू आणि पडजीभ येथे खंड असणे, (२) कठिण व मृदू तालू या दोन्ही ठिकाणी खंड असणे आणि (३) क्वचित दोन्ही बाजूंच्या तालू आणि पुढचे दात यांमध्ये खंड असणे. बहुधा खंडतालूबरोबर वरच्या ओठात खंडौष्ठही असतो. खालच्या ओठात मात्र खंडौष्ठ बहुधा दिसत नाही.

शस्त्रक्रिया

या विकारावर शस्त्रक्रिया हा एकच उपाय आहे. ही शस्त्रक्रिया शक्य तितक्या लवकर म्हणजे मूल बोलू लागण्याच्या आधी करतात. वयाच्या दीड ते तीन वर्षांपर्यंत शस्त्रक्रिया केली असता पुष्कळ गुण दिसतो. जितका उशीर होईल तितका दोष कायम राहण्याचा संभव असतो.

शस्त्रक्रियेसाठी विशेष तंत्र वापरावे लागते. पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेमध्ये (प्लॅस्टिक शस्त्रक्रियेमध्ये) पुष्कळच प्रगती झालेली असल्यामुळे या विकारावर परिणामकारक उपाय करणे शक्य झालेले आहे. शस्त्रक्रियेच्या वेळी विशिष्ट पद्धतीचे शुद्धिहरण (भूल देण्याचे) तंत्र वापरावे लागते. तोंडातून शस्त्रक्रिया करावी लागत असल्यामुळे जखम पूर्ण भरून येऊन टाके काढून टाकीपर्यंत तोंड बंद करावे लागते. त्यामुळे तेवढ्या अवधीत नाकातून नळीने अन्न देणे आणि श्वासनालाला भोक पाडून त्या मार्गाने श्वसन चालू ठेवणे जरूर पडते. तालू अतिशय पातळ आणि नाजूक असल्यामुळे नायलॉन अथवा तत्सम अतिबारीक परंतु भक्कम दोरा वापरावा लागतो. दोन्ही बाजू एकमेकींस नीट जुळाव्या व त्या एका रेषेत याव्या यांसाठी विशेष प्रयत्न करावा लागतो.

आयुर्वेदीय चिकित्सा

खंडतालूच्या परस्परांसमोर असलेल्या अर्धावर शस्त्राने त्वचा व मांस यांवर छेद घेऊन ते ताणून एकमेकांस जोडावे आणि शिवल्यानंतर रक्तचंदन, रसांजन, जेष्ठमध ह्यांचे चूर्ण वर भूरभूरून त्याच्यावर पांढऱ्या तिळाच्या तेलात कापसाचा बोळा भिजवून तेल टाकावे आणि अन्न व्यवस्थित रीतीने जिरल्यावर रिकाम्या पोटी गाईचे तूप पाजावे. नंतर योग्य रीतीने विरेचन देऊन कोठा शुद्ध करून व गहू, सातू, तूप, मूग असे पदार्थ आहारात देऊन तांदूळ, ताक, दूध इ. पू निर्माण करणारे पदार्थ आहारात वर्ज्य करावे.

लेखक : वेणी माधवशास्त्री जोशी, वा. रा.ढमढेरे,

संदर्भ : Holdsworth, W. G. Cleft Lip and Palate, London, 1963.

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate