तूलूझ
तूलूझ : (रोमकालीन तलोसा). द. फ्रान्समधील ऑट गारॉन प्रांताची राजधानी. लोकसंख्या ३,९६,८०० (१९७१ अंदाज). बॉर्दोच्या आग्नेयीस २१३ किमी.वर मोक्याच्या जागी असलेले हे इतिहासप्रसिद्ध शहर लोहमार्ग प्रस्थानक, कालव्यावरील बंदर, फ्रान्सच्या विमान उद्योगाचे केंद्र व दक्षिणोत्तर जाणाऱ्या मार्गांचे केंद्र असून पिरेनजीजमधील प्रवाहांमुळे उपलब्ध झालेल्या जलविद्युत शक्तीमुळे विकास पावलेल्या दारूगोळा, खते, कागद, कापड, कातडी सामान, तंबाखू, यंत्रे, रासायनिक पदार्थ इत्यादींच्या कारखान्यांमुळे औद्योगिक दृष्ट्या पुढारलेले आहे.