অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य

आरोग्यसंपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करण्याची कृती किंवा प्रक्रिया म्हणजे ‘सार्वजनिक स्वच्छता’ होय. सार्वजनिक आरोग्य म्हणजे समाजाच्या किंवा एकूण लोकसंख्येच्या आरोग्याची अवस्था होय. लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे व ते सुधारणे यांसाठी समाजाने संघटित केलेल्या प्रयत्नांना ‘सार्वजनिक आरोग्य’ म्हणतात. यामध्ये विविध विज्ञान शाखा, कौशल्य व लोकसमजुती यांचा समावेश होतो, म्हणजे सामूहिक कृतींद्वारे आरोग्य टिकविण्याच्या व सुधारण्याच्या दृष्टीने या प्रणालीचा उपयोग करतात. सार्वजनिक आरोग्यविषयक कार्यक्रम व सेवा आणि त्यात कार्यरत असलेल्या संस्था यांमध्ये रोगांचा प्रतिबंध करणे, समग्र लोकसंख्येच्या आरोग्यविषयक गरजा भागविणे यांच्यावर भर देतात. रोगांचे प्रमाण, अकाल मृत्यू, शारीरिक दौर्बल्य, अस्वास्थ्य, कुपोषण इ. कमी करणे हे सार्वजनिक आरोग्याचे जादा वा पूरक उद्दिष्ट असते.

सार्वजनिक स्वच्छता

सार्वजनिक स्वच्छता हे सार्वजनिक आरोग्याचे एक महत्त्वाचे अंग आहे. रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी पर्यावरणाचे नियमन करणाऱ्या यंत्रणा विविध प्रयत्न करतात. असे प्रयत्न सार्वजनिक स्वच्छतेचाच भाग असतात. सार्वजनिक स्वच्छतेत व्यक्तिगत स्वच्छताही अंतर्भूत असते. कारण व्यक्तिगत स्वच्छतेमुळे समाजाचे रोगांपासून रक्षण करण्याच्या कामाला मदत होते.

अनेक प्रकारचे व्यवसाय व विविध शासकीय यंत्रणा समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी एकत्रितपणे काम करतात. पिण्याच्या तसेच वापरावयाच्या पाण्यावर संस्करण करणारी संयंत्रे, वाहितमलावर (सांडपाण्यावर) संस्करण करणारी संयंत्रे यांचे अभिकल्प (आराखडे) तयार करणे व ही संयंत्रे व्यवस्थित चालू ठेवणे ही कामे स्वच्छता अभियंते करतात. निरोगी पर्यावरण वृद्घिंगत करण्याला साहाय्यभूत ठरतील असे कायदे तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम शासकीय यंत्रणा करतात. अन्न व खाद्यपदार्थांवर संस्करण वा प्रक्रिया करणे आणि त्यांचे वाटप करणे, घन कचऱ्याची विल्हेवाट लावणे, तसेच पाण्यावर व वाहितमलावर संस्करण करणे ही सार्वजनिक स्वच्छतेची कामे आहेत. शिवाय हवेचे प्रदूषण व कृंतक(कुरतडणारे) प्राणी यांचे नियंत्रण करण्याचे कामही सार्वजनिक स्वच्छतेत येते.

अन्न संस्करण व वाटप

सूक्ष्मजंतू, व्हायरस, कृमी व इतर जीव आणि रासायनिक विषारी द्रव्ये यांच्यामुळे खाद्यपदार्थ व पेये यांचे सहजपणे संदूषण होते. तयार खाद्यपदार्थ व पेये यांचे नियंत्रण सर्वसाधारणपणे शासकीय यंत्रणा करतात. या यंत्रणा पशुपक्ष्यांच्या कत्तलीपूर्वी व कत्तलीनंतरही मांस परीक्षण करतात. तसेच खाद्यपदार्थांवरील संस्करण, त्यांच्यावर लावावयाच्या खुणेच्या चिठ्ठ्या व त्यांची आवेष्टने यांचीही तपासणी या यंत्रणा करतात. शिवाय खाद्यपदार्थ व पेये यांच्या वाटपावरही या यंत्रणा लक्ष ठेवतात. एकूणच खाद्यपदार्थांचे उत्पादन, संस्करण, हाताळणी इत्यादींसाठी असलेल्या आवश्यक कायदेशीर बाबींची अंमलबजावणी या यंत्रणा न चुकता करतात.

वाहितमल संस्करण व विल्हेवाट

लोकांनी निर्माण केलेले व केरकचऱ्यासारखी निरूपयोगी द्रव्ये वाहून नेणारे पाणी वा द्रव म्हणजे वाहितमल होय. अशा सांडपाण्यात सु. एकदशांश टक्क्यांपर्यंत घनरूप अपशिष्टे (टाकाऊ द्रव्ये) असतात. घरातील स्नानगृहे, स्वच्छतागृहे, पाळीव जनावरांचे गोठे इ. ठिकाणांतून येणारे घन पदार्थ मिसळलेले पाणी, कारखान्यांतून बाहेर पडणारे सांडपाणी व त्याबरोबर येणारे निरूपयोगी पदार्थ, शेतीवाडी, उपाहारगृहे, कार्यालयीन इमारती इत्यादींमधून येणारे सांडपाणी, तसेच पाऊस पडल्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांतून किंवा नळांमधून वाहणारे पाणी यांचा वाहितमलात अंतर्भाव होतो.

पुष्कळशा औद्योगिक वाहितमलात घातक रसायने व इतर टाकाऊ पदार्थ असतात. यामुळे अशा वाहितमलावर संस्करण करूनच ते नद्या, सरोवरे, समुद्र किंवा इतर जलाशयांत सोडणे आवश्यक असते अन्यथा जलाशय असंस्कारित वाहितमलामुळे संदूषित होऊ शकतात. काही वेळा अशा संदूषित पाण्यामुळे जलचर प्राणी व वनस्पती मरतात. तसेच वाहितमलामुळे पाणी पिण्याच्या दृष्टीने असुरक्षित होऊन पिण्यालायक राहत नाही. एवढेच नव्हे तर असे पाणी पोहणे, मासेमारीचा छंद व इतर मनोरंजनाच्या दृष्टीनेही निरूपयोगी होते.

लोकसंख्या वाढली की वाहितमलाची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्याचे काम अधिक गुंतागुंतीचे होते. पूर्वी ग्रामीण भागात वाहितमल जवळच्या जलाशयात सोडीत असत; मात्र हे धोकादायक ठरते. अर्थात ही प्रथा पूर्णपणे बंद झालेली दिसत नाही. ग्रामीण भागांतही स्वच्छता अभियांत्रिकीची तंत्रे वापरून घरगुती सांडपाणी व मानवनिर्मित अपशिष्टे यांची विल्हेवाट लावतात. बहुतेक मोठ्या शहरांत आणि काही गावांतही किमान एक तरी वाहितमल संस्करण संयंत्र असते. तथापि, बहुतेक ग्रामीण भागांत वाहितमल संस्करणाची सोय उपलब्ध नसते. अशा ठिकाणी पूतिकुंड (सेप्टिक टँक) प्रणालीद्वारे घरगुती सांडपाण्याची विल्हेवाट लावतात. या प्रणालीत सर्व प्रकारचे सांडपाणी भूमिगत व जलाभेद्य टाकीत म्हणजे पूतिकुंडात सोडतात. तेथे सांडपाण्यावर सूक्ष्मजीवांची क्रिया होते व सांडपाण्यातील बहुतेक घनपदार्थाचे अपघटन होते. त्यातून उत्सर्जित होणारे वायू बाहेर पडतात किंवा निचऱ्याच्या नळांत जातात. नंतर द्रव व वायू टाकीच्या माथ्यावरील निर्गमन मार्गावाटे बाहेर पडतात. टाकीचा निर्गमन मार्ग सामान्यपणे जमिनीपासून सु. ६० सेंमी. उंचीवर असतो. अपघटन न झालेले घन पदार्थ टाकीत खाली बसतात. शेवटी ते तेथून काढून त्यांची सुरक्षितपणे विल्हेवाट लावतात. पूतिकुंड प्रणालीमुळे ग्रामीण भागात व शेतीवाडीवर आधुनिक प्रकारची स्नान सुविधा आणि वाहितमल विल्हेवाटीच्या स्वच्छता पद्घती वापरणे शक्य झाले आहे. [⟶ वाहितमल; वाहितमल संस्करण व विल्हेवाट; औद्योगिक अपशिष्ट].

-----------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate