घोगर
घोगर : (गोगर्ली, पापुर, पांडरू; हिं. पाप्रा; क. कळकंबी; इं. इंडियन बॉक्सवुड, गार्डेनिया; लॅ.गार्डेनिया लॅटिफोलिया; कुलरूबिएसी). हा सु. ३-५ मी. उंच व ०.९-१.२ मी. घेर असलेला लहान पानझडी वृक्ष श्रीलंकेत व भारतात सर्वत्र शुष्क जंगलात आढळतो. फांद्या ताठर व सरळ पसरलेल्या असून वृक्षाचा माथा गोलाकार असतो. साल गुळगुळीत व फिकट करडी असून तिचे गोलसर तुकडे निघून जातात.