शरीराच्या एखाद्या भागातील पेशींची अपसामान्य वाढ होऊन तयार होणार्या निरुपयोगी गाठीला 'अर्बुद' असे म्हणतात. पेशींच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे पेशीविभाजनासाठीची जनुके पेशीविभाजन नियंत्रित करतात. काही रसायने, किरणोत्सार, विषाणू इत्यादींमुळे पेशीविभाजनावर परिणाम घडून येतो. परिणामी पेशींची अपसामान्य वाढ होऊन पेशींच्या गाठी म्हणजेच अर्बुदे तयार होतात. अर्बुदे सौम्य, पूर्वमारक किंवा मारक असू शकतात. प्रत्येक अर्बुद म्हणजे कर्करोग नसतो. कर्करोगाच्या व्याख्येनुसार मारक अर्बुदामुळे कर्करोग उद्भवतो. अर्बुदाच्या ऊतींच्या नमुन्याची जीवोतक चाचणी केल्यास त्याचे स्वरूप स्पष्ट होते. काही अर्बुदे कायम सौम्य, तर काही प्रथम सौम्य व नंतर मारक होतात आणि काही प्रथमपासून मारक असतात. मूळ पेशीच्या नावापुढे अर्बुद किंवा कर्क हा शब्द जोडून त्या पेशीच्या अनुक्रमे सौम्य वा मारक अर्बुदाला नाव दिले जाते. (उदा., स्नायू-अर्बुद, स्नायुकर्क).
या प्रकारात ऊतींमधील पेशींपासून विभाजनाने नवपेशीसमूह निर्माण होतो. कालांतराने हे विभाजन थांबते. या अर्बुदातील पेशी एका संपुटात असतात. या संपुटात नवसमूहातील पेशींची वाढ हळुहळू होत असते. मात्र या अर्बुदातील पेशी शेजारच्या ऊतींवर आक्रमण करीत नाहीत किंवा या पेशींचे विक्षेपण अन्य अवयवांवर होत नाही. म्हणून याला सौम्य अर्बुद म्हणतात. सौम्य अर्बुदे कोणत्याही ऊतींमध्ये व कोणत्याही अवयवांमध्ये होऊ शकतात. उदा., मेंदूचे अर्बुद, चामखीळ इत्यादी. सौम्य अर्बुदे भोवतालच्या ऊतींवर दाब देऊ शकतात; पण अन्य परिणाम करीत नाहीत. अशा अर्बुदामुळे त्या अवयवाच्या कार्यप्रणालीत बदल घडून येत असल्यास अथवा शरीराला विद्रपता येत असल्यास, तसेच काही अर्बुदांमध्ये मारक प्रवृत्ती निर्माण होण्याची शक्यता असल्याने शस्त्रक्रियेद्वारे ती काढून टाकणे. अधिक योग्य ठरते. सौम्य अर्बुद काढून टाकल्यास पुन्हा त्याची वाढ होत नाही.
कर्करोगग्रस्त गालावरील अर्बुद
या प्रकारात ऊर्तीमधील पेशींपासून राक्षसी नवपेशीसमूह निर्माण होतो. या पेशींची वाढ सतत व अनियंत्रित होत असते. अशा कर्कजन्य पेशींवर संपुट नसल्यामुळे या पेशी प्राथमिक अर्बुदापासून वेगळ्या होतात. वेगळ्या झालेल्या पेशी रक्त व लसीका वाहिन्यांद्वारे शरीरभर वाहत जाऊन इतर अवयवांत स्थापित होतात. अशा प्रकारे शरीरातील इतर अवयवांमध्ये अर्बुदाची वाढ होते. यालाच प्रक्षेप म्हणतात. मारक अर्बुदामुळे शरीराच्या इतर अवयवांतील पेशींचा नाश होतो. अशा प्रकारची अर्बुदे शस्त्रक्रियेने काढता येत नाहीत. काढली असता उत्परिवर्तनाने पुन्हा तयार होऊ शकतात. फुफ्फुस, स्तन, मुख व गर्भाशय यांच्या कर्करोगातील अर्बुदे या प्रकारात मोडतात. या अर्बुदांमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्यामुळे याला मारक वा उपद्रवी अर्बुद असेही म्हणतात. कर्कजन्य पदार्थांचा सतत वापर, व्यसने, काही विषाणू यांमुळे मारक (दुर्दम्य) अर्बुदे होतात. प्रधान, शशिकांत
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020