অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अल्झायमर विकार

अल्झायमर विकार

माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. तो स्वत्व हरवतो, कार्यकारणाचा अभाव होतो व स्वत:कडे लक्ष द्यायला असमर्थ होतो. १९०७ मध्ये अ‍ॅलॉइस अल्झायमर यांनी हा रोग शोधून काढला. चोर पावलांनी येणारा हा स्मृतिभ्रंश वाढत्या वयानुसार वाढत जातो.

अल्झायमर विकारातील चेतातंतूची स्थिती

अल्झायमर रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीस रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. यानंतर गोंधळलेली मनोवृत्ती व विसराळूपणा येतो. रुग्ण तोच तो प्रश्न विचारत राहतो, नेहमीचा रस्ताही विसरतो. स्थितिज्ञान जाते. हळूहळू भूतकाळ हरवतो. त्या व्यक्तीला निरनिराळे भास होतात. मधूनच अशी व्यक्ती आक्रमक होते. वाचणे, लिहिणे, बोलणे, चालणे यांची क्षमता कमी होत जाते. नैसर्गिक विधीही समजत नाहीत. त्यामुळे त्यावरचे नियंत्रणही जाते. शेवटी स्नायू र्‍हासामुळे सर्व हालचाली मंदावतात व रुग्ण बिछान्यात पडून राहतो. प्रतिकारशक्तीही हळूहळू क्षीण होते. बहुधा न्यूमोनियाने या रुग्णाचा अंत होतो.

अल्झायमर रुग्णांचे शवविच्छेदन केले असता पुढील बाबी आढळल्या आहेत: रुग्णाच्या मेंदूच्या विशिष्ट भागातील चेतापेशी कमी होतात. चेतापेशीच्या बाहेर अपसामान्य प्रथिने असतात आणि चेतापेशींमध्येही या प्रथिनांचे तंतू आढळतात. त्यात ए-६८/टाऊ नावाचे प्रथिन आढळते. हिप्पोकॅंपस व प्रमस्तिष्काचे बाह्यक यांत चेतापेशींचा र्‍हास जास्त झालेला आढळतो. बाह्यकातील अनेक प्रथिने कमी होतात, तसेच अ‍ॅसेटिल कोलीन हा चेताप्रक्षेपक कमी होतो. चेतापेशींच्या र्‍हासाबरोबरच चेतापेशींपासून निघणार्‍या अक्षतंतूंभोवती पिष्ठाभर्‍हास (अ‍ॅमिलॉइडर्‍हास) दिसतो. या र्‍हासात बीटा-अ‍ॅमिलॉइड प्रथिनांचा थर मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर व अक्षतंतूंभोवती आढळतो. सामान्य वृद्धांत ही अ‍ॅमिलॉइड प्रथिने आढळत नाहीत.

अल्झायमर रोगाचे सुरुवातीस निदान करणे कठिण असते. वयपरत्वे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. चालताना पाय अडखळतात. स्नायूंचा ताठरपणा इतर हालचालींत अडथळा आणतो. वार्धक्य व आनुवंशिकता यांमुळे हा रोग होण्याची शक्यता असते. चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन (एम्.आर्.आय्. - मॅग्नेटिक रेझोनन्स इमेंजिंग) व सी. टी. स्कॅन (कॉम्प्युटरराइज्ड टोमोग्राफी) या तपासण्यांमध्ये मेंदूच्या प्रमस्तिष्काच्या बाह्यकांचा र्‍हास दिसतो. पी.ई.टी. (पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी) चाचणीत मेंदूच्या दोन्ही बाजूंचा र्‍हास दिसतो.

या रोगावर उपचाराचे खास परिणामकारक औषध उपलब्ध नाही. रुग्णाच्या कुटुंबियांना या रोगाची माहिती देणे आवश्यक असते. अशा रुग्णांची काळजी नीट घ्यावी लागते. हे काम कठिण व धीराचे असते. सध्या तरी टॅक्रीन हे एकच औषध या रोगावर आहे. ते सुरुवातीला दिल्यास रुग्णात परिणाम होऊ शकतो. यासोबत पूरक म्हणून जीवनसत्त्वाच्या गोळ्या देतात.

सध्या जगभर माणसाची सरासरी आयुर्मर्यादा वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. सामान्यपणे ८५ वर्षांवरील सु. ५० % वृद्ध अल्झायमरग्रस्त आढळून येतात. विविध शासकीय आणि सेवाभावी संस्थांकडून अशा रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्याचे प्रयत्‍न चालू आहेत.

प्रधान, शशिकांत

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate