धरमशाला
धरमशाला : धर्मशाळा. हिमाचल प्रदेश राज्याच्या कांग्रा जिल्ह्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या १०,९३९ (१९७१). हे या जिल्ह्यातील एक महत्त्वाचे गिरिस्थान असून ते कांग्राच्या ईशान्येस सु. २६ किमी आहे. या गिरिस्थानाचे दोन भाग असून वरच्या भागाची उंची सु. २,१६८ मी. व खालच्या भागाची उंची १,३७२ मी. आहे. येथे पूर्वी हिंदूंची एक धर्मशाळा (विश्रांतिगृह) होती. त्यावरूनच या ठिकाणाला धरमशाला असे नाव पडले असावे. इंग्रजांच्या अमदानीत येथे स्थापन झालेली लष्करी छावणी, आल्हाददायक हवामान आणि सृष्टीसौंदर्य यांमुळे लवकरच हे पर्यटकांचे एक आकर्षण केंद्र बनले.